Featured साहित्य

वाचकप्रिय वेद प्रकाश

Written by shekhar patil

भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधीक लोकप्रिय लेखकांपैकी एक म्हणून गणले जाणार्‍या वेद प्रकाश शर्मा यांनी नुकताच अखेरचा श्‍वास घेतला. अगदी शालेय वयापासूनच कादंबरी लेखनाचा श्रीगणेशा करणार्‍या शर्मा यांनी खप, कमाई आणि अर्थातच लोकप्रियतेचा उत्तुंग मापदंड प्रस्थापित केला आहे. साहित्य क्षेत्रातील मातब्बरांनी कितीही नाके मुरडली तरी कथित अभिजात लिखाणापेक्षा किती तरी पटीने त्यांची पुस्तके वाचली जात आहेत. कधी काळी मीदेखील त्यांच्या कादंबर्‍या अक्षरश: अधाशेपणाने वाचल्या आहेत. शर्मा यांच्या जाण्याने हा कालखंड पुन्हा एकदा आठवला.

माझ्यावर झालेल्या वाचनसंस्काराच्या प्रारंभीच्या स्मृती या प्राथमिक शाळेतील आहेत. हायस्कूलमध्ये आल्यानंतर वाचनाला थोडी दिशा मिळाली. बाल साहित्य वाचत असतांना रहस्य, रोमांचकारी जग खुणावू लागले. यात अपरिहार्यपणे अनेक पॉप्युलर लेखक आयुष्यात आले. डिटेक्टीव्ह स्टोरीजचे वेड लागले. सुदैवाने बालमित्रांमध्ये प्रदीप धांडे याच्या रूपाने मला वाचनवेडा सवंगडी मिळाला. आम्ही दोघांनी अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. दोन्हीही सपाटून वाचणारे. यात प्रदीपचा वाचनाचा निकष हा पुस्तकाच्या आकारावरून ठरायचा (आताही हाच निकष आहे! ). अमुक-तमुक पुस्तक इतके जाड आहे (येथे तो अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांच्या माध्यमातून त्याचा आकार दर्शवत असे !) आणि पुस्तक जितके मोठे तितकेच ते उत्तम असा त्याचा कयास असे. आणि याच वयात कुठे तरी हिंदी उपन्यास आमच्या आयुष्यात आले. याची काही वैशिष्ट्ये मनाला भावली. एक तर ती अतिशय स्वस्त आणि आमच्या निकषात बसणारी (म्हणजेच जाडजूड !) असत. यातच त्याची शीर्षके ही उत्कंठा वाढविणारी असत. आणि अर्थातच याच रहस्य, रोमांचयुक्त मसाला ठासून भरलेला असे. येथूनच आयुष्यातील एक अतिशय रोमहर्षक कालखंड सुरू झाला. यात प्रदीपसोबत शहरातील विविध वाचनालये, पुस्तक विक्रेते आदी भोवतालही आपोआपच समावला. यातच आमचा नरेंद्र महाजन हा दुसरा मित्रही थोड्या प्रमाणात का होईना उपन्यास वाचू लागला. साधारणत: पाच-सात वर्षांपर्यंत आमचा हा ‘रोमान्स’ सुरू राहिला. यथावकाश प्रदीप हा शिक्षणानिमित्त वरोरा येथे गेला. तर नरेंद्र सीआरपीएफमधील नोकरीनिमित्त भारतभर फिरू लागला. तरी ते दोन्ही घरी आल्यानंतर याबाबत चर्वण होतच असे. सर्वप्रथम यातून मी आणि नंतर प्रदीप बाहेर पडत गंभीर वाचनाकडे वळलो. नरेंद्र मात्र शेवटपर्यंत (दुर्दैवाने तो पुढे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला.) हेच वाचत राहिला. प्रदीप आणि माझ्यासारख्या अगदी पुस्तकी किड्यांपासून ते रांगडा गडी असणार्‍या नरेंद्रसारख्यापर्यंतच्या तरूणांना बांधून ठेवणारे असे या उपन्यासांमध्ये काय होते हा प्रश्‍न नाही तर यात काय नव्हते? हे विचारणे अधिक संयुक्तीक ठरणार आहे. येथेच वेदप्रकाश शर्मा आणि त्यांच्यासारख्या अन्य हिंदी लेखकांची महत्ता स्पष्टपणे अधोरेखित होते.

