Featured slider साहित्य

महाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन

Written by shekhar patil

महाकवि अल्लामा इकबाल (डॉ. मोहंमद इकबाल) यांची आज पुण्यतिथी. आजच्या बरोबर ८० वर्षापूर्वी हा महान शायर परलोकीच्या प्रवासाला निघून गेला. मात्र आठ दशकानंतरही इकबालच्या शायरीचे गारूड कायम आहे. उर्दूत मीर आणि गालिबनंतर इकबाल यांचे नाव आदराने घेतले जाते. यामुळे त्यांना रसिकांनी ‘अल्लामा’ अर्थात विद्वान हा खिताबदेखील प्रदान केला. इकबाल यांची शायरी ही त्यांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच अनेक विरोधाभासांनी भरलेली आहे. यामध्ये अनेक यु-टर्न्स आहेत. वैचारिक स्थित्यंतरेदेखील आहेत. तथापि, सर्वसामान्यांपासून ते अभिजन वर्गापर्यतच्या रसिकांना रिझवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत असल्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे यात उच्च तत्वचिंतनाचाही समावेश असल्यामुळे त्यांचे साहित्य आजही ताजेतवाने वाटते.

डॉ. मोहमद इकबाल यांच्या साहित्य सृजनाची बिजे ही त्यांच्या जडणघडणीत असल्याचे आपल्याला दिसून येतात. खरं तर उत्तर भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ‘गंगा-जमुनी तहजीब’चा वापर करतात. तर पंजाबपासून वर असणार्‍या भुभागात सूफी हा हिंदू-मुस्लीमांना जोडणारा एक धागा मानला जातो. इकबाल यांच्यावरही सूफी विचारांचा पगडा होता. त्यांचे पूर्वज हे सप्रू या आडनावाचे काश्मिरी ब्राह्मण होते. दोन शतकांपूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार करून सियालकोट येथे स्थलांतर केले होते. इकबाल यांचा जन्म याच शहरात झाला. त्यांना आपल्या पूर्वजांना अभिमान होता. एवढेच नव्हे तर इस्लामपूर्व संस्कृतीबाबतही त्यांना खूप आत्मीयता असून त्यांच्या काव्यातून आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते. प्रारंभीचे शिक्षण मदरशात झाल्यामुळे त्यांना उर्दूसह फारसी, अरबी आदी भाषांचे ज्ञान झाले. तर यानंतर इंग्रजीतून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी युरोपात उच्च शिक्षण घेतले. अर्थात इस्लामी, हिंदू आणि ख्रिस्ती या तिन्ही विचारप्रणालींचे सखोल अध्ययन केल्यानंतर त्यांचा दृष्टीकोन हा विशाल बनला. इस्लामच्या पलीकडील जगातही बरेच काही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नेमके हेच प्रतिबिंब त्यांच्या सृजनातून उमटले.

इकबाल यांनी लिखाण्यास प्रारंभ केला तेव्हाचा कालखंडदेखील धुमसता होता. तथापि, हिंदू व मुस्लीम समुदायामध्ये तणावाचे वातावरण असले तरी त्यात विखार नव्हता. यामुळे त्यांच्या सृजनातून अतिशय व्यापकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात आले. प्रारंभीच्या काही किरकोळ कवितांमधून त्यांच्यातील चमक रसिकांना आढळून आली. समीक्षकांनीही याची दखल घेतली. तथापि, १६ ऑगस्ट १९०४ रोजी ‘इत्तेहाद’ या लाहोरमधून निघणार्‍या साप्ताहिकात ‘तराना-ए-हिंद’ या शीर्षकाखाली त्यांची कविता प्रसिध्द झाल्यावर मोहंमद इकबाल हे नाव रातोरात प्रसिध्दीच्या शिखरावर आरूढ झाले. एक शतकानंतरदेखील कोट्यवधी लोकांना तोंडपाठ असणारे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हेच ते गीत ! यातील शब्द-न-शब्द हा पारतंत्र्याच्या जोखडात असणार्‍या भारतीयांना नवीन उभारी देणारा ठरला. क्रांतीचे स्फुल्लींग चेतवणारे हे अमरगान भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अघोषीत थीम साँग बनले. एखाद्या कवितेने संपूर्ण भारतीय उपखंडाला भारून टाकण्याचे काम इकबाल यांनी केले. यानंतर केंब्रीज विद्यापीठातून बॅरीस्टर झाल्यानंतर त्यांनी जर्मनीतून पीएच.डी. पूर्ण केली. तेथून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याच आमूलाग्र बदल झाला. एकीकडे गोएटे, नित्शे आदींसारख्या जर्मन तत्वज्ञांनी त्यांची मनोभूमिका बदलून टाकली. तरी दुसरीकडे इस्लामी पुनर्जागरणाच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. यामुळे १९०४ साली ‘तराना-ए-हिंद’ लिहणार्‍या याच कविने १९१० साली ‘तराना-ए-मिल्ली’च्या माध्यमातून इस्लामी गौरवगान लिहले. काही वर्षांपूर्वी हिंद राष्ट्राच्या मजबूत ऐक्याला वर्णन करणारे इकबाल जेव्हा ‘चीन-ओ-अरब हमारा…हिंदूस्ता हमारा । मुस्लीम है हम…वतन है सारा जहाँ हमारा’ असे लिहून मोकळे झाले तेव्हा त्यांच्यातील वैचारिक बदल स्पष्टपणे अधोरेखीत झाला. आधी हिंदी राष्ट्रवादाचे प्रखर समर्थन करणार्‍या इकबाल यांनी इस्लाममध्ये राष्ट्रवादाऐवजी व्यापक उम्माह/उम्मत म्हणजेच मुस्लीम समुदायाला सर्वतोपरी स्थान असल्याचे ठासून सांगितले. आज त्यांची ही दोन्ही गिते आजही लोकप्रिय आहेत. हीच त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची झेप होय.

