चालू घडामोडी राजकारण

वर्चस्वाला पहिला धक्का

आज दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजप, कॉंग्रेसचा दारूण पराभव करत इतिहासाची नोंद केली. या विजयाचे मर्म उलगडून सांगणारे हे विविधांगी विश्‍लेषण.

आज दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजप व कॉंग्रेसचा दारूण पराभव करत इतिहासाची नोंद केली. या विजयाचे मर्म उलगडून सांगणारे हे विविधांगी विश्‍लेषण.

आज सकाळी निकालाचा कल आल्यापासून मी सोशल मीडियात यावर विविध मुद्यांवरून केलेले भाष्य आपल्यासाठी.
narendra-modi-amit-shah

गर्वहरण

चिंधीचा साप एकचदा बनविता येतो. या बनवेगिरीला लोक एखाद्या वेळेस भुलूनही जातात. मात्र जेव्हा कुणी जनतेला काही समजत नाही या भावनेतून उद्दामपणा दाखवितो तेव्हा काय होते हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे खासमखास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चांगलेच लक्षात आले असेल.

मुळातच गुजरातमध्ये मोदींनी आपल्या सहकार्‍यांना काम करण्यास जराही वाव दिला नाही. हाच पॅटर्न आता ते केंद्रात लागू करत आहेत. आज सुषमा स्वराज, राजनाथसिंग, अरूण जेटली यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करत आहेत. मोदी म्हणतात सारे काही मीच करणार. हा बाबा फक्त ग्रामपंचायत निवडणुकीतच उतरायचा बाकी राहिला होता. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडसारख्या राज्यांमधील आधीच्या राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इतका जास्त होता की, सक्षम विरोधकांना यश मिळणारच होते. मात्र हे यश मोदी लाटेचे दाखविणार्‍या भारतीय जनता पक्षाला आता दिल्लीचे अपयश हे मोदी लाट ओसरण्याचे निदर्शक असल्याचे का वाटू नये?

मोदी आणि शहा ही गुजराती जोडगोळी पक्ष आणि आणि जनता आपल्या मुठीत असल्याच्या गुर्मीत वावरत होते. बरे झाले दिल्लीकरांनी त्यांना दणका दिला. आता उर्वरित सव्वा चार वर्षांमध्ये सहकार्‍यांना विश्‍वासात घ्या. विकास करा. अन्यथा मे-२०१९मध्ये भाजपला आजप्रमाणेच शोक व्यक्त करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.

ये जो पब्लीक है सब जानती है!

आज परत लोकशाहीची महत्ता स्पष्ट झाली. अरे अब्जावधींचा चुराडा करून कितीही ‘ओपिनियन मेकर्स’ पदरी बाळगा. तुफान जाहिरातबाजी करा. सोशल मीडियावर ‘पेड’ फौजेच्या माध्यमातून कितीही हल्ले करा. जेव्हा जनतेची सटकते तेव्हा भल्याभल्यांची तंतरते. अरे कित्येकांना जनतेने निवडले…सहन केले…अन् उलथून टाकले. आत्ममग्न मोदी, उन्मत्त शहा आणि त्यांच्या मागे फटफटत जाणारा भाजप लागतो कुठे?

आणि हो…केजरीवाल आणि कंपनीने आजच हुरळून जाण्याचे कारण नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जर केजरीबाबूंनी मोदींना आव्हान द्यायचे असेल तर आततायीपणा सोडून ठोस पावले टाकावी लागतील. आज तुमच्या ४९ दिवसांमधील राजवटीतल्या अराजकावर हल्ला करण्यास भाजपला फारशी संधी मिळाली नाही. मात्र पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘आप’च्या सरकारलाही जनतेने चांगलेच जोखले असेल. सरकारच्या विरोधात बोलणे आणि कामे करणे यांच्यातील फरक महाराष्ट्रात आमचे देवेंद्रभाऊ, नाथाभाऊ, गिरीशभाऊ आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या १०० दिवसांत चांगलाच लक्षात आला आहे. यामुळे ‘आप’लाही साडेचार वर्षांचा हिशोब देऊनच मोदींना आव्हान द्यावे लागणार हे त्यांनी लक्षात घ्यायचे आहे. कुणीही ह्दयातून डोक्यात शिरण्यास फारसा वेळ लागत नाही. आज ‘आप’ डोक्यावर आहे…काम न केल्यास पायदळी जाणार…

कारण-ये जो पब्लीक है सब जानती है!

संधीसाधू कॉंग्रेसी!

आज सामान्य माणूस राजकारणाच्या केंद्रस्थानी असतांना मात्र कॉंग्रेसी कार्यकर्ते ‘प्रियंका लाओ कॉंग्रेस बचाओ’च्या घोषणा देताहेत यातील विरोधाभास समजून घेणे आवश्यक आहे. अहो काहीही म्हणा, अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन आणि त्यातून देशभरात पडलेल्या भ्रष्टाचारविरोधी ठिणगीमुळेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या सामान्य घराण्यातील आणि कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसणार्‍या नायकांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला हे कुणी नाकारू शकत नाही. आज सामान्य माणसांचे मुद्देच राजकारणाच्या केंद्रस्थानी नसून लोकांना नेतेदेखील जमीनीशी जुळलेलेच हवे आहेत. इकडे हवाच नव्हे तर वादळाचा रोख कोणत्या दिशेने आहे याची पर्वा न करता काही कॉंग्रेसी प्रियंकाच्या करिश्म्यावर टपून बसलेत धन्य आहे बुवा!

कॉंग्रेस ही नेहरू वा गांधी घराण्याची खासगी मालमत्ता असल्याचा समज जाणीवपुर्वक पसरवण्यात आला आहे. मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा विचार करता लालबहादुर शास्त्री, पी.व्ही. नरसिंहा राव, डॉ. मनमोहन सिंग आदी नेत्यांचे कर्तृत्व पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्या तोलामोलाचे नाही असे कोण म्हणेल? नेहरू नंतरच्या पोकळीत शास्त्रीजींचे शालीन पण कणखर नेतृत्व, राजीवजींनंतरच्या कालखंडातील राव यांचे नेतृत्व, त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान सहकार्‍याला घेऊन देशाला दिलेली नवीन आर्थिक दिशा तसेच एकविसाव्या शतकात डॉ. मनमोहन सिंग यांनी हाकलेली देशाची धुरा या बाबी कॉंग्रेसींना नकोत. त्यांना हवा कुणीतरी जादुई चेहरा जो ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत विनासायास पक्षाला यश मिळवून देईल. बरं हा चेहरा गांधी घराण्यातील असल्यामुळे जी-हुजुरेगिरीला सोपे पडणार असल्याने आज ‘प्रियंका लाओ’ची केविलवाणी आर्जवे सुरू आहेत.

खरं तर आज त्यांच्याकडे दोन ‘गांधी’ आहेत. यातच यातील युवराज तर अजून सत्तारूढही झालेला नाही. मात्र असे असुनही प्रियंकाला घातलेली साद ही गांधी घराण्याचा ‘युवराज’ सपशेल फेल झाल्याची कबुली देण्यासारखेच नव्हे काय? काहीही असो कॉंग्रेसमधील रस्त्यावर उतरण्याची ठिणगी तर कधीच विझलीय. विश्‍वास पटत नसेल तर केंद्र वा राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनांमधील उसने अवसान पहा. यामुळे आता राहूलचा नाकर्तेपणा भलेही दिसो पण प्रियंकाच तारणहार बनणार हा त्यांचा विश्‍वास आज तरी भाबडेपणाचा नव्हे तर संधीसाधूपणाचाच मानावा लागेल. कॉंग्रेसींनी लोकांमध्ये जावे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, लोकांना जोडावे आणि त्यातूनच नेतृत्व का शोधू नये?

जयजयकारातील भयावह उन्माद !