मराठीतल्या अगदी बाबूराव अर्नाळकर यांच्यापासून ते सुहास शिरवळकर, बाबा कदम तसेच अन्य जनप्रिय लेखकांना साहित्य क्षेत्रातील मंडळी जशी हेटाळणीच्या नजरेने बघायची तीच स्थिती हिंदीतही आहे. गत शतकाचा विचार करता प्रेमचंद, अज्ञेय, जैनेंद्र कुमकार, फणीश्‍वरनाथ रेणू आदींसारख्या लेखकांनी गद्य लिखाणात सृजनातल्या नवनवीन शिखरांना स्पर्श केला. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने दुसरे लेखक पुढे राहिले. रहस्य, रोमांच, हेरगिरी, गुन्हेगारी, घातपात, गुढ, पारलौकीक शक्ती आदी विषय मानवाला आदीम कालखंडापासून आकर्षित करत आलेले आहेत. प्राचीन साहित्य, दंतकथा आणि लोककथांमध्ये याला प्रमुख स्थान आहे. आधुनिक साहित्यातही याचा वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘साहित्य’ म्हणून याला अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी याची महत्ता नाकारता येत नाही. बाबू देवकीनंदन खत्री यांच्या ‘चंद्रकांता’ या ग्रंथाला वाचण्यासाठी अनेक जण प्रयत्नपूर्वक हिंदी शिकले होते ही बाब आजही एखाद्या दंतकथेसारखी सांगितली जाते. याचप्रमाणे हिंदीच्या प्रचार-प्रसारात बॉलिवुडसोबत उपन्यासही कारणीभूत ठरले ही बाब कुणी नाकारू शकत नाही. यात मोठा वाटा होता तो हिंदी पॉकेट बुक्सचा ! मराठी प्रमाणेच हिंदीतल्या मुख्य धारेतील पुस्तकांचे मूल्य हे खूप जास्त असतांना पॉकेट बुक्स हे अगदी सर्वसामान्यांना परवडणारे असे. ही पुस्तके पुनर्प्रक्रिया केलेल्या स्वस्त कागदावर छापलेली असत. अर्थात अन्य पुस्तकांच्या तुलनेत छपाई सरस नसतांनाही त्या साहित्यात नसणारा रोमांच व उत्कंठा या पुस्तकांच्या वाचनात अनुभवता येत असे. साठच्या दशकात गुलशन नंदा आणि रानू हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते. नंदा यांच्या कादंबर्‍यांनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला शर्मिली, खिलौना, झील के उस पार आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत. साधारणत: याच कालखंडात इब्ने सफी, सुरेंद्र मोहन पाठक आणि ओमप्रकाश शर्मा यांच्या रहस्यमय कादंबर्‍यांनी धुमाकुळ घालण्यास प्रारंभ केला. हिंदी पॉकेट बुक्सच्या दोन प्रमुख धारांचे हे त्या कालखंडातील प्रमुख लेखक होते. यातील एका धारेत साधारणत: प्रेमासह सामाजिक विषयांना तर दुसर्‍यात रहस्याला प्राधान्य दिलेले असे. (अलीकडे हा भेद जवळपास समाप्त झाला आहे.) या पार्श्‍वभूमिवर सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी वेद प्रकाश शर्मा यांचे हिंदी उपन्यास लिखाणात आगमन झाले. खरं तर त्यांना बालपणापासूनच लिखाणाची आवड होती. अगदी दहावीत असतांना त्यांनी पहिली कादंबरी लिहली तरी ती कुणी छापण्यासाठी तयार नव्हते. त्या काळात अनेक नवखे लेखक हे दुसर्‍या मातब्बर लेखकांसाठी ‘घोस्ट रायटर’ म्हणून काम करत. यामुळे वेदप्रकाशजींनी मन मारून आपली कादंबरी शंभर रूपयात विकून टाकली. ती तेव्हाचे लिखाणातील मान्यवर नाव असणार्‍या वेद प्रकाश कांबोज यांच्या नावाने छापून आली. तेव्हा शर्मा कुटुंबियांना पैशाची गरज असल्याने वेद प्रकाश यांनी सुरवातील २४ कादंबर्‍या दुसर्‍या लेखकाच्या नावांनी लिहल्या. मात्र या तुफान लोकप्रिय झाल्यामुळे अखेर त्यांना स्वत:च्या नावाने ‘दहकते शहर’ ही कादंबरी लिहण्याची संधी मिळाली. अर्थात यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.