‘तराना-ए-मिल्ली’नंतरदेखील डॉ. मोहंमद इकबाल यांच्या काव्यात सर्वसमावेशकतेचा प्रवाह आढळून आला. मर्यादा पुरूषोत्तम राम यांच्यासाठी त्यांनी खास स्तवन लिहले. राम हे ‘इमाम-ए-हिंद’ असून त्यांच्यामुळेच जगात आपले नावे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वासमोर जगातील तमाम तत्वचिंतन फिके पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

इस देस में हुए हैं हज़ारों मलक सरिश्त
मशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिन्द

है राम के वजूद पे हिन्दोस्तां को नाज़
अहल-ए-नजर समझते हैं उसको इमाम-ए-हिंद

यानंतरदेखील इकबाल यांच्या काव्यातून अनेक परधर्मींय महापुरूषांचे गौरवगान करण्यात आले. कृष्ण, बुध्द, कबीर, नानक, येशू, भर्तुहरी, विश्‍वामित्र, आम्रपाली, झरत्रुष्ट, गोएटे, टॉलस्टॉय, दांते आदींसारख्या महापुरूषांविषयी त्यांनी कमालीच्या आपुलकीने लिहले आहे. एकीकडे इस्लामी चिंतनाकडे झुकलेला हा महाकवि याच वेळेस अत्यंत व्यापक भूमिका घेत असल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. याच्यासोबत जलालुद्दीन रूमी, हाफीज, चिश्ती आदींसारख्या सूफी संतांनीही त्यांना भारून टाकले होते. जगभरातील विविध महाकाव्ये, तत्वज्ञ, मिथके आदींचा सार त्यांनी ‘जावेदनामा’ या ग्रंथातून मांडला. आज या ग्रंथाला अभिजात म्हणून मान्यता मिळाली आहे. विख्यात जर्मन लेखक हरमन हेस यांच्या मते तर ‘जावेदनामा’मध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, बौध्द आणि ख्रिस्ती धर्मातील सार हा विलक्षण पध्दतीने गुंफला आहे. हे सारे होत असतांना डॉ. इकबाल हे वैयक्तीक जीवनात फारसे समाधानी नव्हते. वयाच्या १८व्या वर्षी घरच्यांनी निश्‍चित केलेल्या विवाहामुळे ते असमाधानी होते. युरोपच्या वास्तव्यात अतिया फैजी या तरूणीसोबत झालेले प्रेम हे ‘निकाह’पर्यंत पोहचलेच नाही. या कालखंडात त्यांनी सृजन व वकिलीच्या व्यवसायासोबत स्वत:ला सार्वजनीक जीवनात व्यस्त करून घेतले. विदेशात असतांनाच ते ‘ऑल इंडिया मुस्लीम लीग’च्या पदाधिकार्‍यांच्या संपर्कात आले होते. यामुळे ते या संघटनेत सक्रीय झाले. मात्र येथेही त्यांची द्विधा मनस्थिती झाली. मुस्लीम लीगमध्ये या संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असणार्‍या सर मोहंमद शफी यांचा ग्रुप ब्रिटीश धार्जीणा होता. यामुळे ते नाराज होते. १९२०च्या दशकाच्या धुमसत्या वातावरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू नेतृत्वापासून मुस्लीमांनी अंतर ठेवण्यास प्रारंभ केला होता. खुद्द इकबालदेखील काँग्रेसचे टीकाकार होते. यातच १९२२ साली ब्रिटीश सरकारने डॉ. मोहंमद इकबाल यांना ‘नाईटहूड’ देण्याची घोषणा केली. खरं, तर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असल्यामुळे इकबाल हे हा सन्मान स्वीकारणार नसल्याची अनेकांची धारणा होती. तथापि, त्यांनी याचा स्वीकार करून अनेकांना धक्का दिला. यासोबत ते ‘सर’ मोहंमद इकबाल बनले. काही वर्षातच मुस्लीम लीगमधील अंतर्गत कलहामुळे ते त्रस्त झाले. यातच त्यांनी तेव्हा ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणारे मोहंमदअली जीना यांना भारतात परतून मुस्लीम लीगची धुरा सांभाळण्याची विनंती केली. यानंतर काय झाले हा इतिहास आपल्यासमोर आहेच. १९३० साली मुस्लीम लीगच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या भाषणातून इकबाल यांनीच पहिल्यांदा मुस्लीमांसाठी स्वतंत्र स्वायत्त प्रांत हवा अशी मागणी केली. यातूनच फाळणीचे बिजारोपण झाले. १९३०च्या दशकात त्यांनी राजकारणाला वाहून घेतले तरी सृजनाकडे दुर्लक्ष केले नाही. दरम्यान, २१ एप्रिल १९३८ रोजी या महान शायराचे निधन झाले.

डॉ. अल्लामा इकबाल यांनी आपल्या पूर्वायुष्यातील बहुतांश सृजन हे फारसी भाषेतून केले. या भाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते. नंतर मात्र त्यांनी उर्दू आणि इंग्रजीतूनही विपुल लिखाण केले. त्यांच्या काव्यात पारंपरीक उर्दू शायरीतील प्रेम, विरह आदी भावनादेखील असल्या तरी त्या तुलनेत कमी प्रमाणात आहेत. त्यांची कविता ही सातत्याने तत्वचिंतन, जीवनाचा अर्थ, धार्मिकता, गतकालीन वैभव, इस्लामी जीवनमूल्ये आदींचा शोध घेत राहिली. आणि हो…ब्रिटीश राज विरोधातील त्यांचा क्रोध हा शब्दांमधून अभिव्यक्त झाला. सर्वसामान्यांविषयीची आत्यंतिक कणव त्यांच्या काव्यातून सातत्याने स्त्रवत राहिली. उर्दूचा विचार केला असता त्यांनी शेर, नज्म, गजल आणि रूबाई या सर्व प्रकारांमध्ये आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. त्यांच्या काव्यातील अनेक वाक्ये भारतीय उपखंडातील जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. याची चुणूक खालील अशआरमधून आपल्याला मिळेलच.

* ख़ुदी को कर बुलंद इतना
कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे
बता तेरी रज़ा क्या है

*हजारों साल नर्गिस
अपनी बेनूरी पे रोती है
बड़ी मुश्किल से होता है
चमन में दीदावर (पारखी) पैदा

*लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी
जिंदगी शमा की सूरत हो खुदाया मेरी
दूर दुनिया का मेरे दम से अंधेरा हो जाए
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाए

*अपने मन में डूब कर
पा जा सुराग़-ए-ज़ि़ंदगी
तू अगर मेरा नहीं बनता
न बन अपना तो बन

*ढूंढता फिरता हूं मैं मइक़बालफ अपने आप को

आप ही गोया मुसाफ़िर आप ही मंज़िल हूं मैं ।

*खुदा के बन्दे तो हैं हजारों
बनो में फिरते हैं मारे-मारे
मैं उसका बन्दा बनूंगा
जिसको खुदा के बन्दों से प्यार होगा

* तेरी दुआ से कज़ा (भाग्य) तो बदल नहीं सकती,
मगर है इस से यह मुमकिन कि तू बदल जाये,
तेरी दुआ है कि हो तेरी आरज़ू पूरी,
मेरी दुआ है तेरी आरज़ू बदल जाये।

…आणि हो, गजलचा विचार केला असता, विलक्षण उर्जावान अशा ‘सितारो से आगे जहाँ और भी है ‘ या रचनेला कोण विसरणार ?

सितारों के आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़१ के इम्तिहाँ२ और भी हैं

तही ज़िन्दगी से नहीं ये फ़ज़ायें
यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं

क़नाफअत३न कर आलम-ए-रंग-ओ-बू४पर
चमन और भी, आशियाँ५और भी हैं

अगर खो गया एक नशेमन तो क्या ग़म
मक़ामात-ए-आह-ओ-़फुग़ाँ६और भी हैं

तू शाहीं७है परवाज़८है काम तेरा
तेरे सामने आसमाँ और भी हैं

इसी रोज़-ओ-शब ९में उलझ कर न रह जा
के तेरे ज़मीन-ओ-मकाँ १०और भी हैं

गए दिन के तन्हा था मैं अंजुमन ११में
यहाँ अब मेरे राज़दाँ १२और भी हैं

शब्दार्थ-१) प्रेम २) परीक्षा ३) संतोष ४) संसार ५) घरटे ६) दु:ख व्यक्त करण्याची ठिकाणे ७) गरुड़ ८) उड्डाण करणे ९) दैनंदिन नित्यक्रम १०) पृथ्वी आणि घर ११) मैफील १२) रहस्य जाणणारे

