कोणत्याही खेळाच्या निखळ आनंदाला परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा आयाम मिळाल्यास तो फक्त खेळ राहत नाही तर जागृतीचे अत्यंत परिणामकारक माध्यम कसे बनू शकते ते दाखवून दिलेय ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी!
लेखासाठी एखादा विषय डोक्यात शिरल्यानंतर काही दिवसांतच याला मुर्त स्वरूप प्राप्त होत असल्याचा माझा अनुभव आहे. या लेखाबाबत मात्र प्रथमच खूप विलंब होतोय. जवळपास दीड वर्षांपुर्वी मी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’च्या धमाल कथेविषयी माझ्या सहकार्यांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत लेख लिहण्याचा आग्रह केला होता. अनेकदा संकल्प करूनही तो सिध्दीस गेला नव्हता. आता क्रिकेटचा महाकुंभ काही दिवसांत सुरू होत असल्याचे औचित्य साधून केलेला हा लेखप्रपंच.
ही कथा आहे एक क्रिकेटवेडी महिला आणि आदिवासी समुदायातील तरूणांची. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातल्या अलीया बायूर यांना शालेय वयापासूनच क्रिकेटचे वेड लागलं. अर्थात महिला असल्याने खेळण्याला मर्यादा आल्या तरी त्यांनी ‘आयसीसी’ची पंचासाठी असणारी परीक्षा उत्तीर्ण केली. याचसोबत २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकात अधिकृत स्कोअरर म्हणून कामही पाहिले. अर्थात क्रिकेट तिच्या नसानसात भिनले. मात्र अध्ययनातही कुशाग्र असल्याने केनियातल्या वानरांवर अध्ययन करण्याचे तिने ठरविले. यानुसार केनियातील लायकापिया या घनदाट अरण्य असणार्या भागात ती २००७च्या सुमारास आली. येथे वानरांच्या वर्तनावर संशोधन करतांना तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. एकदा तर सिंहीणीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तिला कसरत करावी लागली. या भागात तिचा दिनक्रम हा अत्यंत कंटाळवाणा असाच होता. यामुळे विरंगुळा मिळावा म्हणून तिला एक भन्नाट कल्पना सुचली. लायकापिया भागातील पोलेई या गावातील प्राथमिक शाळेत जाऊन तिने स्थानिक सरपंच आणि मास्तरांना हाताशी धरून मुलांना क्रिकेटचे धडे देण्याचे देण्याचे ठरविले. केनियात क्रिकेट हे बर्यापैकी लोकप्रिय असले तरी लायकापिया भागातील मुळ रहिवासी असणार्या मसाई या आदिवासी जमातीला याबाबत माहितच नव्हते. त्या भागातील मुले फुटबॉल वा व्हॉलिबॉल खेळत असले तरी क्रिकेट हा त्यांच्यासाठी नवीनच खेळ होता. अर्थात दोन-चार दिवसांत मुलांना या खेळाची गोडी तर लागलीच पण तरूण आणि प्रौढही याकडे आकर्षित झाले. विशेषत: तरूणाईला या नवीन खेळाने भारून टाकले. सुरवातीच्या काळात बायूर यांनी शहरातून टेनिस बॉल आणि अन्य साधे किट आणले होते. यानंतर मात्र तिने उत्तम दर्जाचे साहित्य आणले आणी यातून आकारास आला एक संघ. यालाच नाव मिळाले मसाई क्रिकेट वॉरियर्स!
