मुक्त विचार

सवंग प्रसिध्दीचा ‘कोसला’ ?

सुरवातीलाच स्पष्ट करतो मी भालचंद्र नेमाडे यांचा लेखनाचा जबरदस्त चाहता आहे. त्यांची काही मते पटणारी नसली तरी यामुळे त्यांच्याविषयी असणार्‍या आदरात जराही घट झालेली नाही. मुळातच अर्ध्या शतकानंतर आजही अन्य कुणी प्रतिभावंत त्यांच्या आसपास दिसत नाही ही विलक्षण बाब आहे. मात्र नेमाडेंच्या पुढे जाणारा कुणी अद्याप दिसत नाही ही मराठी साहित्याची शोकांतिकाही आहे. काहीही असो नेमाडे हा बापमाणूस आहे हे त्यांचा भक्तसंप्रदाय आणि कट्टर विरोधकही मान्य करतात. (गमतीची बाब म्हणजे कुणीही एक तर नेमाडेंचे समर्थक असतात वा विरोधक….त्यांची उपेक्षा कुणी करू शकत नाही!) त्यांच्या लिखाणाची सांगोपांग चर्चा झालीय, होतही आहे. ‘हिंदू’च्या नंतरच्या भागांची सर्वांना उत्सुकता लागली आहे. माझे स्नेही चंद्रकांत भंडारी यांना नेमाडेदादांचा प्रदीर्घ सहवास लाभला आहे. भंडारी सरांनी त्यांच्या सृजनाला जवळून बघीतले आहे. सायंकाळी सातनंतर ते पार सुर्योदयापर्यंत नेमाडे हे अध्ययन वा लेखनात बुडालेले असतात. एकेका शब्दावरून काही महिने ते अडून बसतात. चपखल बसणारा शब्द मिळण्यापर्यंत ते पुढेच सरकत नाहीत हे भंडारी सरांनी जवळून पाहिले. यावर लिहलेदेखील. याचप्रमाणे दादांच्या संपर्कात असलेल्या सांगवी परिसरातील काही स्नेह्यांनीसुध्दा याबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यांच्या लेखननिष्ठेबाबत अनेकदा लिहूनही झालेय. या सर्वांचा सार एकच-नेमाडेंची लिखाणनिष्ठा वादातीत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा त्यांनी आपल्या सृजनासाठी उपयोग करून घेतल्याचे यातून आपल्याला दिसून येते. अलीकडच्या काळात मात्र नेमाडे ज्या पध्दतीने अगदी मुक्तपणे विचार प्रकट करू लागलेत ते पाहून एके काळी मीडियाला अगदी उघडपणे झोडपून काढणारा हा माणूस अलगदपणे प्रसारमाध्यमांमधून मिळणार्‍या क्षणभंगुर प्रसिध्दीच्या विळख्यात सापडलाय की काय? अशी भिती वाटू लागली आहे.

एकंदरीतच वर्तमानपत्रे, त्यात काम करणारी मंडळी आणि त्यातील लिखाण यांच्याबाबत नेमाडेंचे मत काहीसे चांगले नाही. यामुळे मीडियात त्यांना आधीपासूनच तशी नकारात्मकच प्रसिध्दी मिळाली. अर्थात त्यांनी ती एन्जॉयदेखील केली. त्यांना ‘टीका स्वयंवर’साठी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाल्यानंतर मराठीतल्या आघाडीच्या वर्तमानपत्राने ‘छाछूगिरीचा सन्मान’ या शीर्षकाच्या अग्रलेखातून त्यांची केलेली संभावना प्रचंड गाजली होती. मात्र अद्यापही त्यांचे याबाबतचे मत कायम आहे. वर्तमानपत्रीय लिखाण म्हणजे रद्दी असल्याचे त्यांचे मत. सकस लिहणार्‍यांनी वर्तमानपत्रांपासून दोन हात लांब रहावे अशी त्यांची जाहीर भुमिका. असा सल्लाही त्यांनी अनेकांना दिलाय (मलादेखील त्यांनी वैयक्तीक भेटीत हेच सांगितलेय!) मात्र अलीकडच्या काळात नेमाडे बदललेत. म्हणजे एके काळी लेखकाच्या ‘लेखकराव’ होण्यावर टीका करणारा हा माणूस स्वत: प्रस्थापित झालाय. पुरस्कारांवर तुटून पडणारा हा लेखक आता त्यांचा अभिमानाने स्वीकार करतोय. यावरून त्यांच्यावर टीकादेखील झाली. मात्र या बदलासोबत आजवर प्रसारमाध्यमांशी फटकून राहणार्‍या नेमाडे यांना याच माध्यमातून मिळणार्‍या प्रसिध्दीचा जणू काही हव्यास जडल्याचे दिसून येत आहे.

मराठीत मापदंड ठरलेल्या ‘कोसला’ कादंबरीत वयात येणार्‍या तरूणाचे प्रांजळ आत्मकथन आहे. ओढाळ वयात संवेदनशील मनाभोवती विणला जाणारा कोश नेमाडेंनी समर्थपणे जगासमोर मांडला. आज याच्या अगदी उलट थिल्लर वक्तव्यांनी मिळणार्‍या प्रसिध्दीचा कोश ते आपल्याभोवती (मुद्दाम!) विणत आहेत की काय? अशी शक्यता वाटू लागली आहे. काही मान्यवरांना प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची सवय लागते. उलट-सुलट वक्तव्यांना तात्काळ प्रसिध्दी मिळत असल्याचे एकदा का लक्षात आले की पुढे त्यांना फारसे परिश्रमही करावे लागत नाही. राजकारणातील बेताल बडबड करणार्‍या मंडळीपासून ते विविध क्षेत्रांमधील काही सेलिब्रिटींना हे चांगलेच जमते. आता त्यांच्याच रांगेत मराठीतल्या एका उत्तुंग प्रतिभावंताचा समावेश व्हावा ही बाब धक्कादायक आहे. ‘हिंदू चतुष्टा’तील उर्वरित तीन भाग लवकरात लवकर यावेत यासाठी नेमाडेंची सुरू असलेली धडपड कुणापासून लपून राहिलेली नाही. अगदी ‘ज्ञानपीठा’नंतर सत्काराच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी नकार दिलाय. म्हणजे आपल्याकडे असणार्‍या मर्यादीत वेळेची त्यांना जाणीव आहे. चांगदेव चतुष्टानंतर ‘हिंदू’च्या चार भागांमधील सुमारे अडीच हजार पानांमधून मराठी कादंबरीच्या इतिहासात नवीन टप्पा निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. मात्र आता उठसुठ कोणत्याही विषयावर वादग्रस्त मत प्रदर्शन करून त्यांना भलेही सवंग प्रसिध्दी मिळेल. मात्र या थिल्लर प्रकारांमध्ये अडकून पडल्यास त्यांच्या संकल्पाची सिध्दी अजूनच अवघड होणार.

आजच विश्‍वास पाटील यांनी नेमाडेंवर ते साहित्यात दहशतवाद निर्माण करत असल्याचा आरोप करून झोडपून काढले. मात्र दहशतवादी वगैरेंपेक्षा ते क्षणिक प्रसिध्दीच्या चक्रव्युहात सापडल्याचे मला वाटते. तसे त्यांनी आयुष्यभर अनेकांना अंगावर घेतले. सर्वांना ते पुरून उरले. आताही प्रखर बुध्दीमत्ता आणि तर्कशक्तीने ते विविध विषयांवर अभ्यासपुर्ण मते मांडू शकतात. मात्र यात अडकून पडल्यास मराठी साहित्यक्षेत्राला ‘हिंदू’च्या पुढील भागांसाठी अजून वाट पाहू लागू शकते. एका अर्थाने नेमाडेंचा हा ‘कोसला’ त्यांनाच नव्हे तर मराठी साहित्यालाही महाग पडू शकतो.

(18 August 2015)

<<<<<<<<<0000000>>>>>>>><<<<<000000>>>>>>>>>

नोकियाचा नवा डाव !

टिन एजर्सचा अपवाद वगळता बहुतांश लोकांचा पहिला मोबाईल फोन हा ‘नोकिया’चाच होता हे कुणी नाकारू शकणार नाही. एका व्यापक अर्थाने अगदी काही वर्षे आधी नोकिया हा ‘ग्लोबल ब्रँड’ होता. या कंपनीच्या स्थापनेला दीडशे वर्षे होत असतांना मोबाईल निर्मितीतून नोकियाने काढता पाय घेतला असला तरी पुन्हा भरारी घेण्याची तजवीज केली आहे.

तब्बल दीडशे वर्षांपासून नवनवीन क्षेत्रात यश मिळवणारी ही कंपनी आज स्थित्यंतरातून जात आहे. मे १९६५ मध्ये फ्रेड्रिक इडस्टेम यांनी फिनलँडमध्ये कागदाचा कारखाना स्थापन केला. तीन वर्षातच त्यांनी नोकिया शहराजवळचा आणखी एक कारखाना विकत घेतला. यानंतर १८७१ साली नोकिया या नावाने ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाली. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात कागद, रबर, विद्युत निर्मिती, जनरेटर्सचे उत्पादन आदींच्या क्षेत्रात त्यांनी वाटचाल केली. १९६०च्या दशकानंतर कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदार्पण केले. फिनलँडमधील दुरचित्रवाणी संच बनविणार्‍या सलोरा कंपनीची त्यांनी सोबत केली. मात्र ऐशीच्या दशकाचा उदय होत असतांना त्यांनी ‘नॉर्डिक मोबाईल टेलिफोन’च्या माध्यमातून जगातील पहिले सेल्युलर नेटवर्क उभारत मोबाईल निर्मितीत पदार्पण केले आणि या कंपनीच्या वाटचालीस वेगळे वळण लागले. ‘मोबिरा सिनेटर’ या कारफोनला त्यांनी सादर केले. यानंतर ‘मोबीरा सिटीमॅन’ला सादर करण्यात आले. जाडजुड व अत्यंत महागडा असूनही हा मोबाईल फोन तुफान लोकप्रिय झाला. अगदी रशियन राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा या मोबाईलसोबतचा फोटो जगजाहीर झाल्याने याची लोकप्रियता वाढीस लागली. नव्वदच्या दशकात ‘नोकिया’चे नशीब चांगलेच फळफळले. जगातील बहुतांश भागात याच कालखंडात मोबाईल पोहचला. अर्थात सोबत या कंनीचे हँडसेटही पोहचले. ‘नोकिया’ने एकाहून एक सरस मोबाईल फोन सादर केले.

२००५च्या सुमारास ऍपल कंपनीने आयफोन सादर केल्यानंतर मात्र नोकियाला पहिला धक्का बसला. दोन वर्षातच गुगलच्या अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टिमने युक्त एचटीसीचा मोबाईल फोन सादर झाला. अर्थात स्मार्टफोनचे आगमन झाले होते. मात्र ‘नोकिया’ने याची दखल घेतल्याने ही कंपनी मागे पडली. नाही म्हणायला ‘सिंबीयन’ या आपल्या प्रणालीवर चालणारे काही फोन त्यांनी सादर केले. याचसोबत विंडोजवर चालणारे ल्युमिया या श्रेणीतील स्मार्टफोन सादर केले. मात्र एव्हाना खूप वेळ झाला होता. स्मार्टफोनच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करणे व विशेषत: अँड्रॉईडचा स्वीकार न केल्यामुळे ‘नोकिया’ला आपला मोबाईलचा व्यवसाय गुंडाळावा लागला. २०१३च्या अखेरीस नोकियाने आपला मोबाईल निर्मितीचा व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकण्याची घोषणा केली. २०१४ मध्ये हा व्यवहार पुर्णत्वास आला अन् मोबाईल हँडसेटमधील ‘नोकिया’ची सद्दी संपुष्टात आली. मायक्रोसॉफ्टने आता ल्युमिया हा ब्रँड लोकप्रिय करण्याचा आटापिटा सुरू केला आहे. या व्यवहारातील अटीनुसार २०१६च्या मध्यापर्यंत नोकिया कंपनी स्वत:च्या ब्रँड नेमने मोबाईल निर्माण करू शकणार नाही. यानंतर मात्र त्या कंपनीला मोकळीक मिळणार आहे. अर्थात एकादा स्पर्धेतून मागे पडल्यानंतर पुन्हा यात प्रस्थापित होणे सोपे नाही. विशेषत: ऍपल, सॅमसंग, सोनी आदींसारख्या प्रस्तापित कंपन्यांसोबत शिओमी, वन प्लस, जिओनी आदी चिनी कंपन्यांनी मारलेली मुसंडी पाहता ‘नोकिया’ला गतवैभव मिळवणे सोपे नाही. मात्र दीडशे वर्षांचा उंबरठा पार करतांना या कंपनीने आपली वाटचाल सुरक्षित केली आहे. एक तर या कंपनीने आधीच विविध क्षेत्रांमध्ये आपले स्थान मजबुत केले होते. यातच काही दिवसांपुर्वीच अल्काटेल-ल्युसेंट या सेल्युलर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि तत्सम सेवेतील अग्रगण्य कंपनीला तब्बल १६.६ अब्ज डॉलर्सची बोली लावून अधिग्रहीत केले आहे. या माध्यमातून फाईव्ह-जी तंत्रज्ञान, क्लाऊड कंप्युटींग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी क्षेत्रात नोकियाचा दबदबा प्रस्थापित होऊ शकतो. एका अर्थाने दीडशे वर्षानंतरही या कंपनीने काळाचा वेध घेत भरारीचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आपल्यासाठी महत्वाची बाब म्हणजे राजीव सुरी या मुळच्या भारतीयाकडे आज या कंपनीची सुत्रे आहेत.
(14 May 2015)

<<<<<00000>>>>><<<<<00000>>>>>

राजकारण्यांना दाऊदचे अस्तित्व हवेच…

१९९५च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या तत्कालीन नेत्यांच्या भाषणांमध्ये हटकून दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्याची भाषा केली जात होती. म्हणजे दाऊदला पकडण्यासाठी आंतराष्ट्रीय प्रत्यार्पणाचे नियम, गुप्तचर यंत्रणा आदी कोणत्याही बाबींचा उपयोग न करता युतीचे काही ‘सैनिक’ जाऊन दाऊदला पकडून आणणार असल्याचा भाबडा आशावाद नेत्यांनी तयार केला होता. या गदारोळात शरद पवार यांच्यासह काही नेत्यांचा दाऊदशी संबंध असल्याचे आरोपही करण्यात आले होते. अल्प काळात हे स्वप्न विरून गेले. दाऊद मात्र बलिष्ठ होत गेला. मध्यंतरीच्या प्रत्येक केंद्र सरकारने यावर उहापोह केला. संसदेत यावरून चर्चादेखील झडल्या. यातून त्याच्या नावाची चर्चा होत राहिली इतकेच.

१९ वर्षानंतर अर्थात २०१४ साली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दाऊदच्या मुसक्या आवळण्याची भाषा केली तेव्हा देशवासियांचा यावर विश्‍वास बसला होता. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप नेत्यांना दाऊदला पकडणे शक्य न झाल्याने केंद्रात मोदी यांना सत्ता दिल्यानंतर का होईना दाऊद पकडला जाणार हे स्वप्न भारतीय जनतेने पाहिले होते.

आज संसदेत केंद्र सरकारने दाऊद इब्राहिम कुठे लपलाय हेच माहित नसल्याची ‘अधिकृत’ माहिती दिली आहे. ‘दाऊदचा पत्ता समजल्यानंतर त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल,’ असेही सरकारने स्पष्ट केले आहे. अगदी बरोबर आहे दाऊद कुठे लपलाय हे माहित असते तर त्याला आपण पकडले नसते का? जाऊद्या सगळेच गोलमाल असल्यामुळे दाऊदला पकडले काय अन् नाही काय? यात फारसा फरक पडणार नाही. मात्र या एका गुंडाच्या जीवावर किती राजकीय पोळ्या शेकल्या गेल्यात हे पाहून गंमत वाटते. बरं दाऊद नैसर्गिकरित्या मेल्यानंतर राजकारण्यांची गोची होऊ शकते. तेव्हा लखवी वा तत्सम दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना होतील. परिणाम मात्र शुन्य…शब्द बापुडे केवळ वारा…!

