Featured चालू घडामोडी राजकारण

राजकीय रंग…जनता दंग !

Written by shekhar patil

कर्नाटकातील प्रचारतोफा थंडावल्या असतांना या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या बडबडीमुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. जनहिताच्या प्रश्‍नांना पध्दतशीरपणे बगल देत निव्वळ अस्मितेवर आधारित भावनात्मक आवाहने आणि वैयक्तीक पातळीवरील निंदा-नालस्तीची यथेच्छ चिखलफेक आपण अनुभवली. यात एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसींचा भगवा फेटा चांगलाच गाजला. हा ओवेसींच्या राजकीय विचारधारेचा यु-टर्न आहे की, काळाची पावले ओळखण्याचा धुर्तपणा? याबाबत आपण आज काहीही ठोस भाष्य करू शकत नाही. मात्र, देशातील हिंदू मतपेढीकडे दुर्लक्ष करणे कुणाला परवडणारे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

विख्यात विचारवंत कार्ल मार्क्स यांनी धर्म ही अफूची गोळी असल्याची केलेली मांडणी निश्‍चितच पूर्ण सत्य या प्रकारातील नाही. तथापि, धर्माचा स्वार्थी वापर हा अनेक भयंकर दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. चतुर भारतीय राजकारण्यांनी तर धर्माचा अफूसोबत चॉकलेट म्हणूनही वारंवार वापर केला आहे. अमुक-तमुक पक्षामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची हाकाटी ठोकली म्हणजे बिनबोभाटपणे निवडणूक जिंकता येते असे अनेकदा सिध्द झाले आहे. यामुळे काहींसाठी जणू काही हा मूलमंत्रच बनला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशकतेला व त्यातही नेहरूंच्या करिश्माई नेतृत्वाला धर्मावर आधारित राजकीय विचारधारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न तसा फारसा यशस्वी ठरला नव्हता. यानंतर इंदिराजींनी अनेकदा स्वत:च नर्म हिंदुत्वाचा वापर करून विरोधकांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राजीव गांधी यांच्या दोन ऐतिहासीक चुकांचा भारतीय राजकारणावर अनेक दशके प्रभाव राहिला आहे. देशभरात गाजलेल्या शाहबानो पोटगी खटल्यातील न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अध्यादेश राजीव सरकारने काढला. यातून सरकारने मुस्लीमांसमोर मान झुकवल्याचा संदेश देशभरात गेला. यावरून उसळलेल्या जनक्षोभाला शमविण्यासाठी अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूचे कुलूप उघडण्याचा निर्णय राजीव सरकारनेच घेतला. या दोन परस्परविरोधी घटनांच्या ठिणग्यांनी पुढे वणव्याचे स्वरूप धारण केले. या धार्मीक ध्रुविकरणाला काँग्रेस व भाजपने हवा दिली. तर यानंतर सत्तारूढ झालेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने ‘मंडल कमिशन’च्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांच्या उत्थानाला गती दिली. यातून देशातील बहुतांश राज्यांमध्ये ओबीसी समुदायाची अस्मिता राजकीय शक्तीच्या स्वरूपात समोर आली. काँग्रेस व भाजपने अनुक्रमे मुस्लीम व हिंदू धार्जीणी भूमिका घेण्यास प्रारंभ केला. तसेच राज्या-राज्यांमध्ये जाती वा प्रादेशिक अस्मितांवर आधारित विविध पक्ष उदयास आले. जवळपास पाव शतकापर्यंत भारतीय राजकारणात हा त्रिस्तरीय पट अस्तित्वात होता. मात्र २०१४च्या निवडणुकीने हे सारे समीकरण गडबडले. तत्कालीन युपीए सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या रोषाला हिंदूत्ववादी विचारांचा साज चढवत नरेंद्र मोदी मैदानात उतरले आणि यानंतर काय झाले ते आपल्यासमोर आहेच.