जगातील अनेक देशांमध्ये व्यावसायिक आणि हौशी पातळीवर क्रिकेट खेळले जाते. अनेक क्लब आणि संघ आपापली ओळख जपतात. क्रिकेट खेळणार्या प्रत्येक देशात स्थानिक देशांतर्गत स्पर्धा होतात. यात भारतातील ‘आयपीएल’मध्ये तर क्रिकेटचे ग्लॅमरस रूप आपल्याला दिसून येते. या सर्वांपेक्षा ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’चे रूपडे हे क्रिकेटच्या वैश्विक रंगात खुलून दिसणारे आहे. साधारणपणे आता क्रिकेटच्या गल्लीबोळातील स्पर्धांपासून ते विश्वचषकात रंगीबेरंगी पोशाख वापरले जातात. मात्र याचा एक अलिखीत नियम आहे. एक तर रंग कोणताही असो खेळाडू सैलसर स्पोर्टस शर्ट आणि ट्रॅकसुट परिधान करतात. याशिवाय मैदानावर हेल्मेट वा कॅप घालण्यात येतात. मात्र ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी याला फाटा देत आपल्या पारंपरिक पोशाखातच क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. आता आपण धोतर वा लुंगी घालून क्रिकेट खेळण्याची कल्पनाही करू शकत नाही. याचप्रमाणे मसाईंच्या पारंपरिक परिधानात खेळणेही अवघड असले तरी स्थानिक तरूणांना हेच भावले. अर्थात ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ला यामुळे व्यापक प्रसिध्दी मिळाली.
मसाई ही निसर्गाच्या सानिध्यात राहणारी जगातील सर्वात आदिम समजली जाणारी जमात आहे. आज एकविसाव्या शतकातही दररोज त्यांना हिंस्त्र प्राण्यांशी संघर्ष करावा लागतो. अत्यंत कष्टदायक अशा त्यांच्या दिनक्रमाचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनशैलीवरही पडले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे जीवनाची चार टप्पे मानले गेले आहेत. याचप्रमाणे मसाईंच्या जीवनात बालपण, योध्दावस्था आणि प्रौढावस्था असे तीन टप्पे मानतात. माणसाच्या जीवनात १५ वर्षांपर्यंत बालपण, १५ ते ३० वर्षे योध्दावस्था तर यापुढे प्रौढावस्था असे साधारणपणे विभाजन आहे. मुलगा पंधरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला ‘योध्दा’ म्हणून तयार करण्यात येते. यासाठी समारंभपुर्वक विधी करण्यात येतो. या माध्यमातून संबंधीत मुलगा हा आपले कुटुंब आणि जमातीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. शेकडो वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा आजही कायम आहे. अलीया बायूर यांनी तयार केलेल्या संघात हेच योध्दे सहभागी झाले. मसाई योध्दांचा पोशाख हा ‘शुकास’ म्हणून ओळखला जातो. हत्ती वगळता (साधारणपणे गाय वा अन्य प्राणी) प्राण्याच्या कातडीपासून तयार केलेल्या कापडाने ते आपल्या शरीराचा कमरेखालील आणि वरील भाग झाकतात. अलीकडच्या काळात यात सुताचे प्रमाण वाढले आहे. हे वस्त्र गडद लाल रंगाचे असते. हा त्यांच्या पोशाखाचा प्रमुख भाग असतो. याशिवाय, अनेक मणी, त्यापासून तयार केलेल्या माळा, ब्रेसलेट, इयररिंग्ज आदींमुळे मसाई योध्द्याच्या अंगावर अक्षरश: रंगाची उधळण केल्यागत वाटते. याशिवाय त्यांची पादत्राणेदेखील टायरापासून तयार केलेली असतात. अलीया बायूर यांनी तयार केलेल्या संघातील खेळाडूंनी आपल्या पारंपरिक वेशातच क्रिकेटचा सराव करण्यास प्रारंभ केला. काही दिवसांतच याला पाहण्यासाठी गर्दी उसळू लागली. बायूर यांनी कशी तरी पैशांची जुळवाजुळव करत अन्य संघासोबत प्रदर्शनीय सामने खेळवले. केनियाच्या राष्ट्रीय महिला संघासह टांझानियातील काही संघांशी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी दोन हात केले. पारंपरिक पोशाखात क्रिकेट खेळणार्या या तरूणांचा खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळू लागली.
(‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’बाबतचा हा वृत्तांत.)
मसाई माणूस हा आपल्या बालपणापासूनच भाला आणि ढालचा वापर करण्यास शिकतो. अली बायूर यांनी भालाफेक म्हणजे गोलंदाजी तर बॅटचा वापर ढालसमान करण्याचा मंत्र या संघातील खेळाडूंना दिला. अर्थात त्यांचे खांदे मजबुत असल्याने ते भन्नाट वेगाने गोलंदाजी करू लागले. मात्र बॅटींग करतांना त्यांची तारांबळ उडू लागली. एक तर ते प्रत्येक चेंडू उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न करत. यातच त्यांचे क्षेत्ररक्षणही सुमार होते. अली बायूर यांनी मेहनतीने त्यांचा खेळ सुधारण्याचा प्रयत्न केला. हे सारे होत असतांना ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ संघाच्या माध्यमातून सामाजिक पातळीवर काही तरी करण्याची तळमळ त्यांना लागली. खुद्द मसाई समाजातल्या काही कुप्रथांवर आवाज उठवण्याचे त्यांनी ठरविले. याला संघाच्या खेळाडूंनीही पाठींबा दिला. बहुतांश आदीम जमातींप्रमाणे मसाई हीदेखील पुरूषप्रधान जमात आहे. आपण वर पाहिलेच की यात माणसाच्या आयुष्याच्या तीन अवस्था असल्या तरी महिलांच्या मात्र फक्त बाल्यावस्था आणि स्त्रीवस्था अशा दोन अवस्था मानल्या गेल्या आहेत. आतापर्यंत महिलांना अगदी गुराढोरांप्रमाणे मानण्यात येते. सर्वात भयंकर बाब म्हणजे आजही या जमातीत महिलांची खतना करण्याची क्रूर प्रथा सुरू आहे. सहा-सात वर्षांच्या बालिकांच्या योनीचे बाह्यांग कापून काढण्याच्या प्रथेविरूध्द अगदी युनोतर्फे प्रयत्न करूनही फारसा उपयोग झाला नाही. एक तर यासाठी अगदी शेकडो वर्षांपुर्वीची आदीम पध्दत वापरत असल्याने जंतुसंसर्ग आणि अलीकडच्या काळात एचआयव्हीच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या प्रथेविरूध्द ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ने दंड थोपटले. मसाई जमातीत अत्यंत असुरक्षित शरीरसंबंधाचा मुद्दादेखील महत्वाचा आहे. परिणामी एडस्मुळे मरणार्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. याशिवाय, अतिरक्त मद्यपान आणि यातून महिलांचे शोषण व त्यांची दयनीय अवस्था हे मुद्देदेखील कळीच आहेत. याबाबत ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’नी आपल्या जमातीला जागृत करण्याचे काम सुरू केले. म्हणजे नियमित क्रिकेटचा सराव आणि विविध सामने खेळत असतांनाच त्यांनी शाळा, महाविद्यालये, विविध गावांमध्ये पथनाट्य व जनजागृतीपर कार्यक्रम करण्यास प्रारंभ केला. मुळातच क्रिकेटसारख्या नव्या खेळाला आत्मसात केल्याने या संघाविषयी मसाईंना अभिमान असल्याने या जनजागृतीचा काही प्रमाणात तरी सकारात्मक लाभ झाला आहे.
