चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

युग बाजारू महोत्सवांचे !

कोणत्याही पारंपरिक उत्सवाला विविध कंपन्यांनी कधीच गल्ला भरण्याचा हुकमी इव्हेंटमध्ये परिवर्तीत केले आहे. मात्र एखाद्या महोत्सवालाच कुणी कंपनी ‘हायजॅक’ कसे करू शकतो हे पहावयाचे असल्यास चीनमधील ‘सिंगल्स डे’शिवाय दुसरे उदाहरण मिळणार नाही.

कोणत्याही पारंपरिक उत्सवाला विविध कंपन्यांनी कधीच गल्ला भरण्याचा हुकमी इव्हेंटमध्ये परिवर्तीत केले आहे. मात्र एखाद्या महोत्सवालाच कुणी कंपनी ‘हायजॅक’ कसे करू शकतो हे पहावयाचे असल्यास चीनमधील ‘सिंगल्स डे’शिवाय दुसरे उदाहरण मिळणार नाही. अफलातून संकल्पनेतून जन्माला आलेल्या या महोत्सवाला अलीबाबा या कंपनीने धंद्यात परिवर्तीत करण्यासाठी लढविलेली शक्कल आणि भारताच्या उंबरठ्यावर धडक देणार्‍या ‘इव्हेंट’ आदींबाबतचा हा उहापोह.

singles_day_celebration

कधीतरी एखादी गमतीशीर कल्पना एखाद्या परंपरेत परिवर्तीत होत असते. याचप्रमाणे चीनमध्ये ‘सिंगल्स डे’ जन्माला आला. भारतात नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला आर्थिक उदारीकरण सुरू झाले असले तरी चीनमध्ये त्याआधीच आर्थिक सुधारणांना आधीच सुरूवात झाली असल्याने पाश्‍चात्य राष्ट्रांमधील सर्व बर्‍यावाईट बाबींचा शिरकावही झाला. यातील ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सारख्या दिवसाने चिनी समाज ढवळून निघाला. प्राचीन परंपरेचे जोखड झुगारून लावत आधुनिकतेच्या मार्गावर गतीक्रमण करणार्‍या चिनी समाजावर साम्यवादाचा पगडा असल्याने साहजकीच या सांस्कृतीक आक्रमणाला थोपविण्याचे प्रयत्नही झाले. यातूनच १९९०च्या दशकाच्या सुरूवातीला ‘सिंगल्स डे’ उदयास आला.

नोव्हेंबर महिन्याच्या अकरा तारखेला वर्षातून एकदाच येणारी ११/११ अशी स्थिती असते. यातील चारही आकडे स्वतंत्र तसेच एकाकी असतात. याचमुळे या दिवशी नानजिंग विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना ‘सिंगल्स डे’ साजरा करण्याची कल्पना सुचली. हा दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची खिल्ली उडविण्यासाठी साजरा करण्याचे ठरले. परिणामी व्हॅलेंटाईन्सच्या विरूध्द वर्तन यात करण्याचे ठरले. या अनुषंगाने जोड्याने साजरा करणार्‍या त्या उत्सवाविरूध्द ‘सिंगल्स डे’मध्ये अविवाहितांनी एकत्रित येऊन आपल्या एकाकीपणाला सेलिब्रेट करण्यात आले. दोन-तीन वर्षात चीनमधील बहुतांश विद्यापीठांमध्ये याचे लोण पोहचले. १९९५ पर्यंत विद्यापीठातून पदवीधर झालेल्या चिनी विद्यार्थ्यांनी नंतर हा उत्सव संपुर्ण चिनी समाजात रूजविला. यात तरूणांसोबत तरूणीही सहभागी होऊ लागल्या. प्रारंभी ‘बॅचलर्स पार्टी’चे असणारे याचे स्वरूपही बदलले. या दिवशीच अनेक जण आपल्या साथीदाराचा शोध घेऊ लागल्याने याला थोडे रोमँटीक वलयही लाभले. यामुळे कधी काळी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निषेधार्थ साजरा होणारा हा दिवस नेमका त्याच मार्गावरून जाऊ लागला. यानंतरच्या इंटरनेट क्रांतीने तर संपुर्ण चिनमध्ये हा दिवस लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला. खरं तर चिनी माणूस हा उत्सवप्रिय असून वर्षभर ते अनेक सण साजरे करत असतात. यातील चिनी नववर्ष तर आपल्या दिवाळीप्रमाणेच साजरा करण्यात येतो. मात्र त्यालाही फिका पाडेल असे वलय ‘सिंगल्स डे’ला लाभले.

