अनुभव आध्यात्म

मन ओथंबून येती !

मला स्वत:च्या आयुष्यावर अमीट ठसा उमटवणार्‍यांविषयी लिहावयाचे झाल्यास तीन जणांची यादी फिक्स आहे. एक माझे वडील, दुसरे डॉ. गोपाळ नारायण फेगडे आणि तिसरे ‘देशदूत’चे माजी संपादक सुभाष सोनवणे.

जॉर्ज गुर्जीएफ या अवलिया रहस्यदर्शीने त्याला आयुष्यात भेटलेल्या विलक्षण लोकांविषयी ‘मिटींग्ज विथ रिमार्केबल मेन’ या जगविख्यात ग्रंथात अगदी समरसून लिहले आहे. याचप्रमाणे मलाही स्वत:च्या आयुष्यावर अमीट ठसा उमटवणार्‍यांविषयी लिहावयाचे झाल्यास आजच पहिल्या तीन जणांची यादी फिक्स आहे. एक माझे वडील, दुसरे गोपाळ नारायण फेगडे आणि तिसरे ‘देशदूत’चे माजी संपादक सुभाष सोनवणे. माझ्या वडलांनी साधेपणा व सरळपणा जपत आयुष्य किती कृतार्थतेने जगता येते हे शिकवले, फेगडेअप्पा हे माझ्या अंतर्यात्रेचे पथिक बनले तर सुभाष सोनवणे साहेबांनी पत्रकारितेतील गुरूमंत्र दिला. या त्रिमुर्तीचे उपकार मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. किंबहुना उपकाराची भाषा न करता मी त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छीतो. यापैकी माझे वडील आणि सुभाष सोनवणे साहेब यांच्याविषयी कधी तरी लिहणारच. मात्र आजची पोस्ट अप्पांना समर्पीत.

साधारणत: १९९३ चा काळ! कॉलेजातील बेभान वय. त्या वेळेला लोक मला उगाच खुप हुशार समजत असल्याने समाज आणि कुटुंबांच्या आकांक्षांचे ओझे खांद्यावर. वारा पिल्यागत हुंदडण्याचे दिवस. अभ्यास, करियर, रिलेशनशीप, सार्वजनिक जीवन, सेक्स आदींबाबात साराच गोंधळ. सपाटून वाचन, क्रिकेट, यारी-दोस्ती, गणेशोत्सव-दुर्गोत्सवापासून सर्व कार्यक्रमांमध्ये आघाडी. एकंदरीत पाहता आयुष्याचा प्रत्येक क्षण आत्यंतिक उत्कटतेने जगण्याचे ते दिवस होते. साधारणत: याच कालखंडात अंतर्यामीचा रितेपणा छळू लागला. अहोरात्र मित्रमंडळीत वावरतांनाही आपण आयुष्यात काही तरी ‘मिस’ करतोय याची टोचणी कायम लागली. अनेक प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याचा पुस्तकांमध्ये प्रयत्न केला तरी त्याची उत्तरे आढळणे तर दुरच पण संभ्रम अजूनच वाढू लागला. एके दिवशी दुपारची वेळ असतांना अचानक भंगारवाल्या गुलाबमामूचा आवाज आला…

‘‘अरे भांजे देख, आज बहोत अच्छी किताबे मिली है…कुछ काम आयेंगी क्या तेरी?’’