आपण विसरला नसाल तर पुन्हा लक्षात आणून देतो. लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांचे गुणगान करतांना प्रोफेशनल मीडियाच नव्हे तर सोशल मीडियादेखील असाच भारावला होता. तेव्हाचे खलनायक अर्थातच गांधी माता-पुत्र, डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांचे सहकारी होते. आज नऊ महिने उलटल्यानंतर तेच मोदी आज थेट या तिन्ही कॉंग्रेसी नेत्यांच्या भुमिकेत दिसताहेत. आता अरविंद केजरीवाल यांच्या नावाने देशभरात जल्लोष होतोय. मात्र फक्त विचार करा एखाद-दोन वर्षानंतरची स्थिती काय असेल?

मुळातच स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे उलटल्यानंतरही आज प्रत्येक राजकीय पक्षाला पाणी, वीज आदींसारख्या मुलभुत सुविधांचा समावेश आपल्या आश्‍वासनांमध्ये करावा लागतोय ही शोकांतिकाच होय. आजवरचे राजकारणी लोकांना अगदी पायाभुत सुविधादेखील देऊ शकले नाहीत या पार्श्‍वभुमीवर अरविंद केजरीवाल यांच्यासारखा ‘कॉमन मॅन’ राजकारणात येतो काय आणि देदीप्यमान यश मिळवत मुख्यमंत्री होतो काय हा सगळाच अद्भुत मामला देशाने दीड वर्षांपुर्वीच अनुभवला होता. तेव्हा बहुमत नसल्याने केजरीवाल यांची अगतिकता आणि हौतात्म्याचा आव आणत फेकलेला राजीनामाही आपण पाहिला. आज त्यांच्याकडे विधानसभेत राक्षसी बहुमत आहे. अर्थात कोणताही बहाणादेखील नाही. आता दिल्लीची जनता त्यांना प्रत्येक आश्‍वासनाचा जबाब नक्की मागेल. मुळात दिल्लीस पुर्ण राज्याचा दर्जादेखील नाही. देशाची राजधानी असल्याने कायदा व सुव्यवस्थेसह अनेक बाबींमध्ये केंद्राचा थेट हस्तक्षेप आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विकासासाठी लागणार्‍या निधीतील महत्वाचा वाटा हा केंद्र सरकारकडून येत असतो. केंद्र आणि राज्यांमधील बहुतांश वाद हे निधी वाटपावरून होत असतात. आता केंद्रातील मोदींचे स्थिर सरकार हे केजरीबाबूंच्या सरकारला निधी वाटपात झुकते माप देणार नाही हे निश्‍चित. येथेच केजरीवाल यांचा संघर्ष सुरू होईल.

आपल्या ‘सिस्टिम’मधील भ्रष्टाचार समाप्त करण्यासाठी ते ‘जनलोकपाल’ अवश्य पारित करू शकतात. मात्र याची यशस्वी अंमलबजावणी होणार का? किमान दिल्लीतील भ्रष्टाचार तरी मिटणार का? केजरीवाल हे दिलेली सारी आश्‍वासने पुर्ण करणार का? या प्रश्‍नांची उत्तरे आजचे देणे अवघड आहे. सुशासन, प्रशासनातील पारदर्शकता ही आश्‍वासने तर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील निवडणुक कालावधीत दिली होती. आज निरंकुश सत्ता असूनही त्यांची फे-फे उडतेय. यामुळे केजरीवाल यांची महत्ता ही काळाच्या कसोटीवर टिकल्यानंतरच समजणार आहे. अन्यथा त्यांच्यासारखे अनेक विजय मिळवलेले राजकारणी काही महिन्यात टोकाचे अलोकप्रिय झाल्याचे आपण पाहिलेच आहे. याची ताजी उदाहरणे अर्थात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचीच आहेत. खुद्द केजरीवालच मध्यंतरी हास्यास्पद पात्र बनले होते. आता जनतेला हवाय ‘रिझल्ट’. अन्यथा जनता काय करू शकते हे आज त्यांनी स्वत:च पाहिले आहे. उद्या हीच जनता त्यांच्यावर उलटेल आणि आपण सर्वजण त्यांची टिंगल उडवू. खरं तर केजरीवालांना हा धोका समजतोय. आज सकाळी निकालावर प्रतिक्रिया देतांना त्यांनी आपल्याला या एकतर्फी यशाची भिती वाटतेय हे कबुल केले. अर्थात जनतेचे हे प्रेम अर्थातच ‘भयंकर’ आहेच. यामुळे केजरीबाबू जनतेच्या प्रेमातील उतराई होण्याची संधी सोडू नका. अन्यथा जनता वाट पहाण्यात पटाईत आणि अर्थातच सोशीक आहेच. वाट पाहते आणि संधी मिळताच धुळीस मिळवून टाकते…

मोठेपणा दाखवा मोदीसाहेब!

