चालू घडामोडी राजकारण

मोदींची ‘वाट’ आणि ‘चाल’

modi अपेक्षेप्रमाणे गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी हॅटट्रीक केली आहे. हा विजय भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर मोदी यांचा असल्याचे बहुतांश राजकीय पंडित आणि विश्‍लेषकांचे मत आहे. त्यांनी आपल्या विजयी भाषणात पंतप्रधानपदाबद्दल हसून टाळले असले तरी त्यांची देहबोली ही बरेच काही सांगून जात होती. अहमदाबाद ते दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा सुखकर नसेल मात्र आज किमान त्यांचे नाव पर्याय म्हणून समोर येणे ही बाब मोदींचे महत्व अधोरेखित करणारी आहे.

काल विधानसभेचे निकाल लागल्यानंतर हिमाचलातील कॉंग्रेसचा जल्लोष हा गुजरातमधील पराभवामुळे पुर्णत: झाकोळला गेला. यात काही कॉंग्रेस नेत्यांना काय बोलावे हेदेखील सुचेनासे झाले होते. यातील सर्वसामान्य सुर म्हणजे मोदींच्या जागा कमी झाल्या असून अपेक्षेपेक्षा त्यांचा विजय देदीप्यमान नाही. याचसोबत कॉंग्रेसच्या जागा वाढल्याचा दावादेखील करण्यात आला. याचसोबत मोदी नावाच्या ब्रँडचा हा विजय असल्याचे सांगण्यात आले. या दाव्यांमध्ये तथ्य नक्कीच आहे. मात्र या सर्व बाबी मोदींना अजूनच उंची प्रदान करणार्‍या आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याने लागोपाठ तिसर्‍या निवडणुकीत विजय मिळवण्याची किमया करणारे मोदी ही पहिलेच नेते नव्हेत. दिवंगत डावे नेते ज्योती बसू यांचा कार्यकाळ तर यापेक्षा खुप मोठा आहे. अलीकडच्या काळात ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हा कारनामा केला आहे. याशिवाय, पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशातून शिवराज सिंग तर छत्तीसगडमधून रमणसिंग यांनाही हॅटट्रीकची संधी आहे. याशिवाय, मायावती, जयललिता आदींनीही दीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आज मोदींच्या विजयानंतर त्यांचा होणारा जयजयकार आणि पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा ही अन्य नेत्यांबाबत का होत नाही या प्रश्‍नाचे आकलन होण्यासाठी देशातील विद्यमान स्थिती समजून घेणे गरजेचे आहे.

आज भारतातील मध्यमवर्ग हा सर्वात मोठा समूह आहे. उदारीकरणाची फळे ही धनाढ्यांसोबत या समूहालाही बर्‍यापैकी चाखायला मिळाली आहेत. या समूहाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिक नरेंद्र मोदी बनले आहेत. जाती, धर्म, भाषा व संस्कृतीच्या अस्मितेच्या पलीकडे जाऊन या समुदायाला आर्थिक प्रगती अधिक महत्वाची वाटते. एका अर्थाने ‘इंडिया’त राहणार्‍यांना मोदी जवळचे वाटतात. याचमुळे त्यांच्या विकासाचा मुद्दा हा गुजरातच्या सीमारेषा ओलांडून देशभरात कुतुहलाचा विषय बनला आहे. या विकासाआडचे वास्तव काहीही असो मात्र एक माणूस एखाद्या राज्याचा कसा कायापालट करू शकतो याचे ‘रोल मॉडेल’ म्हणून मोदी विख्यात झाले आहेत. मोदींची कठोर प्रशासक म्हणून असणारी ख्याती ही याचमुळे देशभरात वाखाणण्यात आली आहे. या सर्व बाबींच्या जोडीला हिंदुत्ववादाचा मुलामा आणि टेक्नोसॅव्ही यंत्रणा जोडून ‘ब्रँड मोदी’ आता दिल्लीवर स्वारी करण्यासाठी सज्ज आहे. याचे संकेत मोदींच्या कालच्या भाषणात मिळाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणातून गुजरातच्या गौरवाचे गान करतांना त्यांनी गुजरातीतून नव्हे हिंदी भाषेतून संवाद साधला. याचाच अर्थ असा की, आपण काय बोलतो हे संपूर्ण देशात जावे ही त्यांची मनोमन इच्छा असणार. अपेक्षेप्रमाणे त्यांची ही इच्छा फलद्रुप झाली. राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा विषय त्यांनी हसून कुशलतेने टाळला. मात्र याचवेळी राष्ट्रीय मीडियात गुजरातविरोधी टोळी असल्याचा टोला मारण्यास ते विसरले नाहीत. अगदी बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे मीडियाचा मोदी हा अत्यंत आवडता विषय आहे. अर्थात हे ‘प्रेम’ मोदी नेहमी बातम्यांना खाद्य पुरवतात यातूनच आलेले आहे. मीडियाला फटकारतांनाच मोदींनी वारंवार सहा कोटी गुजराती बांधवांचा उल्लेख केला. आपल्याकडून काही चूक झाली असल्यास माफ करा अशी सादही त्यांनी घातली. हे सर्व करत असतांना त्यांची देहबोली ही अत्यंत आक्रमक विजेत्यासमान होती. यातूनच आगामी काळात त्यांची पावले दिल्लीच्या दिशेने पडण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र या वाटेत अनेक काटे आहेत याचे भान त्यांना ठेवावे लागणार आहे.

गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. आनंदोत्सवाच्या क्षणांमध्ये प्रतिक्रिया प्रकट करतांना अरूण जेटली यांच्या चेहर्‍यावरील तणाव काल अगदी स्पष्टपणे दिसून आला. भाजपाच्या पहिल्या आणि दुसर्‍या फळीतील नेत्यांचा हा थंडपणा मोदींच्या आगामी वाटचालीतील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. अपेक्षेप्रमाणे नितीश कुमार यांच्या पक्षाने मोदींच्या नावाला विरोध करून आपली मतपेढी कायम राखण्याचा प्रयत्न केला खरा मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य नेत्यांनी फारशा उत्साहवर्धक प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. उध्दव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असले तरी शिवसेनेने यापूर्वीच सुषमा स्वराज या मोदींपेक्षा पंतप्रधानपदासाठी लायक असल्याची भूमिका मांडली आहे. याचाच अर्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मोदींचे मित्र कमी अन् शत्रू जास्त अशी आजची तरी स्थिती आहे. इकडे कॉंग्रेससह अन्य पक्ष मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर आल्यास अल्पसंख्यांकांना भिती दाखवून मतांचे धु्रविकरण आपल्याकडे वळवण्याची शक्यता आहे. अगदी लोकसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भलतेच कडबोळे निर्मित होऊ शकते. यामुळे १९९६ ते ९८ दरम्याची राजकीय स्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे मोदींसाठी ‘दिल्ली अभी दुर है’ अशीच स्थिती राहू शकते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद मिळाल्यास त्यांना दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करण्यापासून रोखण्याची शक्ती कोणत्याही भाजपा नेत्यामध्ये नाही. हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. कारण मोदींना आपल्या शत्रूंशी वेगवेगळ्या पातळ्यांवरून लढावे लागणार आहे. त्यात विरोधकांसोबत स्वकीयही राहणार आहेत हे मात्र निश्‍चित.

About the author

shekhar patil

1 Comment

  • इस दूरदर्शी चेहरे के सपनो की तोड़ – फोड़ तो कई बार की गयी लेकिन यह चेहरा, अब कोई ख़ुदग़रजी का लिबास नही है, ना ही फर्जी. यहा चेहरा अब लखो लोगों के प्यार के पहचान की निशानी बन चुका है. इस चेहरे ने अब कसम खाई है मिटानेकी उन ज़रख़ीद की जो कुछ विषैले व्यक्तिओने फैलाई है.
    people have vandalized the visions of this visionary may times, but now, This visage, is no mere veneer of vanity,but he is a vestige of the vox populi. Now this visage has vowed to vanquish these venal,virulent and vainglorious visions of vain and venomous oppositions.

Leave a Comment