जाता जाता- आपल्या राष्ट्रीय सन्मानाला ठेच पोहचवणार्‍यांना अनेक देशाच्या गुप्तचर यंत्रणा अगदी टिपून ठार मारतात. मग ओसामासारख्या कुख्यात दहशतवाद्याला त्याच्याच घरात ठार मारण्यात येते तर सद्दाम सारख्याला फासावर लटकवण्यात येते. अमेरिकन ‘सीआयए’ आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या ‘केजीबी’ने अनेक राजकीय हत्या केल्या. इस्त्राएली गुप्तहेर संघटना ‘मोस्साद’ने तर द्वितीय विश्‍वयुध्दाच्या कालखंडात ज्यूंचे शिरकाण करणार्‍या आणि महायुध्दानंतर जगभरात तोंड लपवून जगणार्‍या उच्चपदस्थ नाझींना अगदी काटेकोरपणे टिपून मारले. यातील अडॉल्फ आईखमन याला तर मोस्सादच्या पथकाने अर्जेंटिनातून गुप्तपणे उचलून इस्त्राएलमध्ये आणत त्याला फासावर लटकवले. याचप्रमाणे इस्त्राएलच्या अनेक शत्रूंच्या यमसदनी पाठविण्यात आले. आपल्या गुप्तचर यंत्रणांनी अशा पध्दतीने एक तरी दहशतवादी वा देशाच्या शत्रूला परदेशात पकडले/मारले का? (अलीकडच्या काळात प्रत्यार्पणातून डॉन अबू सालेम गवसला हा अपवाद!) अर्थात त्यांचाही काही दोष नाही. यासाठी लागणारी दृढ राजकीय इच्छाशक्तीच आपल्याकडे आहे का?

( 5 may 2015)

‘अंजनीच्या सुता’चा अमृतयोग!

ह्दयाचा ठाव घेणारे शब्द, अगदी सुलभ चाल, समर्पक संगीत आणि तितक्याच तोलामोलाचे चित्रीकरण यातून एखादे गीत कसे अजरामर होते हे ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान!’ या गिताशिवाय आपल्याला समजू शकणार नाही. खरं तर शाहीर दादा कोंडके यांनी मध्ययुगीन कालखंडातील कोणत्या तरी अभंगातून हे गाणे उचलेगिरी करून लिहले असल्याचा बर्‍याच जणांचा आरोप होता. अर्थात दादांची लेखणी फक्त विनोद आणि श्रुंगारातच बध्द झालेली नव्हती तर तिला आध्यात्माचाही आयाम होता. आजही अनेकांना हे दादांनी लिहलेले गीत असल्याचे माहित नाही. मात्र या गाण्यातील गोडवा, गेयता आणि अर्थातच आर्तता आजही मंत्रमुग्ध करते.

काही गाणी सुश्राव्य आणि त्याचसोबत प्रेक्षणीयही असतात. त्याचप्रमाणे ‘अंजनीच्या सुता’ला ऐकण्यात जितका आनंद आहे तितकाच पाहण्यातही आहे. यात खुद्द नायक असणारे दादा कोंडके, त्यांच्यावर अनुरूक्त असणारी नायिका, तिचा खाष्ट बाप आणि गावातील वारकरी मंडळी अशा परिस्थितीत आणि मारूती मंदिरातल्या लहानशा भागात या गाण्याचे इतके अप्रतिम चित्रीकरण केलेय की बस्स! दादांच्या अनेक गितांमधून त्यांची प्रतिभाशक्ती आपल्याला दिसते. मात्र या गीतात त्यांच्या सृजनाने उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांच्या शब्दाला राम-लक्ष्मण यांनी अगदी ओठांवर रेंगाळणारी अवीट गोडीची चाल दिली. उर्वरित कसर महेंद्र कपुर यांचा आवाज आणि खुद्द दादांच्या अभिनयाने भरून काढली. यात ‘हादरली ही धरती…थरथरले आसमान’ यातील हादरणे आणि थरथरणे त्यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: जिवंत केले आहे. ‘दैत्य खवळले सारे…अन् हसले बिभिषण’ यातील ‘हसले’ हे वाक्य खरोखरीच हसून ते म्हणतात. बरं गाण्यात सुरू असलेली वाक्ये ही नायकाच्या स्थितीला लागू असतात. मग ‘आले किती गेले किती संपले भरारा…तुझ्या परी नामाचा रे अजूनी दरारा’ यातून नायिकेचा बापाला टोमणा मारलेला असतो. गाण्याचा अत्युच्च बिंदू शेवटच्या कडव्यात गाठला जातो.

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण…

हे म्हणत असतांना दादांच्या चेहर्‍यावरील आर्तता मनाला भिडते. दादा काळीज पिळवटून काढणार्‍या स्वरात ‘‘…तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?’’ अशी आळवणी करत असतांना गलेलठ्ठ पुजारी देवाच्या नैवेद्यातील लाडू अधाशीपणे तोंडात टाकतांना दाखवण्यात आले आहे. एकाच क्षणाला भक्ती आणि दांभिकतेवर भाष्य दादाच करू जाणोत! याचसोबत दादांचे अत्यानंदातील चिपळ्या घेऊन केलेले नृत्यही अफलातून. या गाण्याच्या कोरसमध्ये मुद्दाम ठेवलेला एक चिरका आवाज या गाण्याला एक वेगळीच उंची प्रदान करतो.

सांगायचे एकच-दादांचा शब्दसाज, राम-लक्ष्मण यांचे संगीत, महेंद्र कपुर यांचा आवाज आणि या सर्वांचे चित्रीकरण हा एक अमृतयोगच मानायला हवा. दादा हा मराठी मातीतला अस्सल कलावंत. त्यांच्या संपुर्ण सृजनातून मृदगंध दरवळलेला आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त त्यांचे ‘अंजनीच्या सुता…’ हे गाणे अनेक ठिकाणांहून कानांवर पडल्याने हे सगळे अवचितपणे आठवले इतकेच…

(4 April 2015)

00000<>00000<>00000

मायक्रोसॉफ्टची चार दशके !

मानवी जीवनाला नवीन दिशा देणार्‍या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या स्थापनेला आज चाळीस वर्षे झालीत. ४ एप्रिल १९७५ साली बिल गेटस आणि पॉल ऍलन या तशा उनाड मात्र हिकमती तरूणांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. याच्या सुमारे एक वर्ष नंतर याच पठडीतल्या स्टीव्ह जॉब्स आणि त्याच्या मित्रांनी ‘ऍपल’ची स्थापना केली. सत्तरच्या दशकाच्या मध्यावरील या दोन्ही कंपन्यांची इतकी भरभराट झाली की यातील एक जगातील सर्वात मोठी तर मायक्रोसॉफ्ट ही तिसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टचे नाव आल्याबरोबर आपल्याला चिरपरिचित ‘विंडोज’ ही ऑपरेटींग प्रणाली आणि यासोबतचे आपल्याला पावलोपावली उपयुक्त पडणारे ‘एमएस ऑफिस सॉफ्टवेअर्स’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आजही ‘मायक्रोसॉफ्ट’ची मुख्य मदार यावरच आहे. अर्थात एकविसाव्या शतकातही आघाडीचे स्थान टिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्टला धडपड करावी लागत आहे. याची मुख्य कारणे म्हणजे काही बाबींकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष होय.

ms1

खरं तर मायक्रोसॉफ्टने अनेक चुका केल्या. सर्वात गंभीर चूक म्हणजे इंटरनेटच्या प्रारंभीच्या वर्षात सॉफ्टवेअर्सवर अक्षरश: एकाधिकार असतांना कंपनीने ‘सर्च इंजिन’कडे फारसे लक्ष दिले नाही. ‘एमएसएन’च्या माध्यमातून त्यांनी थोडा प्रयत्न केला. मात्र ते सॉफ्टवेअर्सच्या विक्रीला चिपकून राहिले आणि ‘गुगल’चा उदय झाला. ऐशीच्या दशकात ‘आयबीएम’ने सॉफ्टवेअरकडे दुर्लक्ष करत मायक्रोसॉफ्टशी केलेला करार त्या कंपनीला खूप महागात पडला होता. त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी ऍपल कंपनीने कंप्युटींगच्या क्षेत्रातील नवे आयुध म्हणून टॅब/स्मार्टफोनच्या निर्मितीला प्राधान्य दिले तरी मायक्रोसॉफ्टला काळाचा वेध घेता आला नाही. आयपॉड, आयपॅड आणि आयफोन या क्रमाने यशाच्या पायर्‍या चढल्या. ते मात्र या कंपनीला जमले नाही. यानंतर गुगलने स्मार्टफोन्स आणि टॅबसाठी अँड्रॉईडला विकसित करत जोरदार धक्का दिला. खरं तर ‘विंडोज’ हे सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान असल्याच्या आत्ममुग्धतेत असणारी मायक्रोसॉफ्ट यातून खर्‍या अर्थाने शुध्दीवर आली. ‘विंडोज’च्या चलतीच्या काळात या कंपनीवर एकाधिकारशाहीतून गैरप्रकार करण्याचे आरोप झाले. त्यातील काही वाद न्यायालयातही गेले. गुगलने मात्र काळाचा वेध घेत ‘ओपनसोर्स’ला प्राधान्य दिले. यातून अँड्रॉईडचा वारू उधळला. यानंतर मायक्रोसॉफ्टने नोकियाच्या मोबाईल उत्पादन विक्रीचे युनिट विकत घेऊन विंडोज स्मार्टफोन निर्मितीचा प्रयत्न केला तरी यात अद्याप हवे तितके यश आलेले नाही. आज कंपनीला चाळीस वर्षे होत असतांना बिल गेटस्, स्टीव्ह बालमेर यांच्यामार्गे सर्व सुत्रे सत्या नादेला या मुळ भारतीयाकडे आलेली आहेत. त्यांच्यासमोर कंपनीची प्रगती किमान कायम राखण्याचे आव्हान आहे.

मायक्रोसॉफ्टला आज ऍपलच नव्हे तर गुगल, फेसबुक, अमेझॉन, अलीबाबा या टेक कंपन्यांचे आव्हान आहे. सत्या नादेला यांनी भविष्याचा वेध घेत अनेक पावले उचलली आहेत. एक तर ग्राहकांना थेट सॉफ्टवेअर विकण्याऐवजी ‘क्लाऊड बेस्ड’ सेवा देण्याला ते प्राधान्य देत आहेत. यानुसार कंपनीची ‘अझुर’ ही शाखा चांगले काम करत आहे. कंपनीची ऑफिस सॉफ्टवेअर्सही विविध प्रणालींसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. यासोबत ‘विंडोज-१०’, स्पार्टन ब्राऊजर, एक्सबॉक्स वन गेमिंग कन्सोल, स्काईप, सरफेस टॅब, विंडोज बेस्ड स्मार्टफोन्स, कोर्टाना हा स्मार्ट पर्सनल असिस्टंट आदी आयुधे मायक्रोसॉफ्टकडे आहेत. याच्या बळावर ही कंपनी जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी होणार की अन्य कंपन्या त्यांना मात देणार याची उत्तरे काळच देणार आहे.

(4 April 2015)

00000<>0000000<>0000

गोर्‍या रंगाचा ‘कॉंप्लेक्स’!

भारतीय राजकारण्यांचा महिलांबाबतचा दृष्टीकोन फारसा निकोप नसल्याच्या अनेक घटना आजवर घडल्यात. आज दोन मान्यवरांनी आपली अक्कल पाजळत यात भर टाकली इतकेच. केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग यांनी सोनिया गांधी या नायजेरियाच्या असत्या तर कॉंग्रेसींनी त्यांना स्विकारले असते का? असा प्रश्‍न विचारत गोर्‍या वर्णावर मल्लीनाथी केली. अर्थात ती त्यांच्या अंगलाट आली. इकडे भाजपचेच नेते तथा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आंदोलन करणार्‍या त्यांच्या राज्यातील नर्सेसला उन्हात उपोषण न करण्याचे सांगत यामुळे तुमचा रंग काळा पडेल आणि तुमचा विवाह करतांना अडचणी येतील अशी काळजी पण व्यक्त करून टाकली.

काही दिवसांपुर्वीच संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी दाक्षिणात्य महिलांचा कमनीय बांधा आणि नृत्यशैलीचे राज्यसभेत इतके गुणगान केले की बस्स! त्याचे वेळेस दिल्लीतील गँगरेपवर वादग्रस्त माहितीपट बनविणार्‍या लेस्ली उडवीन या श्‍वेतवर्णीय असल्याने त्यांना सर्व परवानग्या मिळाल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. आजवर राजकारण्यांपैकी कुणी महिलांना ‘टंच माल’ म्हटले, कुणी विरोधकांना भांडकुदळ खेडवळ महिला म्हणत हिणवलयं, कुणाला बिहारमधील रस्ते हेमामालिनीच्या गालांसारखे करायचे होते आणखी काय…काय…

यातील मुळ मुद्दा आहे तो गौर वर्णाचा. आता भारतीयांना गोर्‍या रंगाचा काय हव्यास! गोर्‍या रंगाच्या हव्यासावरच अब्जावधी रूपयांची इंडस्ट्री बहरली आहे. आता विवाह जुळवण्यापासून ते समाजात वावरण्यापर्यंत गोरा रंग हा जणू यशाचा पासवर्ड असल्याचे मानले जात आहे. तो नसल्यास अनेक जण आयुष्यात न्यूनगंडाचे ओझे घेऊन वावरतात. आता भारतीय हे मुळचे गौरवर्णीय नाहीतच. यामुळे कितीही बाह्य उपाययोजना करून एका विशिष्ट पातळीपर्यंतच आपण गोरे बनू शकतो हे कुणी लक्षात घेतच नाही. मला तर सौदर्यप्रसाधनांपेक्षा ‘फोटोशॉप’चे जास्त कौतुक वाटते. साला अगदी काळाठिक्कर माणूसही गावातील फ्लेक्सवर कसा चमकतो बघा…जाऊद्या गौर वर्णाचे भुत भारतीय सामूहिक चेतनेत इतके खोलवर रूजले की, ते लवकर निघणे कठीण. यात सरंजामी वृत्तीचे राजकारणी भविष्यात असलीच वक्तव्ये करतील. घडीभर करमणूक होईल. मग सगळे शांत…

गमतीची बाब अशी की, भारतात गोरे होण्यासाठी करोडो लोकांचा आटापीटा सुरू असतांना बरेच श्‍वेतवर्णीय लोक मात्र आपली त्वचा किमान ब्राऊन करण्यासाठी ‘सन बाथ’ घेतात. याचाच अर्थ मानव जे आहे त्यात समाधानी नाहीच. म्हणजे-भारतीयांना गोरा होण्याचा हव्यास तर गोर्‍यांची कातडी रापविण्याची धडपड…

(1 April 2015)

00000<>00000<>00000

सिगारेटमुळे कर्करोग होत असल्याचा कोणताही पुरावा नाही…

तंबाखूमुळे पचनक्रिया चांगली राहते-खा. दिलीप गांधी

बीडी आरोग्याला हानीकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही-खा. शामाचरण गुप्ता

दररोज साठ सिगरेट ओढल्यानेही कुणी मरत नाही-खा. रामप्रसाद शर्मा

तिन्ही नेते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे. पहिले महाराष्ट्रातील, दुसरे उत्तरप्रदेशी तर तिसरे आसाममधील. तंबाखू लॉबीला अखिल भारतीय पाठींबा पाहून उर भरून आलाय.

मित्रो…आता वक्ता दशकोटीशू प्रधान सेवकांनी महेंद्रसिंग धोनी स्टाईलने शेवटचा भीमटोला मारावा हीच अपेक्षा.

(3 april 2015)

00000<>00000<>00000

अलीबाबाची स्वारी…

चीनमधील अलिबाबा कंपनीचा संस्थापक जॅक मा हा एक द्रष्टा आणि हिकमती माणूस. पुर्वायुष्यात जेमतेम परिस्थितीतल्या इंग्रजीचा शिक्षक असणार्‍या जॅकने नोकरी सोडून अवघ्या नऊ सहकार्‍यांसह सुरू केलेल्या कंपनीने अक्षरश: स्वप्नवत झेप घेतली असून या कंपनीचे आजचे मुल्य बारा लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. आजवर फक्त चीनमध्ये कारभार करणार्‍या जॅकचे लक्ष आता विशालकाय भारतीय बाजारपेठेवर आहे. यामुळे अवघ्या चार महिन्यात त्यांनी दुसर्‍यांदा भारताला भेट दिली. कालच ते पंतप्रधानांना भेटले. अलीबाबा समुहाने चीनमध्ये व्यापाराची व्याख्याच बदलून टाकली आहे. म्हणजे स्वत:च्या पेमेंट गेटवेसह ऑनलाईन पोर्टल्स, मॉल्स, वेअरहाऊसेस, चेन शॉपीज, ऍफिलीयेट सर्व्हीसेस आदींच्या माध्यमातून लक्षावधी खरेदी-विक्री करणार्‍यांचे एकजीनसी जाळे त्यांनी उभारले आहे. याच्यासोबत आयटीतल्या अन्य शाखांकडेही त्यांचे लक्ष आहेच.