आज आम आदमी पक्षाने विधानसभेत तब्बल ९५ टक्के जागा मिळवण्याचा पराक्रम केला. अर्थात यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा पेचही निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी दुपारीच निकषात बसणारे नसले तरी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्याची जाहीर करून एका सकारात्मक पाऊल उचलले आहे. ‘आप’च्या उमदेपणाआधी भाजपने लोकसभेतील निकालानंतर कॉंग्रेसोबत केलेला ‘गेम’ आपण पाहिला आहे. लोकसभेत कॉंग्रेसला एकंदरीत जागांपेक्षा किमान दहा टक्केदेखील जागा न मिळाल्याने त्यांना नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही. मात्र विरोधातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणार्‍या कॉंग्रेसला हे पद देण्यात काहीही वावगे नव्हते. मात्र कॉंग्रेसमुक्त देश करण्याची शपथ घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे साफ नाकारले. यामुळे आज हे पद रिक्त आहे. खरं तर १९७७च्या ‘सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ लिडर्स ऑफ अपोझिशन इन पर्लियामेंट ऍक्ट’ नुसार विरोधी पक्षनेतेपदाला कायदेशीर मान्यता मिळाली. यानंतर लोकसभेत राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरसिंहा राव, शरद पवार, सोनिया गांधी, सुषमा स्वराज आदींसारख्या मातब्बर नेत्यांनी या पदाची धुरा सांभाळली. आज हे पद रिक्त आहे.

२००३च्या ‘सेंट्रल व्हिजीलन्स कमिशन ऍक्ट’मधील क्लॉज-४ नुसार दक्षता आयोगाच्या अध्यक्षाची निवड करणार्‍या समितीमध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा समावेश करावा असे नमुद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेत कोणताही विरोधी पक्षनेता नसला तर सर्वात मोठा विरोधी पक्ष असणार्‍या पक्षाच्या नेत्याला या पदावर नियुक्त करणे वावगे नसल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. म्हणजे निकषात बसत नसलेल्या विरोधी पक्षनेतेपदाला कायद्याचा अडसरही नाही. मात्र भाजपने जाणीवपुर्वक कॉंग्रेसला या पदापासून दुर ठेवले. कॉंग्रेसने आपले सभागृहातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना हे पद देण्यात यावे अशी केलेली मागणी भाजपच्या लोकसभाध्यक्षांनी धुडकावून लावली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेतेपदापेक्षा कॉंग्रेसी नेत्यांनी जनहिताचे प्रश्‍न उपस्थित करण्याला प्राधान्य द्यावे असा अनाहुत सल्लादेखील देऊन टाकला. यामुळे नऊ महिन्यांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेताच नाहीय. यासोबत महाराष्ट्र विधानसभेत कॉंग्रेसला या पदापासून वंचित ठेवण्यासाठी करण्यात आलेली खटाटोपही आपण पाहिली आहे. या पार्श्‍वभुमीवर आता कुमार विश्‍वास यांनी दिल्ली विधानसभेत निकषात न बसतांनाही विरोधी पक्षनेतेपद देऊ करून भाजपच्या मुजोरीला सणसणीत चपराकच दिली आहे. भाजपनेही याला प्रतिसाद देत लोकसभेत कॉंग्रेसला मोठेपणाने विरोधी पक्षनेतेपद देण्यास काय हरकत आहे? मात्र कॉंग्रेसला संपविण्याचा विडा उचलणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात तरी हा विचार येईल काय?

About the author

shekhar patil

Leave a Comment