वेदप्रकाश शर्मा यांनी एकूण १७६ हिंदी कादंबर्‍या लिहल्या. यातील ‘वर्दी वाला गुंडा’ने तर लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला. १९९३ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीसाठी एखाद्या नवीन चित्रपटासारखी जाहिरात करण्यात आली होती. देशभरातून अनेक ठिकाणी याची अगावू नोंदणी करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी या कादंबरीच्या १५ लाख प्रती हातोहात खपल्या. आजवर याच्या आठ कोटींपेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. आजवर रहस्य रंजनाची सम्राज्ञी म्हणून गणल्या जाणार्‍या अगाथा ख्रिस्ती हिच्या पुस्तकांच्या दोनशे कोटींच्या वर प्रति खपल्या असून ती खपाबाबत जगात ‘ऑल टाईम ग्रेट’ म्हणून गणली जाते. मात्र प्रत्येक पुस्तकाची पाच लाखांची आवृत्ती हातोहात खपणार्‍या वेद प्रकाश शर्मा यांच्या सर्व पुस्तकांचा खप हा अगाथा ख्रिस्ती यांच्यापेक्षा किती तरी अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे वेद प्रकाश शर्मा हे भारतच नव्हे तर जागतिक पातळीवरील सर्वाधीक वाचले जाणारे लेखक ठरतात. कधी काळी रेल्वे स्थानकावरील ए.एच. व्हिलर या साखळी पुस्तक विक्रेत्या कंपनीपासून ते देशाच्या अगदी कान्याकोपर्‍यातील पुस्तकांच्या दुकानांमधून त्यांची पुस्तके विकली जात. आता जमान बदलला असला तरी ऑनलाईन विक्रीतही वेद प्रकाश शर्मा मागे नाहीत ही बाब लक्षणीय आहे. मराठी, हिंदीसह बहुतांश भारतीय भाषांमध्ये हजार-दोन हजार पुस्तकांची एक आवृत्ती प्रकाशित होत असते. याचा विचार करता पुस्तकांचा खप, यातून होणारी कमाई आणि अर्थातच लोकप्रियतेच्या निकषावर वेद प्रकाश शर्मा यांच्या जवळपासही जाणारा कुणी असू शकत नाही. मात्र मुख्य प्रवाहातील हिंदी साहित्यिकांनी शर्मा यांना लेखक म्हणून कधी मान्यता दिलीच नाही. अमृतलाल नागर यांचा अपवाद वगळता कुणी साहित्यिकाने त्यांच्या सृजनाचे कौतुक केले नाही. अर्थात स्वत: वेद प्रकाशजींना याचा कधी खेद वाटला नाही. त्यांनीदेखील आपण प्रेमचंद सोडून कुणीही हिंदी लेखक वाचला नसल्याचे अनेकदा ठासून सांगितले. आपले लिखाण आणि मुख्य धारेतील लिखाणात फरक काय? असा प्रश्‍नदेखील त्यांनी अनेकदा जाहीरपणे केला. मात्र त्यांना कुणी उत्तर दिले नाही. अर्थात साहित्य क्षेत्राने मान्यता दिली नसली तरी कोट्यवधी वाचकांच्या हृदयावर राज्य करण्याचा योग त्यांच्या नशिबात होता. भारतीय लेखकांना अत्यंत तुटपुंजे मानधन मिळते. मुळातच पुस्तके कमी खपतात. यातच प्रकाशक आणि लेखकांमधील व्यवहार अनेकदा आतबट्टयाचे असतात. मात्र हिंदीतील विख्यात उपन्यासकारांना रग्गड मानधन मिळत असे. वर उल्लेख केलेल्या गुलशन नंदा यांना तर साठ आणि सत्तरच्या दशकात एकेका कादंबरीचे लाखो रूपये मिळत असत. त्यांच्या कादंबर्‍यांचे हक्क मिळवण्यासाठी चित्रपट निर्माते धडपडत असत. नंदा यांच्यानंतर वेद प्रकाश शर्मा यांनीही याच पध्दतीने खप आणि कमाईचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या कादंबर्‍यांवरही चित्रपट बनले. यात अनाम, बहू मांगे इन्साफ, इंटरनॅशनल खिलाडी, सबसे बडा खिलाडी आदींचा समावेश होता. अजूनही त्यांच्या काही कादंबर्‍यांवर चित्रपटाचे काम सुरू आहे. मध्यंतरी आमीर खान आणि अक्षयकुमार यांनी शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चित्रपटाबाबत चर्चा केली होती. कधी काळचा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटासाठी अक्षयकुमारने त्यांना गळ घातली होती. मात्र आता वेद प्रकाश शर्मा यांच्या मृत्यूमुळे हा चित्रपट अधांतरी राहणार हे स्पष्ट आहे.

