Featured अनुभव आध्यात्म

वारीची वेळ येणार केव्हा?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या विठुरायाच्या दर्शनासाठी घर-दार सोडून वारीवर जाणार्‍यांचे मला जाम कौतुक वाटते. याला एक वैयक्तीक कारणदेखील आहे. माझी आजी (आईची आई) यशोदाबाई सोपान पाटील ही अव्याहतपणे पायी वारीला जात असे. खरं तर सुनसगाव (ता. भुसावळ) येथील माझ्या आजीचे पुर्वायुष्य अत्यंत खडतर असेच होते. तीन मुली लहान असतांनाच पती वारल्याने तिच्यावर तारूण्यातच वज्राघात झाला होता. संयुक्त कुटुंबातील सर्व जाच आणि कट-कारस्थाने सहन करत ही बाई जिद्दीने आयुष्यात उभी राहिली. तिन्ही मुलींचा संसार मार्गाला लागला. नातवंडेही झाली. लहान असतांना आजी बर्‍याचदा भुसावळला येत असे. मात्र वर्षातील विशिष्ट कालखंडात तिच्या येण्यात बराच काळ खंड पडत असे. विचारणा केली असता ‘आजी वारीला गेली आहे’ हे उत्तर आईकडून मिळत असे. तेव्हा तितके समजत नव्हते. मात्र समजू लागल्यापासून आपली आजी किती ‘दिव्य’ करते याची जाणीव झाली.

मोठा झाल्यानंतर आजीला अनेकदा पंढरपूर येथे बस वा रेल्वेने प्रवासासाठी जाण्याचे मी सुचविले. याला ती कधीही तयार झाली नाहीच. मला अनेकदा आश्‍चर्य वाटायचे…या बाईच्या आयुष्यात सुखाचे मोजकेच क्षण आले…दैनंदिन जीवनात तर अनंत अडचणी होत्या. असे असूनही कोणत्या अनामिक ओढीने ती आपला संसार सोडून पंढरपूरला जाते या प्रश्‍नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते. नंतर मात्र मला पडणार्‍या प्रश्‍नांचे उत्तर तिच्या वागणुकीतून दिसू लागले. अत्यंत कष्टदायक आयुष्यातही ती प्रत्येक क्षणाला इतक्या खेळकरपणे जगत होती की कुणीही थक्क व्हावे. लौकीकदृष्ट्या फार शिक्षित नसणारी माझी आजी ओव्या, अभंग, गौळणी, भजने, गोष्टी आदींच्या माध्यमातून आम्हा नातवंडांना ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करत असे. कुणी ऐको वा नको मी मात्र अतिशय लक्षपुर्वक ऐकत असे. याचमुळे मी तिचा खुप लाडका होता. माझ्याही आयुष्यात तिला महत्वाचे स्थान आहे. ‘मी तुझ्याच मांडीवर जीव सोडणार’ असे ती नेहमी म्हणायची तेव्हा मी हसण्यावरी नेत होतो. मात्र कर्मधर्मसंयोगाने तिने माझ्याच मांडीवर प्राण सोडला. या जगातून जाण्याआधी ती म्हणायची ‘‘जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्यात एक तरी पंढरपुरची पायी वारी कर अन् तुकोबाच्या गाथेचे पारायण कर’’ दुर्दैवाने या दोन्ही बाबी आजवर करता आल्या नाहीत. आयुष्यात झपाट्याने खूप वाचन केले. अगदी जगप्रसिध्द अभिजात ग्रंथांपासून ते टाईमपासपर्यंत बरेच वाचले व वाचतही आहे. मात्र जीवनाचे शाश्‍वत सत्य साध्यासोप्या भाषेत सांगणारी आजीने दिलेली तुकोबाची गाथा घरात तशीच पडून आहे याची सल अनेकदा वाटते.vitthal

