चालू घडामोडी

म्हणे संस्कृती रक्षक !

नुकत्याच दोन भयंकर घटना समोर आल्यात. एकात प्रेमी युगलास बेदम मारहाण करणार्‍यांचे भयंकर प्रकरण समोर आले. तर दुसर्‍यात बायको जीन्सची पँट घालते म्हणून गावाने एका दाम्पत्यावर बहिष्कार घातल्याची.

नुकत्याच दोन भयंकर घटना समोर आल्यात. एकात प्रेमी युगलास बेदम मारहाण करणार्‍यांचे भयंकर प्रकरण समोर आले. तर दुसर्‍यात बायको जीन्सची पँट घालते म्हणून गावाने एका दाम्पत्यावर बहिष्कार घातल्याची. या दोन्ही घटनांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे ती संस्कृतीच्या स्वयंघोषित ठेकेदारांची मुजोरी !

आता संस्कृती आणि नितीनियम म्हणजे काय असतात हो? जगातील एका देशातले वागणे हे दुसर्‍या देशात अनैतिक ठरू शकते. पाश्‍चात्य लोक घरात बुट घालून वावरतात तर पौर्वात्य दरवाजाजवळच चपला काढतात. मग अनैतिक कोण? याचप्रमाणे आहार-विहारापासून ते सामाजिक निती-नियमांमध्येही जगभरात प्रचंड वैविध्य आहे. आता जग प्रचंड गतीने बदलतेय. अनेक संस्कृत्यांची घुसळण होतेय. यातून ‘आपली संस्कृती लयास जातेय’ याच्या नावाने गळे काढणार्‍यांना डोक्याला कितीही झिणझिण्या येऊ देत; आपल्या भोवती अक्षरश: गरगरायला होईल इतके बदल होताहेत. काही चांगले काही वाईट. चांगले बदल स्विकारण्याचा खुलेपणा आपल्याकडे हवा तर वाईटाला कायदेशीर मार्गाने प्रतिबंध करण्याची इच्छाशक्ती. मात्र आपण म्हणू तीच संस्कृती म्हणणार्‍यांची एक हिंस्त्र जमात देशभरातील गल्लीबोळांमध्ये अन् निर्जन स्थळांमध्ये वावरतेय. आपण म्हणू तेच सामाजिक नियम असा यांचा हेका आहे. यातून प्रेमी युगलांना मारण्यापासून ते पाशवी बलात्कारापर्यंतच्या घटना घडताहेत. आता लातूर जिल्ह्यातील ती अमानुष मारहाण पाहून अद्यापही अस्वस्थ वाटतेय यार! या हरामखोरांचा अमानुषपणा पाहून त्यांना मानव तरी म्हणावे की नाही अशी स्थिती आहे. यातच हे कुणा संघटनेचे सदस्य आहेत. नाव काय तर म्हणे…‘गनिमी कावा’. अरे आपल्या छत्रपतींनी ‘गमिनी कावा’ जगप्रसिध्द केला तो स्वराज्यासाठी! अन् तुम्ही वापरताहेत कथित नैतिकता जोपासण्याआड पशुसमान कृत्यांसाठी! अन् तुमचे काय जाते? कुणी प्रेम केल्यास तुमच्या पोटात का दुखावे? अन् नैतिकतेच्या नावाखाली धुडगुस घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय? यात मुलीची जात विचारून केलेली अमानुष मारहाण पाहून मन सुन्न झाले राव.