आता गुलाबमामूकडून मी अनेकदा पुस्तके खरेदी करत असल्याने तो बिचारा नेहमी नवीन काही आल्यानंतर मला हमखास सांगत असे. मी उत्सुकतेने त्याच्या गाडीकडे गेलो. त्याच्याकडे तीन-चार इंग्रजी आणि हिंदीतली मासिके होते. पटकन पैसे देऊन घरात आलो. बरं वाचनाचा तो काळ इतका भन्नाट होता की घरात कथा-कादंबर्‍याच नव्हे तर ‘सायन्स रिपोर्टर’, ‘इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू’पासून ते पार तंत्र-मंत्रांच्या पुस्तकांचे ढिग पडलेले असत. यामुळे मामूने दिलेली पुस्तके कशावर आहेत हे पाहण्याची तसदीदेखील घेतली नाही. घरात आल्यानंतर पाने पलटवल्याबरोबर मी गंभीर झालो. ‘आचार्य रजनीश’…पटकन आठवले. अरे यार संतोषने (माझा मित्र संतोष चौधरी. हा सध्या मुंबईत मोठा कंत्राटदार आहे.) आपल्याला दोन वर्षांपुर्वी याच माणसाचे पुस्तक भेट दिले की! त्या पुस्तकाने अनेक महिने अस्वस्थ केल्याचेही आठवले. तातडीने अधाशागत वाचू लागतो. यातील एका मासिकात ‘मंडला मेडिटेशन’ची माहिती दिली होती. मला या सर्व प्रकारांमध्ये रस असल्याने मी त्याचा प्रयोग कसा करावा याचा विचार करू लागलो. अनेक दिवस उलटले तरी गाडी पुढे सरकत नव्हती. यातच मित्रमंडळीत बसलेला असतांना प्रसाद जावळे याने आमचाच मित्र अमितच्या (डॉ. अमित फेगडे) आजोबांकडे रजनीश यांच्या पुस्तकांचे भांडार असल्याचे सांगताच मी उडालोच. अर्थात तातडीने प्रसाद व मी सहकार नगरातील अमितच्या आजोबांकडे गेलो. बस्स…हीच अप्पांची आणि माझी पहिली भेट!

साधारणत: करड्या शिस्तीच्या एखाद्या वृध्दाला आपण भेटणार असल्याची कल्पना करून गेल्यानंतर पहिल्याच भेटीत मला जोरदार धक्का बसला. शुभ्र दाढीधारी कृश व्यक्तीने आमचे अगदी हसून स्वागत केले. पहिल्या भेटीत अप्पा साठीतले अत्यंत प्रसन्न स्वभावाचे गृहस्थ वाटले. (प्रत्यक्षात ते सत्तरीत होते.) माझी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी वाचनालयासाठी माझी नोंदणी केली. पुस्तक जपून वापरण्याची ताकीदही त्यांनी दिली. हातात ओशोंचा ग्रंथ पडल्यानंतर अक्षरश: हवेत उडत घरी आलो. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा अप्पांकडे जाऊन पुस्तक मागितले तेव्हा थक्क होण्याची पाळी त्यांची होती.

‘‘अरे तु पुस्तक वाचलेही?’’…‘‘हो’’ मी उत्तरलो. त्यांना खात्री पटेना.

या पुस्तकात नेमके काय आहे यावर त्यांनी दोन-तीन प्रश्‍न विचारले तेव्हा त्यांचे समाधान झाले. यानंतर त्यांनी मला हवे ते पुस्तक शेल्फवरून काढून घेण्याचे सांगितले. तेव्हापासून ते अगदी या क्षणापर्यंत ओशोंचे पुस्तक निवडतांना उडणारी धांदल कायम आहे. याप्रमाणे दररोज किमान एका ग्रंथाचा appaफडशा पाडणे सुरू झाले. दरम्यान, अप्पा हे मला टप्प्याटप्प्याने समजत गेले. त्यांचे नाव गोपाळ नारायण फेगडे, ओशोंच्या संप्रदायातील नाव स्वामी गोपाळ नारायण भारती. स्वतंत्रता सेनानी, लेखक-कवि अन् भुसावळातील डी.एस. हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक. स्वातंत्र्यपुर्व काळातील त्यांनी सत्यशोधक पध्दतीने केलेला विवाह चांगलाच गाजला होता. अप्पा अत्यंत करड्या शिस्तीचे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ख्यात होते. १९७०च्या दशकाच्या मध्यावर जीवनसंगिनी मध्यातून सोडून गेल्यामुळे हा विलक्षण संवेदनशील माणूस काही काळ उन्मळून पडला. याच कालखंडात तेव्हा भगवान श्री रजनीश नावाने विख्यात (खरं तर कुख्यात !) असणार्‍या वादळाकडे ते आकर्षित झाले. बरं हे क्षणिक आकर्षण नव्हते. एका क्षणात पुढील आयुष्य याच गुरूचे बोट धरून अंतर्यात्रा करण्याचा संकल्प केला. याचसोबत आपले सर्वस्व अर्पण करून त्यांचे विचार आणि ध्यानप्रणालींचा प्रचार-प्रसार करण्याचाही ध्यास घेतला. यातूनच भुसावळात त्यांनी ‘हरिछाया ध्यान केंद्र’ सुरू केले. समाजात चांगली प्रतिष्ठा असणारा हा गृहस्थ जेव्हा गैरिक वस्त्र घालून घराबाहेर पडला तेव्हा काय हलकल्लोळ उडाला असेल याची कल्पना आज आपण करू शकत नाही. मात्र जेव्हा रजनीश हे नाव उच्चारणेही अवघड होते त्या कालखंडात अवघ्या जगासमोर त्यांचे शिष्यत्व मिरवण्याचे अग्निदिव्य भल्याभल्यांना जमले नाही. अर्थात अप्पा यातून तावून-सुलाखून बाहेर पडले. यथावकाश ओशोंच्या विचारांना मान्यता मिळू लागली. याच कालखंडात मी त्यांच्या संपर्कात आलो. शेकडो पुस्तकांचा फडशा पाडल्यानंतर मी संभ्रमीत झालो. ओशोंना तुम्ही अन्य लेखकांप्रमाणे बुध्दीने समजण्याचा प्रयत्न करणे अवघड आहे. यामुळे सकाळी कृष्णावर समरसून बोलणारे ओशो सायंकाळी बुध्दाचा जयघोष करतात. याचप्रमाणे त्यांनी विलक्षण परस्परविरोधी विचार मांडले आहेत. यामुळे साहजीकच मीदेखील प्रचंड कन्फ्युज्ड झालो. एक दिवशी सकाळी अप्पांसमोर व्यथा मांडली. ते दाढी कुरवाळत मंदपणे हसले. तातडीने सांगितले, ‘‘आज संध्याकाळी चार वाजता ये’’ यानुसार पावणेचारलाच त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला कुंडलिनी ध्यानाच्या स्टेप्स समजावून सांगत टेपरेकॉर्डवर संगीत सुरू करून माझ्याकडून ते ध्यान करवून घेतले. तो दिवस होता १० डिसेंबर १९९४! दुसर्‍याच दिवशी ओशोंच्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती देत त्यांनी सकाळी लवकर सक्रीय ध्यानाला बोलावले.

यानुसार दुसर्‍या दिवशी लवकर गेल्यावर मला अन्य काही मंडळी दिसली. यापैकी नमस्कार-चमत्कार होत सक्रीय ध्यान सुरू झाले. आता यातील स्टेप्स मला प्रारंभी विक्षिप्तपणासारख्या वाटल्या. अगदी मधूनच पळून जाण्याचेही मनात आले. मात्र तसे केले नाही. अर्थात त्या एका तासाच्या ध्यानाने अगदी स्पष्ट जाणवेल इतके ‘फ्रेश’ वाटले. यानंतर दिवसभर विविध ध्यानप्रकार झाले. सायंकाळी किर्तन ध्यान होऊन फलाहार होऊन कार्यक्रम संपला. निघतांना मी अप्पांना उद्या मी सक्रीय ध्यान करण्यासाठी येणार हे सांगताच ते पुन्हा प्रसन्न हसले. यानुसार दुसर्‍या दिवशी सकाळी गेलो तेव्हा आदल्या दिवशी कार्यक्रमाला आलेले तरूण चढ्ढा, सतीश जाधव, भास्कर ठोके आदी तरूण ध्यानासाठी उपस्थित दिसले. अप्पा स्वत: ध्यान करवून घेण्यासाठी आले. आपल्याला ध्यान म्हणजे कुणी तरी पद्मासनात धिरगंभीरपणे बसलेला साधक डोळ्यासमोर येतो. मात्र ओशोंच्या बहुतांश ध्यानप्रणाली याच्या अगदी विरूध्द असून सक्रीय ध्यान हा त्यांचा शिरोमणी आहे. यात आत्यंतिक शारिरीक आणि मानसिक परिश्रमांचा समावेश आहे. (या ध्यानावर मी लवकरच पोस्ट टाकणारच आहे!) मात्र यानंतर दिवसभर मिळणारा टवटवीतपणा मला दुसर्‍या दिवशीदेखील जाणवला. यानंतर साधारणत: चार-पाच दिवसांच्या ध्यानंतर मला झपाटल्यागत झाले. खरं तर नव्यानेच मद्याचा आस्वाद घेणार्‍याला संपूर्ण जगानेही मद्य प्राशन करून धुंद व्हावे असे वाटते. किंबहुना अन्य लोक यापासून वंचित का? असा विचारही येतो. याचप्रमाणे ती त्या काळात मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला ओशो आणि सक्रीय ध्यान याबाबत अक्षरश: बोर होईपर्यंत सांगू लागलो. अर्थात काही दिवसांत ही स्थिती बदलली. ध्यानाचा आस्वाद ही आत्यंतिक वैयक्तीक बाब असल्याचे लक्षात आले. तेव्हापासून ते आजवर मी कुणी रस दाखविला तरच याबाबत बोलतो. असो. नियमितपणे ध्यान करू लागलो आणि अर्थातच अप्पांचा संपर्क वाढला.

सक्रीय ध्यानाने मी अंतर्मुख झालो. मित्रमंडळीत रमणारा आणि जवळपास खुशालचेंडू असणारा मी आता पार बदलण्याच्या मार्गावर चाललो. ज्या वयात आपल्याला सर्व काही कळते त्याच वयात आपल्याला काहीही कळत नसल्याची जाणीव झाल्याने अनेक प्रश्‍न उद्भवले. उत्तरे शोधण्यासाठी दोनच मार्ग. एक ओशो आणि दुसरे अप्पा! ओशोंच्या शब्दांनी समाधन न झाल्यास त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी अप्पांकडे धाव ठरलेली. साधारणत: सकाळी सक्रीय ध्यान आणि सायंकाळी ‘व्हाईटरोब’आधी अप्पांसोबत बौध्दीक काथ्याकुट असा नित्यनेम सुरू झाला. हे होत असतांना अप्पांचा पुर्ण भोवताल माझ्यासोबत समरस झाला. त्यांची अगदी मुलीप्रमाणे काळजी घेणारी मा शारदा, त्यांचा मुलगा नरेंद्र, अवलिया पीटर अंकल, तेव्हा इंजिनिअरिंगला शिकणारा सुनील चौधरी, कॉलेजातच असणारे प्रवीण आणि मिलींद (विक्की) हे पवार बंधू,त्यांचे काका किशोर पवार, अजित आणि अमरजित रंधावा बंधू, दीपक गांगले, डॉ. कमलकांत शास्त्री, जंगले परिवार, भास्कर ठोके, नरेंद्र कदम, बाबूराव शिंदे, मार्कंडे, सतीश जाधव आदींसह अनेकांचा येथे परिचय झाला. अर्थात ही बहुतांश मंडळी कार्यक्रम असला तरच भेटत होती. आता तो काळ ओशोंची पुस्तके लपून-छपून वाचण्याचा असतांना मी बिनधास्त मित्रांमध्येही याबाबत चर्चा करत असे. आमच्या कॉलनीतल्या काही जणांनी माझ्या घरी सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या वडलांनी दिलेले उत्तर मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरू शकणार नाही. ते म्हणाले, ‘‘तो रजनीश काय आहे हे मला माहित नाही….मला मात्र माझ्या मुलावर आणि त्याच्या विवेकबुध्दीवर विश्‍वास आहे’’ यामुळे मला मोकळे रान मिळाले हे सांगणे नकोच!! यानंतर खुद्द काही महिन्यातच माझे वडीलही ओशोंचे दिवाणे झालेत ही बाब अलाहिदा!

वाचन, मनन, बौध्दीक खाज, ध्यान…नवनवीन प्रश्‍न…त्यांची उत्तरे शोधण्याचा आटापिटा…प्रत्येक क्षणाला पंख लागले. आपण जीवनाला कुठे तरी स्पर्श करतोय याची जाणीव झाली.  यथावकाश बी.एस्सी. झालो. हुशारीचा शिक्का असल्याने स्पर्धा परिक्षांची तयारी करू लागलो. टाईमपास म्हणून मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हची नोकरी पकडली. काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य आले. ओशोंच्या पुण्याच्या आश्रमातील वार्‍या वाढल्या. अप्पा बर्‍याच भेटींमध्ये दोन बाबींचा अवश्य उल्लेख करत. ‘‘विवाह केलाच तर स्वत:च्या मर्जीने आणि शक्य झाल्यास ओशोंच्या शिष्येशी कर अन् तुझ्या आवडीचा व्यवसाय निवड. अन्यथा आयुष्याची होरपळ होईल.’’ त्यांचा हा इशारा काही वर्षातच खरा वाटू लागला. आयुष्यात अनेक उलथा-पालथी झाल्या. एम.आर.ची नोकरी सोडून नेमके काय करावे? हा विचार समोर आला. व्यवसायासह अनेक मार्ग समोर असले तरी मला रस होता तो लिखाणात! एव्हाना माझे लिखाण प्रसिध्दही होऊ लागले होते. यामुळे विचारांती ‘देशदूत’ जॉईन करण्याचा निर्णय अप्पांच्या कानावर टाकायला गेलो तेव्हा ते अत्यंत प्रसन्नतेने हसले. ‘आता तुला आवडीचे क्षेत्र मिळाले. जा मस्त एन्जॉय कर!’ अप्पांचा आशीर्वाद घेत मी आयुष्यात प्रथमच गंभीर होत ‘देशदूत’ला काम सुरू केले तेव्हा तेथे मला पैलू पाडणारे गुरू तथा तेव्हाचे संपादक सुभाष सोनवणे साहेब तयारच होते. एका अर्थाने अप्पांनी अंतर्यात्रेला गती दिली तर बाह्य जगात सोनवणे साहेबांनी घडविले. अप्पांच्या हातातून मी पुढे दुसर्‍या एका समर्थ शिल्पकाराकडे गेलो ज्यांनी मला आकार दिला.

एव्हाना अप्पांचे शरीर थकले तरी त्यांचे दिसणे आणि असणे हे एखाद्या तेजस्वी प्राचीन ऋषीप्रमाणे कायम राहिले. किंबहुना वाढत्या वयासोबत त्यांच्यात विलक्षण उर्जा दिसू लागली. २००४च्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मी त्यांना भेटलो. यावेळी ते अगदी नेहमीप्रमाणे प्रसन्नचित्त होते. पत्रकारितेविषयी बरीच चर्चा झाली. यानंतर काही दिवसांनी अप्पा अंथरूणाला खिळल्याचे समजले. एक-दोन दिवसांत त्यांना भेटायला जाऊ असे मनाशी ठरवत असतांनाच २१ सप्टेंबर २००४ रोजी सायंकाळी अप्पांनी देह सोडल्याचे समजले. नरेंद्रच्या वरणगाव रोडवरील निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. नेमका त्याच दिवशी खूप पाऊस झाला असल्याने नरेंद्रकडे जातांना चिखल तुडवत जावे लागले. अखेर अप्पा नजरेस पडले…

अहो काही तरी चूक तर झाली नाही ना?

अप्पांचे देहावसान झालेय?

छे! अहो ते तर मस्तपैकी निद्रेत आहेत की!