यथावकाश ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ची लोकप्रियता अन्य देशांमध्येही पसरली. जगभरातील हौशी क्रिकेट संघांची इंग्लंडमध्ये ‘लास्ट मॅन स्टँडस्’ या नावाने स्पर्धा होते. यात खेळण्यासाठी त्यांना आमंत्रण आले. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या ‘लॉर्डस’वर खेळतांना मसाई योध्दे मोहरून गेले. या स्पर्धेत त्यांचे प्रदर्शन फारसे उत्तम झाले नसले तरी ब्रिटनमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. बीबीसी, सीएनएन, गार्डियन आदींसह विख्यात ‘विस्डेन’नेही त्यांची दखल घेतली. दरम्यान, अलीया बोयूर यांनी वेबसाईटसह फेसबुक, ट्विटर आणि युट्युबच्या माध्यमातून आपल्या संघाला ग्लोबल व्यासपीठ दिले. आता तर त्यांच्यावर ‘वॉरियर्स’ या नावाने डॉक्युमेंटरी फिल्मही तयार होत आहे. ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग करणार्या वेबसाईटवरून यासाठी भांडवल जमा करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे यासाठी जेम्स अँडरसन यांच्यासारख्या ब्रिटीश खेळाडूंनी पुढाकार घेतला आहे. तर आज स्टीव्ह टिकोलो आणि थॉमस ओडोयो यांच्यासारख्या आंतराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. यासाठी आता अनेक नवीन खेळाडू समोर येत आहेत. इकडे केनियातील घनदाट जंगलातील मसाई या योध्द्या जमातीत क्रिकेटची बिजे रोवून अलीया बोयूर या गेल्या वर्षीच आपल्या मायदेशी अर्थात दक्षिण आफ्रिकेत परतल्या आहेत. मात्र त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एका अध्यायाची नोंद केलीय हे कुणी अमान्य करणार नाही.
(वॉरियर्स डॉक्युमेंटरीचा प्रोमो)
आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे जगातील नवनवीन देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाले नाहीत ही उघड बाब आहे. आज ‘आयसीसी’ ही जगातील एक धनाढ्य संस्था आहे. याचप्रमाणे ‘बीसीसीआय’कडेदेखील रग्गड पैसा आहे. व्यावसायिक खेळाडूंवर आज अब्जावधींची उलाढाल होत आहे. यात काही गैरही नाही. मात्र मसाईसारख्या जमातीच नव्हे तर युरोपातील ब्रिटन वगळता अन्य राष्ट्रे, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, मध्य आशिया, पुर्व आशिया यातही याचप्रमाणे क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न झाल्यास येत्या काही वर्षांमध्ये क्रिकेट हा खर्या अर्थाने वैश्विक खेळ झाल्याशिवाय राहणार नाही. विशेषत: क्रिकेटचा वापर जनजागृतीसाठी होऊ शकतो. आजवर भारतासह अनेक देशांमध्ये क्रिकेटपटूंनी अनेक जागृतीपर मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. मात्र त्यांचा सहभाग फार तर एखाद्या मोहिमेचा ‘ब्रँड अँबेसेडर’ बनण्यापलीकडे राहत नाही. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात थेट सहभाग शक्य नसला तरी विविध भागांमध्ये ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’प्रमाणे स्थानिक संस्कृतीत रंगलेल्या संघांच्या माध्यमातून जनजागृतीचा थेट संदेश परिणामकारकरित्या पोहचवणे शक्य आहे. याहूनही महत्वाची बाब म्हणजे अशा संघांची जागतिक स्पर्धा भरविल्यास क्रिकेटचा बहुसांस्कृतीक रंग ठळकपणे जगाला दिसू शकतो. म्हणजे भविष्यात ‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ हे एखाद्या नागा जमातीसोबत तर सातपुड्यातील पावरांचा सामना पाकिस्तानच्या वजिरीस्थानातील पठाणांसोबत रंगू शकतो. यातून क्रिकेटला ‘ग्लोबल’ चेहरा मिळेल यात शंकाच नाही.
पहा-‘मसाई क्रिकेट वॉरियर्स’ची काही अद्भुत छायाचित्रे.
ऐकावे ते नवलच !
एकदम भन्नाट शेखरजी !
शेखर दादा खरच सुन्दर आणि अभ्यसु लेख…अभिनन्दन.तुमचे सर्वच लेख हे नविन्यपूर्णच असतात..