नरेंद्र मोदी यांनी देशातील जातीय, प्रांतीय अथवा भाषिक अस्मितांना उद्ध्वस्त करत प्रखर हिंदूत्वाला विकासवादी मुलामा चढवून दिलेले ‘चॉकलेट’ जनतेला चांगलेच भावले. तथापि, चॉकलेट कितीही स्वादीष्ट आणि मनमोहक असले तरी त्याच्याने पोट भरू शकत नाही हे जनतेच्या लक्षात येण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली. आता भारतवासियांचे दुर्दैव असे की, मोदींच्या चॉकलेटला एखादा पौष्टीक पर्याय सुचविण्याऐवजी विरोधकांनी त्यांचीच नक्कल करण्यास प्रारंभ केला आहे. अर्थात हेच चॉकलेट वाटण्याचा आततायीपणा विरोधक दाखवत असून याचा कळस असदुद्दीन ओवेसी यांच्या भगव्या फेट्यातून गाठला गेला आहे. २०१४च्या निवडणुकीत देशाचे राजकारण हे जातीवरून धर्मावर आले. युपीएच्या दहा वर्षाच्या कालखंडात काँग्रेसी नेत्यांनी वारंवार हिंदू धर्माचा उपमर्द करणारी केलेली वक्तव्ये जनतेच्या जिव्हारी लागली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करत असल्याची भावना देशात पुन्हा बळावली होती. म्हणजेच ऐंशीच्या दशकाच्या मध्यावरील परिस्थिती निर्माण झाली असतांना युपीए नेतृत्वाच्या लक्षात ही बाब आली नाही. यामुळे राजीवजींप्रमाणे ‘ट्रिक’ वापरण्याची कोणतीही संधी त्यांना मिळाली नाही. अर्थात, युपीए सरकारच्या पतनात हिंदूत्वविरोधी भूमिकेचा महत्वाचा वाटा असल्याचे कुणाला नाकारता येणार नाही यामुळे भाजपच्या प्रखर हिंदुत्वाला तोड देण्यासाठी काँग्रेसनेही नर्म हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा हाती घेतली आहे. या पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या अलीकडच्या कालखंडातील अनेक मंदिरांच्या वार्‍या हेच दर्शवत आहेत. तर हिंदूत्वाचे कट्टर विरोधक असणारे असदुद्दीन ओवेसी यांनीही काळाची बदलती पावले लक्षात घेत भगवा फेटा आपल्या डोक्यावर धारण केला असला तरी त्याकडे फारसे गांभिर्याने पाहण्याची गरज नाही. ओवेसींच्या एमआयएम पक्षाने आधीही आपल्या परंपरागत मुस्लीम मतपेढीसोबत दलीत व हिंदूंना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राष्ट्रीय राजकारणात दमदार मुस्लीम नेत्याची असणारी उणीव भरून काढण्यासाठी ते कट्टर विचार घेऊन मैदानात उतरले. याचा त्यांना लाभदेखील झाला. आजही आपल्या प्रखर तर्कशक्तीने विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला अस्खलीत हिंदी, इंग्रजी अथवा उर्दूत उत्तर देण्याची क्षमता असणारा देशातील एकमेव मुस्लीम नेता म्हणजेच असदुद्दीन ओवेसी असल्याची बाब कुणी नाकारू शकत नाही. मात्र आपली कट्टर विचारधारा आणि वैयक्तीक करिश्मा यांना असणारी मर्यादा आता ओवेसींच्या लक्षात आल्याची शक्यता आपण गृहीत धरू शकतो. यामुळे आपण सर्वसमावेशक विचारधारा स्वीकारत असल्याचे संकेत देण्यासाठी त्यांनी आपला आजवरचा शेरवानी आणि मुस्लीम टोपीचा पेहराव सोडून भगवा फेटा परिधान केला असावा. खरं तर, ओवेसी आणि त्यांचा पाठींबा असणारा जेडीएस पक्ष हा कर्नाटकच्या रणांगणात प्रमुख दावेदार नाहीय. यामुळे भगव्या फेट्यामुळे आपसूकच फुकटची प्रसिध्दी मिळणार असल्याचा होरादेखील चतुर ओवेसींनी बांधल्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय राजकारणात आधीच ‘सोशल इंजिनिअरिंग’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात वापरण्यात येत आहे. आता राजकीय पक्षांना ‘रिलीजीअस इंजिनिअरिंग’ची आवश्यकता भासू लागल्याचे आता दिसून येत आहे. कारण २०१४ च्या निवडणुकीने देशातील राजकारणातील धर्माचा फॅक्टर हा सर्वात महत्वाचा असल्याचे अधोरेखीत केले आहे. भाजपने या चलनी नाण्याचे महत्व कधीच ओळखले आहे. तर अन्य पक्षही याचाच कित्ता गिरवत आहेत. यातून काँग्रेससारख्या आजवर सहसा हिंदू धर्माच्या प्रेमाला जाहीर न करणार्‍या पक्षाच्या अध्यक्षालाही भाळी टिळा लाऊन मंदिरांमध्ये जावे लागत आहे. तर दुसरीकडे मुलायम, नितीश कुमार आदींसारख्या मंडलवादी नेत्यांनीही मंदिराच्या फेर्‍या सुरू केल्या आहेत. यामुळे असदुद्दीन ओवेसींनीही भगव्या फेट्याच्या माध्यमातून याकडे पावले वळवली आहेत. अन्य मुस्लीम नेते याचे अनुकरण करणार काय? हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकारण्यांचा हा खेळ पाहून सर्वसामान्य जनता मात्र थक्क झाली आहे. भारतीय राजकाणात प्रचलीत असणार्‍या ‘कोलांट उड्या’ आणि ‘घुमजाव’ या संकल्पनांना आता बदलवण्यात येणार्‍या रंगाच्या उपमेची जोडदेखील मिळणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याहूनही महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘राजकीय हिंदुत्वा’ने हिंदू धर्माच्या उत्थानाला थोडा तरी हातभार लागला वा लागणार का ? याचे उत्तर नकारार्थीच येणार असून ही शोकांतिकाच मानावी लागणार आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment