Featured अनुभव

मैत्रीचा ‘क्रिकेट बंध’!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्रीचे नाते नव्या रंगात नव्या रूपात आपल्याला भेटत असते. मैत्रीचा प्रत्येक बंध हा निखळ आणि निस्वार्थी असेलच असे नाही. मित्रता ही सच्ची असती तितकीच अनेकदा लुच्चीही असते. अनेकदा स्वार्थ वा अपरिहार्यतेपोटीदेखील मित्रसंबंध प्रस्थापित होतात मात्र त्याला जराही किंमत नसते. दगाबाजी वा बेईमानीमुळे निकटच्या संबंधात विषही कालवले जाते. असे असले तरी आयुष्यातील सच्च्या दोस्तीची सर कशालाच येत नाही. मी प्रचंड बहिर्मुख असलो तरी अनेकदा अत्यंत अलिप्त भासणार्‍या अंतर्मुखतेमुळे आजूबाजूची मंडळी चकीत होत असते. एका अर्थाने माझ्या स्वभावातील परस्परविरोधी बाजू या माझ्या स्वत:सह अनेक निकटवर्तीयांच्या लक्षात आल्या आहेत. काहींना मी ‘हॅपी गो लकी’ टाईप खुशालचेंडू वाटतो तर काहींना जगाची चिंता वाहणारा गंभीर माणूस वाटतो. अर्थात या दोन्ही बाजूंना मायेचा ओलावा लाभला आहे. साहित्य, कला, आध्यात्म आदी अंतर्मुख वा गंभीर अंगाला अनेक मित्रांनी समृध्द केले आहे तर जगाच्या कोलाहलातही अनेकांची दोस्ती मी जपून ठेवली आहे. यातील प्रत्येक संबंध हा आपापल्या परीने श्रेष्ठ आहेच. मात्र यात विद्यानगरातील बाल सवंगड्यांसह क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या यारीची सर कुणालाही येणार नाही.

क्रिकेट हे माझे पहिले (शेवटचे नव्हे) प्रेम! बालपणीच्या सर्वाधिक मधुर आठवणी या दंगामस्तीसह वाचन आणि क्रिकेटच्याच आहेत. आम्ही १९७७ साली भुसावळच्या विद्यानगरात रहायला आलो. यानंतर साधारणत: चार-पाच वर्षात परिसरात बर्‍यापैकी वस्ती झाली. आमची कॉलनी ही येथून जवळच असलेल्या भुसावळ हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी वसविलेली होती. त्यांच्याशिवाय अन्य बहुतांश सर्व जण रेल्वेचे कर्मचारी होते. साधारणत: मध्यमवर्गियांच्या या भागात सुमारे ९५ टक्के रहिवासी हे एकाच (लेवा पाटीदार) समाजाचे होते. विद्यानगरात १९७२ ते ७७ दरम्यान जन्मलेल्या चाळीस मित्रांचा ग्रुप जमला. १९८१ साली सर्व बालकांनी मिळून विद्यानगर मित्र मंडळाची सुरूवात करून गणेशोत्सव सुरू केला. १९८६ साली नवदुर्गोत्सव सुरू झाला. दरम्यान जवळपास सर्वच मित्रांना क्रिकेटचे वेड लागले. आमचे सर्वप्रथम मैदान हे विद्यानगरचे पटांगण हेच बनले. आमच्या कॉलनीचा ओपनस्पेस असणारे हे मैदान आमच्या अनेक ‘लिलां’चे साक्षीदार आहे. आमच्या क्रिकेटप्रेमाचा श्रीगणेशाही येथूनच झाला. आम्ही मित्रमंडळी याच मैदानावर रबरी चेंडूने खेळू लागली. काही काळातच खळवाडी, काशिराम नगर आदी भागातील अन्य मुलेही खेळू लागली. प्राथमिक स्वरूपातील सामने येथेच झाले. मात्र मैदान अपुरे पडल्याने आम्ही सध्या आराधना कॉलनी असणार्‍या व तेव्हा मोकळी जागा असणार्‍या रेल्वे ट्रॅक जवळच्या भागाकडे वळविला. येथे विद्यानगरसह जुना सातारा, काशिराम नगर, रेल्वे पलीकडील भगतसिंग चाळीचा भाग येथील मुले येऊ लागली. येथे अनेक सामने रंगले. मात्र काही फलंदाजांचे फटके रेल्वेच्या रूळांवर जाऊ लागल्याने मैदान बदलणे भाग पडले. यानंतर आम्ही सध्या शिव कॉलनी असणार्‍या मोकळ्या मैदानावर खेळू लागलो. येथे दुरवरून विविध संघ येत असत. येथे अनेक टुर्नामेंटही खेळविण्यात आल्या. हा भाग आमच्या कॉलनीला लागूनच असल्याने आम्ही येथे अनेक वर्षांपर्यंत मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. मात्र मैदानातील मुख्य खेळपट्टीजवळच एक घर बांधण्यात आल्यानंतर आमच्या खेळावर मर्यादा आल्या. यामुळे आम्ही सध्या ‘रेल दुनिया’कडे जाणारा रस्ता, यानंतर कालिंका माता मंदिरासमोर व नंतर रेल्वे लाईनला लागून असलेल्या मैदानांवर खेळलो. दरम्यान, या भागात घरे बांधण्यात आल्यानंतर आम्ही श्रीनगर परिसरात असलेल्या विस्तीर्ण जागेकडे वळलो. येथे आम्ही किमान दहा वर्षे खेळलो. येथे दोन चार खेळपट्ट्या बदलल्यानंतर रेल्वेवरील उड्डाण पुलाजवळच्या विटभट्ट्यांजवळच्या मैदानावर आम्ही खेळलो.(आमचे हायवेजवळचे शेवटचे मैदान)