जॅक मा यांच्या भारतभेटीत त्यांनी मांडलेला महत्वाचा मुद्दा असा- भारतातील ई-कॉमर्स हे बहुतांश ‘बी-टू-सी’ अर्थात ‘बिझनेस टू कस्टमर’ या प्रणालीवर आधारित आहे. अर्थात मला हव्या असणार्‍या वस्तूची मी संबंधीत कंपनीला ऑर्डर देतो आणि ती वस्तू माझ्याकडे येते. अमेझॉनसारख्या अमेरिकन कंपन्यांनी हे मॉड्युल तयार केले असून फ्लिपकार्टसह अन्य भारतीय कंपन्या याचे अंधानुकरण करत असल्याचा थेट आरोप जॅक मा यांनी केला. यात नफा फक्त एका केंद्रीय कंपनीला मिळतो. मात्र ‘बी-टू-बी’ अर्थात ‘बिझनेस टू बिझनेस’ ही प्रणाली अधिक वास्तववादी आणि यशस्वी ठरणारी असल्याचे त्यांचे मत आहे. म्हणजे-मला जळगावातील ग्राहकांना विकण्यासाठी टायर्स हवे आहेत. मग मी अलीबाबाच्या सेवेच्या माध्यमातून चीन वा जगातील कोणत्याही ठिकाणच्या उत्पादकाशी थेट संपर्क साधून मला हव्या असणार्‍या कंपनीचे टायर्स विकत घेऊ शकतो. यात मध्यस्थ म्हणून अलीबाबा वा अन्य कोणतीही कंपनी राहू शकते. या मॉड्युलमध्ये संबंधीत कंपनी, मी स्वत: आणि अर्थातच अलीबाबा या तिघांना लाभ होईल. नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत ही प्रणाली किरकोळ भारतीय व्यापार्‍यांना लाभदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. भारतीय कंपन्यांनी किमान ई-कॉमर्समध्ये तरी अमेरिकीकरण (‘बी-टू-सी’) नव्हे तर जागतिकीकरणाला (‘बी-टू-बी’) प्राधान्य द्यावे असे मतही जॅक मा यांनी व्यक्त केले आहे. आता त्यांचा सल्ला कोण कितपत ऐकणार यात शंका असली तरी खुद्द अलीबाबा भारतीय बाजारपेठेत (केंद्र शासनाच्या धोरणावर ते बहुतांश अवलंबून आहे. सध्या ‘बी-टू-बी’मध्येच थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. ) जेव्हा पुर्ण ताकदीनिशी उतरले तेव्हा मात्र भारतीय ‘ई-कॉमर्स’ची दिशादेखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(31 March 2015)
00000<>00000<>00000

चाणाक्ष राजकीय नेता दुसर्‍या क्रमांकावर कुणाला येऊ देत नाही. किंबहुना एक ते दहा क्रमांकापर्यंत आपणच कसे राहू? याची काळजी तो नेहमी घेत असतो. यात निरंकुश सत्ता असल्यास विचारायलाच नको. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम ज्येष्ठांचा अडसर दुर केला. लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांना ज्येष्ठतेच्या मुद्यावरून अलगदपणे बाजूला सारल्यानंतर त्यांना अन्य सहकार्‍यांवर दरारा प्रस्थापित करण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

यामुळे अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भुषण यांच्यासोबत जे केले ते फारसे आश्‍चर्यकारक नाही. केजरीवाल यांच्याकडून खुप मोठ्या अपेक्षा असतांना त्यांचेही पाय मातीचेच निघावेत हे मात्र अनेकांना खटकणारे आहे. २०१९चा मुकाबला हा नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात होणार असल्याची भाकिते अनेक राजकीय विश्‍लेषकांनी आधीच केली आहेत. कदाचित तसे होईलही. मात्र पक्षांतर्गत विरोधकांना मोडीत काढणे आणि दुसर्‍या क्रमांकावर कुणी येऊ नये याची काळजी घेणारे हे दोन्ही एकाच माळेचे मणी निघावेत हा विलक्षण योगायोग नव्हे तर भारतीय राजकारणाची शोकांतिक होय. मग ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणणार्‍यांपासून ते आजही गांधी घराण्याच्या करिश्म्यावर अवलंबून असणारे कॉंग्रेसी आणि याचाच कित्ता गिरवणारे भाजप आणि आपचे नेते यांच्यात फरक तरी काय? अर्थात थोड्याफार फरकाने बहुतांश राजकीय पक्षांमध्ये नेतृत्व याच प्रकारे पक्षांतर्गत विरोधकांना गारद करते हेदेखील सत्य नाकारता येत नाही.

(29 march 2015)

000000<>000000<>00000

माझ्या जीवनातील ‘राम’ !

माझे स्नेही तथा ‘तरूण भारत’चे संपादक दिलीपजी तिवारी यांनी आज सकाळी त्यांच्या व्हाटसअप ग्रुपमध्ये आपापल्या जीवनातील रामाचे स्थान अधोरेखित करण्याचे आवाहन केले होते. कामातून मोकळा झाल्यावर याबाबत मी व्यक्त केलेले हे विचार.

माझ्यासाठी राम हा व्यक्तीवाचक शब्द नाही. मला शुद्र शंबुकाचा वध करणारा, आपल्या गर्भवती पत्नीचा त्याग करणारा, लोकापवादावरून पत्नीला अग्निपरीक्षा घ्यायला लावणारा, प्रणय निवेदनासाठी आलेल्या महिलेस (शुर्पणखा) विद्रुप करण्यात हातभार असणारा तसेच झाडाच्या आडून वालीवर वार करणार्‍या रामाशी काही एक देणेघेणे नाही. मला तो मान्यही नाही. मात्र राम नामाच्या माध्यमातून आपण भारतीय जे नितीमुल्य जपतो व मानतो त्यांचा मी आदर करतो.

आपल्या जीवनात सदाचार हवा, हाच माझ्यासाठी ‘राम’ आहे. जीवनातील सत्य, शिव व सुंदर म्हणून जे काही असेल ते माझ्यासाठी ‘राम’ आहे. मग ते माझे काम असो, वैयक्तीक आवडी-निवडी असो, नातेसंबंध जोपासणे असो वा समाजात वावरणे!

या देशाच्या आत्म्यात राम, कृष्ण आणि बुध्द ही त्रिमुर्ती वसलीय. रामाचा सदाचार, कृष्णाचा जीवनोत्सव आणि बुध्दाचे ध्यान जीवनात यावे असे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. यामुळे आपल्या आयुष्यात रामाच्या जोडीला जीवनाला खेळकर, खोडकर आणि अर्थातच समग्रतेने स्वीकारणारा कृष्ण आणि यासोबत स्वत:चा वैज्ञानिक पध्दतीने शोध घेण्यास प्रवृत्त करणारा बुध्ददेखील हवाच.

सांगायचे तात्पर्य एकच-आयुष्यात राम, कृष्ण आणि बुध्दाची युती हवी. नैतिकता, भोग आणि ध्यान यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न आपण करावा. किंबहुना कुणी केला नाही तरी मी तर करतच आहे.

(28 March 2015)
<<<<<<<<<000000>>>>>>>>00000<<<<<<<<<000000000>>>>>

जगू द्या त्यांना…

खरं तर आपण दुटप्पी आहोत. काल्पनिक प्रेम आपल्याला खुप आवडतं. जवळपास प्रत्येक चित्रपट, कथा, कादंबरी, कविता ही प्रेमाभोवतीच फिरत असते. आपण ते मोठ्या आवडीने पाहतही असतो. प्रत्यक्षात मात्र आपण प्रेमाला तुच्छतेने पाहतो. प्रेमी जनांना तर ते जणू काही फार मोठे पाप करत असल्यागत वागणूक मिळते. मग ते देशाच्या कान्याकोपर्‍यात युगलांना मारहाण करणारे कथित संस्कृतीरक्षक असोत की अन्य बुरसट विचारधारेवाले! यातच जगाच्या नाकावर टिच्चून प्रेम जगणारे तर…शिव…शिव! सांगायचे कारण असे की, विराट आणि अनुष्का एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असतील तर तुम्हाला-आम्हाला यात वाईट वाटण्यासारखे काहीही नाही. यार मला तर विराटमधील बेडरपणा जाम आवडतो. जग गेलं बोंबलत…पठ्ठ्या बेदरकारपणे खेळतो आणि जगतोही!

आता संपुर्ण जग विराटला अनुष्का आणि तिच्यासोबतच्या संबंधाबद्दल विचारतेय. मला नवलं वाटतं. खरे प्रेम बोलून नव्हे तर वागणुकीतून समजते. आता विराट काय जगासमोर त्याचे खासगी जीवन उघडून दाखवेल? अर्थात त्याच्यात धाडस असल्याने तो करोडो लोकांसमोर थेट ‘फ्लाईंग किस’ देतो. विशेषत: अनेक सेलिब्रीटीजही आपली ‘रिलेशनशीप’ लपविण्याची धडपड करत असतांना त्याचे हे वागणे विलक्षणच! लोकांना ‘फॉलिंग इन लव्ह’ माहित आहे…पण ‘बीईंग इन लव्ह’ ही तर अनुभवण्याची बाब आहे. अगदी एका गाण्यातील-‘‘तुमने इश्क का नाम सुना है…हमने इश्क किया है’’ या वाक्याप्रमाणे! विराट आणि अनुष्का यांच्यातील ‘केमिस्ट्री’ तटस्थपणे अनुभवा. रूपेरी पडद्यावरील बेगडी प्रेमापेक्षा ती कांकणभर सरसच भरेल. अहो, ते या वयात श्रुंगार करणार नाही तर काय म्हातारपणात करतील? तेदेखील तुमच्या-आमच्या सारखेच आहेत. मग ते शारीरिक प्रेमात असो, प्लेटॉनिक/फ्लर्टींग की आणखी कोणत्या..ते ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये असो, विवाह करो का नको…त्यांच्या संबंधांना वासना म्हणा, लफडं म्हणा, अफेयर म्हणा की आणखी काही…जगू द्या त्यांना. मला तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे आधुनिक बंडखोर तरूणाईचे प्रतिक वाटतात. जग गेलं तेल लावत आम्ही तर आमच्याच मस्तीत जगणार…

इकडे समाज मात्र प्रत्येक खिडकीतून डोकावून पाहणार्‍या मांजराच्या मनोवृत्तीचा…किळसवाणा!! (‘आपलं ठेवावं झाकून अन् दुसर्‍याचं पहावं वाकून’ हा गुणधर्मदेखील सोबत चिकटलेला आहेच.)
virat

(27 March 2015)
<<<<<<<<<000000>>>>>>>>00000<<<<<<<<<000000000>>>>>

नियतीचा हा कोणता न्याय ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते आज ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले. एका उत्तुंग नेतृत्वासाठी हा सन्मान त्यांच्या घरी चालत गेला. हा देशाने केलेला त्यांचा अत्यंत कृतज्ञपणाने केलेला गौरव आहे. रूग्णशय्येवर असणारा हा महान नेता आज अतिशय जर्जरावस्थेत आहे. आजच आलेल्या बातमीनुसार अटलजींनी डेमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंशाचा विकार आहे. त्यांच्या वाढदिवसाला अर्थात २५ डिसेंबर २०१४ रोजी ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याबाबतची माहिती अटलजींना दिल्यानंतर ते फक्त क्षीणपणे हसले होते. समस्त गात्रे थकलेली असतांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळण्याचा खरा आनंदही आज अटलजींना मिळाला नसेल.

आता पलीकडे नजर लागण्यापुर्वीच अटलजींना ‘भारतरत्न’ का मिळाला नाही? हा प्रश्‍न आहे. २००४ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही ते चार-पाच वर्षे सक्रीय होते. तेव्हाच हा सन्मान मिळाला असता तर बरे झाले असते. असो. खुद्द अटलजींनी ‘जीवन की ढलने लगी सांझ’ या कवितेतून वृध्दावस्थेचे मार्मिक वर्णन केले आहे. आज याच जर्जरावस्थेत त्यांना ‘भारतरत्न’ मिळावा हा नियतीचा कोणता न्याय आहे?

जीवन की ढलने लगी सांझ

उमर घट गई
डगर कट गई

जीवन की ढलने लगी सांझ |

बदले हैं अर्थ
शब्द हुए व्यर्थ

शान्ति बिना खुशियॉं हैं बांझ |

सपनों में मीत
बिखरा संगीत

ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ |
जीवन की ढलने लगी सांझ |

(27 March 2015)

<<<<<<<<<000000>>>>>>>>00000<<<<<<<<<000000000>>>>>

वास्तव ‘सोशल नेटवर्कींग’का नको?

आठवड्यातून एक उत्तम चित्रपट पहाण्याचा संकल्प व्यवस्थितपणे सुरू आहे. नवीन वर्षापासून आठवड्यात एक पुस्तकाचा संकल्पही जुडला आहे. वाचन करतांना थोडी कसरत होते. म्हणजे काही पुस्तके सात दिवसांत संपत नाहीत. मात्र मजा येतेय. यातच आता माझ्या एका मित्राने सुचविले की आपण आठवड्यातून एकदा एका पुर्णपणे अनोळखी व्यक्तीला भेटायचे. म्हणजे आयुष्यात त्या माणसाला आपण कधीही भेटलेले नसावे. मग तो लौकीक अर्थाने यशस्वी आणि समाजातल्या ‘एलीट क्लास’ मधील असो की, रस्त्यावरचा फाटका माणूस! आपण त्याच्याशी फक्त गप्पा मारायच्या. त्याला बोलते करायचे. प्रत्येकाची एक कथा असते. आपण समजून घेऊ! आपण सपाटून वाचतो, ऐकतो, बघतो मात्र खरा माणूस वाचण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करू. मला प्रश्‍न पडला. असे कसे होईल? आता भलेही समाजातील लब्धप्रतिष्ठितांना भेटणे सोपे आहे. पत्रकार असल्याने तर सोय होणारच. मात्र अगदी पुर्णपणे अनोळखी असणार्‍या सर्वसामान्य माणसाला उभे करून ‘‘अहो थांबा…आम्हाला तुमच्याशी मस्तपैकी गप्पा मारायच्या आहेत हो!’’ असे कसे सांगणार? नेमकी हीच प्रश्‍नार्थक भिती मी व्यक्त केली.

यावर तो मित्र म्हणाला, ‘‘अरे सोपे आहे…सुरवातीला आपण भिकारी वा भणंगपणे फिरणार्‍यांपासूनच सुरवात करूया. आपण त्यांना आस्थेवाईक शब्दांसह चहापाण्यासह बोलते करायचे…!’’ यानंतर क्रमाक्रमाने लहान व्यावसायिक, किरकोळ विक्रेते आदींशी संवाद साधूया असेदेखील त्याने साधून टाकले. आणि हो…शक्य झाल्यास याचे व्हिडीओ वा किमान ऑडिओ रेकॉर्डींग करण्याची अटदेखील त्याने टाकली. सोशल नेटवर्कींगच्या आभासी विश्‍वात आपण रमतोच ना…मग वास्तव ‘सोशल नेटवर्कींग’ करायला हरकत काय? असा निरूत्तर करणारा प्रश्‍नही त्याने विचारला. बापरे…कसे होणार ? लौकीक अर्थाने अत्यंत विद्वान, उच्च अभिरूचीसंपन्न आणि यशस्वी असणारा माझा हा मित्र अत्यंत झपाटलेला आणि एखाद्या पक्षागत स्वच्छंदी आहे. ठरविले ते करणारच. आणि आजवर त्याला मी कधीही टाळू शकलो नाही. यामुळे आता हे कसे टाळू? त्याला काय बहाणा सांगू? की होऊनच जाऊ देऊ…?
(25 March 2015)
<<<<<<<<<000000>>>>>>>>00000<<<<<<<<<000000000>>>>>

ये एक चिराग कई आँधियों पे भारी है..!

माझ्या वाढदिवसानिमित्त विविध माध्यमातून शुभेच्छा देणार्‍यांचे मानलेले हे आभार…

कभी तो आसमा से चांद उतरे जाम हो जाए
तुम्हारे नाम एक खुबसुरत शाम हो जाए ॥
उजाले अपनी यादो के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाए ॥

मित्रांनो अगदी खरं सांगतो…याच पध्दतीने आज आपल्याला आमंत्रित करण्यास मला आवडले असते. मात्र आपल्यास बोलावू शकलो नाही याची खंतदेखील आहे. खरं तर मी आधी मद्यपान करायचो तेव्हा वाढदिवस हा ‘बसण्या’चा एक अत्यंत जंगी बहाणा असे. तसे अनेक बहाणे मी आणि माझ्या ‘ग्लासफ्रेंडस’नी शोधून काढले होते ही बाब अलाहिदा. मात्र आता या सर्व बाबींना पुर्णविराम दिलाय. यातच शाकाहारी तर आधीपासूनच आहे. अर्थात आता ‘खाणे’ वा ‘पिणे’ नसल्यामुळे मैफिलप्रेमी मित्रांचा हिरमोड झाल्याने त्यांचे क्षमस्व!! आयुष्यात मी स्वत: वा कुटुंबियांनी माझा वाढदिवस कधी साजरा केला नाही. भविष्यातही करणार नाही हे निश्‍चित. यामुळे आज दिवसभर घरीच थांबावे असा विचार मनाशी आला. सकाळी साडेसात वाजेलाच फोन स्विचऑफ केला तेव्हा पत्नी माझ्याशी अक्षरश: भांडली. ‘‘अहो कुणीही आपुलकीनेच बोलेल हो…फोन बंद का करताय?’’ असा सवाल तिने केला. मात्र मी बधलो नाही. काही मित्रांचे घरच्या लँडलाईनवर फोन आल्यानंतर मात्र मुकाट्याने मोबाईल सुरू केला अन् सौभाग्यवतीचे म्हणणे किती सार्थ होते याची जाणीव झाली.

मित्रांनो मी फार मोठा पत्रकार नाही. माझे वर्तमानपत्र छोटे आहे. एका अर्थाने मी स्वत:ला ‘छोट्या वर्तमानपत्रातील छोटा पत्रकार’ समजतो. आज मात्र या फाटक्या माणसाची झोळी आपल्या शुभेच्छांनी इतकी काही भरली की याच्यापुढे स्वर्गसुखही फिके पडावे…आधीच सांगितल्याप्रमाणे मी फार लोकप्रिय पत्रकार नाही. अनेकांना शेखर पाटील दिसतो कसा? हेदेखील माहित नाही. मात्र देश-विदेशातून अक्षरश: शेकडो कॉल्स मी अटेंड केले तेव्हा रोमांचित झाल्यावाचून राहिलो नाही. ही किमया तंत्रज्ञानाचीच…मग तो माझा ब्लॉग असो, फेसबुक असो वा तुमच्या-आमच्या आवडीचे व्हाटसअप!! मला आजवर असे वाटायचे की, ‘‘यार आपण लिहतो तर खरे पण कुणाला आवडते की नाही?’’ आजवर मोजके लोक ग्रुपमध्ये प्रतिक्रिया देतात. काही जण खासगी मॅसेज करून पसंती कळवत असत. बरेच पत्रकार मित्र प्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगत असतात. आज मात्र अनेक अपरिचित लोकांनी लिखाणाबद्दल भरभरून बोलत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तेव्हा आपले मोडके-तोडके लिखाण हे कुणाच्या तरी हृदयाला भिडतेय…त्याच्या जीवनाला कुठे तरी स्पर्श करतेय हा दिलासा मिळाला. शेखर पाटील या व्यक्तीचे असणे आणि त्याची दोन शब्द लिहण्याची धडपड हा अपघात नव्हे, कदाचित ते वार्‍यावर विरून जाईल मात्र कुणाला तरी दोन क्षण विचार करण्यास भाग पाडील याचा विश्‍वास आजच्या माझ्या वाढदिवसाने मला दिला.

सोशल मीडियातील अनेक कॉमेंट या भारावून सोडणार्‍या होत्या. मात्र माझे बंधूतुल्य आणि आत्यंतिक संघर्षाच्या कालावधीतील माझे साथीदार तथा ‘इंडिया टिव्ही’चे झोनल रिपोर्टर नरेंद्र कदम (माझ्यासाठी विक्कीभैय्या!) यांनी माझ्याबाबत ‘विचारो की आंधी’ हे शब्द वापरले तेव्हा मात्र मी खदखदून हसलो. अरे भैय्या ‘आंधी’ नसेल हो आपल्या भुसावळच्या भाषेतील ‘अंधी-बहिरी’ असेल. हो आयुष्यात अनेक ‘अंधी-बहिरी’ फटके मारलेत आपण…‘‘काही हुकले, काही बसले’’ हुकलेल्या फटक्यांच्या वेदना आपण कधी विसरणार का भैय्या? ते फक्कड दिवस…जागेपणी स्वप्ने पाहण्याचा भारलेला काळ…जाऊ द्या पुन्हा हुरहुर कशाला? मात्र व्याकुळ करणारी ही ‘यादो की बारात’ निघालीच!! बालमित्रांपासून ते आयुष्यात कधीही न भेटलेल्या अनेकांशी बोलणे झाले. मजा आली…जीवनासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सृजनासाठी नवीन बळ मिळाले…

जाऊ द्या शेवटी जनाब वसीम बरेलवी…

उड़ान वालो उड़ानों पे वक़्त भारी है
परो की नही अब हौसलों की बारी है

मैं क़तरा हो के तुफानों से जंग लड़ता हूँ
मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है

कोई बताये ये उसके ग़ुरूर-ए-बेजा को
वो जंग हमने लड़ी ही नहीं जो हारी है

दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत
ये एक चिराग कई आँधियों पे भारी है

( 24 March 2015)
00000000======0000000======000000000=====00000

हौतात्म्य दिन !

आज भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा हौतात्म्य दिन! यानिमित्त सर्वप्रथम या महान क्रांतीकारकांना अभिवादन. अलीकडच्या काळात महापुरूषांवर जाती-धर्म, भाषा, प्रदेशासह राजकीय विचारांवर आधारित मालकी हक्क दाखवण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभुमीवर या तिघा क्रांतीकारकांवर आजवर तरी कुणी ‘दावा’ सांगितला नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. ही त्रिमुर्ती गांधीजी आणि पर्यायाने कॉंग्रेसच्या विरोधी असल्याचा दावा करत त्यांना धार्मिक कट्टर मंडळी आपले ‘आयडॉल’ म्हणू शकत होती. तसे थोडे प्रयत्नदेखील झाले. मात्र या तिघांमध्ये सर्वाधीक वलयांकीत असणारे ‘शहीद-ए-आझम’ भगतसिंग हे विचारांनी डावे आणि कट्टर नास्तिक असल्याने त्यांची गोची झाली. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपल्या नास्तिकतेबाबत पुस्तिकेच्या रूपाने लेखी पुरावा ठेवल्याने कट्टरपंथी हतबल झाले.

आज या त्रिमुर्तीच्या बलीदानास ७४ वर्षे पुर्ण झाल्यानंतर अनेक बाबींमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. एक तर भारत स्वातंत्र्य झाला तरी सुराज्य मिळाले हे म्हणणे धाडसाचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या अनेकांचे नंतरच्या काळात सत्तेमुळे झालेले पतन देशाने पाहिले. समाजवादी, संमिश्र अर्थव्यवस्थेकडून भारत आर्थिक उदारीकरणाकडे वळला. यातच खुद्द भगतसिंग ज्या डाव्या विचारधारेला मानत ती खूपच क्षीण झालीय. कम्युनिझमच्या नावावर अनेक सामूहिक अनाचार झाले. यातून सोवियत संघासारख्या बलाढ्य शक्तीचा उदय आणि अस्तही झाला. चीनसारखे कम्युनिस्ट राष्ट्र आज नावापुरते साम्यवादी आहे. भारतातही डावा विचार कमजोर झालाय. मध्यंतरी नक्षलबारी प्रकरण आणि त्यातून उगम पावलेल्या नक्षलवादाने तरूणाईला थोडीफार भुरळ घातली तरी ही चळवळही भरकटली आहे. राजकीय पातळीवरही डाव्यांचा प्रभाव ओसरला आहे. म्हणजे भगतसिंग यांच्यानंतरच्या पाव शतकात त्यांना अपेक्षित असणारे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यांचा विचार हरवला. अर्थात भगतसिंग यांचा नास्तिकवाद आजही तेवढाच प्रासंगीक आहे. आपल्याला स्वराज्यासाठी फासावर जाणारे भगतसिंग चालतात. मग त्यांचा नास्तिकवाद का चालू नये? हा प्रश्‍न सार्थ आहे. अर्थात अलीकडच्या काळात सर्वधर्मीय प्रतिगामी शक्तींचे हुंकार पाहता भविष्यात उघडपणे नास्तिकतेचे समर्थन करू शकेल की नाही याबाबत शंका वाटतेच.

(23 March 2015)

0000000000================0000000000000000===============

स्वागतार्ह परवानगी !

महाराष्ट्रातील किरकोळ विक्रेत्यांना ३६५ दिवस दुकान उघडे ठेवण्यास मिळालेली परवानगी स्वागतार्ह आहे. यातून ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही लाभ होणार आहे. मात्र निव्वळ या माध्यमातून किरकोळ विक्रेते मॉल्सचा मुकाबला करू शकतील हे म्हणणे धाडसाचेच ठरणार आहे. अनेकदा काही बाबींचा अकारण बागुलबुवा उभा केला जातो. नव्वदच्या दशकात ‘गॅट’, ‘डंकेल करार’ आदींबाबत प्रचंड भिती व्यक्त करण्यात आली होती. यातून कथित ‘स्वदेशी’ अर्थव्यवस्था लयास जाण्याची भाकितेही झाली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. याच प्रकारे काही वर्षांपुर्वी रिटेलमधील बडे प्रस्थ असणार्‍या कंपन्या विविध मॉल्सच्या माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांच्या मुळावर उठतील अशी आवई उठली होती. प्रत्यक्षात देशातील बहुतांश शहरांमध्ये सुपरशॉपी तर मोठ्या शहरांमध्ये मॉल्स अवतरले तरी किरकोळ व्यापार्‍यांना फटका बसला नाही. एका अर्थाने रिटेलर्सनी मोठ्या कंपन्यांचा यशस्वी मुकाबला केला. या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे लहान दुकानदार मॉल्सचा मुकाबला करतील ही अपेक्षा व्यर्थ आहे. कारण त्यांनी आधीच हे आक्रमण यशस्वीपणे थोपवून धरले आहे. फार तर यामुळे बाबूगिरी आणि त्या अनुषंगाने होणार्‍या चिरीमिरीला आळा बसू शकतो.

आता छोटे व्यापारी आणि मॉल्स या दोघांनाही धोका आहे तो ऑनलाईन रिटेलर्सपासून. आज मला हवी असणारी वस्तू ही या दोन्ही घटकांपेक्षा किफायतशीर दरात मिळत असेल तर यासाठी मी स्थानिक बाजारपेठेत (मग तो छोटा दुकानदार असो की मॉल!) का जावे? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडू लागला आहे. भारतीय बाजारपेठेत ‘लॉजिस्टीक’च्या अनेक अडचणींवर मात करून ऑनलाईन रिटेल कंपन्यांचा (आता त्या ‘ई’ सोबत ‘एम’ अर्थात मोबाईल कॉमर्स म्हणून ओळखल्या जातात.) उधळलेला वारू रोखण्याची ताकद सध्या तरी किरकोळ व्यापारी आणि बड्या रिटेलर्समध्येही नाही.

(21 March 2015 )

0000000000================0000000000000000===============

गुढी उभारतो त्याले कसं म्हनती पाडवा….

गुढीपाडव्यानिमित्त अवचितपणे बहिणाबाईंची ‘गुढी उभारणी’ ही कविता आठवली. बहिणाबाईंचा भोवताल, भाषा, संस्कृती आदींशी परिचित असल्याचे यातील गोडवा अजूनच मनाला भावतो. आसोद्याची ही लौकीक अर्थाने अशिक्षित असणारी बाई सहजगत्या गुढी उभारतांना मनातली अढी सोडण्यासह येरायेरांवर अर्थात परस्परांवर प्रेम वाढविण्याचे सांगते. रामपहार उलटत असतांना सुस्तपणे घोरत असणार्‍यांवर बहिणाबाई रागावतात. चैत्रातल्या उन्हात जीव कासाविस होत असला तरी रामनवमी जवळ येत असल्याने राम नाम घेण्याचा उपायदेखील त्या सुचवितात.

बहिणाबाईला निसर्गाने आणि जीवनाने शिकविले…सुजाण केले. यातून त्यांना अनेक प्रश्‍न पडले अन् याचे काव्यातूनच उत्तर सुचले. आता गुढी उभारणी होत असतांना ‘पाडवा’ का म्हणावा? हा त्यांना पडलेला प्रश्‍न इतका भाबडा मात्र तितकाच मार्मीकदेखील आहे. अर्थात जमीनीत ‘उभा’ असणार्‍याला ‘आड’ म्हणणारे भांग वगैरे तर प्यायले नाहीत ना? असा मिष्कील प्रश्‍नदेखील बहिणाबाईंच्या मनात तरळून जातो. चैतन्यदायी चैत्राचे स्वागत करतांना बहिणबाईंच्या या कवितेला कसे टाळता येईल?

गुढी उभारनी

गुढीपाडव्याचा सन
आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनातली आढी

गेलं सालं गेली आढी
आता पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनता गेला रे
रामपहार निंघूनी

आता पोथारा रे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारी उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधी
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आता
रामनवमीचा दिस

पडी जातो तो ‘पाडवा’
करा माझी सुधारनी
आता गुढीपाडव्याले
म्हना ‘गुढी उभारनी’

काय लोकांचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधी
आड म्हनती उभ्याले

आसं म्हनू नही कधी
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा….

:- बहिणाबाई चौधरी

( 21 March 2015 )

0000000000================0000000000000000===========

नुरा कुस्ती?

पहिल्यांदा ‘मॅच फिक्सिंग’चे प्रकरण जगासमोर आले तेव्हा ‘आजतक’ वाहिनीवरील एक कार्यक्रम पाहून मी कधीही क्रिकेटचा सामना न पाहण्याचे ठरविले. तेव्हापासून आजवर मी एकही सामना पुर्ण पाहिला नाही. पत्रकार असल्याने माहिती असावी म्हणून (अनेकदा लिखाणही करावे लागते हो!) सामन्याचे वृत्तांकन वा दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचा उपयोग करतो. यामुळे आज ‘आयसीसी’चे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी कालच्या भारत आणि बांगलादेशात झालेल्या सामन्याबाबत ‘फिक्सींग’चा केलेला आरोप पाहून मला जराही नवल वाटले नाही. जगात क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांची एकत्रीत लोकसंख्या ही ३५-४० कोटींच्या पेक्षा जास्त नाही. यामुळे एकशेतीस कोटींपेक्षा अवाढव्य ‘ग्राहक’ असणार्‍या देशात क्रिकेटच्या चलनी नाण्याची चकाकी कायम ठेवायची झाल्यास ‘फिक्सिंग’चा खेळ करणे सहज शक्य आणि अनिवार्यदेखील आहे. आयपीएलमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष असणार्‍याच्या जावयाचा संघ वरचढ ठरतो काय, त्या संघातील बर्‍याच खेळाडूंना सातत्याने भारतीय चमूकडून खेळण्याची संधी मिळते काय या सार्‍याच बाबी संशयास्पद आहेत. बरं मॅच फिक्सिंगमध्ये अनेकांबाबत संशयकल्लोळ निर्माण होऊनही कधी कुणी तोंड उघडेल तर शपथ! जाऊद्या…

(टिप-सदगृहस्थांचा खेळ म्हणून ख्यात असणार्‍या क्रिकेटचा मी निस्सिम चाहता आहे. आयुष्यात मी विपुल क्रिकेट खेळलोय…सध्याही खेळतो. शालेय आणि महाविद्यालयीन वयातच मी क्रिकेटचा इतिहास कोळून प्यायलो होतो. आजही क्रिकेटबाबत आस्था आहे. मात्र आज क्रिकेटचे सामने म्हणजे नुरा कुस्ती असल्याचा भास मला वारंवार का होतो हे मात्र कळत नाही बुवा!)
(20 March 2015)

0000000000================0000000000000000===

‘‘मित्रो…इन भ्रष्ट चाचा-भतिजो को उखाड कर फेकना है’’ पासून ते ‘‘मित्रो मै…इनसे हरदम सलाह लेता हू’’ या वाक्यांनी अनेकांना आलेली झांज अद्याप उतरली नसतांनाच आजचा दिवस उजाडला. काय तर म्हणे विधानपरिषद अध्यक्षांवरील अविश्‍वासाप्रसंगी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र..!! राजकारणात वास्तववाद महत्वाचा असतो. यातूनच अनेक अभद्र युत्या आणि आघाड्या जमतात अन् बिघडतात. फडणवीस सरकारला सुरळीतपणे काम करण्यासाठी विधानपरिषदेतही बहुमत हवे आणि सध्या तरी राष्ट्रवादीशिवाय हा मार्ग सुकर नाही. या तहात कोण हरणार कोण जिंकणार? हा प्रश्‍न नाही. सवाल आहे तो मतदारांच्या भावनांचा. अर्थात राजकारण्यांनी मतदारांच्या भावना लक्षात घेतल्या असत्या तर आजवर मुलभुत सोयींपासून आपण वंचित राहिलो नसतो. असो. मी तर त्या दिवसाची वाट पहातोय…काका-पुतण्याच्या प्रचारार्थ ‘प्रधान सेवक’ बोलबचनगिरी करताहेत!!

