Featured चालू घडामोडी

मै हिंदुस्तानी मुसलमाँ हू !

Written by shekhar patil

जगभरात धार्मिक उन्माद आणि यातून निर्मीत होणारा कट्टरतावाद चरमोत्कर्षाकडे सुसाट वेगाने निघाल्याचे दिसत असतांना काही सुसंवादी स्वर आश्‍वासकता प्रदान करत असल्याचे आपण अनुभवू शकतो. या विषाक्त युगात संवेदनशील मनांची घुसमट जेव्हा सृजनाचे रूप घेते तेव्हा समाजाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. याच पध्दतीने आजच्या युगाला आरसा दाखविण्याचे काम हुसेन हैदरी या युवकाची एक कविता करत आहे. हुसेन हा रूढ अर्थाने कवि नाही. जगमानसावर गारूड करू शकेल इतकी त्याच्या शब्दांची झेप नाही. तो मानवी भावनांच्या गुंतागुंतीचे चित्रणदेखील करू शकत नाही. खरं तर तो आजच्या तरूणाईचे प्रतिक आहे. बुध्दीमान आणि करियरिस्ट. मूळचा इंदूरकर असणार्‍या हुसेनने आधी सीए झाल्यानंतर ‘आयआयएम’मधून एमबीए केले. त्याने अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकर्‍या केल्या. अगदी आजच्या युगाला साजेसा आणि वरकरणी खुशालचेंडू भासणारा हा युवक आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षावधींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याला कारणीभूत ठरलीय त्याची एक कविता. यात प्रारंभी ‘आयडेंटीटी क्रायसिस’चा उल्लेख आलाय. आपण दारू-सिगरेट पितोय. अर्थात धर्मात त्याज्य असणार्‍या बाबी करतोय यामुळे आपण मुसलमान कसे? असा प्रश्‍न त्याला पडतो.

मैं शिया हूं या सुन्नी हूं
मैं खोजा हूं या बोहरी हूं
मैं गांव से हूं या शहरी हूं
मैं बाग़ी हूं या सूफी हूं
मैं क़ौमी हूं या ढोंगी हूं

मैं कैसा मुसलमां हूं भाई?

या अनेक प्रश्‍नांमधून त्याला आपण हिंदुस्थानी मुसलमान असल्याची जाणीव होते आणि ही कविता विलक्षण उंचीला पोहचते. आपण मुस्लीम असलो तरी भारताच्या खुल्या वातावरणात आपल्याला बरेच काही मिळाले असल्याची कृतार्थता त्याच्या सृजनातून प्रकट होते.

मेरा इक महिना रमजान भी है
मैने किया तो गंगा स्नान भी है

आणि हो हिंदूच नव्हे तर शिख, ख्रिस्ती धर्मांमधील अनेक बाबींचा तो उल्लेख करतो. नेत्यांनी भारतीय समाजाला धार्मिक आधारावर विभाजीत केले आहे. या पार्श्‍वभूमिवर तो ठणकावून सांगतो.

कोई नेता मेर नस नस मे नही
मै कोई पार्टी के बस मे नही

भारतात १४ टक्क्यांच्या आसपास असणार्‍या समुदायाचे घटक असलो तरी हुसेन थेट सर्वच्या सर्व शंभरांशी नाते सांगतो. अर्थात तो मोठ्या अभिमानाने भारतीय मुसलमान असल्याची घोषणा करतो.

सौ मे से चौदह हू लेकीन
चौदह ये कम नही पडते है
मै पुरे सौ मे बसता हूं
पुरे सौ मुझमे बसते है

मै जितना मुसलमॉ हू भाई
मै उतना हिंदूस्थानी हूं
मै हिंदूस्थानी मुसलमाँ हूं
मै हिंदूस्थानी मुसलमाँ हूं

आज हुसेनला सोशल मीडियाने डोक्यावर घेतले असले तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. काही वृत्त वाहिन्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्याने आपण सामान्य भारतीय असून आपल्याला तसेच राहू द्या, अशी विनंती करत कॅमेर्‍यासमोर येण्यास नकार दिला. हुसेनचा हा सुर भारतीय समाजाच्या मुळाशी असणार्‍या एकसंघतेला नव्या युगाचा साज चढविणारा आहे. वर नमुद केल्यानुसार ‘आयडेंटीटी क्रायसिस’ हा खरं तर आपल्या प्रत्येकालाही भेडसावणारा असतो. जातीय, धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक, प्रादेशिक अशा असंख्य अस्मितांच्या जयघोषात आपली मूळ ओळख काय? हा प्रश्‍न प्रत्येकाने आता स्वत:ला विचारायला हवा. हुसेनची अगदी साध्या सोप्या शब्दांमधील कविता हीच सांगतेय. आपण ती त्याच्याच आवाजात ऐकल्यास उत्तम. ही लिंक मी सोबत देत आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment