Featured क्रीडा

मन मे है विश्‍वास…

Written by shekhar patil

फुटबॉलचा विश्‍वचषक संपला तो अनेक अविस्मरणीय क्षणांची भरभरून उधळण करतच ! सर्वार्थाने सरस असणार्‍या फ्रान्सने विश्‍वषकावर उमटवलेली मोहर ही अनपेक्षीत नव्हतीच. मात्र उपविजेता ठरलेल्या क्रोयेशियाच्या संघाची जोरदार लढतदेखील कुणी विसरू शकणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जाणारा फुटबॉल किती विलक्षणपणे जगभरातील अब्जावधी लोकांना एका सूत्रात बांधून ठेवू शकतो याची प्रचितीदेखील यातून आली आहे. निर्वासीत व अल्पसंख्यांकांमुळे तणावग्रस्त बनलेला फ्रान्स आणि गृहयुध्दामुळे होरपळलेल्या क्रोयेशियातील फुटबॉलच्या मैदानात रंगलेली लढाई ही हार-जीतच्या पलीकडे जाणारी ठरली. सर्वात महत्वाचे म्हणजे हा सामना फुटबॉलवर मनापासून प्रेम करणार्‍यांच्या मनात एक नवीन आस निर्माण करणारा ठरला आहे.

फुटबॉलचा हा खेळ तसा रांगडा. मैदानावरील धुसमुसळेपणा आणि स्टेडियममधील हुल्लडबाजीमुळे अनेकदा टिकेचा विषय बनणारा. मात्र या खेळाला जगभरात किती अलोट लोकप्रियता लाभलीय हे नुकत्याच संपलेल्या विश्‍वचषकाने दाखवून दिले आहे. भारतासाख्या खंडप्राय देशाचा फुटबॉलचा संघ जागतिक पातळीवर कुणाच्या खिजगणतीत नसला तरी आपल्याकडे या खेळाचे चाहते कमी नसल्याचेही यातून दिसून आले आहे. जवळपास एक महिनाभर पृथ्वीतलावरील अब्जावधी लोक आपले श्‍वास रोखून टिव्हीच्या वा स्मार्टफोनच्या पडद्यासमोर बसलेली वा अस्वस्थतेत येरझरा घालतांना दिसून आली आहेत. यात कोट्यवधी भारतीयांचाही समावेश होता. जगभरातील फुटबॉल शौकिनांना दक्षीण अमेरिकन शैलीतल्या फुटबॉलची चांगलीच मोहिनी पडलेली आहे. यामुळे साहजीकच ब्राझील व अर्जेंटीनासारख्या मातब्बर लॅटीन अमेरिकन संघांना जबरदस्त फॅन फॉलोविंग असून त्यांनी विश्‍वचषक जिंकावा अशी प्रार्थना करणारे रसिक संख्येने अधिक होते. तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शस्त्रे हाती न टाकणार्‍या जर्मनीसह इटली, स्पेन, पोर्तुगाल आदी संघदेखील ‘हॉट फेव्हरीट’ मानले जात होते. तथापि, या सर्वांचा अंदाज चुकवत फ्रान्स आणि क्रोयेशियात अंतिम सामना रंगला याचे अनेक आयामांमधून विश्‍लेषण करता येईल. मात्र या विश्‍वचषकाने कथित वलयांकीत खेळाडूंच्या मर्यादा साफ उघड्या पाडल्याचे दिसून आले. विशेष करून लिओनेल मेस्सी, क्रिस्तीयानो रोनोल्डो आणि नेमार यांच्यासारख्या सेलिब्रीटींना यात फारशी चमक दाखवता आली नाही. एक तर बहुतांश मातब्बर खेळाडू हे राष्ट्रीय संघापेक्षा आपापल्या प्रोफेशनल लीग्जला जास्त महत्व देतात. अर्थात विविध क्लब्जसाठी घाम गाळणारे महान खेळाडू हे या विश्‍वचषकात थकलेले वाटत होते. नेमार तर कामगिरीपेक्षा त्याच्या नाटकीपणामुळेच जास्त गाजला. यामुळे रशियातील विश्‍वचषकाने आजवर असलेल्या वलयांकीत कंपूची सद्दी संपुष्टात आल्याची द्वाही फिरवली असल्याचे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अर्थात त्यांच्या जागेवर एमबाप्पेसारख्या नव्या दमाचे सुपरस्टार याच विश्‍वचषकातून उदयास आले आहेत. १९५८ सालच्या विश्‍वचषकात पेलेचा जसा उदय झाला होता, अगदी त्याच प्रकारे २०१८मध्ये एमबाप्पे जगासमोर आल्याचे मानले जात आहे. हा फुटबॉल विश्‍वातील नवीन ‘ब्लॅक डायमंड’ ठरणार असल्याची भाकिते आता केली जात आहेत.

या विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहचलेले दोन्ही संघ युरोपियन होते. यामुळे जगावर युरोपीयन शैलीच्या फुटबॉलच्या साम्राज्याचचे वर्चस्व निर्माण झाल्याचे मानले जात आहे. तथापि, हा निष्कर्षदेखील वरवरचा ठरू शकतो. कारण या आधीदेखील काही वेळेस असे प्रसंग आले आहेत. खरं तर, युरोपमध्ये फुटबॉलच्या पायाभूत सुविधा या अन्य खंडातील राष्ट्रांपेक्षा अधिक आहेत. यातील बहुतांश देशांमधील अंतर्गत लीग सामन्यांमधून मातब्बर क्लब्ज उदयास आले आहेत. यातील बर्‍याचशा क्लबचा संघ तर एखाद्या देशाच्या बलाढ्य संघालाही मात देणारा असतो. एकंदरीतच फुटबॉलची संस्कृती ही युरोपशी एकजीव झाल्याचा लाभ काही प्रमाणात तरी फ्रान्स आणि क्रोयेशियाला झाल्याचे कुणी अमान्य करणार नाही. तथापि, याच्याही पलीकडे जात आणि खरं तर या दोन्ही देशांमधील सामाजिक स्थितीचे अध्ययन केले असता आपल्याला एका नवीन बाबीचे आकलन होते. ते म्हणजे या दोन्ही संघांमधील विजीगिषु वृत्ती ही तेथील सामाजिक स्थितीतून निर्माण झाली आहे. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी युगोस्लाव्हीयाचे विभाजन होऊन सर्बिया व माँटेनेग्रो, बोस्नीया व हर्जेगोविना, स्लोव्हेनिया, मॅसिडोनिया आणि क्रोयेशिया आदींसारख्या चिमुकल्या देशांचा जन्म झाला. मात्र हे विभाजन सुखासुखी झाले नव्हते. मानवी जीवनातील सर्वात भयंकर एक म्हणून कुख्यात झालेल्या गृहयुध्दातून या देशांचा जन्म झाल्याचे विसरता येणार नाही. खरं तर याच रक्तरंजीत वेदनांनी कण्हत असतांनाच १९९८च्या विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरी क्रोयेशिया पोहचला तेव्हा हा चमत्कार मानला जात होता. आज दोन दशकानंतर याच चमत्काराने पुन्हा एक नवीन पायरी वर चढल्याचे दिसून आले आहे. जेमतेम ४० लाखांवर लोकसंख्या असणार्‍या आणि फुटबॉलच्या फारशा पायाभूत सुविधा नसतांनाही या संघाची ही भरारी आश्‍चर्यकारक अशीच आहे. यामुळे भारतात फुटबॉलसाठी सुविधा नसल्याची ओरड करणार्‍यांनी यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. साधारणत: फुटबॉलच्या विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीस दोन्ही बाजूचे संघ बचावात्मक खेळ करत असल्याचे आधीदेखील दिसून आले आहे. यामुळे फायनल मॅच ही नेहमी निरस होत असते. मात्र यावेळी दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे साहजीकच सामना चुरशीचा झाला. यात बाजी सर्वार्थाने उजव्या असणार्‍या फ्रान्सने मारली. अंतिम फेरीतील सामना हा फुटबॉलच्या कोणत्याही शैलीमध्ये बध्द नसल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केले. यामुळे गोलांचा वर्षाव झाला. अर्थात गेल्या अनेक वर्षांमध्ये इतक्या चुरशीचा अंतिम सामना झाला नव्हता.

