Featured slider साहित्य

रवींद्रनाथांचे पसायदान

Written by shekhar patil

आज महाकवि रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. त्यांचे नाव येताच डोळ्यासमोर एका आनंदयात्री ऋषीचे चित्र उभे राहते. जीवनाच्या विविध आयामांमधील आनंदाचे क्षण गुरूदेवांच्या सृजनयात्रेतून जगासमोर आले आहे. आज अनेक दशकांपासून आपल्याला त्यांच्या रचना भावविभोर करत आहेत. खरं तर आज टागोराच्या रचनांमधील निसर्गाकडे पहावयास कुणाला वेळ नाही. त्यांच्या सृजनातील प्रतिमासृष्टीदेखील आपल्यासाठी लुप्त होत आहे. तथापि, आज एकविसाव्या शतकातही टागोर हे नाव त्याच विलक्षण तेजाने चमकत असल्याची बाब कुणी नाकारू शकत नाही.

रवींद्रनाथांचा मूळचा पिंड हा कविचाच असल्यामुळे त्यांचे काव्य आणि गिते, त्यांनी स्वत: विकसित केलेले रवींद्र संगीत हे तर काळाच्या कसोटीवर टिकणारे ठरलेच आहे. पण याच्या सोबतीला त्यांच्या कथा, कादंबर्‍या, निबंध, लेख, भाषणे, प्रवासवर्णने आदींनाही तोड नाही. भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत लिहण्याचा (खरं तर त्यांच्या काव्यातून निवडल्या जाण्याचा) अभूतपुर्व योग त्यांच्या नशिबात होता. आपल्याला फारशी माहिती नसलेली बाब म्हणजे श्रीलंकेचे राष्ट्रगीतसुध्दा रवींद्रनाथांच्या रचनांवर प्रेरित आहे. लंकेच्या राष्ट्रगीताचे रचियते आनंद संपरकूम यांच्यावर रवींद्रनाथांचा मोठा प्रभाव असून याचेच प्रतिबिंब ‘श्रीलंकन माथा’ या त्या देशाच्या राष्ट्रगीतातही उमटले आहे. अर्थात भारतीय उपखंडातून गत एका शतकात रवींद्रनाथ यांच्यापेक्षा उत्तुंग कवि निर्माण झाला नाही हीच त्यांची महत्ता.

रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचाच विचार केला असता, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यात झालेल्या आणि याचमुळे नोबेल पारितोषीत पटकावणार्‍या गीतांजलीचा उल्लेख कुणी टाळूच शकणार नाही. जागतिक पातळीवर व विशेष करून युरोपीय सौदर्यदृष्टीला गीतांजलीने जोरदार धक्का दिला. रवींद्रनाथांच्या काव्यातील रहस्यवाद (मिस्टीसिझम) वैश्‍विक पातळीवर मान्यताप्राप्त झाला. गीतांजलीतील बहुतांश कवितांमध्ये परमेश्‍वराची विविध स्वरूपातील आराधना, ईश्‍वरी अनुभूती आणि याची अनेक विस्मयजनक रूपे आढळून येतात. यातील प्रत्येक कविता ही विलक्षण अनुभूती प्रदान करणारी आहे यात दुमत नाहीच. मात्र या संग्रहातील ३५ व्या क्रमांकांची कविता सर्वाधीक लोकप्रिय आहे. मूळ बंगालीतल्या ‘चित्तो जेथ भयशून्य…’ या कवितेचा खुद्द रवींद्रनाथांनीच ‘व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय’ या शीर्षकाने अनुवाद केला आहे. टागोरांच्या सर्वाधीक लोकप्रिय कवितांमध्ये याचा समावेश होतो. अनेक मान्यवरांनी यावर भाष्य केले आहे. अनेकांनी यातील ओळी उद्धृत केल्या आहेत. एक शतकानंतरही कुठे तरी याचा हमखास उल्लेख होत असतो.

रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यातील गेयता आणि लय ‘भयशून्य चित्त जेथ’मध्ये परिपूर्ण स्वरूपात आढळून येत नाही. मूळ बंगाली कवितेत छंद असले तरी इंग्रजीसह अन्य भाषांचा विचार केला असता, अवघ्या ११ मुक्तछंदातील ओळींमध्ये रवींद्रनाथांनी असीम व अनंत व्याप्ती असणारा गहन अर्थ प्रदान केला आहे. यातून रवींद्रनाथांचा युटोपिया अभिव्यक्त झाला आहे. आपल्या भारत देशाच्या नागरिकांनी अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करावी. किंबहुना अशा वातावरणात त्यांचे अवेकनींग व्हावे ही प्रार्थना यात करण्यात आलेली आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘उठा ! जागृत व्हा आणि आपल्या उद्दीष्टपूर्तीपर्यंत थांबू नका !’ या आपल्या अत्यंत गाजलेल्या वाक्यातून कोट्यवधी भारतीयांना जागृतीचा मूलमंत्र दिला होता. तथापि, विवेकानंदांचा हा विचार संकल्प या प्रकारातील असून रवींद्रनाथांचा विचार हा प्रार्थना स्वरूपातील आहे. अर्थात, असे असले तरी या दोन्ही विचारांनी भारतातील अनेक पिढ्यांवर संस्कार केल्याचे कुणी नाकारू शकणार नाही. रवींद्रनाथांनी पारतंत्र्याच्या काळोखात देदीप्यमान भविष्याची उज्ज्वल प्रभा आपल्या प्रतिभेतून पाहिली होती. यातूनच कोट्यवधी मनांमध्ये तेजोमय भविष्याचा विचार पेरला होता. तेव्हाची परिस्थिती अशाच प्रकारची अतिशय अंध:कारमय होती. परकीय राजवटीच्या वरवंट्याखाली देशातील जनता पिचून निघत होती. या काळ्याकुट्ट वातावरणात लवकरच उष:काल होणार असल्याचा आशावाद रवींद्रनाथांच्या मनात होता. हीच अदम्य आशा या कवितेतून जगासमोर आली आहे. आज भारत देश स्वतंत्र असला तरी रवींद्रनाथांनी या कवितेतून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अवतरले आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी असूच शकत नाही. देशात नावाला लोकशाही असली तरी पराकोटीची विषमता आणि मनामनांमध्ये दुहीचे बिजारोपण करणार्‍या अनेक घटकांनी देश पोखरून काढला आहे. यामुळे रवींद्रनाथांना अपेक्षित असणारे वातावरण अद्यापही भारतात नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अर्थात याचमुळे एक शतकानंतरही ‘चित्तो जेथ भयशून्य’ आपल्या मनाला भावते. ते आजही समकालीन वाटते.

वर नमूद केल्यानुसार ‘व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय’ या कवितेला आयकॉनीक दर्जा मिळाला आहे. याला अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून सादर करण्यात आले आहे. मात्र यात भारताचा मोझार्ट म्हणून समजल्या जाणार्‍या ए. आर. रहेमानची सर कुणाला येणार नाही. रहेमानने ‘जगाओ मेरे देश को’ या विलक्षण फ्युजनमधून रवींद्रनाथांच्या काव्याला आधुनिक संगीतात गुंफण्याची किमया केली आहे. हे गाणेही विलक्षण आशावाद जागवणारे आहे. अर्थात रवींद्रनाथ आणि रहेमान यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या प्रतिभांचा हा संकर एकविसाव्या शतकात तरी भारतात खरोखर या कवितेतील आशावाद प्रत्यक्षात अवतरेल याची ग्वाही देणारा ठरला आहे. आज जयंतीनिमित्त रवींद्रनाथ टागोर यांचे स्मरण करतांना भारतात किमान फ्युजनचा उदारमतवादी विचार तरी रूजलाय ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये विविधतेतील एकतेचा मिलाफ आपण सर्वांनी स्वीकारला तरच रवींद्रनाथांना अपेक्षित असणार्‍या अवेकन्ड अर्थात जागृत समाजाची निर्मिती होईल. ज्ञानेश्‍वरांनी पसायदानाच्या माध्यमातून चराचराच्या भल्यासाठी प्रार्थना केली आहे. याच पध्दतीने रवींद्रनाथ टागोर यांनी भारत राष्ट्राच्या उत्थानासाठी केलेली प्रार्थना व खर्‍या अर्थाने मागितलेले पसायदान म्हणजेच ‘व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय’ ही कविता होय. ही रचना आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवीन विचार देणारी ठरो हीच प्रार्थना.

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake

पहा ए.आर. रहेमानचे अफलातून फ्युजन.

About the author

shekhar patil

2 Comments

 • *ज्ञानेश्वरी, नोबेल आणि ऑस्कर चा सुरेख संगम साधणारा विश्वस्तरीय लेख*
  – डॉ. काझी रफीक “राही”

  काल रात्री दमदार युवा लेखक, नाटककार, अभिनेता व दिग्दर्शक अमर राजपूत यांच्या लग्नसमारंभात शेखर पाटील यांच्याशी भेट झाली. संपादकांचा वेळ किती अमूल्य असतो हे सांगायची गरज नाही. त्यात नियमित जबाबदार्‍या पार पाडून स्वतःच्या भावविश्वात रमून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संपादकाला त्यासाठी वेळ काढणे किती किती दुरापास्त असेल याची कल्पना करता येईल. असो. समारंभात त्यांनी मला या विषयावर लेख लिहायचा आहे हे सांगितल्यावर मला आपसूक जिज्ञासा निर्माण झाली. घरी आल्यावर काही वेळातच लेख प्राप्त झाल्यानंतर मला त्यांच्या ध्येयनिष्ठेबद्दल अप्रूप वाटले. पण रात्री मी फक्त वरवर वाचन केले व सकाळी उठताच बरोबर लेख वाचला.

