आध्यात्म पत्रकारिता राजकारण

युध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता !

राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही.

राजकारणाला अनेकदा युध्दाची उपमा दिली जाते. आणि युध्दात जय-पराजयाइतकाच महत्वाचा असणारा घटक म्हणजे तह होय. मराठी वीर युध्दात जिंकतात मात्र तहात हरतात असे अनेकदा म्हटले जाते. यात तथ्यदेखील आहे. इतिहासातील अनेक घटना याचीच ग्वाही देणार्‍या आहेत. याचा विचार करता गेल्या साडेचार दशकांपेक्षा जास्त कालखंडाच्या राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही. मुरब्बी, मुत्सद्दी, चाणाक्ष, चतुर आणि अर्थातच काळाचा अचूक वेध घेणार्‍या या महानेत्याचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली असता कोणत्याही स्थितीत कायम दोन पाऊल पुढे टाकण्याची त्यांची विलक्षण हातोटी आपल्याला थक्क केल्यावाचून राहत नाही.

मुळातच देशातील अन्य राज्यांमध्ये साठच्या दशकातच कॉंग्रेसेतर राजकीय विचार प्रबळ होत असतांनाही महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष अत्यंत भक्कम स्थितीत होता. या पुरोगामी भुमित कॉंग्रेसचा सर्वसमावेशक विचार चांगलाच रूजला होता. यातच यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाचे कॉंग्रेस सोडण्याचे ‘टायमिंग’ साफ चुकले होते. या पार्श्‍वभुमिवर, चाळीशीतही प्रवेश न केलेल्या शरदचंद्र गोविंदराव पवार या तरूणाने पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडण्याचे धाडस दाखविले. महाराष्ट्रात १९९५ साली युतीने प्रथम गैरकॉंग्रेसी सरकार स्थापन करण्याचे मानले जात असले तरी पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुलोद’ सरकारने आधीच कॉंग्रेसला पहिला धक्का दिला होता हे विसरून चालणार नाही. असे अनेक धक्के त्यांनी आजवर दिलेत हा इतिहासही आपल्यासमोर आहेच! अर्थात हा प्रयत्न अल्पजीवी ठरला. इंदिराजींच्या राष्ट्रीय राजकारणातील धमाकेदार पुनरागमनामुळे सगळे चित्र बदलले. महाराष्ट्रात शरदरावांच्या वाटचालीबद्दल शंका व्यक्त करण्यात आल्या. मात्र राज्याच्या कान्याकोपर्‍यात आपला पाया मजबुत करत असतांनाच त्यांनी राजीवजींच्या कालखंडात कॉंग्रेसमध्ये पुनरागमनाचा घेतलेला निर्णय हा अनेकदांना धक्कादायक वाटला. यावेळी त्यांनी दाखविलेली लवचिकता ही फक्त अपरिहार्य राजकीय तडजोडच नव्हती हे नंतर सिध्द झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा वर्षे तर दुसर्‍या टप्प्यात अंदाजे एक तप कॉंग्रेसमध्ये व्यतीत करतांना शरदराव पवार कॉंग्रेसी संस्कृती कोळून प्यायलेच नाही तर या पक्षातील वरिष्ठांच्या चालींना पुरूनही उरले.

देशातील कोणत्याही राज्यातून ‘हायकमांड’ला आव्हान देणारे नेतृत्व उदयास येऊ नये याची पुरेपुर काळजी कॉंग्रेसने आजवर घेतली आहे. यासाठी त्या-त्या राज्यातील प्रबळ समुदायातील नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवितांना त्याच्या खुर्चीखाली फटाके पेरण्याचा ‘पॅटर्न’ आजवर राबविण्यात येत आहे. अर्थात एकाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि दुसर्‍या तितक्याच तोलामोलाच्या नेत्याला त्यांच्याविरूध्द झुंजण्यासाठी बळ द्यायचे अशी पॉलिसी आजवर राबविण्यात येत आहे. यामुळे शरदरावांना आजवरच्या कॉंग्रेसमधील वाटचालीत विरोधकांपेक्षा सोबत बसलेल्यांच्या कुरघोड्यांनाही तोंड द्यावे लागले. ते याला पुरूनच उरले नाहीत तर या प्रकाराला त्यांनी ‘जशास तसे’ उत्तर दिले. यामुळे स्वकियांनी अनेकदा त्यांचा ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. नव्वदच्या दशकात दिल्लीतील काही राजकीय घटनांमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली. १९९१ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडणे असो, नरसिंहा राव यांनी त्यांना महाराष्ट्रात परत पाठविणे असो की, कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव! एखाद्या नेता यामुळे गलीतगात्र होण्याची शक्यता होती. मात्र ते नाऊमेद झाले नाहीत. मुळातच कॉंग्रेसमधील ‘निष्ठे’च्या व्याख्येत आपण बसू शकत नसल्याची जाणीव होत असतांनाच सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्याचे पाहून शरदरावांनी स्वतंत्र वाट चोखाळणे हे त्यांच्या धाडसी स्वभावाला साजेसेच होते. मात्र हे करत असतांना सोनिया गांधींच्या विदेशी मुळाला आक्षेप घेण्याचा त्यांचा पवित्रा त्यावेळी अनाकलनीय वाटला. आयुष्यभर पुरोगामीत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या पवारांना एका महिलेच्या विदेशी मुळावर जावेसे वाटले याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. त्या कालखंडात भारतीय जनता पक्षातील नेतेदेखील हाच आरोप करत असतांना पवारांनीही तोच सुर आळवावा; या धक्यातून राजकीय वर्तुळ सावरत असतांना त्यांनी लागलीच दुसरा बॉंब टाकला. १९९९ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवून निकालानंतर मात्र सत्तेसाठी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याच्या त्यांच्या निर्णयाने खळबळ उडाली.