0000000000================0000000000000000=

ऐतिहासिक चूक?

राजकारणात जर-तरला फारसे महत्व नसते. मात्र बर्‍याच राजकीय पक्षांचे काही निर्णय ‘ऐतिहासिक चुका’ ठरल्या आहेत. यात ज्योती बसू यांनी पंतप्रधानपद नाकारणे विख्यात झाले असले तरी प्रत्येक पक्षात असे कधी तरी घडले आहेच. यातच आता जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत भाजपने केलेला घरोबादेखील या पक्षासाठी ‘ऐतिहासिक चूक’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता सरकार, जनता दल, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आदींच्या राजवटीत राजकीय ब्लॅकमेलिंगचे अध्याय आपण पाहिले आहेत. यामुळे जम्मू-काश्मिरात भाजपने पीडीपीसोबत केलेली हातमिळवणी ही चाणक्यनिती असल्याचे प्रारंभी वाटले होते. मात्र कसले काय…

खरं तर मुफ्ती मोहंमद सईद हा माणूस मला पहिल्यापासूनच डाऊटफुल वाटतो. व्हि. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री असतांना त्याच्या मुलीचे झालेले अपहरण आणि त्या बदल्यात पाच अतिरेक्यांची झालेली सुटकादेखील संशयास्पद गणली गेली होती. यामुळे त्याच्यासोबत जातांना भलेही मोदी-शाहा यांच्या व्यापारी बुध्दीने काही गणित लावले असेल. (कदाचित अडाणी-अंबानींना काश्मिरात प्रोजेक्ट लावायचे असतील.) मात्र भाजपच्या मुळ विचाराला गुंडाळून ठेवत कथित ‘किमान समान कार्यक्रम’ ठरवून सत्ता स्थापन झाल्याझाल्याच मुफ्तीने दहशतवादी आणि पाकिस्तानला शांततेच झालेल्या निवडणुकीचे श्रेय दिल्याने भाजपेयींच्या चेहर्‍याचा रंग बिघडला. यानंतर मुफ्तीने मसरत आलम या फुटिरतावाद्याला कारागृहातून मुक्त केल्यावर तर भाजप नेत्यांना दातखिळ बसण्याची वेळ आली. मोदी सरकार आल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर मुक्त होतील अशी भाबडी आशा बाळगून असणारे भक्त तर या प्रकाराने चांगलेच संतप्त झाले आहेत. यामुळे पीडीपी-भाजपचा संसार काही दिवसांतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र मुळातच मुफ्ती मोहंमद सईदसारख्या नेत्यासोबत केलेली हातमिळवणी आणि आपल्या कोट्यातून सज्जाद लोन याच्यासारख्या फुटिरतावाद्याला मंत्री करण्याची ‘कामगिरी’ मोदी यांच्या नावावर जमा झालेली आहेच. अर्थात ही चूक ‘ऐतिहासिक’ ठरण्याची शक्यता आहे. मोदींना याला उत्तर द्यावेच लागणार आहे. (तसे ‘अच्छे दिन’, काळे धन, ५६ इंच छाती, दहा लाखांचा कोट आदी प्रश्‍नदेखील सोबत राहतीलच!

(8 March 2015)

00000000=======000000000

सत्तेसाठी काय पण !

जम्मू-काश्मिरात पीडीपी आणि भाजपची सत्ता येणार असल्याची बातमी येताच मी माझ्या एका कट्टर भाजप समर्थक मित्राला संपर्क साधला असता त्याच्या तोंडून प्रथमच निराशाजनक सुर निघाला. बोलणे खुप वेळ झाले. सार एकच-सत्तेसाठी काय पण !

नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी धुमसत्या वातावरणावर स्वार होत भाजपने सत्तेच्या मार्गाकडे कुच करतांना जनतेच्या व विशेषत: तरूणाईच्या भावनांना हात घालणारे अनेक मुद्दे एकचदा पोतडीतून काढले होते. यात राम मंदिरासारख्या अस्मितेच्या विषयासोबत जम्मू-काश्मिरातील कलम-३७०, समान नागरी कायदा असे विषयदेखील घेण्यात आले होते. जम्मू-काश्मिरचा प्रश्‍न कॉंग्रेसने व विशेषत: पंडित नेहरूंनी चिघळवला असून कलम-३७० हटविणे हाच यावर एकमेव उपाय असल्याची ‘थिअरी’ सर्वांच्या तोंडी ऐकू येऊ लागली. आज जवळपास २५ वर्षानंतर भाजप केंद्रात स्पष्ट बहुमताने राज्य करत असतांना हे मुद्दे गेलेत कुठे? राम मंदिराचा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे पाहून भाजपने यातून हुशारीने अंग काढून घेतले. समान नागरी कायद्याचा प्रश्‍नदेखील असाच गुंडाळून ठेवला. मात्र भाजपने आजवर ‘कलम’ पकडून ठेवले होते. अगदी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील जाहिरनाम्यात भाजपने काश्मिर खोर्‍यात पंडितांचे पुनर्वसन आणि ‘कलम-३७०’च्या समाप्तीचा स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र आता जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत सत्ता स्थापन करतांना हा मुद्दादेखील पध्दतशीरपणे बाजूला ठेवले जाईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पीडीपीने भाजपसोबत जातांना ‘कलम-३७०’मध्ये बदल न करण्याचे आणि जम्मू-काश्मिरातून एका वर्षात लष्करास विशेषाधिकार देणार्‍या ‘अफ्प्सा’{Armed Forces (Special Powers) Act} या कायद्याला हटविण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. यात ‘अफ्प्सा’ काढणे अशक्य असले तरी ‘कलम-३७०’चा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवणे सहजशक्य आहे.

राजकारणात सारे काही क्षम्य असते. आजचे शत्रू उद्याचे मित्र असतात. जम्मू-काश्मिरातील ‘नॅशनल कॉन्फरन्स आधी भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’सोबत होता. यामुळे ‘पीडीपी’सोबत जाणेही गैर नाही. मात्र यासाठी पक्षाच्या मुलभुत विचारांपैकी एकाला तिलांजली देणे भाजपच्या सच्च्या समर्थकांना व्यथीत करणारे आहे. अर्थात राजकारणात भावनांपेक्षा व्यवहारवादाला महत्व असते. आणि वास्तवात ‘यु-टर्न’ घेणे अनेकदा लाभदायक ठरते. याचाच अर्थ बारामतीत सुरू झालेला हा खेळ काश्मिरातला बारामुलापर्यंत पोहचणार. माझ्या मित्रासारखे सच्चे समर्थक हळहळणार मात्र सिंहासनावर आरूढ झालेल्यांच्या कानावर हा आवाज जाणे अवघडच.

शेवटी सत्तेसाठी कायपण…

(26 feb-2015)

<<<<<00000>>>>>00000>>>>><<<<<

सेवा आणि स्वार्थ !

मदर तेरेसा यांच्या सेवा भावामागील धर्मांतरणाबाबतच्या वक्तव्यातून सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन काहीच सांगितले नाही. यापुर्वी अनेकदा देश-विदेशातून मदर तेरेसा यांच्यावर हा आरोप करण्यात आलाय. भागवत यांनी आताचा मुहुर्त साधलाय इतकेच.
एका हातात भाकरी आणि दुसर्‍या हातात बायबल घेऊन जगभरात ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍या ‘मिशनरीं’वर कितीही टिका होवोे त्यांनी मानवतेची सेवा केली हे कुणी नाकारू शकणार नाही. या धर्माच्या प्रसारासाठी झालेली ‘क्रुसेडस्’ भयंकर रक्तरंजीत होती. मात्र मध्ययुगापासून युरोपातून अक्षरश: हजारोंच्या संख्येने ख्रिस्ती मिशनरीज जगभरात विखुरले. जगाचा असा कोणता कोपरा नसेल जिथे ते पोहचले नाहीत. ते स्थानिक लोकांमध्ये मिसळले. त्यांच्या व्यथा-वेदना जाणून घेत सेवा केली. त्यांची बोली आणि संस्कृती आत्मसात केली. रोटी-बेटी व्यवहार केले. त्यांनी सेवेचा नवीन मापदंड प्रस्थापित केला. अर्थात सोबत ख्रिस्ती धर्मही विस्तारला. मिशनरींच्या या अक्रिय आक्रमणाचा प्रतिकार करायचा तर त्यांचेच अनुकरण करण्यावाचून गत्यंतर नव्हते. यातूनच जगातल्या बहुतांश देशांमधील अनेक धार्मिक समाजकार्यांचे मॉड्युल्स हे मिशनरीजच्या कार्यपध्दतींवर आधारित आहेत. आज मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्या समाजकार्याच्या आड असणार्‍या धर्मांतरणावर बोट ठेवले असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही संस्थांची कार्यप्रणाली ही थेट मिशनरींच्या कार्यप्रणालींवर आधारित आहे. देशातील बहुतांश दुर्गम ठिकाणी संघाचे प्रचारक पोहचले. मिशनरीजप्रमाणेच ते स्थानिक जनतेत मिसळले. त्यांना आरोग्य, शिक्षण आदी मुलभुत सेवा प्रदान केल्या. नैसर्गिक आपत्तीत ते धावून गेले. याचसोबत त्यांनी या भागात आधीपासून असणार्‍या मिशनरीजला अगदी समांतर अशी हिंदू सेवा प्रणाली विकसित केली. यामुळे आता सरसंघचालक मदर तेरेसा यांच्याकडे बोट दाखवत असले तरी चार बोटे खुद्द त्यांच्याकडेच आहेत.

एवढे सर्व होऊनही एक प्रश्‍न उरतोच-

संघाने समाजसेवा, संस्कृती, परंपरा व भाषा संवर्धन आदींमध्ये आपल्या परीने काम केलेच. सेवेसोबत धर्म प्रचार-प्रसार केला. त्यांची राजकीय विंग असणार्‍या भारतीय जनता पक्षाने केंद्र व अनेक राज्यांमध्ये सत्तादेखील काबीज केली. मात्र मदर तेरेसा यांच्यासमान किमान एक तरी मानवतावादी आणि सर्वमान्य चेहरा संघ निर्मित का करू शकला नाही? मदर तेरेसांना अन्य धर्मियांमध्येही सन्मान मिळाला. संघाला मात्र हे शक्य का झाले नाही? मोहन भागवत यांनी याच प्रश्‍नांवर चिंतन करणे योग्य राहील. मदर तेरेसा यांच्या सेवेआड स्वधर्म प्रचाराचा मुद्दा तर खूपच जुना आहे.

(24 feb. 2015)

0000000——<<<<<00000>>>>>000000

बंदे मे है दम !

काही म्हणा यार मानलं अण्णांना! गेल्या चार वर्षात रोलर-कोस्टरप्रमाणे त्यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ वरखाली झाला. २०११च्या ऐतिहासिक उपोषणाद्वारे अवघा देश ढवळून काढणारा हा फकीर यानंतर साफ फिका पडला. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आंदोलनाची घोषणा करून गर्दी न जमल्याने अण्णांना पाठ फिरवावी लागल्याने त्यांचे हसे झाले. म्हणजे भ्रष्टाचारविरूध्द लढाईतील ‘आयकॉन’ ते हास्यास्पद पात्र अशा स्थित्यंतरातून जाऊनही हा बाबा आज पुन्हा प्रस्थापितांच्या तोंडाला फेस आणण्यासाठी उभा आहे.

आता गमतीची बाब अशी की, अण्णांच्या आधीच्या उपोषणांमुळे आनंदाच्या उकळ्या फुटणारा भारतीय जनता पक्ष आज बचावाच्या मुद्रेत आहे. तर अण्णांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणार्‍या कॉंग्रेसला यातून प्राणवायू मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे अण्णा आधी एनजीओ गँग आणि आरएसएसचे एजंट असल्याचा आरोप होता तर आता ते कॉंग्रेसचे हस्तक असल्याचा हल्ला होत आहे. आता भारताच्या इतिहासात तर दोन परस्परविरोधी विचारधारांचे हस्तक असल्याचा आरोप होणारे अण्णा हे एकमेव असावे. असो…

कुणी कितीही नाकारले तरी भारतीय राजकारणातील अलीकडच्या काळतले नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे नायक अण्णांच्या आंदोलनांनी ढवळून निघालेल्या वातावरणातूनच उदयास आलेत. राजकारणात पारदर्शक कारभाराची ग्वाही आणि स्वच्छ प्रतिमा या आज आवश्यक बाबी बनलेल्या आहेत. हा कुठे तरी अण्णांच्या आंदोलनाचा निश्‍चितच परिणाम आहे. त्यांच्या आंदोलनातील अनेक त्रुटी गृहीत धरल्या तरी आजवर कोणत्याही राजकीय मोहांना बळी न पडणारा हा सह्याद्रीपुत्र अनेक मातब्बरांपेक्षा कांकणभर सरसच ठरला आहे.

(23 feb- 2015)

<<<<<<<<<<<0000000000>>>>>>>>>

शरम वाटतेय आम्हाला…

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यसंस्काराला नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले नाहीत तेव्हा वाटले होते बघा…किती काम करतात हो आपले पंतप्रधान! नंतर समजले की, वाढदिवस, विवाह, खासगी कार्यक्रम आदींना जायलादेखील त्यांना भरपूर वेळ असतो. आज तर महाशय उत्तरेतील दोन मातब्बर यादव घराण्यांमधील नातेसंबंधाला साक्षीदार बनण्यासाठी गेले (हा फक्त टिळ्याचा कार्यक्रम होता. विवाह अजून बाकी आहे.) सांगायचा मुद्दा असा की, अगदी पंतप्रधानही अनेक कार्यक्रमांना प्रोटोकॉल तोडून जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचेही तसेच. विवाह, खासगी कार्यक्रम आदींनाही मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने हजेरी लावत आहेत. अगदी आजही ते नाशकात होते. संध्याकाळीदेखील ते कुठे तरी असतीलच. असू द्या. मुद्दा आहे तो कॉम्रेड पानसरेंना अखेरचा निरोप देतांना कामात मग्न असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना शक्य नसले तरी त्यांचे एखादे सहकारी जाण्यास काय हरकत होती हो? हो मान्य आहे ‘लाल’ आणि ‘भगवे’ विचार कधी जुळू शकणार नाहीत. मात्र कुणाच्या मृत्युनंतरही जर विचारांची लढाई संपत नसेल तर पुढे बोलणे नकोच!

कॉम्रेड पानसरे….आम्हाला आपला अभिमान आहे. आपण ज्या विचारांसाठी लढा दिला तो कधीही क्षीण न होऊ देण्याची जबाबदारी आमच्यावरच आहे. मात्र पानसरे आम्ही शरमिंदे आहोत…आम्ही ज्यांना निवडून दिले ते इतके असहिष्णू, असंवेदनशील आणि संकुचित वृत्तीचे असतील हे स्वप्नातही वाटले नव्हते हो!! जाऊद्या…आपल्याला कडक ‘लाल सलाम’!

(21 feb. 2015)

<<<<<<<<<->>>>>>>>>-<<<<<<<--->>>>>>>

व्यवस्थेच्या नावाखाली…

हा सगळा प्रकारच संशयास्पद आहे. अहो, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नींची हरवलेली पर्स पोलीस सहज शोधून काढत परत आणून देतात. अगदी कालपरवाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिक्षण संस्थेतील चोरीचाही तातडीने उलगडा होतो. मात्र दीड वर्षे उलटूनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कुणाला सापडत नाही. यातच कॉम्रेड पानसरे यांनाही त्याच मार्गाने संपविण्यात येते अन् तपास शुन्य!

महाराष्ट्र पोलिसांनी अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. जगात एकमेव जिवंत पकडला गेलेला आत्मघाती दहशतवादी हा हातात दंडुका असणार्‍या तुकाराम ओंबळे याने बहादुरीने पकडला होता. ते शौर्यातही कमी नाहीत अन् चातुर्यातही. त्यांनी अनेकदा अगदी रहस्यमय वाटणार्‍या गुन्ह्यांची उकल केली आहे. मात्र पोलिसांवर असे कोणते दडपण आहे की दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी मोकाट आहेत? पोलिसांवरील दडपण काढा अन् पहा कसा तपास लागत नाही ते? आता मुख्यमंत्री म्हणतात की, हे व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. पहा बुवा…आता व्यवस्थाही तुमचीच, पोलीसही तुमचेच आणि पोलिसांवरील नियंत्रणही तुमचेच!

