साहित्य

मेघदूत विथ व्हर्च्युअल क्लाऊड !

आषाढाच्या आगमनानंतर महाकवि कालिदासांच्या विश्‍वविख्यात ‘मेघदूत’ची आठवण अवचितपणे होणारच. खरं तर अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ याच रोजी संकल्प करूनही यावर लिहता न आल्याने आज संगणकावर टाईप करतोय. असो. अनेक शतके उलटली तरी मेघदुताची लोकप्रियता जराही ओसरली नाही ही कविकुलगुरूंच्या उत्तुंग प्रतिभेची किमयाच होय. प्रेमीजनांची विरह वेदना ही अनेक अजोड कलाकृतींचा गाभा असल्याचे आपल्याला दिसून येते. जगात आजवर असंख्य प्रकारांनी, अनेक भाषांमध्ये याच प्रकारची अभिव्यक्ती झालीय. मात्र मेघदूत एकमेवाद्वितीयच! यात विरहाग्नीत जळणारा यक्ष आणि त्याच्या पत्नीसोबत संदेश वहनाची जबाबदारी असणार मेघ हादेखील प्रमुख पात्र आहे. खरं तर तोदेखील या महाकाव्याचा नायक वा सहनायकच!

खर तर अनादि कालापासून प्रेमीजनांना आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती वा संदेशांच्या देवाण-घेवाणीसाठी माध्यमाचीच सर्वात मोठी अडचण येत आहे. नेत्रपल्लवी, खाणाखुणा, इशार्‍यांच्या पलीकडे हृदयीचे गुज करण्यासाठी प्रेमीजनांनी आजवर किती खटाटोप केला असेल (आजही सुरूच असेल!) याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. अगदी स्वत:, कुणा व्यक्तीमार्फत, पत्रांच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आता अत्याधुनिक संपर्क यंत्रणांपर्यंत येऊन पोहचला आहे. कवि कल्पनांमध्ये तर अनेक संदेशदूत अवतरले आहेत. आपल्या प्रियतमाला संदेश पोहचविण्यासाठी हवा, पाणी, पाने-फुले, चंद्र-तारे, नदी-सागर आदी प्रतिमांचा वापर अनेकांनी केला आहे. जगातील सर्व भाषांमध्ये अशा प्रकारची साहित्य मौक्तिके आढळून येतात. कालिदासांनी मात्र याहूनही उच्च शिखर गाठले आहे. त्यांचा मेघदूत हा फक्त संदेशासाठीच नव्हे तर मार्गातील मिलनोत्सुक चराचराची त्या यक्षाला माहिती देण्याचे कामही करतो. आपल्या प्रिय पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेला तो यक्ष मुळातच खूप हळवा झालेला असतो. आपल्या प्रियेच्या आठवणीत उसासे काढत असतांनाच तो त्या मेघदुताला मार्गात आढळणार्‍या प्रेमीजनांना मदत करण्याचे सांगण्यास विसरत नाही. म्हणजेच तो यक्ष हा परोपकारी असून आपल्या दुतानेही तसेच असावे अशी अपेक्षा बाळगणारा आहे.

मेघदुतामधील मेघ हा आषाढातील आहे. तो वर्षाच्या अन्य महिन्यांप्रमाणे भाकड, स्वच्छंदी वा आवारादेखील नव्हे. तर तो ‘जलद’ अर्थात जलयुक्त आहे. चिंब बरसण्यासाठी आतुर. नवसृजनाच्या प्रसवकळांनी व्याकुळलेला! भारतवर्षात ज्येष्ठातच वर्षा ऋतुस प्रारंभ होत असला तरी वैशाख वणव्याने तप्त भुमि या महिन्यात तृप्त झालेली नसते. ही जबाबदारी आषाढालाच पार पाडायची असते. मात्र एवढे करूनही आषाढाला फारसे महत्व नाहीच. आपल्याला श्रावणातल्या सरी आणि विलोभनीय निसर्गाची भुरळ पाडते. त्यानंतरचा भाद्रपदही साजश्रुंगार अन् सणांनी नटलेला असतो. तर दुसरीकडे आषाढावर कुणी फारशी स्तुतीसुमने उधळलेली नाहीत. ओथंबुन येणारा आणि रसिकांना ओथंबुन आणणारा हा महिना तसा कौतुकाला पारखाच ! याच आषाढातील मेघाला कालिदासाने आपला संदेशदूत बनवून जगाच्या इतिहासात अजरामर केले. याचसोबत आषाढालाही प्रथमच सन्मान प्रदान केला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आषाढातील ढगाला आपला संदेशदूत बनविण्याची कालिदासांची कल्पना हा प्रतिभेचा अत्युच्च अविष्कार नक्कीच आहे. मात्र खुद्द त्यांनीही कल्पना केली नसेल की ढगच पण कृत्रीम हा कधी काळी मानवी जातीच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘मॅसेंजर’ बनेल!

संदेश वहनाच्या प्रकारांमध्ये गत दोन दशकांमध्ये झालेले बदल हे मानवी इतिहासातील सर्वात विलक्षण या स्वरूपाचेच आहेत. एखादी पध्दत स्थिरावणार असे वाटत असतांनाच दुसरी गतीमान प्रणाली समोर येत असल्याचे अनेकदा घडले आहे. आता हेच पहा ना! सोशल मीडिया अवघे जग व्यापून टाकणार असल्याचे चित्र उभे राहिले असतांनाच आता विविध मॅसेंजर्स तुफान लोकप्रिय झाले आहे. मॅसेंजरच्या धडाक्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये सोशल नेटवर्कींग साईटस् झाकोळल्या जाणार असल्याची भाकिते आता करण्यात येत आहेत. यात क्लाऊड हे तंत्र वापरण्यात आले आहे. हेदेखील ढगासमानस असले तरी व्हर्च्युअल अथवा आभासी जगातील आहेत. व्हाटसअ‍ॅप, हाईक, लाईन, फेसबुक मॅसेंजर, व्हायबर, वुईचॅट आदींसह अन्य मॅसेंजर्सवर अब्जावधी आबालवृध्द दररोज तासन्तास घालवत आहेत. अर्थात आधुनिक प्रेमीजनांनाही या माध्यमातून संदेशाचे अत्यंत गतीमान माध्यम मिळाले आहे. कालिदासाचा मेघदूत हा कविकल्पनेतून अस्तित्वात आला असेल तर आधुनिक मॅसेंजर्स हे वैज्ञानिक/तंत्रज्ञांनी विकसित केले आहेत. मेघदुत हे शापग्रस्त व विरहाग्नीत होरपळणारा यक्ष, त्याची पत्नी, संदेशवाहक मेघ आणि अर्थातच या तिघांच्या भावनिक आंदोलनांवर अद्भूत व सारगर्भ भाष्य करणारे कालिदास यांच्या भावनांनी ओथंबलेला आहे. तर आधुनिक मॅसेंजरमध्ये खुद्द वापर करणार्‍यांच्या भावनांची गुंतागुंत आहे. कालिदासाचा मेघदूत हा कितीही रसपुर्ण असला तरी अभिजनांपलीकडे पोहचला नाही. आजही याचा रसास्वाद घेणारा समाजातील अत्यल्प वर्ग आहे. तर दुसरीकडे व्हर्च्युअल क्लाऊडवरील मॅसेंजर्सने मात्र अभिजनांसह सर्वसामान्यांनाही जवळपास व्यसनाधिन म्हणण्याइतपत वेड लावले आहे. कालीदासांचा मेघदूत शेकडो वर्षांमध्ये जितक्या लोकांपर्यंत पोहचला नसेल तितके लोक प्रत्येक सेकंदाला याच्या आधुनिक अवतारांवर वेळ घालवत आहेत.

आज माझ्या भोवती आषाढमाया पसरलीय. सोबत मेघदुताचा ऑनलाईन अनुवादही आहे. लॅपटॉपवर टायपिंग करतांना अधूनमधून आधुनिक मेघदूत अर्थात व्हाटसअ‍ॅपसारख्या मॅसेंजर्सवरील संदेशांची सुचना देणारे नोटिफिकेशन्सही अलगदपणे आदळताहेत. काल, आज आणि उद्याच जणू एकत्र एकत्र आलेत. आधीचे हे महाकविंच्या प्रतिभेतून स्त्रवलेले तर आताचे वैज्ञानिकांच्या अविश्रांत परिश्रमातून अवतरलेले. ‘ते’ साहित्य सौदर्याचा अजोड नमुना तर ‘हे’ भौगोलिक सीमारेषा हद्दपार करणारे. जुने ते मनाला मोहविणारे अन् नवीन ते अवघ्या जगाला गुरफटून टाकणारे. या दोन्ही आभासी विश्‍वांनी अक्षरश: मंत्रमुग्ध व्हायला होते. आणि हे अनुभवणे किती विलक्षण अन् आयुष्य समृध्द करणारे !!

Cloud-Computing

About the author

shekhar patil

Leave a Comment