राज्यभरात कॉंग्रेविरोधी रान उठविल्यानंतर काही महिन्यात त्याच पक्षाशी ‘तह’ करण्याचा पवारांचा हा पवित्रा किती फलदायी ठरला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुळात तेव्हा सेना-भाजपच्या सोबतीने सत्तेत सहभागी होणे त्यांना सोयीचे होते. यातून ते तत्कालीन वाजपेयी सरकारमध्ये वजनदार खात्याचे मंत्रीदेखील बनू शकले असते. मात्र हा मोह टाळल्याने महाराष्ट्रात तीन तर केंद्रात दोन पंचवार्षिक इतका सत्तेत वाटा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला. यामुळे ९९ सालचे पवारांचे एक मागे घेतलेले पाऊल त्यांना राजकीय कारकिर्दीत दहा पावले पुढे घेऊन गेले. याच प्रमाणे २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापनेत महत्वाची भुमिका बजावतांना त्यांनी उमदेपणा दाखवत सोनियांना मान दिला. तर विधानसभेत कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही ‘आघाडी धर्म’ निभावत मुख्यमंत्रीपद न मागण्याचे त्यांचे निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले. मात्र शरदराव पवार हे राजकीय क्षितीजापल्याड पाहण्यास सक्षम असल्याची प्रचिती यानंतर एक दशकानंतर आली. गैरव्यवहारांमुळे बदनाम झालेले संयुक्त पुरोगामी आघाडीचे दुसरे सरकार भुईसपाट होणार याचा अंदाज घेऊन त्यांनी आधीच २०१४ची लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली. यातच सुमारे चारशे सभांनी देश ढवळून काढणार्‍या नरेंद्र मोदी यांच्याशी असणारे संबंध वापरत त्यांना बारामतीत येऊ दिले नाही. यानंतर आश्‍चर्यकारकरित्या दीड दशकांपासून असणारी कॉंग्रेससोबत आघाडी तोडली. आणि याहूनही धक्कदायक बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी न मागता भाजपला पाठींबा देऊन टाकला. या सर्व घटनांच्या पटकथेतील समान दुवे कुणाच्याही लक्षात सहजपणे येतील. अर्थात आपल्या राजकीय कारकिर्दीतल्या शेवटच्या टप्प्यात पवार यांचा हा पवित्रा त्यांना लाभदायक ठरणार असल्याचे आजच स्पष्ट झाले आहे.

शरदचंद्रजी पवार हे त्यांच्यापेक्षा अधीक राजकीय शक्ती असणार्‍या अनेक राज्यांमधील मातब्बर नेत्यांप्रमाणे ‘प्रादेशिक’ इमेजमध्ये अडकले नाहीत. जाणीवपुर्वक आपली ‘राष्ट्रीय’ अशी प्रतिमा जोपासण्यात ते यशस्वी ठरले आहेत. वयाच्या पंचाहत्तरीतही ते तारूण्यातील उत्साहाने राजकीय कारकिर्दीतील नवे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. प्रदीर्घ काळानंतर ते सत्तेत नसल्याचा विराम अनुभवत आहेत. मात्र आपल्या आयुष्यातील असले अनेक विराम हे ‘स्वल्प विराम’ असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. शरदरावांचा सध्या भाजपसोबतचा ‘तह’ हा अनेकांना आश्‍चर्यकारक वाटत आहे. मात्र राज्य आणि केंद्रात कोणतेही काम अडणार नसल्याची तजवीज त्यांनी यातून करून घेतली आहे. अलीकडच्या काळात सुरू झालेल्या चर्चेनुसार २०१७च्या राष्ट्रपतीपदाचे ध्येय त्यांच्यासमोर असू शकते. तसे न झाल्यास २०१९ साली ते तत्कालीन स्थितीचा वेध घेत कोणता तरी नवीन ‘तह’ करू शकतात. मात्र तो भाजपसोबत जाण्याचा असेल की, मोदींविरूध्दच्या देशव्यापी सेक्युलर आघाडीत सहभागी होण्याचा? याचे उत्तर खुद्द शरदचंद्र पवार हेच योग्य वेळी देतील.

अफाट लोकसंग्रह, जनसामान्यांशी जुळलेली नाळ, उत्कृष्ट संसदपटुता, विविध पक्षातील मान्यवरांशी व विशेषत: विरोधकांशीही असणारे सलोख्याचे संबंध आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकीय द्रष्टेपणा असतांनाही महाराष्ट्राचा हा महानेता दिल्लीच्या तख्तावर आरूढ न झाल्याची सल प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच आहे. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आता याची शक्यता धुसर वाटत असली तरी मराठी भुमीचा हा थोर सुपुत्र आज देशातील मोजक्या नेत्यांमध्ये गणला जातोय याचा अभिमानही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तर त्यांना आधीच अढळपद प्राप्त झाले आहे. अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पुढील ‘इनिंग’साठी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा.

About the author

shekhar patil

Leave a Comment