अनुभव राजकारण

राजकारण आणि प्रेम…सेम टू सेम !

असचं आहे. भाजप म्हणा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी! फरक नाहीच. तोच भ्रष्टाचार, तोच अहंकार, तीच मग्रुरी, तोच उग्रपणा. फक्त पक्षाचे निशाण आणि लोक बदलतात. प्रवृत्ती तीच.

‘‘अहो हे भाजपवाले विरोधात असतांना किती सोज्वळ वाटत होते किनई!’’-इति सौभाग्यवती.

मी- ‘‘ हो ना…अगदी चारित्र्यवान, देशप्रेमी, भ्रष्टाचारविरोधी, स्वच्छ प्रतिमेचे, खर्‍या अर्थाने निती-नियमांची चाड असणारे ! बरं एक सांग तुला तेव्हा केंद्रातील युपीएचे नेते तसेच राज्यातील आघाडीचे पुढारी कसे वाटत होते?’’

बायको- ‘‘ ते तर अगदी उन्मत्त वाटत होते हो! सत्तेच्या नशेत धुंद. मग्रूर, अहंकारी, भ्रष्टाचारी, जनतेच्या समस्यांपासून कोसो दूर, स्वत:च्या तोर्‍यात मग्न, सत्तालोलुप.’’

मी- ‘मग आता भाजपवाले तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले कसे वाटतात?’’

बायको- ‘‘ भाजपवाल्यांचं काय सांगाव बाई!…अरे ‘अच्छे दिन’ची आशा आम्ही कधीच सोडलीय ! मात्र दैवाने दिलेय ते तर सांभाळा. आहे ती सत्ता नीट तर राबवा. घोटाळ्यांमागून घोटाळे करताहेत…आणि घोळ केल्यानंतर सपशेल नकारच देताहेत…बेताल बडबड काय करताहेत… हो सत्तेची चटक त्यांनाही लागली बरं. म्हणजे व्हिआयपी कल्चर, उध्दटपणा, सत्तेची हवा डोक्यात जाणे आता स्पष्ट उमटू लागले आहे. आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तर चक्क एकदम झुंजार, आदर्श जनसेवक, स्वच्छ, पारदर्शक, अगदी सदगुणांचे पुतळे वाटतात हो!!’’

मी-‘‘ बाई असचं आहे. रिश्ता वोही सोच नई! भाजप म्हणा की कॉंग्रेस-राष्ट्रवादी! फरक नाहीच. तोच भ्रष्टाचार, तोच अहंकार, तीच मग्रुरी, तोच उग्रपणा. फक्त पक्षाचे निशाण आणि लोक बदलतात. प्रवृत्ती तीच!’’

बायको-‘‘ आपलेच चुकते हो. स्वप्न खरी होत नसतात. उगाच मोदीबाबा आणि ‘अच्छे दिना’च्या मागे लागलो. आता बसा बोंबलत’’

मी-‘ तसं नाही गं बाई, जीवन हे असेच आहे. अगदी आपलेदेखील.’’

बायको-‘‘ मला समजले नाही?’’

मी- ‘‘ आता हेच बघ ना! आपण प्रेमात असतांनाचे क्षण आठवून बघ. म्हणजे तुला पाहिल्यावर माझ्या मनात ‘कुछ कुछ’ व्हायचे तर तुझ्या गालांवर गुलाब फुलायचे. एकमेकांच्या डोळ्यात पाहतांना मोहरून येत असे. सालं मले तं एकदम ‘पहला नशा’ गाण्यातल्या आमिरखानसारखे स्लो मोशनमध्ये नाचावसं वाटायच. काय दिवस होते ते! मंतरलेले…स्वप्नाळू!! सालं असं वाटायचं लग्न केल्यावर जगातलं सर्वात सुखी जोडपं आपणच असू. म्हणजे अगदी ‘फुलो के शहर मे है घर अपना’प्रमाणे राजा-राणीचा संसार असेल…वगैरे-वगैरे.’’

पत्नी हसली. तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जातांना परत एकदा ‘नजरे मिलती है…जाम मिलते है’’ या ओळी अनुभवल्या.

मी-‘‘ आताची स्थिती काय? खरं सांग?’’

*(%ऋ*()!‘’%%ऋ**((%ऋ’‘!
*(%ऋ*()!‘’%%ऋ**((%ऋ’‘!
*(%ऋ*()!‘’%%ऋ**((%ऋ’‘!

वरील चर्चेचा सार…‘‘सारे सपने कही खो गये…हाय हम क्या से क्या हो गये’’ म्हणजेच…‘‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!’’

मी-‘‘ अगं हे असचं आहे बरं का. विरोधी पक्ष म्हणजे आयुष्यातील प्रेम प्रकरण. आजवरचा प्रत्येक विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आपल्याला आपलेसे वाटतात. कारण ते आपल्या आशा-आकांक्षा पुर्ण करतील असे वाटते. प्रेमात आकंठ बुडालेल्यांना जशी संसारातील खाचखळग्यांची जाणीव होत नाही त्याचप्रमाणे विरोधी पक्ष हा आपल्याला सर्वगुणसंपन्न वाटतो. आपल्या विवाहानंतरच्या सुखी संसाराप्रमाणेच विरोधी मंडळी सत्तेत आल्यानंतर किती उत्तम प्रकारे सरकार चालेल हे स्वप्न पाहण्यात आपण मश्गुल होतो. मात्र सत्ताधारी पक्ष हा संसारासारखा असतो. अगदी वास्तववादी. घर चालवायचे तर काम करावे लागेल. याची आर्थिक बाजू सांभाळावी लागेल. उत्पन्न चांगले असेल तरच खर्च करता येईल. भाऊबंदकीचे कट-कारस्थान तसेच बाहेरील दुश्मनांचे हल्ले परतून लावण्याची जबाबदारीही असतेच. प्रत्येक घरात काही बच्चेमंडळी असते. याचप्रमाणे सरकारमधील खट्याळ व उपद्रवी मंडळींनाही सांभाळावे लागते. म्हणून काही दिवसांपुर्वी जनतेचे प्रेम प्रकरण भाजप होते तर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी आहे. पहिल्यांदा आघाडी शत्रू होती तर आता भाजप संतापाला कारणीभूत ठरत आहे.’’

बायको अगदी मनापासून हसली. म्हणाली, ‘‘अहो किती साध्या-सोपेपणाने तुम्ही फरक सांगितला हो’’

मी- ‘‘हो ना. च्या मायला…मला तर तामिळनाडूची जनता आवडते. एकदा द्रमुकला तर दुसर्‍यांदा अद्रमुकला संधी. त्यातही विजयी करणार तर प्रचंड बहुमताने; पराजीत म्हणजे अक्षरश: भुईसपाट करणार. याचप्रमाणे आपण भाजप (एनडीए) आणि कॉंग्रेसला (युपीए) आलटून-पालटून सत्ता दिली तर कोणीच उतरणार नाही…मातणार नाही….घेतला वसा टाकणार नाही. यातून प्रेम आणि संसार यातील बॅलन्सही साधला जाईल’’

बायको पुन्हा एकदा हसली. लागलीच दुसर्‍या खोलीत असणार्‍या एफएमवरून गाणे ऐकू आले….‘बडा लुफ्त था जब कुंवारे थे हम-तुम’’ पत्नी गुणगुणू लागली ‘‘ बडा लुफ्त था जब अपोझिशनमे थे तुम’’ हे गाणे तिच्या आवडत्या पक्षाला म्हणजे भाजपला उद्देशून होते हे सांगणे नकोच. अर्थात सत्तेच्या अहंकारात तल्लीन झालेल्या भाजपेयींच्या कानावर तिचा हा स्वर जाणार नसल्याची जाणीव त्या बिचारीला नव्हती. इकडे मलाही सपान पडलं. पाहतो तो काय शुध्द, सात्विक, जनहिताची कळकळ असणारे, स्वच्छ प्रतिमेचे भासणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे एकेक नेते मला २०१९ नंतर ‘अच्छे दिन’ येतील असे सांगू लागले. अन् मी बापडा हरवून गेलोय…वास्तवापेक्षा असली स्वप्नेच बरी!!

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment