चालू घडामोडी पत्रकारिता

रविशच्या सृजनाचा ‘प्राईम’ टाईम !

Written by shekhar patil

बहुतांश पत्रकारांची नजर मग ती लेखणीतून अभिव्यक्त होणारी असो की, कॅमेर्‍यातून! ही बर्‍याच अंशी जे दिसते त्यालाच प्रमाण मानणारी असते. मात्र जे दिसतेय (वा ठसठशीतपणे दाखवले जातेय!) त्याच्या पलीकडेचे सत्य भेदकपणे मांडण्याची धमक फार मोजके जण दाखवू शकतात. ‘एनडीटिव्ही’चा आयकॉनिक आधारस्तंभ रविशकुमार हादेखील (माझ्या मते तरी !) त्यातील एक. सध्या आपल्या सृजनाच्या शिखरावर असणारा रविश बरेचसे विषय असे काही अफलातून सादर करतो की कुणीही स्तिमीत झाल्यावाचून राहत नाही. अलीकडच्या कालखंडाचा विचार करता त्याचे काही कार्यक्रम उत्तुंग शिखरांना स्पर्श करणारे ठरले आहेत. संपूर्ण स्क्रीनवर अंधार दाखवून या प्रतिकात्मक विरोधाचा अर्थ उलगडून सांगणारे त्याचे निरूपण अंगावर काटा आणते. ‘बागो मे बहार है…’च्या लडिवाळपणाला तो जेव्हा वर्तमानातील विसंगती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घुसमटीचा आयाम देतो तेव्हा आपण अवाक् होतो. आता युपीतली राजकीय लढाई चरमोत्कर्षावर असतांना त्याने बनारस म्हणजेच वाराणसी (काशी) शहरावर सादर केलेला ‘बनारस बोर करता है…’ हा एपिसोड पुन्हा एकदा त्याच्या प्रतिभेची ग्वाही देणारा ठरला आहे.

माझ्या एका मित्राने आम्हा पत्रकारांचे लिखाण हे ‘संदर्भासहीत स्पष्टीकरण’ या संज्ञेच्या पलीकडे नसल्याचे सांगितले तेव्हा मी अक्षरश: थक्क झालो होतो. त्याच्यानुसार मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील अनुक्रमे लिखाण व विविध स्वरूपातील कार्यक्रम हे संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणाच्या पलीकडे जात नाहीत. अर्थात त्यातील विषय आणि आशय हा अगदी ‘इन्स्टंट’ पध्दतीने वाचक अथवा प्रेक्षकांना समजावला जातो. तथापि त्या विषयाच्या गाभ्याला किमान स्पर्श करण्याची तसदी सहसा कुणी घेत नाही. माझ्या मित्रांचे हे आकलन कदाचित अर्धसत्य या प्रकारातीलही असू शकते. मात्र याच्या अगदी उलट; रवीश आपल्या ‘प्राईम टाईम’ला सुरूवात करण्याआधी ज्या पध्दतीने त्या विषयाला समजावून सांगतो तेव्हा त्याने केलेली ‘तयारी’ कुणापासून लपून राहत नाही. याचमुळे नागराज मंजुळे याच्या मुलाखतीआधी त्याने फँड्री आणि सैराट या दोन्ही चित्रपटांबाबत केलेले भाष्य हे एखाद्या कसलेल्या समिक्षकाच्या तोडीस तोड असल्याचे आपण अनुभवू शकतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र वाराणसीतल्या राजकीय प्रहसनावर भाष्य करण्यासाठी रविशने गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेल्या गुरमेहर कौर हिच्या प्रकरणातील एक संकल्पनेचा आधार घेतला. अर्थात विषयाला हात घालण्याआधी तसेच त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्याला रवीश कुठेही दिसत नाही. तर गुरमेहरप्रमाणे त्याने आपले मत हे हातातल्या फलकावरील शब्दांच्या माध्यमातून मांडले आहे. म्हणजे यात तो दिसतही नाही अन् त्याचा आवाजही ऐकू येत नाही. मात्र पडद्यावर जे दिसते ते आपल्याला अत्युच्च अनुभुती प्रदान करणारे ठरते.