सज्जनांमध्ये एकच दुर्गुण असतो की ते दुर्जनांना मार्ग मोकळा करून देतात. डॉ. दाभोलकरांच्या क्रूर हत्येनंतर समाजमन अस्वस्थ झाले होते. लोकांनी आपला उद्रेकही व्यक्त केला होता. मात्र या खटल्याचा तपास पुढे सरकला नाही. आता कॉम्रेड पानसरे यांचे खुनीदेखील याचप्रकारे हात लागण्याची शक्यता धुसर आहे. यासाठी जनसमुदायाचा रेटा लावून धरण्याची गरज आहे. यातून सत्ताधार्‍यांना या दोन्ही हत्यांचा तपास लावणे भाग पडेल. याचसोबत आपण आपल्या जीवनात कोणत्याही कट्टर विचारांना थारा न देता विवेकवादावर आधारित पुरोगामीत्व अंगिकारू तेव्हाच दाभोलकर आणि पानसरे यांच्या बलीदानाचे चिज होईल.

0000—0000—-0000—-0000

राजकारण्यांचे (अति)सामान्यज्ञान!

राजकारण्यांनी आपल्या अज्ञानावर कितीही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तरी केव्हा तरी ते उघडे पडताच. आता हेच पहा ना! पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर आपले सरकार डास निर्मुलनास प्राधान्य देईल असेदेखील त्यांनी सांगितले. यानंतर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी हा विकार हृदय आणि फुफ्फसांशी संबंधीत असल्याचे सांगून धमाल उडवून दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिकारासाठी उष्णता कमी होणे आवश्यक असून यासाठी आम्ही महापालिकेतर्फे वृक्षारोपण करत असल्याची घोषणादेखील करून टाकली. मान्य आहे की, प्रत्येकाला सर्वच विषयांचे ज्ञान असणे शक्य नाही. मात्र जबाबदार पदांवर असणार्‍यांनी किमान माहिती घेऊनच वक्तव्य करणे केव्हाही उत्तम. असो.

अर्थात मध्यप्रदेशच्या राजकारण्यांच्या तुलनेत ममता बॅनर्जी आणि स्नेहल आंबेकर या खूपच ज्ञानी मानाव्या लागतील. मुळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असणारे तथा ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर हा धमाल किस्सा घडला. एमपीच्या आरोग्यमंत्री कुसुम मेहेंदळे, आदिवासी विकास मंत्री ज्ञानसिंग आणि बर्‍याच आमदारांनी आपल्याच सरकारमधील शहरी विकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे ‘नोबेल’बद्दल अभिनंदन करून टाकले. मेहेंदळेबाईंनी तर मध्यप्रदेश आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने कैलाशभाईंना पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप कौतुक केले. यावरून मीडियात खिल्ली उडविण्यात आल्यानंतर मध्यप्रदेश सरकारमध्ये सहा खात्याच्या मंत्री असणार्‍या या बाईंनी आपली कधी कैलाश सत्यार्थी यांच्याशी भेट न झाल्याने आपल्याला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माहिती मिळाली नसल्याचे सांगत हात झटकले. आता बोला! राजकारण्यांच्या अज्ञानाचे अनेक किस्से आहेत. मात्र मेहेंदळेबाईंचा किस्सा दीर्घ काळापर्यंत चघळला जाणार हे नक्की!

(20 Feb.2015)

0000—-0000—-0000

फोटोशॉपची पंचविशी!

आजच्या डीजिटल युगातील सर्वाधीक वापरण्यात येणारे ‘फोटो एडिटींग टुल’ म्हणून ख्यात असणार्‍या फोटोशॉपची आज पंचविशी! आजच्या बरोबर पंचवीस वर्षांपुर्वी अर्थात १९ फेब्रुवारी १९९० रोजी थॉमस आणि जॉन नॉल या भावंडांनी फोटोशॉप १.० सादर केले. संगणक युग अद्याप आले नसतांना आणि अर्थातच सायबर क्रांतीची कोणतीही पदचिन्हे नसतांना फोटोशॉप अवतरले. गत २५ वर्षात पीसी ते स्मार्टफोन्स हा प्रवास आपण पाहिला. सॉफ्टवेअर्सची जागा ऍप्लीकेशन्स घेऊ पाहत आहेत. इमेज एडिटींगमध्येही अनेक सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ‘फोटोशॉप जैसा कोई नही’ असे कायम म्हटले जाते ही बाब आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

फोटोशॉपने ग्राफीक डिझायनिंगच्या क्षेत्रात तर क्रांती केलीच पण व्हिज्युअल कल्चरलाही एक नवीन आयाम दिला. हे सॉफ्टवेअर कला आणि तंत्रज्ञानाचा अफलातून संगम म्हणून विख्यात झाले आहे. यात आहे त्याला अगदी कोणत्याही स्वरूपात बदलून टाकण्याची अफाट क्षमता आहे. याचा मीडिया, कला, जाहिराती आदींवरील परिणाम तर स्पष्ट आहेच. पण सोशल मीडियाच्या आगमनानंतर याच्या लोकप्रियतेने अजून नवीन शिखर गाठले. आज फोटोशॉप हा सोशल मीडियाचा अविभाज्य घटक आहे. फोटोशॉपच्या माध्यमातून सृजनाला नवीन आयाम मिळतो. त्यातून विनोद, विकृती अन् भयावताही निर्माण होते. मात्र फोटोशॉप कसेही असले तरी किमान त्याला टाळणे अशक्य आहे. परिणामी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेले सॉफ्टवेअर देणार्‍या नॉल बंधूंचे आज आपण आभार मानायलाच हवेत!

(19 feb. 2015)

=====—===—===000===000

मुर्ती लहान किर्ती महान !

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘आम आदमी’ आर.आर. आबा! ..काहींची नियती ही राहूल द्रविड याच्यासारखी असते. म्हणजे सातत्याने गुणवत्ता दाखवूनही दुसरा वा तिसरा क्रमांक! असेच राजकारणातील द्रविड म्हणजेच आबा होत. पक्षाला गरज वाटली तेव्हा त्यांना आबांची आठवण होई. आणि तेदेखील नाराज करत नसत. कधी त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. कधी त्यांची स्वकीयांकडूनच खिल्ली उडविण्यात आली. मात्र त्यांनी कधी याबाबत खंत व्यक्त केली नाही. कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसणारा आणि चेहर्‍यावर बालसुलभ भाव असणारा हा माणूस किती कणखर होता हे त्यांनी स्वत:हून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेत सिध्द केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुणग्राहकचा अवघा महाराष्ट्र जाणतो. अनेकांना त्यांनी हेरले, घडविले, अमाप संधी दिल्यात. मात्र बोटावर मोजणार्‍यांनीच सोने केले. त्यातील एक हिरा म्हणजे आबा होत. पवारांच्या अनेक चेलेचपाट्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र गैरव्यवहाराचा डागच नव्हे तर शिंतोळाही न उडालेला सोज्वळ राजकारणीदेखील आबाच होत. एका अर्थाने मुर्ती लहान पण किर्ती महान असणार्‍या या नेत्याला आदरांजली.

(16 feb. 2015)

उन्मादाचा निचरा !

भारतीय क्रिकेट संघाच्या आजच्या दणदणीत विजयानंतर मनात विचार आला. बरे झाले यार आपल्या समाजाचा सामूहिक निचरा झाला. खरं तर आपले पुर्वज खूप हुशार होते. यामुळे त्यांनी होळीसारख्या सणातून सामूहिक पातळीवर मनातील कचरा बाहेर काढण्याची सुविधा प्रदान केली होती. आता साहेबांची क्रिकेटच्या माध्यमातून हीच सोय दिलीय. यामुळे रावापासून ते रंकापर्यंत सगळे यात रंगून गेलेत. यातच कट्टर हाडवैरी असणार्‍या पाकिस्तानसोबतचा सामना असला म्हणजे तर विचारायलाच नको. म्हणजे आपण चीन वा अमेरिकेची बरोबरी करो वा नको पाकिस्तानच्या पुढेच हवे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेकडून मार खाल्ला तरी पाकला धुळ चारली ना? म्हणत धन्यता मानणार्‍यांना खरोखरच सलाम!

आता आपले मतभेद तरी किती हा भाजपचा तो कॉंग्रेसचा तर ते ‘आप’चे. हा उजवा, तो डावा, तो तिरपा तो मध्यममार्गी, हा नक्षलवादी तो अराजकवादी… मात्र क्रिकेट सर्वांना एकत्र आणतोच ना! आपल्या पंतप्रधानांना शेतकरी आत्महत्या, घरवापसी, जातीय दंगे आदींवर मत व्यक्त करता येत नाही म्हणून काय झाले? अहो भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी साहेबांनी तब्बल सोळा ट्विट केले म्हणे! जिंकल्यावर अभिनंदाचे वेगळेच. अर्थात पंतप्रधानच नव्हे तर देशातील कोट्यवधी लोक आज रोमांचित झाले. पाकचा खुर्दा पाडला..यामुळे अर्थातच तेथे मातम. इकडे लोक आनंदाच्या लहरींवर तर तिकडे पाकी संघावर शिव्यांचा भडीमार. म्हणजे पाकी जनतेच्या मनातील क्रोधाचाही निचरा होणारच की! असो ‘मजबुर ये हालात इधर भी है उधर भी’ अर्थात जनता दोन्ही बाजूंची गांजलेली आहे. यामुळे त्यांच्या मनोविकारांना वाट करून देण्यासाठी ‘आयसीसी’ने वर्षातून एकदा तरी असाच रविवार पाहून सामना खेळवायलाच हवा. अरे ‘बीसीसीआय’मध्ये आता कुणी श्रीनिवासन वा डालरमिया यांच्या डोक्यात वाघा बॉर्डरवर क्रिकेटचे मैदान करून त्यावर सामना खेळवायची आयडिया कशी येत नाही याचे मला खूप आश्‍चर्य वाटते यार…म्हणजे मित्रांनो विचार करा असे झाल्यास किती भन्नाट मजा येईल नाही. खेळाडूंना रग्गड पैसा मिळेल, सेलिब्रिटींना मिरवता येईल, क्रिकेट संघटनांच्या तिजोर्‍या भरतील, दोन्ही देशातील कोट्यवधी लोकांच्या रटाळ जीवनात एक दिवस तरी थरारक रोमांचाचा राहील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकमेकांचे हाडवैरी असणार्‍या भारत आणि पाकमध्ये एक दिवस तरी शांतता प्रस्थापित होईल.
(ताजी बातमी-आजही सीमेवर गोळीबार! कदाचित खोटी असावी यार!)

(15 feb. 2015)

फलकबाजांना दणका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना कानपिचक्या देत चमकोगिरी करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गर्जना केली आहे. यात प्रामुख्याने वाढदिवसाच्या दिवशी फलकबाजी करणार्‍यांना दुसर्‍याच दिवशी पक्षातून बाहेर काढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असाच आहे.

अलीकडच्या काळात आलेले होर्डींग्जचे खुळ आता बहुतांश शहरेच नव्हे तर ग्रामीण भागातही चांगलेच फोफावले आहे. यात वाढदिवसांच्या फलकांनी तर कहर केला आहे. फ्लेक्स प्रिंटींगचे अल्प दर आणि मिळेल ती जागा आपल्याच बापाची समजण्याच्या प्रवृत्तीमुळे आज ही समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. आपला भोवताला विद्रुप करण्यात या फलकांचा सर्वात मोठा वाटा आहे. या विद्रुपीकरणाबाबत आजवर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली. अगदी न्यायालयानेही याची दखल घेत बेकायदा फलक काढण्याचे आदेश दिले तरी यावर फारशी अंमलबजावणी होत नसल्याचे आजचे चित्र आहे. यामुळे आता राज ठाकरे यांनी या प्रकारावर कडक भुमिका घेतली हे चांगले झाले. खरं तर त्यांनी आधीच फलकबाजी करणार्‍यांना सुचना दिल्या होत्या. जनतेची कामे करण्याचे सोडून फक्त बाजार मांडण्याच्या प्रवृत्तीला चाप घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला होता. त्यांच्या या सुचनेचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. त्यांच्या सुचनेनंतरही गावोगावी मनसैनिकांनी केलेली फलकबाजी प्रसारमाध्यमांमधूनही गाजली होती. आता मात्र थेट राज यांनी असे करणार्‍यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची घोषणा केली आहे.

औद्योगीकरण आणि शहरीकरणाचे अनेक ‘साईड इफेक्ट’ आहेत. यात विविध प्रकारचे प्रदुषण, वाहतूक समस्या आदींसोबत फलकबाजीदेखील कारणीभूत आहे. आजच्या बाजारपेठ केंद्रीत युगात मोक्याच्या इमारतींवरील जागा फलकांनी व्यापल्या आहेत. हा धोका राजकीय क्षेत्रात सर्वप्रथम राज ठाकरे यांच्या लक्षात आला याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांच्या या घोषणेनंतरही काही प्रश्‍न उरतातच.

एक तर राज यांनी आपल्या वाढदिवसाच्या फलकबाजीपासून दुर राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र वर्षभरात वेळोवेळी येणारे सण/उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, विविध सामाजिक वा राजकीय उपक्रम कुणाची नियुक्ती वा यश मिळाल्याबद्दल एवढंच काय आदरांजलीपरही शेकडो बेकायदेशीर फलक झळकत असतात. खुद्द मनसेसकट सर्व राजकीय पक्ष हे विविध निवडणुकांच्या प्रचारासह सभा, मेळावा, आपल्या नेत्यांनी केेलेली कामे, उदघाटने आदींसाठीही बेकायदेशीर फलकांचा मुक्त वापर करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अवाढव्य कार्पोरेट कंपन्यांसह गल्लीबोळातील व्यावसायिकही फलकबाजीतून शहरी विद्रुपीकरणाला प्रामुख्याने कारणीभुत आहेत. त्यांच्यावरही राज यांनी अशीच ठाम भुमिका घ्यावी ही अपेक्षा.

(22 Nov. 2014)

()()()()()()()000000000()()()()()()

गावोगावी हरामपाल !

हरियाणातील रामपाल या कथित आध्यात्मिक बाबाच्या लिला पाहून मला एक भन्नाट किस्सा आठवला. साधू, महाराज,बाबा,पुजारी, महंत आदी मंडळी सर्वसामान्यांना भिती दाखवून त्यांना आपल्या अंकीत करतात. ते कुणालाही कशा प्रकारे ब्लॅकमेलींग करतात याचे हे अगदी भेदक उदाहरण आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रूपये खर्च करून पराभूत झालेल्या एका स्नेह्याला मी काही दिवसानंतर भेटलो. हा माणूस पुन्हा नव्या उमेदीने तयार आणि प्रसन्नचित्त वाटला. अर्थात निवडणुकीचा विषय निघालाच. त्यांनी सांगितलेल्या अफलातून घटना ऐकून मी थक्क झालो. साधारणपणे निवडणुकीच्या काळात संबंधीत उमेदवाराला ‘धुवून’ घेण्याची प्रवृत्ती आढळते. यात या माणसाला अनेक साधू आणि महाराजांनी खूप छळले. एक तर अमुक-तमुक पुजा करून घ्यावी…तुम्हाला इतके तितके मते मिळून विजयी व्हाल अशी आमिषे दाखविण्यात आली. बरं पुजेची दक्षिणा पाच हजारांपासून ते दहा लाखांपर्यंत सांगण्यात आली. या उमेदवाराने ही पुजा करून घ्यावी यासाठी ते महाराज आपल्या शिष्य परिवारासकट रात्री एक-दोन वाजेपर्यंत वाटही पाहू लागले. त्यांनी दोन-तीन जणांना थोड्याफार पैशात कटविले. यानंतर मात्र वाढीव आकडे घेऊन दुसरीच मंडळी पुन्हा हजर! आता माझे हे मित्र हैराण झाले. त्यांना काय करावे हे कळेनासे झाले. एकाला त्यांनी अक्षरश: हाकलून दिल्यानंतर त्याने आपण तुला तंत्र-मंत्राच्या सहाय्याने देशोधडीला लावू अशी धमकीदेखील दिली. सर्वात धमाल प्रकार शेवटच्या काही दिवसांमध्ये घडले.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात साधारणपणे कोणत्याही भागातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता वा हुरहुन्नरी माणूस आपल्याकडे इतके-तितके मतदार असल्याचे सांगून उमेदवारांकडून आपापली किंमत वसूल करत असतो. या समीकरणानुसार हा मित्र आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पैसे वाटू लागला तर त्याच्या मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांचे पुजारी आणि महंतही उगवले. आमच्या मंदिराचे इतके-तितके भक्त तर आमच्या पंथाची इतकी हजार मते असे सांगून त्यांनीही ‘पाकिटे’ उकळण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र हा माणूस हबकला. बरं येतांना ही मंडळी लवाजमा घेऊन येत असल्याने त्यांच्यावर दडपण येऊ लागले. यातील एका  बहाद्दराने तर ‘आपण तुम्हाला माझ्या भक्तांची ६५ हजार मते मिळवून देऊ’ असे आमिष दाखवत इनोव्हा कारची मागणी केली तेव्हा या उमेदवाराने तोंडाचा ‘आ’ वासला.