टिपीकल हिंदी उपन्यासाप्रमाणेच वेद प्रकाश शर्मा यांच्या पुस्तकांचीही सहजपणे ओळखून येणारी काही ठळक वैशिष्ट्ये होती. एक तर यात सज्जन विरूध्द दुर्जन असा लढा अतिशय रोमांचकारी पध्दतीने रंगविलेला असे. यातील सिक्रेट एजंट विजय त्याचा भाचा विकास व कायद्याचे शिक्षण नसतांनाही भल्याभल्या वकिलांना मात देणारा केशव पंडित, डिटेक्टीव्ह विभा जिंदल हे नायक तर अलफांसे व सिंगही सारख्या खल नायकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची मांडणी अगदी ठसठशीत असे. याच्या जोडीला प्रत्येक पुस्तकात अन्य पात्रांची फौज साकारलेली असे. अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून श्रुंगाराला प्राधान्य दिलेले असून वेद प्रकाश शर्मा यांनीही क्वचित प्रसंगी याचा वापर केला होता. मात्र अगदी उत्तान पातळीवर ते कधी घसरले नाहीत. त्यांचा मुख्य भर हा रहस्यमय वातावरणाचे सजीव चित्रण करण्याकडेच होता. त्यातील काही टिपीकल शब्दांनी सजलेली वाक्ये (उदा. कोठी, साया आदी) वाचून आम्हाला जाम हसू येत असे. त्यांच्या पुस्तकांमधील अनेक खटकेबाज संवाद आम्ही एखाच्या चित्रपटाच्या ‘डायलॉग’प्रमाणे एकमेकांना ऐकवत असत. इतर हिंदी उपन्यासांप्रमाणे त्यांच्या पुस्तकांमध्येही विलक्षण प्रभावशाली शब्दांमध्ये त्यांच्या आगामी पुस्तकांचे ‘टिझर्स’ दिलेले असत. कधी काळी चित्रपटगृहांमध्ये आगामी सिनेमांचे ‘ट्रेलर’ ज्या भक्तीभावाने पाहिले जात अगदी त्याचप्रमाणे हे ‘टिझर्स’ त्या पुस्तकाबाबत उत्कंठा जागृत करण्याचे काम करत असत. एकंदरीत ‘पैसा वसूल’ अशा प्रकारचा वाचनानंद पुरविण्यात वेद प्रकाश शर्मा यांचा हातखंडा होता. याचमुळे त्यांच्यावर समाजाच्या विविध स्तरांमधील लक्षावधी लोकांनी जीवापाड प्रेम केले. आपल्या जवळपास पावणे दोनशे पुस्तकांमधून त्यांनी आपल्या विलक्षण लिखाण शैलीतून शेकडो पात्रे अक्षरश: जीवंत केलीत. मोजक्या दुर्बोध पुस्तकांच्या माध्यमातून अवघ्या काही हजार वाचकांपर्यंत पोहचून साहित्यिक म्हणून मिरवणार्‍या ढुढ्ढाचार्यांच्या तुलनेत ही कामगिरी देदीप्यमान असली तरी वेद प्रकाश शर्मा यांना शेवटपर्यंत प्रस्थापितांनी ‘लेखक’ म्हणून स्वीकारले नाही. खरं तर अलीकडच्या काळात कथित अभिजात आणि लोकप्रिय लिखाणातील वैश्‍विक पातळीवर बर्‍यापैकी नाहीसा झालेला आहे. यामुळे डॅन ब्राऊन, जे.के. रोलिंग, जेफ्री आर्चर, जॉन ग्रिशम आदी लोकप्रिय लेखकांना मुख्य धारेतील साहित्य क्षेत्राची मान्यता मिळाली आहे. भारतात मात्र अद्याप हा भेद आहेच. नाही म्हणायला अलीकडेच ‘हार्पर कॉलिन्स’ सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने इब्ने सफी आणि सुरेंद्र मोहन पाठक यांच्या उपन्यासांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.परिणामी येणार्‍या काळात तरी वेद प्रकाश शर्मा यांनी मान्यता मिळेल ही त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. अर्थात त्यांच्यासह अन्य लोकप्रिय लेखकांच्या सृजनाला ‘पल्प फिक्शन’ म्हणजे हिंदीत लुगदी साहित्य वा घासलेटी साहित्य म्हणून हिणवण्याचा प्रकारही बंद होईल अशी अपेक्षा करण्यासही हरकत नाही.

आज वेद प्रकाश शर्मा यांचे लिखाण वाचण्याचे सोडून बरीच वर्षे उलटून गेली. आता अगदी कुणी पैसे देऊन त्यांची एखादी कादंबरी वाचण्याचे सांगितले तरी मन धजावणार नाही. मात्र त्या कालखंडातील अनेक दिवस शर्माजींच्या लिखाणाने सुगंधीत केलेत याबद्दल हृदयात कृतज्ञतेची भावना नक्कीच आहे. शर्मा यांच्यापुढील वाचनाचा खूप मोठा पल्ला गाठला. यात देश-विदेशातील ख्यातनाम बेस्ट सेलर्सपासून ते अभिजात साहित्याचा समावेश आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात वाचनाची दिशाही बदलली. आता तर बराच ‘चुजी’ झालोय. काय वाचावे यापेक्षा ‘काय वाचून वेळ वाया घालू नये!’ याची दक्षता घेणे किती आवश्यक आहे याची जाणीवदेखील झाली. खरं तर आता वाचन करतांना ‘उपयुक्तता’ हाच एकमेव निकष असतो. युटिलीटीच्याही पलीकडे आणि खरं तर अगदी कोणताही हेतू नसतांना निखळ आनंद म्हणून वाचण्याचा काळ आता परत येणार नाहीच. मात्र असे असले तरी त्या मंतरलेल्या कालखंडाबाबत माझ्या मनात नक्कीच कृतज्ञता आहे. उमलत्या वयातील प्रत्येक बाब आपल्याला आयुष्यभर पुरून उरणारी असते. या वयातील मैत्री, प्रेम सारेच काही मर्मबंधातल्या ठेवीसमान ! याच प्रमाणे वाचन संस्कारातील प्राथमिक टप्पा हा बाळबोध असला तरी त्याबाबत लज्जा वाटण्याचे काही एक कारण नाही. म्हणूनच या कालखंडाचे एक नायक असणार्‍या वेद प्रकाश शर्मा यांना मानाचा मुजरा !!

About the author

shekhar patil

Leave a Comment