आज ‘सिंगल्स डे’ हा चिनमध्ये अत्यंत चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात येतो. या दिवसाला कोणत्या डिशेश खाव्यात, कोणती गाणी म्हणावी याचे अलिखित नियमही अस्तित्वात आले. जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या चिनमधील या उत्सवाचे बदलते रंग सर्वप्रथम काही कंपन्यांच्या लक्षात आले. यात ‘अलीबाबा’ या दिग्गज कंपनीने यातील खरे सामर्थ्य जोखले. चीनमध्ये सायबर क्रांती प्राथमिक अवस्थेत असतांनाच १९९८ साली जॅक मा या हिकमती तरूणाने ‘अलिबाबा’ ही ई-शॉपींग करणारी कंपनी सुरू केली तेव्हा त्याच्या यशाबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती. यथावकाश ‘अलीबाबा’ची घोडदौड सुरू झाली. प्रारंभी ‘ई-कॉमर्स’मध्ये फक्त मध्यस्थाची भुमिका करणार्‍या या कंपनीचे शेकडो मॉल्स उभे राहिले. यानंतर इंटरनेट सोल्युशन्स, क्लाऊड कंप्युटींग, स्मार्टफोन सोल्युशन्स आदींमध्ये या कंपनीने वर्चस्व प्रस्थापित केले. २००९ साली ‘अलिबाबा’ने ‘सिंगल्स डे’ हा दिवस शॉपिंगसाठी सर्वोत्तम असल्याची प्रचंड जाहीरातबाजी केली. कोट्यवधी चिनी जनतेपर्यंत हा संदेश परिणामकारक पोहचलवल्याचा फरक त्यांना स्पष्ट जाणवण्यापर्यंत दिसून आला. अजून एक वर्ष निघून गेल्यानंतर २०११ हे वर्ष आले. यात ११/११/११ असा दुर्मिळ योग जुळून आल्याची पर्वणी ‘अलीबाबा’ला चांगलीच फळली. या दिवशी त्यांच्या ‘ताओबाओ’ या ई-कॉमर्स पोर्टलने तब्बल तीन अब्ज डॉलर्स (सुमारे साडे अठरा हजार कोटी रूपये!) इतका व्यवसाय केल्याचे अवघे जग थक्क झाले. गतवर्षीदेखील कंपनीने अशीच रग्गड कमाई केली. यामुळे या दिवसाच्या प्रेमात ‘अलीबाबा’ इतके पडले की त्यांनी अकरा या चिनी शब्दाचे स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) आपल्याकडे घेतले आहेत.

हे सारे होत असतांना अजस्त्र आकारमान बनलेली ‘अलीबाबा’ न्युयॉर्क शेअर बाजारात लिस्टेड झाली. कोणत्याही टेक कंपनीचा जगातील सर्वात मोठा ‘आयपीओ’ म्हणून त्यांचा नावलौकीक झाला. चिनी ब्रँडकडून ग्लोबल पातळीवर ही कंपनी जात असतांना त्यांनी आजच्या ‘सिंगल्स डे’साठी संपुर्ण ताकद पणास लावली. याचाच परिणाम म्हणजे आज या कंपनीने तब्बल नऊ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त डॉलर्सचा (सुमारे ६३ हजार कोटी!) रूपयांचा व्यवसाय केला.

खरं तर प्रत्येक देशांमधील महत्वाचा सण वा उत्सव हे कंपन्यांसाठी सुगीच्या दिवसांसमान असतात. आपल्या देशाचा विचार केला असता दसरा-दिवाळीत बहुतांश गृहोपयोगी सामानांवर ऑफर्सचा भडिमार असतो. या कालखंडात सर्वाधीक पैसा खर्च होत असल्याने कंपन्या ग्राहकांना विविध आमिषे दाखवितात. अमेरिकेत प्रत्येक नोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरूवार ‘थँक्सगिव्हींग डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून क्रिसमसच्या सेलिब्रेशनला सुरूवात होते. याचा दुसरा दिवस अर्थात चौथा शुक्रवार हा अमेरिकन कंपन्यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून नावलौकीकास आणला आहे. सणाच्या आणि लागोपाठ येणार्‍या सुटीच्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या खिशातील पैसा अलगदपणे काढण्यासाठी अमेरिकन कंपन्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर दोन दिवसांनीच येणार्‍या सोमवारला त्यांनी ‘सायबर मंडे’ मध्ये परिवर्तीत करून त्या दिवशी शॉपिंग करण्याचे आमिष टाकले. साधारणत: २००४-०५पासून हे दोन दिवस अमेरिकन ई-कॉमर्स कंपन्यांसह अन्य व्यावसायिकांना बक्कळ कमाईचे हक्काचे दिवस ठरले आहेत. अगदी क्रिसमसपेक्षाही या दोन्ही दिवशी कंपन्यांची चांदी होते.

‘सिंगल्स डे’ असो ‘ब्लॅक फ्रायडे’ की ‘सायबर मंडे’ यातील प्रत्येक दिवसाची भरभराट व्यावसायिकतेच्या पायावर झालेली आहे. आता अलीबाबाचा

‘सिंगल्स डे’चे व्यावसायिक महत्व ओळखणारा जॅक मा!

‘सिंगल्स डे’चे व्यावसायिक महत्व ओळखणारा जॅक मा!

संस्थापक जॅक मा याने ‘सिंगल्स डे’ हा महोत्सव ग्लोबल पातळीवर साजरा करण्याची घोषणा केली आहे. अलीबाबाची अजस्त्र आर्थिक ताकद पाहता (आजचे त्यांचे व्हॅल्युएशन १५ हजार कोटी डॉलर्स अर्थात नऊ लाख कोटी रूपये इतके आहे!) ते भविष्यात अगदी भारतासारख्या मोठ्या राष्ट्रातही ‘सिंगल्स डे’ वा एखाद्या देशी महोत्सवाला व्यवसायकेंद्रीत इव्हेंटमध्ये परिवर्तीत करू शकतात. यासाठी चित्रपट, दुरचित्रवाणी वाहिन्यांासह संपुर्ण मीडिया, पॉप कल्चरमधील सेलिब्रीटीज आदींचा वापर करणे त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. चीन आणि अमेरिकेत बाजारू महोत्सवांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता अर्थातच भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडे त्यांचे लक्ष जाणे स्वाभाविक आहे. आणि अर्थात कितीही प्रयत्न केला तरी या सांस्कृतीक नव्हे अर्थसांस्कृतीक आक्रमणाला कुणीही थोपवू शकणार नाही. यामुळे कदाचित २०१५ वा १६ साली याच दिवशी भारतातही ‘सिंगल्स डे’ वा असलाच कोणता उपटसुंभासमान उदायस आलेला महोत्सव जल्लोषात साजरा झाल्यास नवल वाटू नये.

About the author

shekhar patil

Leave a Comment