बनारस हे जगातील सर्वाधीक प्राचीन शहरांपैकी एक. येथे जणू काही इतिहास आणि वर्तमानाची विलक्षण सरमिसळ झाली आहे. बनारसमधील एकंदरीतच वातावरण हे तेथील रहिवाशांसाठी विलक्षण अभिमानाची बाब आहे. आणि असणारच ना. पुराणांपासून ते वर्तमानापर्यंत या नगरीची महत्ता टिकून आहे. येथील पवित्र गंगा, तिच्या किनार्‍यावरील घाट, मंदिरे आणि तेथील आरत्या, विविध धार्मिक कार्यक्रम, तीर्थयात्रेकरूंची वर्दळ, धर्मशाळा, कायम धगधगणारी स्मशानभूमि, आपला शेवटचा श्‍वास हा पावन नगरीत जावा म्हणून तळमळणारी गलीतगात्र शरीरे, घरच्यांनी अडगळ म्हणून येथे आणून सोडलेली वृध्द मंडळी, उदासवाण्या विधवा, गंगेत सोडण्यात येणारे असंख्य शव, अगदी खरेखुरे विरक्त साधू, साधूंच्या वेशाआडची भोंदू मंडळी, विविध मठ, आश्रम, पंडित-पुरोहित आणि एकंदरीतच येथील भारावलेल्या चराचरावर बरेच काही लिहून, बोलून अथवा दाखवून झाले आहे. मात्र केवळ फलकांवरील मोजक्या शब्दांच्या मदतीने रविशने या प्राचीन नगरीच्या वर्तमानातील व्यथवर अचूकपणे बोट ठेवले आहे.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता चांगलाच रंग भरला आहे. याच टप्प्यात वाराणसी महानगरातील विधानसभा मतदारसंघांमध्येही निवडणूक होत आहे. वाराणसी हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ! यातच युपीतली निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली असल्याने साहजकीच वाराणसीवरच या निवडणुकीचा मुख्य झोत राहिला आहे. सध्या पंतप्रधानांनी येथे मुक्काम ठोकला असल्याने प्रसारमाध्यमांचे लक्षही येथेच लागले आहे. आता तर जणू काही येथे ‘पीपली लाईव्ह’चा उन्माद पहायला मिळत आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांना बनारसमधील घडामोडी जगापर्यंत पोहचवण्याची झालेली प्रचंड घाई आपल्या अनुभवास येत आहे. सर्वपक्षीय नेते, त्यांच्या सभा वा रोड-शो, प्रचारफेर्‍या, गल्लीबोळ आणि कट्टयांवर चालणार्‍या गप्पा आणि एकंदरीतच निवडणुकीचा सारा माहोल जगासमोर मांडण्याचा आटापीटा सुरू असतांना रविशच्या सहकार्‍यांचे कॅमेरे मात्र वाराणसीच्या आजवर समोर न आलेल्या मुद्यांना उपस्थित करतात. यातून बनारसमध्ये तीन नद्या असूनही ‘फोकस’ हा पुर्णपणे गंगेवर असल्याचे आपल्याला दिसते. अस्सीघाटाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चेत तेथील जवळपास पाचशे धोबी समाजबांधवांच्या व्यवसायावर आलेले गंडांतरही यातून आपण अनुभवतो. मोदी, अखिलेश, मायावती, राहूल आदी नेत्यांच्या वलयात तेथील विधानसभेत नेमके कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार आहेत? याचा वेधही त्याचे सहकारी घेतात. एकंदरीतच ‘काशी’त बरेच काही दाखविण्याजोगे असतांना फक्त आणि फक्त मोजके मुद्देच का? असा सरळ प्रश्‍न रविशचे फलक उठवतात तेव्हा प्रसारमाध्यमांचा ‘सिलेक्टीव्ह ऍप्रोच’ विलक्षण परिणामकारकतेने आपल्याला अनुभवास येतो. अर्थात रविशला प्रसारमाध्यमांमधील वाराणसीचे चित्र कंटाळवाणे वाटत असते तरी तेथे बरेच काही असल्याचेही तो आवर्जुन नमूद करतो. याचमुळे तो सहजपणे ‘बनारस बोर करता है’ असे ठासून सांगतांना लागलीच ‘बनारस सराबोर करता है’ असेदेखील म्हणू शकतो. मीडीयात दिसणारे हे शहर प्रत्यक्षात वेगळे कसे? याचा उहापोहदेखील तो करतो. आणि अर्थातच त्याच्या या सादरीकरणात कुणीही ‘सराबोर’ म्हणजेच चिंब झाल्यावाचून राहत नाही.

मुद्रीत माध्यमातील भाषाशैली ही इलेक्ट्रॉनिक मीडियात फारशी वापरली जात नाही. कदाचित एकीकडे शब्द सामर्थ्य तर दुसरीकडे सादरीकरण हे महत्वाचे असल्याने हे होत असावे. मात्र रविशच्या सादरीकरणात त्याची विलक्षण भाषाशैली ही आपल्याला नेहमीच भारून टाकत असते. ‘बनारस बोर करता है…’मध्ये रविशचा चेहरा आणि शब्द नसले तरी त्याचे फलक याची कोणतीही कमतरता भासू देत नाहीत. हीच तर त्याच्या प्रतिभाशक्तीची उत्तुंग झेप आहे. अलीकडच्या हालचालींचा मागोवा घेतला असता ‘एनडीटिव्ही’ या वहिनीवरून रविशची गच्छंती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. खरं तर निरंकुश ताकद असणार्‍यांच्या दबावाखाली या प्रकारचे ‘फळ’ अपेक्षित आहेच. असे होणार की नाही? हे तर काळच ठरवणार आहे. मात्र रविशसारख्या प्रतिभावंताच्या आयुष्यातील सृजनाचा हा ‘प्राईम’ टाईम भारतीय पत्रकारितेत निश्‍चितच ‘मैलाचा दगड’ म्हणून गणला जाणार आहे. याचमुळे मला म्हणावेसे वाटतो….‘रवीश सराबोर करता है…!’

आपल्याला वेळ असल्यास ‘प्राईम टाईम’चा हा एपिसोड नक्की पहा !

About the author

shekhar patil

Leave a Comment