क्षणार्धात त्यांच्या चरणावर स्वत:ला झोकून दिले. एका क्षणांत त्यांच्या सहवासातील आठवणींचा पट डोळ्यासमोर तरळला. एव्हाना नरेंद्रच्या घरी अप्पांचे काही स्नेही जमा झाले होते. यापैकी माझ्यासह पाच-सहा जणांनी रात्री थांबण्याचा निर्णय घेतला. मग काय…सुरू झाला अप्पांच्या आठवणींचा सिलसिला. आयुष्यात अनेक प्रसंग रेकॉर्ड न करण्याचा नेहमी पस्तावा होतो. यापैकी ही पहिल्या क्रमांकाचा प्रसंग. सगळे भरभरून बोलू लागले…आपल्या आयुष्यातल्या मर्मबंधातल्या ठेवी उलगडू लागले. तसे आम्ही सर्व जण चांगले मित्र असलो तरी फक्त अप्पांचा धागा पकडून झालेल्या चर्चेत अनेक नवीन बाबी समजल्या. खरं तर आप्पा शेवटच्या क्षणापर्यंत अंतर्बाह्य अत्यंत समृध्द जीवन जगले. अप्पांच्या अंतर्यात्रेतील प्रवास तर त्यांच्या सानिध्यात कुणाच्याही लक्षात येत होता. याचप्रमाणे लौकीक जगातही ते सधन होते. मात्र याचा बडेजाव न मिरवता त्यांनी अनेकांना सढळ हाताने मदतही केली होती. एका अर्थाने त्यांनी अनेकांना अंतर्बाह्य पातळीवर मदतीचा हात दिला. किमान दोन पिढ्यांना ओशोंचे विचार आणि ध्यानप्रणालीची माहिती व्हावी यासाठी त्यांनी अक्षरश: आयुष्य पणास लावले. कुणाला आत्यंतिक नैराश्यातून काढले, कुणाला अडीअडचणीत मदत केली, कुणाचा संभ्रम दुर केला तर अनेकांना आत्यंतिक स्नेहाने मार्गदर्शन केले. जवळपास दहा वर्षातून अप्पा मला समजले त्यापेक्षा त्या रात्रीतून बर्‍याच बाबींचे आकलन झाले. अधून-मधून अप्पांच्या पार्थिवाकडे नजर गेली असता ते डोळे मिटून आमच्या गप्पा मजेने ऐकत असल्याचे जाणवत असे. लगेच डोळे मिचकावून आपली दाढी कुरवाळत ते प्रसन्न हसतील असेही वाटे. या रात्रीतील अनुभुती शब्दांच्या पलीकडील आहे. अनेक बाबी येथे सांगणे अप्रस्तुत होईल. मात्र रात्र ऐन भरात येत असतांना आम्हीही भरात आलो. आत्यंतिक प्रसन्नतेने आप्पांना वाजत-गाजत, हसत-नाचत निरोप देण्याचा संकल्प झाला. अनेकांशी फोनवरून बोलणे झाले. कोण केव्हा पोहचणार याची माहितीदेखील घेतली. उत्तररात्र उलटल्यानंतर आमच्या आठवणींचा झरा खळाळत्या नदीत बदलला. झुंजुमुंजू झाली. गहन मौन अवतरले. सुर्योदयाच्या साक्षीने अप्पांना डोळे भरून पाहिले. तेच स्मितहास्य…तोच आश्‍वासकपणा! कृतज्ञतेने ओथंबलेल्या ह्दयाने घरी फ्रेश होण्यासाठी निघालो. अर्थात ज्यांच्या संगतीने आपले आयुष्य सुगंधीत झाले त्या अप्पांची ही आपली भौतिक जगातील शेवटची भेट असेल वाटले नाही. नरेंद्रच्या घरून स्वत:च्या घरी येत असतांना अचानक मनात असे काही झाले की, घरी आल्यावर लागलीच आंघोळ करून ऑफिसला निघालो.

तेव्हा काय झाले हे मला आजवर उमजले नाही. मात्र अप्पांना त्या रात्री जसे पाहिले, अनुभवले, जाणून घेतले त्याची अमीट छवी माझ्या ह्दयावर कायमची टिकून रहावी हे कुठेतरी वाटले अन् मी अप्पांच्या अंत्यसंस्काराला न जाताच त्यांचा निरोप घेतला. अप्पा गेल्यानंतर आयुष्यात किती पोकळी निर्माण झाली ती समजण्यासाठी तीन वर्षे गेलीत. आधी वाटायचे हिर्‍याप्रमाणे ‘अप्पा है सदा के लिए’! मात्र अप्पा नसल्यानंतरची जीवघेणी पोकळी छळू लागली. २००७ साली सर्व मित्रांना एकत्र करून अप्पांच्या आठवणी काही प्रमाणात जागविल्या. यानंतर नियमितपणे ध्यान शिबिरांना हजेरी लावली. अनेक नवनवीन साधक मित्रांना भेटलो. अनेक उच्च श्रेणीतील ध्यानी मान्यवरांचीही भेट झाली. मात्र या सर्वांना भेटल्यानंतर अप्पा किती महान होते याची जाणीव झाली.

