मी कोण?

नमस्कार मंडळी !

स्वत:चा परिचय कसा करून द्यावा हेच समजत नाही! अर्थात ‘मी कोण?’ या मानवाच्या आदीम प्रश्नाने मीदेखील अस्वस्थ झालोय. याचे खरे उत्तर आजवर न मिळाल्याने नाव-गाव, व्यवसाय आणि व्यक्तीमत्व या ढोबळ आणि जुजबी माहितीच्या आधारे आपल्यासमोर एक ‘पात्र’ उभे करण्याचा प्रयत्न करतोय.

माझे नाव शेखर राम पाटील. मी भुसावळकर अर्थातच अस्सल खान्देशी. रेल्वे जंक्शनमुळे बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक चेहरा असणारे माझे शहर तापीमाईच्या अमृताने पावन झालेले आहे. येथील भाषेत अबे…काबे…हा रांगडेपणा असला तरी याच बोलीतील बहिणाबाईचे काव्य मराठीला ललामभूत ठरले आहे. खुले वातावरण आणि उदारमतवादी संस्कार हे माझ्या घरातही होतेच. यातच समजायला लागले तेव्हापासून शब्दांच्या प्रेमात पडलो. जे जे छापील असते ते फक्त वाचनासाठीच! हे मनावर तेव्हाच बिंबले. सपाटून वाचन करत असतानाच जगरहाटीप्रमाणे शिक्षण घ्यावेच लागले. येथूनच इतरांचे जग आणि आपले विश्व यात मोठी दरी असल्याची भेदक जाणीव झाली. यातच मला शिकायचे होते साहित्य…शिकावे लागले विज्ञान. मोठ्या नाखुशीने बी.एस्सी. केल्यावर काही वर्षे एम.आर. म्हणून काम केले.

हे सर्व होत असताना वाचन, मनन हे सुरूच होते. यालाच आता लिखाणाचीही जोड मिळाली. स्थानिक वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकांमधून प्रसिध्द झालेले लिखाण आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता या क्षेत्रात कारकीर्द करण्याचे काही मित्रांनी सुचविले. अर्थात, या संदर्भात फार काही प्रयत्न न करता जळगावच्या दैनिक देशदूत मध्ये उपसंपादक म्हणून रूजू झालो. येथेच मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहिले. ‘देशदूत’मध्ये साडेसात वर्षे काम केल्यावर  जळगाव येथील ‘सायंदैनिक साईमत’ येथे सुमारे पावणेसहा वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम केल्यानंतर आता जळगाव येथीलच ‘दैनिक जनशक्ति’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे.

वर्तमानपत्र म्हणजे ‘क्षणभराचे साहित्य आणि अनंतकाळची रद्दी’ अशी बर्‍याचदा संभावना करण्यात येते. यात सत्यांशही आहे. मात्र, आपले सृजन जगासमोर आणण्यासाठी याच्याइतके उत्तम माध्यम दुसरे नाही. या क्षेत्रातील बारकावे समजून घेत माझी वाटचाल सुरू आहे. ‘येणारा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी काही तरी नवीन आणणारच !’ यावर माझी ठाम श्रध्दा आहे. माझ्या लिखाणातही याचे प्रतिबिंब उमटले आहे. चालू घडामोडी, साहित्य, राजकारण, क्रीडा, व विज्ञान/तंत्रज्ञान आदींवर माझे लेख सातत्याने प्रकाशित होत आहेत. याच विषयांवर मी विविध लेखमाला लिहल्या आहेत.माहिती तंत्रज्ञान हादेखील माझा आवडीचा विषय. यामुळे ‘जळगाव लाईव्ह’ हे संकेतस्थळ मी स्वत: विकसित केले आहे. याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट वृत्तविषयक संकेतस्थळाचा पुरस्कारही मिळाला आहे. माझा हा ब्लॉगही मी स्वत:च विकसित केला आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक घडामोडींची माहिती देण्यासाठी ‘टेकवार्ता’ तर मंत्रालयीन बातम्या आणि घडामोडींसाठी ‘मंत्रालय लाईव्ह’ या पोर्टल्सलाही मी विकसित केले आहे. मला वेब डेव्हलपिंगमध्ये प्रचंड आवड आणि बर्‍यापैकी गती आहे. अर्थात यात व्यावसायिक पातळीवर काम करण्याचा विचार अद्याप तरी केलेला नाही.