तुकोबाच्या गाथेचे वाचन आणि त्यावर मनन करणे फारसे अवघड नाही. मात्र एखादी पायी वारी केल्याचा अनुभव घेतल्यानंतरच गाथा वाचावी असा मनाशी संकल्प केला आहे. यासाठी वारीला जाणे क्रमप्राप्त आहे. अर्थात हे काम किती कठीण आहे याची जाणीव आहेच. आजच्या अत्यंत व्यस्त जगामध्ये अगदी तास-दोन तास वाया गेले तरी लगेच मनावरील तणाव वाढतो. यामुळे एक-दीड महिना जवळपास सर्व सोडून पायी वारी करणे फारसे सोपे नाही. आज संपर्काची तमाम साधने आपल्याजवळ आहेत. यामुळे वारीत राहूनही जगाशी ‘कनेक्ट’ राहणे शक्य आहे. किंबहुना वारी करायची तर व्हिडीओ कॅमेरा अन् तमाम गॅजेट्सह असा विचारही मनात आहे. मात्र एक पाऊलही उचलण्यासाठी मन धजावत नाही हेदेखील तितकेच खरे आहे.

खरं तर कोणत्याही कर्मकांडावर माझा अजिबात विश्‍वास नाही. मात्र माझ्या आजीच्या रूपाने मन:पटलावर उमटलेली ‘वारी’ डोक्यातून उतरण्यास तयार नाही. गुरूवर्य झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या दिंडीतून आजी ज्या मार्गाने पंढरपूरला मार्गक्रमण करत जात असे त्याच मार्गावरून आपणही विठुरायाच्या चरणी अर्पण व्हावे हा संकल्प यातूनच जन्माला आला आहे. कदाचित त्या मार्गातील खाचखळगे, झाडे-झुडपे, मंदिरे वा धर्मशाळा आदी मला माझ्या आजींच्या वेदना सांगतील. कधी तरी तिने या सर्वांसमोर आपली व्यथा प्रकट केली असेलच…कधी पिळवटून टाकणार्‍या काळजातून प्रार्थनेची आर्त हाक उमटली असेल…कधी सर्व दु:ख विसरून ती पांडुरंगाच्या नामात रंगली असेल! मला हे अनुभवायचे आहे. पण काय करू यार…दुनियादारीचा हिशोब हे करण्याच्या आड येतोय! रूढ अर्थाने फक्त चार इयत्ता शिकलेल्या आजीला जगण्याचे सत्य या वारीतच गवसले होते. आम्ही चांगले सुशिक्षित अन् तिच्यापेक्षा कित्येक पटीने व सर्वार्थाने समृध्द आयुष्य जगतांनाही प्रत्येक क्षण तणावातच जगतो. आयुष्यात खूप काही मिळाले तरी झोळी अपुर्णच असल्याची अधाशी जाणीव आपल्या मनाच्या कोपर्‍यात कायम ठाण मांडून बसलीय. आजीचा फाटका संसार मात्र कोट्यधिशांनाही लाजविणारा असल्याचे मी स्वत: अनुभवले आहे. मित्रांनो अजून आश्‍चर्यचकीत करणारी एक बाब विसरूनच गेलो…मी तर फक्त माझ्या आजीच्या माध्यमातूनच वारी अनुभवली. एक यशोदाबाई संसारागाड्यातील सर्व अडीअडचणींना घरीच ठेवून नाम रंगात रंगुनी पंढरीच्या वाटेवर चालल्यावर माझ्या मनात प्रश्‍नांचे काहूर उठते….मग हजारो-लाखोंच्या संख्येने इतर यशोदाबाईंच्याही स्वत:च्या कथा अन् व्यथा असतीलच की! याचमुळे पंढरीच्या वाटेवरील सर्व पाऊले मला वंदनीय वाटतात. मी माझ्या आजीने केलेल्या मार्गाने पायी वारी करणारच कारण मला विठुरायाच्या भक्तीचा जराही गंध नाही. मात्र त्याच विठ्ठलाच्या कृपेने सुगंधीत झालेले एक कृतार्थ आयुष्य माझ्या डोळ्यासमोर अनुभवले आहे…विठ्ठलावर या क्षणाला श्रध्दा असो वा नसो मी वारी करणारच…कारण याच विठूरायाच्या नामस्मरणाने नरकासमान परिस्थितीतील माझी आजी भोवती तमाम सुखे असणार्‍यांपेक्षाही समृध्द जीवन जगली. आज आषाढीच्या निमित्ताने स्मृतींचा हा वर्षाव झाला. यातून पायी वारीच्या संकल्पाची उजळणी झाली हे ही नसे थोडके!

About the author

shekhar patil

3 Comments

Leave a Comment