फ्रान्सच्या यशात या संघातील कृष्णवर्णीय खेळाडूंचा सर्वात मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर २३ खेळाडूंच्या चमूत तब्बल १५ अश्‍वेतांचा समावेश असल्यामुळे फ्रान्समधील कट्टरपंथी आधीच खूप संतापले होते. यावरून तेथील सोशल मीडियात विखारी चिखलफेकदेखील सुरू होती. मात्र फ्रान्सच्या विश्‍वविजेतेपदामुळे त्यांना थोबाडात मारल्यासारखी झाली आहे. फ्रान्सच्या १९९८ साली मिळवलेल्या पहिल्या-वहिल्या विश्‍वविजेतेपदात झिनेदीन झिदानचा मोलाचा वाटा होता. तेव्हादेखील झिदानला त्याचे अल्जेरियन मूळ आणि मुस्लीम धर्मावरून टोमणे मारणार्‍यांची संख्या कमी नव्हती. तथापि, झिदानच्या आगमनानंतर फ्रान्सच्या फुटबॉल संघामध्ये ‘ब्लॅक, ब्लँक, ब्युअर’ अर्थात ‘अश्‍वेत, श्‍वेत आणि अरब’ असा संकर झाल्याचे मानले जात होते. हीच त्रिसूत्री पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात विश्‍वचषक मिरवतांना दिसून येत आहे. खरं तर, संपूर्ण पृथ्वीवतलावर आपल्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा सर्वप्रथम जयघोष करणार्‍या फ्रान्समध्येच हा चमत्कार शक्य आहे. तथापि, ही वाटचाल वाटते तितकी सोपी नक्कीच नाहीय. कारण, फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वांशिक तणाव वाढला आहे. विशेष करून परधर्मीय निर्वासीतांना हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्याविषयीचा द्वेष वाढीस लागला आहे. याला विश्‍वविजेतेपदामुळे मोठी चपराक मिळणार आहे. आज अवघा फ्रान्स ज्यांना राष्ट्रीय नायक म्हणून डोक्यावर मिरवत आहेत ते केलियन एमबाप्पे, पॉल पोगबा, एनगोलो कांटे आणि अन्य मंडळी ही गौरवर्णीय आणि कथितरीत्या शुध्द फ्रेंच नव्हेत. कुणाचे मूळ अल्जेरियाचे तर कुणी कॅमरूनचा. कुणी ख्रिस्ती तर कुणी मुस्लीम. आफ्रिकेच्या विविध देशांमध्ये मूळ असणार्‍या आणि पराकोटीच्या गरीबीत राहणारी ही मुले आज जगभरातील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. यातील बहुतांश खेळाडू हे पॅरीससह आसपासच्या झोपडपट्टीत राहणारे आहेत. यामुळे कुणातही टॅलेंट असेल तर तो खेळाडू कोणत्याही धर्माचा असो, वंशाचा असो, वर्णाचा असो की भाषेचा…त्याला कुणीही थांबवू शकत नाही. फ्रान्सच्या विश्‍वविजयातील नायकांची पार्श्‍वभूमि तपासून पाहिली असता आपल्याला हीच बाब दिसून येते. यामुळे आपल्याकडे हे नाही…ते नाही अशी ओरड करण्यापेक्षा आहे त्याच स्थितीत प्रतिभा दाखविण्याची धमक ज्यांच्यात आहे तेच कोणत्याही विपरीत परिस्थितीवर मात करू शकतात हेच फ्रान्सच्या संघाने दाखवून दिले आहे. तर किती शालीनतेने हरता येते हे दाखवणे क्रोयेशियाशिवाय कुणालाही शक्यच नव्हते. अगदी पराभूत झाल्यानंतरही ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा निर्धार या संघातील लुका मॉड्रीक आणि त्याच्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यांवर दिसून आला. अर्थात या सर्वात विजय झालाय तो फुटबॉलचा ! अवघ्या जगाला एका सूत्रात बांधणार्‍या सुंदर खेळाचा !

About the author

shekhar patil

Leave a Comment