  प्रथमदर्शनीच तो लेख विश्वस्तरीय विभूतींच्या विचार आणि कलांचा सुरेख संगम साधणारा वाटला. रविंद्रनाथ टागोरांच्या माध्यमातून मध्ययुगीन संत ज्ञानेश्वर यांचे विचार किती कालसुसंगत आहेत हे पटवून दिले. ज्ञानेश्वरांचे पसायदान विश्वस्तरावर भवतु सब्ब मंगलम ची करूणा भाकणारे आहे. नोबेल पारितोषिक प्राप्त कवी ने लिहिलेली
  ‘व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय’ ही कविता पसायदानाप्रमाणे सर्वार्थाने वैश्विक प्रार्थना आहे. विश्वस्तरीय कवितेला विश्वस्तरीय संगीतकाराने आयकॉनीक दर्जा प्राप्त करून दिला हे अधोरेखित करणारे त्यांचे निरिक्षण समर्पक आहे.
  रवींद्रनाथ आणि रहेमान यांच्या संमिश्र प्रतिभेचा संकर एकविसाव्या शतकात भारतीय जनमानसात आशावाद रूजवेल ही सार्थ आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
  या लेखात त्यांनी भारतातील सद्यस्थितीची तुलना स्वातंत्र्यापुर्वी असलेल्या अंध:कारमय
  परिस्थितीशी केली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विविधतेतील एकता जोपासून एकात्मिक विकास साधावा हा संदेश दिला आहे.
  संयोगवश, देशातील अस्थिरता संवेदनशील व्यक्तींना कशी प्रभावित करते याचा प्रत्यय समकालीन प्रथितयश उर्दू कवी
  जावेद अख्तर लिखित नया हुकूमनामा (न्यु ऑर्डिनन्स) ही बहुचर्चित कविता वाचल्यावर येतो. जावेद अख्तर म्हणतात :

  किसी का हुक्म है सारी हवाएं,
  हमेशा चलने से पहले बताएं,
  कि इनकी सम्त क्या है.
  हवाओं को बताना ये भी होगा,
  चलेंगी जब तो क्या रफ्तार होगी,
  कि आंधी की इजाज़त अब नहीं है.
  हमारी रेत की सब ये फसीलें,
  ये कागज़ के महल जो बन रहे हैं,
  हिफाज़त इनकी करना है ज़रूरी.
  और आंधी है पुरानी इनकी दुश्मन,
  ये सभी जानते हैं.

  किसी का हुक्म है दरिया की लहरें,
  ज़रा ये सरकशी कम कर लें अपनी,
  हद में ठहरें.
  उभरना, फिर बिखरना, और बिखरकर फिर उभरना,
  गलत है उनका ये हंगामा करना.
  ये सब है सिर्फ वहशत की अलामत,
  बगावत की अलामत.
  बगावत तो नहीं बर्दाश्त होगी,
  ये वहशत तो नहीं बर्दाश्त होगी.
  अगर लहरों को है दरिया में रहना,
  तो उनको होगा अब चुपचाप बहना.

  किसी का हुक्म है इस गुलिस्तां में,
  बस अब एक रंग के ही फूल होंगे,
  कुछ अफसर होंगे जो ये तय करेंगे,
  गुलिस्तां किस तरह बनना है कल का.
  यकीनन फूल यकरंगी तो होंगे,
  मगर ये रंग होगा कितना गहरा कितना हल्का,
  ये अफसर तय करेंगे.
  किसी को कोई ये कैसे बताए,
  गुलिस्तां में कहीं भी फूल यकरंगी नहीं होते.
  कभी हो ही नहीं सकते.
  कि हर एक रंग में छुपकर बहुत से रंग रहते हैं,
  जिन्होंने बाग यकरंगी बनाना चाहे थे, उनको ज़रा देखो.
  कि जब यकरंग में सौ रंग ज़ाहिर हो गए हैं तो,
  वो अब कितने परेशां हैं, वो कितने तंग रहते हैं.

  किसी को ये कोई कैसे बताए,
  हवाएं और लहरें कब किसी का हुक्म सुनती हैं.
  हवाएं, हाकिमों की मुट्ठियों में, हथकड़ी में, कैदखानों में नहीं रुकतीं.
  ये लहरें रोकी जाती हैं, तो दरिया कितना भी हो पुरसुकून, बेताब होता है.
  और इस बेताबी का अगला कदम, सैलाब होता है.
  किसी को कोई ये कैसे बताए.
  (सुलभ संदर्भासाठी व्हिडिओ लिंक दिली आहे. )
  शेखर पाटील यांचा लेख वाचून त्या विषयाशी संबंधित जे जे आयाम सुचले ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रतिक्रिया लांबलचक नसावी हे संकेत असताना विषयव्याप्ती लक्षात घेऊन वाचक ही बाब दुर्लक्षित करतील ही अपेक्षा ठेवून रजा घेतो.

Leave a Comment