काही क्षण विराम गेल्यानंतर या उमेदवाराने त्या बाबासमोर अक्षरश: लोटांगण घातले.

‘‘बाबाssss…तुम्ही खूप उशीर केला हो!’’-उमेदवार

‘‘का?’’- त्या बाबाचा प्रश्‍न.

‘‘अहो मला माहित असते की तुमच्याकडे ६५ हजार मतदार आहे तर मी अर्ज न भरता तुम्हालाच आमदार म्हणून निवडून आणले असते!’’ असे उमेदवाराने म्हणताच आता चाट पडण्याची पाळी त्या बाबाची होती. त्या बाबाला हसावे की रडावे हेच समजेना…कसेनुसे बळजबरी हसत आणि उमेदवाराला आशीर्वाद देत त्याने काढता पाय घेतला तेव्हा तो माझा स्नेही उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पोट धरून हसत होते हे सांगावे लागेल का?

(21 Nov. 2014)

000000*****000000******

अरे नराधमांनो…मग मुले पैदा का करतात?

वर्तमानपत्रातील अनेक बातम्या अस्वस्थ करतात. समाज किती रूग्ण झालाय याची जाणीवही यातून होत असते. गेल्या दोन दिवसांत दोन बातम्या वाचायला मिळाल्या. एक नाशिक जिल्ह्यात सख्ख्या बापाने आपल्या तीन मुलांना विकल्याची आणि दुसरी जळगावातील संसार विच्छेद झाल्यानंतर आबाळ होणार्‍या चिमुरड्यांची!

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणार्‍या एकाने आपल्या पोटचे तीन गोळे चक्क विकले. आता विकत घेणार्‍याने त्या तिघांना कामाला लावले. यातील सर्वात मोठा जेमतेम अकरा वर्षाचा आणि दोन त्याहून लहान. या मुलांना विकणारा बाप जसा समाजात आहे तसाच त्यांना खरेदी करणाराही आहेच. खरेदी केलेल्या मालकाकडे राबराब राबतांना त्या चिमुरड्यांना आपल्या आई-वडिलांची आठवण झाली. दहा-पंधरा मैल पायी चालत त्यांनी बसस्टँड गाठले. इतक्यात मालकाची माणसे त्यांना शोधायला आणि त्यांची पळापळ सुरू झाली. लोकांना हा प्रकार समजल्यानंतर त्या मुलांच्या पालकांना बोलावून त्याला दम देत मुलांना त्याच्या हवाली केले. आता तो सैतान पुन्हा त्यांना विकणार नाही कशावरून? असो.

जळगावातील घटनाही तितकीच धक्कादायक. तीन मुलांच्या आईचे एकावर प्रेम जडले. यातून संसार तुटला. मुलांची वाटणी झाली. बापाने ‘वंशाचा दिवा’ असणार्‍या मुलास घेऊन जळगावातून काढता पाय घेतला तर ती बया मुलांकडे ढुंकुनही न पाहता प्रियकरासोबत निघून गेली. यानंतर दोन चिमुरड्या आपल्या आजीसोबत (वडिलांची आई) राहू लागली. अर्थात ती म्हातारीही त्रागा करू लागली. यातून त्या मुली वणवण भटकू लागली. अखेर महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी त्यांना काल केरळमधील आश्रमात रवाना केले. विचार करा. आई-वडिलांपासून ताटातुट आणि भाषेसकट सारे काही भिन्न असणार्‍या वातावरणात त्या चिमुकल्यांचे भावविश्‍व उद्ध्वस्त होणार नाही तर काय? अरे पिसाटांनो तुम्हाला शारिरीक सुखच हवे तर त्याची शिक्षा मुलांना कशाला? आणि मुले सांभाळण्याची धमक नसेत तर त्यांना जन्म देतात तरी कशासाठी?

‘बोल’ हा एक मन सुन्न करणारा पाकिस्तानी चित्रपट आहे. (याबाबत मी कधीतरी लिहणारच आहे.) यातील अशाच पाशवी बापाचा खुन करणारी नायिकाही समाजाला हाच प्रश्‍न विचारते…अगर खिला नही सकते तो पैदा क्यु किया? जर खुन करणे हा गुन्हा असेल तर व्यर्थ जन्म देणे हा गुन्हा का नाही? तिच्या प्रश्‍नावर अवघे जग निरूत्तर आहे.

(19 Nov. 2014)

000000*****000000*****000000******000000

शिंदे…एकदा तरी फोन करा हो!

सर्व जगाच्या समस्या मांडणार्‍या पत्रकाराची व्यथा-वेदना जग समजून घेत नाही. किंमत होते ती तो गेल्यानंतर! अशाच एका अवलिया, अष्टपैलु पत्रकाराने जीवनात काय कमावले ते काल त्यांच्या अंत्ययात्रेत गेल्यावरच समजले. मी आपल्याला सांगतोय ते नुकतेच कालवश झालेले ज्येष्ठ पत्रकार आणि माझे सहकारी जनार्दन शिंदे यांच्याविषयी!

काल सकाळी आलेली जनार्दन शिंदे गेल्याची बातमी तशी अपेक्षितच होती. गेल्या काही दिवसांपासून ते अत्यवस्थ असल्याने हा निरोप येणार अशी मनाची तयार होती. सकाळी कामाची दिशा दाखवून दिल्यानंतर प्रमोदभाऊ बर्‍हाटे आणि माझे सहकारी शशिकांत राजवैद्य यांच्यासोबत तातडीने पाचोर्‍याकडे निघालो. रस्त्यातच माझा बंधुतुल्य आणि एके काळचा सहकारी सुनील बडगुजर याचा फोन आला. लागलीच कडी जुळली. अरे सुनीलनेच आपली जनार्दन शिंदे यांच्याशी ओळख करून दिली होती. तेव्हा गावकरीला असणार्‍या शिंदे यांना मी ‘साईमत’साठी साकडे घातले. खरे तर मध्यमवयीन शिंदे यांच्याविषयी माझे पहिल्यांदा मत प्रतिकुल झाले होेते. मात्र काही दिवसांतच हा ‘बाप माणूस’ असल्याचे कळले.

ग्रामीण भागातील व अगदी तालुक्याच्या शहरांमधील अतिशय गुणवान पत्रकार योग्य संधीअभावी आपल्याच गावात खितपत पडतात. त्यापैकीच एक जनार्दन रामभाऊ शिंदे हे असल्याचे मी हेरले. त्यांनी अल्पकाळ डेस्कवरही काम केले होते. आपल्याला अतिरंजीत वाटू शकते मात्र ते कायम डेस्कवर असते तर मोठे पत्रकार झाले असते. या माणसाने आम्हाला एकाहून एक सरस बातम्या दिल्या. एखाद्या दिवशी तर दोन-तीन ‘बायलाईन’ द्याव्यात अशा बातम्या ते पाठवत. काहीदा ते बातम्यांसाठी कधीतरी माझ्याशी भांडतही. अर्थात बातमीसाठी वणवण भटकणार्‍याचा ती न लागल्यानंतर होणारा तळतळाट मी जवळून अनुभवला असल्याने त्यांना साहजीकच झुकते माप मिळाले अन् ते बहरले. यामुळे शोकसभेत अनेक जणांनी साईमत’मध्ये शिंदे खर्‍या अर्थाने बहरल्याचे आवर्जून नमुद केले तेव्हा बरे वाटले.

‘साहेब साप आणि बातमी मी कधीही खिशात ठेवत नाही…पटकन काढून टाकतो!’’ असे आमच्या मिटींगमध्ये जनार्दन शिंदे यांनी सांगितल्यावर हा माणूस आपल्या भोवतालवर किती प्रेम करतो याची जाणीव झाली. यथावकाश जनार्दन शिंदे मला तुकड्या-तुकड्यांना समजू लागले. यातच त्यांनी आपला मुलगा गणेश याच्यासाठी आमच्याकडे शब्द टाकला. यातून तो ‘साईमत’च्या कार्यालयात रूजू झाला. हळूहळू शिंदे कुटुंबातील व्यथा-वेदना मला समजल्या. आज मोठ्या तडफेने लेखणी चालविणारा हा माणूस काही वर्षांपुर्वी पाचोर्‍यातील सर्वोत्कृष्ट टेलर होता. सुबकरित्या ‘थ्री-पीस’ शिवण्यात त्यांचा हात कुणी धरत नसे. सुमधुर गळ्याचे धनी जनार्दन शिंदे अनेक भक्तीगिते आणि ऑकेस्ट्रांमध्ये गायनासाठी जात. शिंदे काय नव्हते? जनहिताची कळकळ असणारा पत्रकार, लेखक, उत्तम शायर, कवि, लोकगीत गायक, बहारदार सुत्रसंचालक, मिमिक्रीपटू, उत्तम क्रिकेटपटू, वारकरी, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे हिरीरीने काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी पारदर्शक माणूस! मोठ्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा माणूस जो उन्मळून पडला तो कधीही न सावरण्यासाठी. याच कालखंडात माझा त्यांच्याशी स्नेह जुळला. अनेकदा चर्चा करतांना त्यांच्या वेदना उफाळून यायच्या. मात्र हा माणूस कायम आनंदी वृत्तीने जगासमोर वावरला.

जनार्दन शिंदे यांनी आयुष्यात किमान २०-२५ पत्रकार घडविल्याचे काल त्या सर्वांनी आम्हाला अगदी गदगद् अवस्थेत सांगितले. मात्र माझ्यामते त्यांचा मुलगा गणेश हा पत्रकारितेत खंबीरपणे उभा राहिला ही त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी ‘अचिव्हमेंट’ होय. आज गणेश पत्रकारितेत स्थिर झालाय. तो ‘साईमत’चा अविभाज्य घटक आहे व राहणारच ही ग्वाही मी स्मशानभुमीतील शोकसभेत दिली. शिंदेंनी जर स्वाभीमान विकला असता तर ते कोट्यधीश झाले असते. मात्र शेवटपर्यंत हा माणूस ताठ मानेने सायकलवरच फिरला. बातम्यांसाठी धावपळही सायकलवरच आणि बातमी छापून आल्यानंतर पेपर वाटणेही सायकलवरच! २०-२५ वर्षे पत्रकारितेत राहून पेपर सायकलवर वाटणारे कदाचित ते जिल्ह्यातील एकमेव तालुका प्रतिनिधी असावेत. असो.

काळ किती क्रूर असतो याची अनेक उदाहरणे आपल्याला जीवनात आढळून येतात. माझ्या आयुष्यातील याचेच उदाहरण जनार्दन शिंदे यांचे होय. उत्कृष्ट गळा लाभलेल्या शिंदे यांचा गळा असाध्य विकाराने बसून त्यांचा आवाजच नाहिसा झाल्याचे आम्हाला समजले तेव्हा प्रचंड धक्का बसला होता. बरं हे झाल्यानंतरही त्यांनी अनेक महिने पत्रकारिता केली. आईशप्पथ खरं सांगतो. जनार्दन शिंदेंचा फोन आहे हे इंटरकॉमवरून सांगितल्यानंतर माझ्यासकट सर्व सहकारी हादरायचो. कारण आवाज गेलेला आणि अक्षरश: खोल गेलेल्या अगदी न कळणार्‍या शब्दांमध्ये हा माणूस ‘‘साहेब अमुक-तमुक बातमी पाठविलीय…पाहून घ्या’’ असे म्हणायचा तेव्हा काळीज पिळवटून निघायचे! काही वेळा तर ते एखाद्याला साईमतच्या कार्यालयात फोन करायला लावायचे. यासाठी त्याने ऑफिसात काय सांगायचे ते कागदावर लिहत आणि तो माणूस वाचून इकडे सांगायचा! फक्त बातमीसाठी असल्या प्रकारचा आटापीटा करणारा पत्रकार आम्ही कधी आयुष्यात पाहिला नाही! काही महिन्यांपासून हा सिलसिला थांबला तेव्हा त्यांच्या आयुष्याचा अंतिम टप्पा सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संपुर्ण आयुष्य सृजनाच्या धुंदीत जगणारे जनार्दन शिंदे यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचा मुलगा गणेश याने जी सेवा केली तिचे कौतुक करावे तितके कमीच. खरं तर शिंदेंच्या फक्कडपणामुळे संपुर्ण कुटुंबाची बर्‍याचदा कुचंबणा झाली. तरी शेवटच्या काळात गणेश अहोरात्र आपल्या वडिलांच्या उशाशी आज्ञेची वाट पाहत उभा होता. त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परवा रात्री अकरा वाजता ‘आता आपल्याला अखेरची चहा प्यायचीय’ असे फर्मावले अन् चहादेखील घेतला. यानंतर सर्वांचा कृतज्ञतेने आणि कृतार्थतेने निरोप घेतला.

जनार्दन शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करून आल्यानंतर मन उदास झालं. हे स्मशानवैराग्य असले तरी जनार्दन शिंदे यांच्या आठवणी मनात रूंजी घालताहेत. बातम्यांसाठी जगणारा, बातम्यांसाठी भांडणारा, बातम्या जमवणारा आणि वाटणारा एवढंच नव्हे तर सर्व आयुष्यच बातम्या जगणारा आणि बातम्याच झालेला हा कलंदर आता पुन्हा दिसणार नाही…कधी त्यांचा खोल आणि न कळणार्‍या आवाजात फोन येणार नाही ही जाणीव काळजावर सुरी चालवणारी आहे. जनार्दन शिंदे तुम्ही निघून गेलात? न फोन करता? असे कसे गेलात हो? एकदा तरी फोन करा ना! प्लीज….

(15 Nov. 2014)

000000*****000000*****000000******000000

खरा घात कार्यकर्त्यांचाच!

आजची राजकीय सौदेबाजी ही भाजप-राष्ट्रवादीतला संधीसाधूपणा, शिवसेनेसाठी हातातोंडाशी आलेला घास तुटल्याचा त्रागा तर कॉंग्रेससाठी वैफल्यग्रस्तता दर्शविणारी ठरली. भाजप-राष्ट्रवादी सोबत येण्यामागे देशातील मोठी उद्योजक लॉबी तसेच विविधांगी अर्थपुर्ण हितसंबंध कारणीभुत असल्याचे शेंबड पोरगही सांगेल. मात्र मित्रांनो यात घात झालाय तो सर्वसामान्य कार्यकर्त्याचा!

सतरंजी उचलणे, झेंडे लावणे, नेत्यांचा जयजयकार करणे आदींसाठी आवश्यक असणारा कार्यकर्ता हा कधीतरी आपण नेता बनू वा आपला पक्ष वा पुढारी आपल्या कामात येईल या आशेवर असतो. यासाठी नेत्यांच्या एका इशार्‍यावरून राडा होतो. विरोधकांशी अगदी रक्तरंजीत संघर्ष होईपर्यंत टोकाचा विरोध घेतला जातो. अंगावर केसेस घेतल्या जातात. असंख्य तरूणांची उमेदीची वर्षे वाया जातात. सत्ता आल्यावरही कामे होतीलच आणि नेता उच्च पदावर जाऊनही नशिब फळफळेलच याची शाश्‍वतीही नसते. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षातील या सर्वात महत्वाच्या घटकाची व्यथा-वेदना कुणी जाणून घेत नाही. आणि अचानक रात्रीतून त्यांनाच हादरवणारी ‘डिलींग’ होते तेव्हा त्यांच्या पायाखालील जमीन घसरल्यावाचून राहत नाही. दुश्मनी करावी कार्यकर्त्यांनी, विरोध घ्यावा कार्यकर्त्यांनी, मारामार्‍या, आंदोलने, खटले आदींचे कामही त्यांचेच…नेते मात्र कोणताही सौदा करण्यास मोकळे !

भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय विचारधारा परस्परविरोधी असतांना आणि राज्यातील अनेक ठिकाणी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा विरोध असतांना आजचा अध्याय महाराष्ट्राच्या इतिहासात घडतो याचा सर्वात गंभीर विचार कार्यकर्त्यांनी करावयाचा आहे. सरकारने मोबाईल पोर्टेबिलीटी दिलेली आहे. कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क नसल्यास वा सर्व्हीस बरोबर नसल्यास आपण फटदिशी नंबर कायम ठेवून कंपनी बदलून टाकतो. याचप्रमाणे कार्यकर्त्यांनीही विरोधकांशी टोकाचा विरोध न घेता कायम पोर्टेबिलीटीच्या मोडमध्ये रहावे अन्यथा भविष्यातही असले प्रकार होतच राहतील. नेते क्षणार्धात त्यांच्या भावना पायी तुडवतील…असल्या अभद्र युत्या, आघाड्या होतच राहतील…कार्यकर्ते विव्हळतील आणि नेते मात्र रात्री सोबत ‘बसतील’!

