महान चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांची आज पुण्यतिथी. त्यांचे आयुष्य आणि त्यांची कला हे अगदी परस्परविरोधी. आपल्या मृत्यूपश्चात जगभरात नावलौकीक मिळवणारा हा माणूस अक्षरश: शापीत आयुष्य जगला. त्यांच्या आयुष्यावर आयर्विंग स्टोन यांनी लिहलेले ‘लस्ट फॉर लाईफ’ हे नितांतसुंदर पुस्तक फार आधीच वाचनात आले. यानंतर यावर आधारित चित्रपटही पाहिले. व्हिन्सेंटविषयी बरेच काही वाचले आणि पाहिले असून खरं तर हे अव्याहतपणे सुरूच आहे. आज मात्र थोडा वेगळा विषय. यातून एकाच कलेकडे विविध प्रतिभावंत कशा नजरेने पाहतात याची जाणीव आपणास होऊ शकते.
ज्यांना वर्ल्ड सिनेमा जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी काही मान्यवरांना टाळणे अशक्य आहे. यातील आघाडीवरचे नाव अर्थातच विख्यात जपानी दिग्दर्शक अकिरा कुरूसावा यांचे होय. राशोमोनसह त्यांचे बहुतांश चित्रपट हे मानवी जीवनाचे विविध पैलू आपल्याला उलगडून दाखवतात. कुरूसावा हे रूढ अर्थाने चित्रकार नव्हते. तथापि, त्यांच्या काही चित्रपटांमध्ये (उदा. रान) रंगांची विलक्षण उधळण ही कुणालाही मोहीत केल्याशिवाय राहत नाही. अर्थात रंग व रेषांची त्यांना उत्तम जाण होती. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात कुरूसावा यांनी १९९० साली ‘ड्रीम्स’ हा चित्रपट निर्मित केला. याची खासियत म्हणजे यात त्यांनी पहिल्यांदाच आपल्या चित्रपटाची पटकथा लिहली होती. या सिनेमाचे कथानक एका रेषेतील नाहीय. खुद्द अकिरा कुरूसावा यांना बालपणापासून पडणार्या विविध स्वप्नांना त्यांनी यातून रूपेरी पडद्यावर साकारले आहे. यात त्यांनी आपली आठ स्वप्ने एका पाठोपाठ गुंफली आहे. यातील ‘क्रोज’ हे सातवे स्वप्न हे व्हिन्सेंट व्हॅन गॉगशी संबंधीत आहे. हा अवघ्या दहा मिनिटांचा तुकडा कलेवर प्रेम करणार्याला मोहीत केल्याशिवाय राहत नाही. विशेष बाब म्हणजे यात व्हिन्सेंटच्या प्रतिभेला अकिरा कुरूसावा यांच्यासोबत दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे दृश्यकलेचे गाढे अभ्यासक मार्टीन स्कोर्सेसी व हॉलीवुडमधील लीजंडरी व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे जॉर्ज लुकास यांचा परिसस्पर्श झाला आहे. अर्थात चार प्रतिभावंताच्या मिलाफातून ही अजोड कलाकृती आकारास आली आहे. व्हिन्सेंटची चित्रे, कुरूसावाचे लेखन व सिनेमॅटोग्राफी, स्कोर्सेसीने वठवलेली व्हिन्सेंटची भूमिका आणि लुकासचे स्पेशल इफेक्टस् आदींमधून वास्तव व आभासाच्या सीमारेषेवर प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार आपण यातून अनुभवू शकतो.
(खालील व्हिडीओ पहा अकिरा कुरूसावा यांची ही कलाकृती)
Yume (Dreams) – Cuervos from abZurdo on Vimeo.
अकिरा कुरूसावा यांना या स्वप्नात चित्रकलेचा विद्यार्थी म्हणून दाखविण्यात आले आहे. तो एका कला दालनात व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या कलाकृतींना अनिमिष नेत्रांनी न्याहळत असतो. आलटून-पालटून तो गाजलेली चित्र पाहत असतांना अचानक ‘लँग्लोईज ब्रिज ऑफ अर्ल्स’ या विख्यात चित्राच्या फ्रेममध्ये तो (स्वप्न पाहणारा) शिरतो, आणि सुरू होते एक जादूई सफर ! व्हिन्सेंटने या पुलाशी संबंधीत चार छायाचित्रे काढली आहेत. दक्षीण फ्रान्समधील अर्ल्स या शहरात वास्तव्यास असतांना याला रेखाटण्यात आले आहे. वास्तविक पाहता हा व्हिन्सेंटच्या आयुष्यातील सर्वात झपाटलेला कालखंड होय. येथील उण्यापुर्या १५ महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी सुमारे दोनशे चित्रे, शंभर रेखाटने काढली. याच्या जोडीला त्यांनी आपला भाऊ थिओसह इतरांना सुमारे दोनशे पत्रदेखील लिहली. याच अर्ल्समधील पुलाखालून सूत्रधार व्हिन्सेंटला शोधण्यासाठी निघतो. हा सर्व प्रवास येथे सांगणे अप्रस्तुत ठरेल. आपण तो सोबत दिलेल्या व्हिडीओमधून स्वत: अनुभवू शकतात. तथापि, यातील काही सौंदर्यस्थळे हृदयाला स्पर्श करण्यावाचून राहत नाहीत.
व्हिन्सेंट व्हॅग गॉगला भेटण्यासाठी यातील नायक झपाटल्यागत भ्रमंती करतो. याला प्रतिकात्मक पध्दतीने दर्शवितांना अकिरा कुरूसावा यांनी व्हिन्सेंटच्याच विख्यात कलाकृतींना आधार बनविला आहे. विविध पेंटींग्जमधून व्हिन्सेंटचा शोध घेण्याचे हे प्रतिक अतिशय विलोभनीय पध्दतीत दर्शविण्यात आले आहे. यात व्हिन्सेंटच्या कलाकृतींमधील निसर्ग आणि एकंदरीत भोवताल आलेला आहे. हिरवीगार शेते, कुरणे, फुलांच्या ताटव्यांनी बहरलेले रस्ते आदींमधून मार्ग काढत नायक व्हिन्सेंटला एका हंगाम संपलेल्या वैराण वाटणार्या शेतात भेटतो. नायक त्याच्याकडून कलेबाबतचे विचार काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तथापि, तुटक शब्दांच्या पलीकडे हा महान चित्रकार बोलत नाही. यात आपण ऑटोमोटीव्ह म्हणजेच रेल्वे इंजिनाच्या त्वरेने रेखाटन करत असल्याचे सूचविण्यास तो विसरत नाही. व्हिन्सेंटच्या झपाटलेपणास आधुनिक युगातील उपमा आपल्याला खटकत नाही. किंबहुना यातून त्याच्या सृजनातील त्वरा लक्षात येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे चॉपीन या महान संगीतकाराचा एक तुकडा यामध्ये अतिशय चपखलपणे वापरण्यात आला आहे. यामुळे याला अजूनच नवीन उंची प्रदान करण्यात आली आहे.
यातील शेवटचे दृश्य अतिशय परिणामकारकतेने चित्रीत करण्यात आलेले आहे. व्हिन्सेंटला पुन्हा एकदा भेटण्यासाठी आटापिटा करणार्या नायकाची ही त्याच्यासोबतची शेवटची भेट असते. यात पुन्हा एकदा वास्तवात हिरवागार भोवताल असतांना वाळलेल्या गव्हाच्या शेतांमधील एका पायवाटेवरून जाणार्या व्हिन्सेंटची पाठमोरी आकृती त्याला दिसते. हातात कॅनव्हास आणि पाठीवर कुंचले, रंग आदींनी भरलेली बॅग लटकावल्यामुळे तो एखाद्या बुजगावण्यासारखा दिसतो. नायकाने आवाज देऊनही तो याला काहीही प्रतिसाद न देता झपाझप चालत राहतो. रस्त्याच्या वरील टोकावर पोहचतांना तो हळूच नाहीसा होतो. याच क्षणाला असंख्य कावळे काव-काव करत पडद्यावर येतात. व्हिन्सेंटच्या सृजनाचा वसंत आणि ग्रीष्म याला एकाच वेळी विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीने यात दाखविण्यात आलेले आहे. अर्थात याच्या जोडीला त्याच्या स्वभावातील तर्हेवाईकपणाही स्पष्टपणे दाखविण्यात अकिरा कुरूसावा यशस्वी झाले आहेत. त्यांचे हे स्वप्न संपूनही आपल्या मनात रेंगाळत राहते हीच त्यांच्या प्रतिभेची महत्ता.
छान मांडणी शेखरभाई