जसे धर्माच्या नावाखाली अधर्म करणारे ठेकेदार जगातील प्रत्येक कोपर्‍यात आहेत त्याचप्रमाणे संस्कृतीचे ठेकेदारही आहेत. जणू काही समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या म्हणण्यानुसार वागायला हवा. नाही वागला तर सरळ हे हाणामारीसाठी मोकळे. मग कधी यांना ‘व्हॅलेंटाईन्स डे’चा राग येतो तर कधी सार्वजनिक स्थळांवर प्रेमिकांचे वर्तन खपत नाही. श्रीराम सेनेसारख्या मुजोर संघटना आता देशाच्या कान्याकोपर्‍यात उदयास आल्यात या बाबीकडे आपण अत्यंत गांभिर्याने पहायला हवे. मुळातच प्रत्येक वाईट बाब ही पाश्‍चात्यांकडून आल्याचे गळे काढत त्याला विरोध करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. काही वर्षांपुर्वी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला विरोध करण्याचे खुळ आले होते. याला विरोध करण्यासाठी कथित संस्कृतीरक्षकांनी गावोगावी राडेबाजी केली होती. झाले काय? आता कुणीही ‘सैनिक’ या दिवशी फारसा विरोध करत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती मग ती कोणत्याही दिवशी असो करणे जर पाप असेल तर प्राचीन भारतातील वसंतोत्सव आणि मदनोत्सवात काय वेगळे घडत होते? जीवनाला समग्र दृष्टीने पाहणार्‍या आपल्या पुर्वजांनी धर्म,अर्थ आणि मोक्षासोबत ‘काम’ही जीवनातील आवश्यक बाब मानली होती. आता मात्र याला विरोध. कार तर म्हणे खुलेपणाने प्रेमाची अभिव्यक्ती करण्यास आपल्या संस्कृतीत थारा नाही तर खजुराहोसारखी मैथुनशिल्पे काय कुणी परदेशी लोकांनी कोरलीत?

इकडे रायगड जिल्ह्यातील दुसरे प्रकरणही असेच भयंकर आहे. भोगाव येथील राहुल येलंगे आणि त्याची पत्नी पौर्णिमा हिच्यावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला. यासाठी राहुलची पत्नी जीन पँट घालण्याचे तकलादू कारण पुढे करून या दाम्पत्याला त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. खुद्द राहुलने याबाबत पोलिसात तक्रार केली नसली तरी यातून आजही सामाजिक बहिष्काराचे अस्त्र उपसले जात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. यातच आज दाभोळखाडीय भोई समाजातील तब्बल ४०० कुटुंबांना आंतरजातीय विवाहांमुळे वाळीत टाकल्याचे वृत्त आले आहे. खरं तर आंतरजातीयच नव्हे तर आंतरधर्मीय विवाह झाल्याशिवाय भारतीय समाजाच्या एकजीनसीकरणाला वेग येणार नसल्याची बाब सुर्यप्रकाशाइतकी सत्य असतांना येथेही समाजाचे ठेकेदार आपल्या इभ्रतीचा हवाला देऊन वाळीत टाकण्याचे घृणास्पद कृत्य करतात ही बाब महाराष्ट्राच्या पुरोगातीत्वाला धक्का पोहचवणारी आहे. सुदैवाने गेल्या दोन वर्षात असल्या स्वरूपाचा मुजोरपणा करणार्‍या अनेक जात पंचायती आणि त्यातील पंचांना कारागृहाची हवा खावी लागली आहे. मात्र प्रत्येक जण असे धाडस दाखवू शकत नसल्याने अद्यापही जात पंचायती आणि समाजाच्या ठेकेदारांची दादागिरी कायम आहे.

अहो चाललेल तरी काय? प्रत्येकाला आपला धर्म, जात, भाषा, संस्कृती, समाज हा धोक्यात आल्याचा साक्षात्कार होत आहे. यासाठी कुणी समाजात कसे वागावे, कुणाशी संबंध ठेवावे, विवाह कुठे करावेत, सार्वजनिक स्थळांवर कसे वावरावे यासाठी सल्ला देणारी आणि कुणी याचा भंग तर करत नाहीना हे पाहण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणार्‍या रिकामटेकड्यांचा मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. आता तर कुणी किती अपत्यांना जन्मान घालावे असा सल्ला देणार्‍यांचाही सुळसुळाट झाला आहे. यातूनच लातूरसारख्या भयंकर घटना आपल्या भोवती घडत आहेत. राहुल येलंगेसारखे या मंडळींच्या डोळ्यात खुपत आहेत. हा एक प्रकारचा सामाजिक दहशतवादच आहे. आज माणसांचे मुडदे पाडणार्‍या दहशतवादापासून आपल्याला जितका धोका आहे तितकाच माणसांना विविध निर्बंधांमध्येच जगण्यास प्रवृत्त करणार्‍या या हरामखोरांपासूनही आहे.

About the author

shekhar patil

2 Comments

  • दादा लेख खरोखर वस्तुस्थितीवर आधारित आहे परंतु अशा हरामखोरांनी बोध घेण्याची गरज आहे

Leave a Comment