(12 Nov. 2014)

000000*****000000*****000000******000000

अरेरे राजदीप तुम्हीसुध्दा!

पत्रकारितेतील आयकॉन आणि अनेकांचे आदर्श असणारे राजदीप सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर आणि सुरेश प्रभू हे केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी झाल्यानंतर ते गौड सारस्वत ब्राह्मण असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे केलेले ट्विट आपल्या बौध्दीक वर्तुळातील दिशाही प्रतिगामीत्वाच्या मार्गावर असल्याचे दर्शविणारे आहे. कुण्याही सोम्यागोम्याने नव्हे तर अगदी वलयांकीत व्यक्तीनेही अमुक-तमुक भाषा, जाती, प्रदेश किंवा धर्माचा गर्व, अभिमान वा माज वगैरे बाळगण्यास आपली हरकत नाही. मात्र स्वत:च्या सेक्युलरिझमचा झेंडा अभिमानाने मिरवणार्‍या राजदीपने असे करावे ही बाब दुर्दैवी आहे.

राजदीप सरदेसाई यांनी कथितरित्या सीएनएन-आयबीएन समुहातील रिलायन्सचा ‘शेअर’ वाढल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविषयी आपल्या मनात आदर वाढला होता. आता मात्र निव्वळ जातीविशेषावर उतरणारे राजदीप आणि गर्व से कहो…वाल्या गर्जना करणार्‍यांमध्ये फरक उरलाय तरी काय? सर्वात महत्वाची बाब म्हणजे मनोहर पर्रीकर आणि सुरेश प्रभू या मोदींच्या मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांच्या कामाबाबत अवघ्या भारतवासियांना उत्सुकता आहे. दोघांनी आपापली गुणवत्ता आजवर सिध्द करून नव्याने देशाची सेवा करण्यासाठी महत्वाच्या खात्यांची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. यात ते कोणत्या जातीचे वा धर्माचे आहेत हा मुद्दाही कुणाच्या मनाला शिवला नसतांना राजदीप यांनी हा मुद्दा उकरून काढलाय. राजदीप यांनी केलेले ट्विट हे जात आपल्या मनात किती खोलवर रूजली याचे दर्शन घडविते की वार्‍याची बदलती दिशा पाहून सोयीची भुमिका घ्यावी याचा संदेश देते?

(10 Nov. 2014)

000000*****000000*****000000******000000

एकांगी विचार नको

निव्वळ जातीच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीच्या नावाने खडे फोडणारे शाहू-फुले-आंबेडकर यांचे वारसदार म्हणवून घेण्यास लायक आहेत काय? पुरोगामीपणाचे अंतिम ध्येय हे धर्म, जाती व कोणत्याही प्रकारच्या विषमताविरहीत समाजाची निर्मिती असते. यामुळे कोणत्याही जातीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर जणू काही बहुजनांची गळचेपी होणार असल्याचे रंगविण्यात येणारे चित्र हे फसवे तसेच पुरोगामीपणाचा एकांगी विचार सादर करणारे आहे.

१९९५ साली युती सरकार आल्यानंतर मनोहरपंत जोशी यांना मुख्यमंत्री बनविल्याची शिवसेनेला जबर राजकीय किंमत चुकवावी लागली होती. जोशी यांच्या रूपाने पेशवाई अवतरल्याची आवई उठल्यानंतर शिवसेना सत्तेबाहेर फेकली गेली. आज तब्बल १५ वर्षानंतरही हा पक्ष सत्तेत येण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. त्यावेळी नारायण राणे यांना शेवटच्या काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री करूनही शिवसेनेला काहीही लाभ झाला नव्हता. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करतांना या सर्व बाबींचा भाजप नेतृत्वाने सांगोपांग विचार केलेला असेलच. फडणवीस यांनी शेटजी,भटजींच्या कलाने राज्याचा गाडा हाकला तर भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी १५-२० वर्षे वाट पहावी लागेल. मात्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेल्यास कितीही विखारी प्रचार झाला तरी कुणी माईचा लाल त्यांना हटवू शकणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरूण नेतृत्वाकडे महाराष्ट्राची धुरा सोपवून भाजपने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यांच्याकडून राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत. यात ते यशस्वी झाल्यास जनता त्यांना डोक्यावर घेईल. मात्र यात अपयशी ठरल्यास हीच जनता त्यांना व पर्यायाने भाजपलाही पायदळी तुडविण्यास मागेपुढे पाहणार नाही. सध्या तरी स्वच्छ प्रतिमा असणार्‍या आपल्या राज्याच्या या तरूण नेतृत्वाने यशस्वी व्हावे याच शुभेच्छा!

(28 Oct. 2014)

000000*****000000*****000000******000000

झुकरबर्गची लवचिकता

भाषेचा अभिमान असावा….दुराभिमान नको! पटत नसेल तर जगातील सर्वात तरूण अब्जाधीश असणार्‍या अवघ्या तीस वर्षाच्या मार्क झुकरबर्गचे उदाहरण पहा. हा पठ्ठ्या आज बीजिंग शहरातल्या सिंगुहा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चक्क चिनी भाषेतून बोलला. चिनी भाषेच्या मँडरीन या सर्वमान्य बोलीतील बारकाव्यांसह त्याने अर्धा तासभर संवाद साधून सर्वांना चकीत केले. फेसबुकवर चिनमध्ये २००९पासून बंदी असून तेथे विस्तार करण्यासाठी मार्क झुकरबर्ग आसुसलेला आहे. यामुळे चिनी जनतेला त्यांच्याच भाषेत साद घालण्यासाठी त्याने स्वत: पुढाकार घेतला. चिनी ही शिकण्यासाठी अत्यंत कठीण भाषा समजली जाते. यामुळे त्याने यासाठी चार वर्षे मेहनत घेतली. चिनी शिकण्यासाठी त्याने वैयक्तीक कारणांचा हवाला दिला असला तरी त्यातील व्यावसायिक हेतू लपून राहिलेला नाही. हाच झुकरबर्ग काही दिवसांपुर्वी भारतात येऊन नरेंद्र मोदी यांना भेटला होता.

भारत आणि चीन या जगातील सर्वात दोन मोठ्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी जगातील एका मोठ्या कंपनीचा संस्थापक ज्या पध्दतीने प्रयत्न करतो ते पाहता त्याच्या व्यापारी कौशल्यासह लवचिकपणाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. यामुळे आपण अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणतांना जगाचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत याची दखल घेत त्या-त्या भाषा आत्मसात करणे आवश्यक नव्हे काय?

(शी जीनपिंग या चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर गुजरातमध्ये चिनी भाषा शिकवणार्‍या क्लासेसची चलती असल्याचे वृत्त मध्यंतरी एका वृत्तवाहिनीवर पाहिले होते ही बाब मला आता लागलीच आठवली.)

(23 Oct. 2014)

000000*****000000*****000000******000000

मुझे मालूम था तुम मर नहीं सकते !

आजच्या बरोबर तीन वर्षांपुर्वी सकाळी सात वाजता आलेल्या ‘अंकल गेले’ या मोबाईलवरील संदेशामुळे मी अक्षरश: उन्मळून पडलो होतो. खरं तर आजाराने अंथरूणाला खिळलेले अंकल कोणत्याही क्षणाला जाणार हे निश्‍चित होते. मात्र असे काय होते की या अपेक्षित निरोपातून मी कोसळलो हे जाणून घ्यायचे असल्यास शब्दही अपुर्ण पडतील.

सीरील लॉरेन्स पीटर्स अर्थात अवघ्या जगासाठी ‘अंकल’ असणारा हा अवलिया आम्हा मित्रांसाठी काय नव्हता? तो आमचा पालक होता…आमचा मित्र होता…आमचा मार्गदर्शक होता…मनोरंजनाचे अफलातून साधन होता….याहूनही सर्वात महत्वाची बाब म्हणजे एक अत्यंत अंतर्बाह्य पारदर्शक माणूस होता. कुणी आयुष्य किती मजेत जगू शकतो हे जाणून घ्यावयाचे असल्यास अंकलइतका चांगले उदाहरण कोणतेही नाही. कोणत्याही क्षणाला मनाचे संतुलन ढळू न देणारे आयुष्यात अनेक भेटले. मात्र अंकलसारखा ‘स्थितप्रज्ञ’ कुणीच आढळला नाही. आयुष्यातील भयंकर कालखंडात अंकलचा प्रसन्न सहवास हा उभारी देणारा ठरला. आठवणी अनेक आहेत…काय काय सांगणार?

वरकरणी फक्कड व विरक्त वाटणारा हा माणूस प्रत्येक क्षण किती आसुसलेपणाने जगत होता हे आम्ही सर्व मित्रांनी प्रत्यक्ष अनुभवले. अर्थात काही हळव्या प्रसंगांमधून त्यांचे विलक्षण एकाकीपणही आम्ही पाहिले. अगदी ‘वो तो है अलबेला…हजारो मे अकेला!’ या प्रकारातील वेदना कोणत्या क्षणाला उफाळून यायची तेव्हा आम्हीही कळवळायचो. मात्र पुढच्या क्षणाला हा माणूस पुन्हा ‘चलो छोडो यार’ म्हणत हसवायचा…जगाच्या दृष्टीने उनाड असणारा हा कलंदर आमच्यासाठी सर्व काही होता! स्वत:चा संसार नसणार्‍या त्यांच्या कुटुंबात त्यांच्यावर निस्सिम प्रेम करणार्‍या हजारोंचा गोतावळा होता. यात अब्जाधिशांपासून ते रस्त्यावर भणंगपणे फिरणारेही होते.

भुसावळातल्या विश्राम हॉटेलसमोर ‘लय भारी’ स्टाईलने सिगरेट फुंकत मैफिल जमवणारा अंकल काळाच्या पडद्याआड गेलाय हे मानण्यास मन तयार होत नाही. आम्ही अजूनही अधूनमधून भुसावळच्या दफनभुमीत त्यांच्याशी गप्पा मारायला जातो. खूप चकाट्या पिटल्या जातात. मोहरून येतो…हसतो…रडतो…पुन्हा परततो!!

१५ ऑक्टोबर २०११ रोजी अंकलचा दफनविधी झाल्यानंतर मी वेड्यासारखे पारायण केलेली निदा फाजली यांची ही कविता…आज पुन्हा त्यांच्यासाठी…

तुम्हारी कब्र पर

मैं फातिहा पढने नहीं आया

मुझे मालूम था

तुम मर नहीं सकते

तुम्हारी मौत की सच्ची खबर जिसन उडाई थी

वो झूठा था

वो तुम कब थे

कोइ सूखा हुआ पत्ता हवा से हिल के टूटा था

मेरी आँखें

तुम्हारे मंजरों में क़ैद हैं अब तक

मैं जो भी देखता हुँ

सोचत हुँ

वो….. वही है

जो तुम्हारी नेकनामी और बदनामी की दुनियाँ थी

कहीं कुछ भी नहीं बदला

तुम्हारे हाथ

मेरी उँगलियों में सांस लेते हैं

मैं लिखने के लिए

जब भी कलम कागज़ उठाता हुँ

तुम्हें बैठा हुआ मैं अपनी ही कुर्सी में पाता हुँ

बदन में मेरे जितना भी लहू है

वो तुम्हारी

लग्ज़िशों नाकामियों के साथ बहता है

मेरी आवाज़ में छुप कर

तुम्हारा जहन रहता है

मेरी बिमारियों में तुम

मेरी लाचारीयों में तुम

तुम्हरी कब्र पर जिसने तुम्हारा नाम लिक्खा है

वो झूठा है

तुम्हारी कब्र में मैं दफ्न हूँ

तुम मुझ में ज़िन्दा हो

कभी फुर्सत मिले तो फातिहा पढने चले आना

(15 Oct. 2014)

000000*****000000*****000000******000000

उथळ जाणीवा

मीडियात काम करतांना लाज वाटण्याचे खूप कमी प्रसंग आलेत. यापैकी आज मला प्रकर्षाने आपल्या जाणीवा किती उथळ आहेत याची भेदक जाणीव झाली. दुपारीच भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजई यांना शांततेचे नोबेल मिळाल्याचे वृत्त आले. मलालाबाबत खूप सारी माहिती असल्याने पहिला प्रश्‍न मनात उदभवला कोण हे कैलाश सत्यार्थी? नेमक्या याच शिर्षकाच्या असंख्य बातम्या आता सायबरविश्‍वात धडकल्या आहेत. तातडीने इंटरनेटचा आश्रय घेऊनही या माणसाविषयी फारशी माहिती मिळाली नाही तेव्हा गुगलपलीकडच्या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी किती तोकडी आहे हे समजले. विकीपेडियावरील माहितीपेक्षा त्यांच्या स्वत:च्या साईटवर बर्‍यापैकी माहितीचे स्त्रोत असले तरी इंटरनेटवर त्यांच्याविषयी फार काही संदर्भ नाहीत.

किती अचाट आहे हो त्यांचे कार्य…‘बचपन बचाओ आंदोलन’! बालकांना अत्यंत सुरक्षित आणि त्यांना नैसर्गिक व मुक्त वातावरणात वाढू देण्याची त्यांची सातत्याने धडपड सुरू आहे. यातून त्यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्लेदेखील झाले असले तरी ते डगमगले नाहीत. बालमजुरी, बालकांचे शोषण, बालकांचे अपहरण व त्यातून होणारी खरेदी-विक्री आदींवर फक्त आवाजच न उठवत सक्रीय काम करण्याचा त्यांचा प्रयत्न स्वीडनमधील नोबेल समितीच्या समोर ठळकपणे येतो पण भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांची आजवर जराही दखल घेतली जाऊ नये याला काय म्हणणार? सेलब्रिटींचे वाह्यात चाळे आणि राजकारण्यांच्या थिल्लर शेरेबाजीवर चर्वण करणारा आपला समाज आणि त्यालाच प्रमाण मानून व्यवसायाच्या अधीन झालेला आमचा मीडिया हे आजचे मन विषण्ण करणारे चित्र आहे. कैलाशजींच्या वेबसाईटवरील माहिती पाहिली असता त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असले तरी ते बहुतांश विदेशातील आहेत. अगदी उनाडटप्पू अभिनेत्यांना पद्म पुरस्कारांची खैरात वाटली जात असतांना कैलाश सत्यार्थी यांच्यासारखा माणूस त्यापासून वंचित रहातो ही बाब आपल्या यंत्रणेतील दोष दर्शविणारी आहे. आता कैलाशजींना ‘नोबेल’ मिळाल्याने त्यांना थेट ‘भारतरत्न’ मिळेल यात शंकाच नाही. मात्र विदेशी पुरस्काराची मोहर उमटेपर्यंत आपण, आपला समाज, प्रसारमाध्यमे करतात तरी काय? नेमके हेच प्रश्‍न पडलेत मला….उत्तर मिळाल्यास अवश्य सांगा !!

(10 Oct. 2014)

000000*****000000*****000000******000000

पॉलिटीकल मार्केटींग

पॉलिटीकल मार्केटींगमध्ये स्वप्न आणि भिती हे हुकमी पत्ते मानले जातात. सहजगत्या हेतू साध्य करण्यासाठी स्वप्नांचा आधार घेतला जातो. तर जिथे स्वप्नही फोल ठरतात तिथे भिती कामाला येते. स्वप्नाळू राजकारणात गरिबी हटाव, संपूर्ण क्रांती, २७ लाख बेरोजगारांना नोकर्‍या, ४० लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरे, मोफत वीज, इंडिया शायनिंग, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, ते थेट ‘अच्छे दिन’ आदींचा समावेश होतो.

याहूनही भन्नाट प्रकार हा भितीचा असतो. कधी धर्म धोक्यात आणला जातो, कधी भाषिक/सांस्कृतीक अस्मिता तर कधी महापुरूषांचा सन्मान, कधी जातीय संघर्ष वरचढ ठरू पाहतो तर कधी प्रांतिक दुराभिमान मस्तकात घुसडण्यात येतो. एखाद्या निवडणुकीत कोणता घटक घ्यायचा हे चतुर राजकारणी आधीच चार भिंतीआड ठरवून नंतर जाहीररित्या वाक्बाण सोडतात. आपण बापडे वाहवत जातो. आता सांगा मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत स्वप्न वरचढ ठरणार की भिती?
जय हो सर्वात पुढे…पुढारी माझे!!

(8 Oct. 2014)

000000*****000000*****000000******000000

Leave a Comment