आज अल्लामा इकबाल यांच्या जीवीतकाळापेक्षाही हिंदू व मुस्लीम समुदायांमध्ये वितुष्ट आहे. ‘हा आपला तर तो त्यांचा’ असे जवळपास प्रत्येक क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. असे असतांनाही या धुम्मसच्या वातावरणात अनेक महान व्यक्तीमत्वे आजही दोन्ही धर्म आणि संस्कृतींमध्ये सेतूचे काम करत आहेत. इकबाल यांची तुलना येथे आपण रवींद्रनाथ टागोर यांच्याशी करू शकतो. कितीही कटुतेचे क्षण आले तरी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये रवींद्रनाथ वंदनीय आहेत. याच पध्दतीने एकमेकांचे हाडवैरी असणार्‍या भारत आणि पाकिस्तानमध्ये महाकवि इकबाल यांचे चाहते सम प्रमाणात आहेत. खरं तर, भारतीय उपखंडाच्या पलीकडे इराणसह मध्य आशिया आणि युरोपातही त्यांचा सृजनगंध दरवळला आहे. याचमुळे आज इकबाल यांना जाऊन आठ दशके झालीत तरी त्यांचे सृजन आजही समकालीन वाटते. हीच त्यांची महत्ता.

About the author

shekhar patil

1 Comment

 • *शेखर पाटील :*
  * *एक नवोन्मेषी सृजनशील लेखक**
  घोड्याच्या दोन्ही डोळ्यांवर आणि तेल घाणीवर जुंपलेल्या बैलाच्या घाणीकडील एका डोळ्यावर पट्टी बांधलेली असते त्यामुळे त्यांना मालक दाखवतो तेच दृश्य दिसते व तेच खरे वाटते. विहिरीतील बेडकाला सुद्धा विश्वाची व्याप्ती त्याच्या नजरेत सामावणार्या दृश्याएवढी असते. आज मानवाच्या विचारांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी गोबेल नीतीचा अबलंब करणार्‍या सर्वधर्मीय ठेकेदारांनी अशाच पट्ट्या लावून दिल्या आहेत. त्यांच्या जाळ्यात सामान्य माणूस तर सोडाच भलेमोठे विचारवंत ही अडकून जातात ही वस्तुस्थिती असताना शेखर पाटलांसारखा आंतरभाषीय, आंतरविद्याशाखीय किंबहुना बहुविद्याशाखीय लेखकाला अनेक विषय आणि पैलू उलगडतांना पाहून हायसे वाटते. भारतीय संविधानाचे अधिष्ठान सर्वसमावेशक विचारसरणी वर आधारित आहे. वैचारिक दृष्टीने परिपक्व विचारवंतांनी अभ्यासू वृत्तीने अहोरात्र झटून राष्ट्रीय एकात्मतेचा पाया मजबूत केला आहे. तत्कालीन परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यात भूमिकेतील बदल समजून घेतल्यास पूर्वग्रह कमी होण्यास मदत होईल. असो.
  महाकवी इकबाल संबंधित त्यांच्या लेखाचा आशयघन शिर्षक अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन निश्चितच प्रशंसनीय आहे. इतक्या कमी शब्दात एका बहुआयामी व्यक्तीचा जीवनपट उलगडणे वाटते तितके सोपे नाही. त्यांनी आपल्या लेखात अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी रवीन्द्रनाथ टागोर यांच्याशी केलेली तुलना सर्वार्थाने समर्थनीय आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी, उच्चशिक्षणाउच्चशिक्षणासाठी केलेली विदेशवारी, त्यामुळे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास, इस्लाम धर्माची परखड चिकित्सा, इत्यादी बाबींचा परामर्श घेऊन त्यांनी डाॅ. इकबाल यांच्या विचारांची जडणघडण कशी झाली आणि
  वैश्विक स्तरावर त्याची दखल कशी घेण्यात आली याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांनी मांडलेल्या काही बाबींविषयी मी अनभिज्ञ होतो. हा लेख वाचून ज्ञानात भर पडली. अपार मेहनत घेऊन ढासळत्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत गंगा जमना संस्कृतिचा वारसा जपणाऱ्या भारतीय संस्कृतीचा नैसर्गिक व पारंपरिक धागा मजबूत करण्यासाठी शेखर पाटील जे प्रयत्न करीत आहेत ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या सारख्या विचारवंतांनी एकात्मिक चळवळ उभारल्यास गढूळ वातावरण नितळ होण्यास मदत होईल असे वाटते.

  -डाॅ. काझी रफीक “राही”
  22.4.2018

Leave a Comment