जगात चांगले आहे ते वाचावे, उत्तम संगीत ऐकावे आणि अभिजात चित्रपट पहावेत याचा मला छंद आहे. अर्थात मला सर्वात जास्त वाचनच भावते. वाचन हे माझ्यासाठी जणू श्वासच आहे. अभिजात ते टाईमपास हे सर्व प्रकार मला आवडतात. ओशो रजनीश यांचा माझ्यावर अमीट प्रभाव असून त्यांचे बहुतांश सहित्य मी वाचले आहे. एवढेच नव्हे तर मी नियमितपणे त्यांच्या विविध ध्यानविधी करतो. याशिवाय क्रिकेट, फुटबॉल हे आवडते खेळ. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवनवीन माणसांशी परिचय करणे हा व्यवसायही आहे अन् आवडही!

ओशो म्हणतात “Just follow your own instincts existence will shower on you” आपल्या आयुष्याचे ध्येय सृजन हेच असल्याचे माझ्या कधीच लक्षात आलयं. याच्याच संगतीने आयुष्य सुगंधीत झालं आहे. माझे जीवन अगदीच साधे-सरळ अथवा समृध्द नाही. आजवरच्या वाटचालीत अनंत खाचखळगे आलेत…येताहेत. मात्र याविषयी तक्रार नाही अन् जीवनात अचाट आकांक्षाही नाहीत. आपल्याला जीवनात अंबानींइतके धनाढ्य आणि केतकर-कुबेर-वागळे यांच्याइतके गुणाढ्यही व्हायचे नसल्याची जाणीव मनात आहेच. मस्तपैकी रमतगमत जगतोय. भविष्यात पाहु या काय होते ते! कुठे तरी वाचलेला एक शेर मला खूप आवडतो. तो असा-

तू जिंदा है तो जिंदगी की जीत मे यकीन कर
अगर कही है स्वर्ग तो उतार ला जमीन पर॥

जिवनाच्या जिंकण्यावर माझा पूर्णत: विश्‍वास आहे. हे जिंकणे भलेही रूढ अर्थाने नसेल मात्र रसिकतेने आयुष्य व्यतीत करणे हे कोणत्याही भौतिक समृध्दीपेक्षा थोडीच कमी आहे. असो. याशिवाय अजून काय सांगणार?

शेवटी…आम्हा पत्रकारांना अभिव्यक्तीसाठी हुकमी साधन असले तरी ब्लॉगच्या रूपाने अगदी कुणालाही आपले मत मांडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रसारमाध्यमांची मिरासदारी मोडणारे ब्लॉगविश्व हे ‘ओपन स्काय’ नव्हे तर काय?

16 Comments

 • शेखर जी , तुमच्या Blog वरील मी कोण ? वाचलं . तुमच जगण्याच तत्वज्ञान आवडलं . थोडयाफार फरकाने मलाही असंच जगायला आवडत . लौकिक मोठ होण्यापेक्षा आनंदाने , रमत -गमत जगणं .…

 • तुमची चारही संकेतस्थळ पाहिल्यावर तुम्ही ग्रेट आहात असच म्हणेल मी.
  तूम्ही लिहिलेले लेख वाचनीय आहे.
  मंत्रालय लाइव्ह तर फारच उपयुक्त संकेत स्थळ आहे.
  असच लिहीत रहावे.

 • शेखरजी,
  क्या बात.मी कोण?
  कुठेही गल्लत न होवू देता समर्पक शब्दात आपण मांडलेला स्व:ताचा परिचय आम्हा नवोदितांना प्रेरणा आहे.

 • शेखर पाटील साहेब, नमस्कार.
  मी “कुबेर” या फेसबुक वरील समुहात सभासद आहे. अॅडमीन व संस्थापक श्री संतोष लहामगे यांनी तुमच्याबद्दल पोस्ट टाकली आहे. त्यावरून जळगांव लाईव्ह आणी टेक या वेबसाईटवर फिरून आलो. मी मुळचा चोपडा येथील राहणारा आता पुण्यात राहतो. तुम्ही भुसावळकर खान्देशी माणसांच आकर्षण मला आहे.मला बऱ्याच दिवसानंतर माझ्या गांवाकडच्या बातम्या समजल्या.चोपडा तालुक्यातील धानोरा कापसाबाबतची माहीती, तसेच अगदी सातपुड्याच्या कुशीतील दुर्गम पहाडातील गांवांच्या बातम्या समजल्या.फार छान वाटले.तुमचा परीचय वाचला. खूप धनाढ्य आणी गुणाढ्य व्हायच नाही. मात्र रमत गमत रसीकतेने जीवन जगायच हे फार आवडलं. तुमच्या विचारांना सलाम! अपना अहीराणीमा राम राम भौ

 • नमस्स्तकार, मी पन खान्देशना राहणार.तुमच्या चारही वेबसाईट फेरफटका मारला. आवडले. चोपड्याचा रहीवाशी. आता पुण्याला राहतो. खूप छान वाटले. धनाढ्य आणी गुणाढ्य व्हायच नाही. रमत गमत रसीकतेने जीवन जगायचं हे फार आवडले.

Leave a Comment