अनेकदा मी चाचपडलो, कन्फ्युज्ड झालो. अनेकदा विश्‍वास डळमळीत झाला. मात्र प्रत्येक प्रसंगात अप्पांनी मला मार्गदर्शन केले. याचमुळे अनेक पेचप्रसंगातून मी तावून सुलाखून निघालो. आजच्या व्यस्ततम आयुष्यातही मी दररोज थोडा वेळ काढून स्वत:च्या अंतर्यामी डोकावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ओशोंसोबत त्यांचे स्मरण आपोआप होते. सदेह अप्पांना भेटण्यात भौगोलिक मर्यादा होत्या. आता उर्जारूपी असणारे अप्पा तर केव्हाही भेटतात की! आतादेखील अनेक मित्रांसोबत मी अप्पांबाबत तासन्तास बोलत असतो. या अनेक तुकड्यांमधून अप्पा नवनवीन रूपांनी भेटत राहतात. लवकरच सर्व अप्पामित्रांनी एकत्र येऊन ‘एक दिन अप्पा के नाम’ असल्या स्वरूपाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. यात उत्सव असेल, ध्यान असेल, हास्यविनोद असेल, आठवणी असतील आणि अर्थातच त्यांच्याविषयीची कृतज्ञता असेल. पाहूया काय होते ते!

आज जवळपास २० वर्षांपासून ओशोंच्या माध्यमातून स्वत:ला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या अंतर्यात्रेत फार काही पल्ला गाठला असे म्हणता येणार नाही. मात्र आपण योग्य मार्गावरून जात असल्याचे निश्‍चित झाले आहे. या प्रवासात ओशो हे महाद्वार बनले तर त्यांच्यापर्यंत पोहचवणारे अप्पा हेदेखील माझ्या मते तेवढेच महत्वाचे आहेत. खुद्द ओशोंनी एकदा ‘मैने चांद की तरफ इशारा किया है…तुम उंगली को ही चांद मत समझ लेना’ या शब्दात साधकांना त्यांच्यात गुंतून न राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र ज्यांनी मार्ग दाखविला ते ओशो आणि ओशोंपर्यंत बोट धरून नेणारे अप्पा यांना विसरणार तरी कसे?

कुठेतरी वाचलेल्या (कदाचित स्वामी अगेह भारती यांच्या एका पुस्तकातील) या ओळी किती समर्पक आहेत!

यही है जिंदगी मेरी यही है बंदगी मेरी
की तेरा नाम आया और झुक गयी गर्दन मेरी ॥

आयुष्यात ज्यांचे नाव आल्याबरोबर झुकावे असे वाटणारे मोजके भेटले. यात अर्थातच ओशोंसोबत अप्पांचाही समावेश आहेच.

(आज बरोबर अप्पांचे देहावसान होऊन दहा वर्षे झालीत. अवचितपणे आठवणींचा वर्षाव झाला. घनांप्रमाणे मनही ओथंबून आले. अर्थात खूपच त्रोटक आराखडा आहे. कधी आत्मचरित्र लिहलेच तर सगळे काही येणार!)

About the author

shekhar patil

2 Comments

  • Shekhar tujya lekhanit mi swatacha suddha anubhav ghetla.pan Jya atmosphere madhe aaplyala urja milali.ti apratimach.tich appana samarpit.ti tyanche shivay v aaplyashivay kunihi janu shakat nahi

  • आप्पामुळेच ओशो माहित झाले ओशो चे पुस्तक विकत घयायला महिनियातुन एकदा आईचा पगार झाली की जळगांव वरुन भुसावल ला जायचे कधी कधी पैसे नसले तर पुस्तक वाचायला भुसावल ला जायचेो आप्पा मोटाी ,महाग पुस्तक वाचायला दंयायची फक्त पुस्तक च नाही आप्पा जेवण फळ वै खाऊ घालायचे असा माझा जीवनक्रम होता

Leave a Comment