मी आतापर्यंत वर्णन केलेला कालखंड हा १९८५ ते सुमारे २००० सालापर्यंतच आहे. दरम्यान, आम्ही फक्त वरील मैदानांवरच खेळलो नाही तर डी.एस. हायस्कूलचे पटांगण, रेल्वे ग्राऊंड, टि.व्ही. टॉवरचे मैदान, दीपनगर, जळगाव आदी ठिकाणी अनेक स्पर्धा खेळलो. यात आम्ही सर्व संघातील खेळाडू एकत्रितपणे एक संघ उतरवत असू. हा संघ मातब्बर म्हणून ओळखला जात असे. याचसोबत आमच्यातील माझ्यासह सतीश पाटील, दीपक लढे, रवींद्र जोशी, अनिल पाटील, जीवन पाटील, अजय चौधरी आदी खेळाडू अन्य संघाकडूनही खेळत. आमच्यात थोडाफार खेळलेला राजू भोई हा गुणी खेळाडू निव्वळ मदतीअभावी पुढे जाऊ शकला नसल्याची खंत आम्हाला आजही वाटते. हे सारे वर्णन करतांना मी क्रिकेटमध्ये नेमका कसा खेळत होतो? हे सांगणे विसरूनच गेलो. तर मी बर्‍यापैकी फलंदाज आणि अत्यंत चतुर गोलंदाज म्हणून विख्यात होतो. फलंदाजीत एका बाजूने चिपकून बसण्याची माझी खासियत होती. गोलंदाजीत मी अगदी तेजगतीपासून ते फिरकीपर्यंत वैविध्य दाखवत समोरच्या फलंदाजांना चकवत असे. समोरच्या फलंदाज अगदी दात-ओठ खात बॅट दांडपट्ट्यासारखी फिरवतोय अन् मी गोलंदाजीच्या वेगात बदल करून त्याला चकवतोय असली अनेक दृश्ये माझ्यासह माझ्या मित्रांनी अनुभवली आहेत. यात फसून बाद झाल्यानंतर फलंदाज अनेकदा स्वत:वरच संतापत असतांना आम्हाला हसू आवरणे कठीण होत असे. क्षेत्ररक्षण करतांना लॉंग ऑन वा लॉंग ऑफ या माझ्या आवडत्या जागा होत्या. एक तर फलंदाजाने सरळ बॅटेने चेंडू जोरदार टोलवला तर या दोन ठिकाणी चेंडू हमखास जाण्याची शक्यता असते. यामुळे या दोन्ही जागा माझ्या आवडत्या होत्या. एखाद्या फलंदाजाने चेंडू हवेत टोलविला असता सुसाट वेगाने पुढे-मागे वा बाजूला धावून झेल घेण्याची मजा ही प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कधीही कळू शकणार नाही. याचप्रकारे मी अनेक अफलातून झेल घेतले आहेत. यातील अनेक दृश्ये मी आजही विसरू शकणार नाही. अशा अनेक आठवणी घेऊन क्रिकेटचे मैदान हे कधी सुटले हे मलाही कळले नाही अन् मित्रांनाही!

साधारणत: विद्यानगर मित्र मंडळाचा क्रिकेट संघ २००१-०२ पर्यंत खेळत होता. अन्य काही खेळाडू २००५-०७ पर्यंतही खेळत होते. मात्र गेल्या किमान पाच-सात वर्षांपासून सर्वांचे खेळणे हे जवळपास बंद होते हे निश्‍चित. (सध्या मित्रांपैकी फक्त सचिन फालक हाच नियमित खेळत असतो!) यामुळे आपण पुन्हा मैदानावर उतरण्याची कल्पना मला सुचली. मी ही कल्पना सर्वप्रथम गोवर्धन भोळे याच्या कानावर टाकली. मात्र यात प्रगती झाली नाही. यानंतर सतीश पाटील व सुभाष पाटील यांनाही याची माहिती दिली. त्यांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कबुल करूनही गाडे पुढे सरकले नाही. दरम्यान, मी स्वत: कामाच्या रगाड्यात अडकलो तरी कुठे तरी मित्रांची पुनर्भेट घेण्याचा अंकुर मनात फुटला. यातूनच आमच्या भुसावळ हायस्कूमधील १९८८च्या बॅचमेटचा मेळावा पाल (ता. रावेर) येथे २६ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आली. याला मिळालेल्या यशाने उत्साह दुणावल्याने विद्यानगर मित्र मंडळाच्या आजी-माजी सदस्यांची एक जंगी मेजवानी नवदुर्गोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी आयोजित करण्यात आली. मात्र क्रिकेट मॅचचा किडा डोक्यात वळवळत होताच….यातून कसा मार्ग काढावा यासाठी माझा बालमित्र हेमंत चौधरी आणि किशोर आसोदेकर (डॅनी) यांच्यासोबत मी आणि राकेश (कोल्हे) अशी बैठक घेतली अन्….
(पुढे काय झाले ते वाचा दुसर्‍या भागात!)

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment