चालू घडामोडी

मंथनाचे वर्तुळ पुर्ण व्हावे

निव्वळ धर्माच्या आधारावर हिंदू हे देशभक्त तर मुस्लीम देशद्रोही असे प्रमाणपत्र वाटणारी मंडळी जितकी असहिष्णू आहे तितकेच रहेमानसारख्या कलावंताविरूध्द फतवा जारी करणारे नव्हेत काय?

विख्यात पाकिस्तानी चित्रपट दिग्दर्शक शोएब मन्सूर याच्या चित्रपटांचा मी निस्सीम चाहता आहे. त्याच्या ‘खुदा के लिये’ या आपल्याला अक्षरश: अंतर्मुख करणार्‍या चित्रपटात जीवन आणि धार्मिक ढवळाढवळीतील संघर्ष इतक्या भेदकपणे दिग्दर्शीत केलाय की असा चित्रपट पाकिस्तानसारख्या देशात बनू शकतो? यावर आपला विश्‍वास बसणार नाही. चित्रपटाचे कथानक साधे आहे. दोन गायक भाऊ जीवनात दोन वेगळ्या वाटेने जातात. एक अमेरिकेत संगीताचे उच्च शिक्षण घेण्यासाठी जातो आणि ९/११च्या प्रक्षुब्ध वातावरणात नाहक पकडला जातो. तर दुसरा प्रतिभावंत असूनही कट्टरपंथियांच्या संगतीत आल्यानंतर अंतर्बाह्य बदलतो. इस्लाममध्ये संगीत ‘हराम’ असल्याचे त्याच्या मनावर ठसविण्यात आल्यानंतर तो आपल्या गायकीचा त्याग करून कट्टर धार्मिक विचारानुसार जीवन व्यतीत करतो. यात शेवटच्या भागात धर्म आणि दैनंदिन जीवनातील निखळ आनंद याच्यावर न्यायालयात जी काही चर्चा रंगते ती तुम्ही स्वत:च पहावी अशी माझी इच्छा आहे. याचा सार एकच आहे की, धर्माने एखाद्याच्या वैयक्तीक जीवन आणि सामूहिक वर्तनात कितपर्यंत ढवळाढवळ करावी? यावर विचार करणे आवश्यक आहे. आज हे सारे आठविण्याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या प्रतिभेची अमीट छाप उमटवणार्‍या ए. आर. रहेमान या संगीतकाराने आपल्या मनातील व्यक्त केलेली सल हेच होय.

काल पणजी येथे आयोजित आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलतांना रहेमान याने आमीर खानच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर भाष्य केले. त्याने आपल्यालाही असहिष्णूपणाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले. अलीकडेच माजिद माजिदी या विख्यात इराणी दिग्दर्शकाने मोहंमद पैगंबरांच्या जीवनावर आधारित ‘मोहंमद- द मॅसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाची निर्मिती केली. याचे संगीत रहेमानने दिले. हा खर तर भारतीय गुणवत्तेचा गौरव आहे. या चित्रपटासोबत त्याच्या संगीताचीही वाखाणणी करण्यात आली. मात्र यामुळे माजिद माजिदी आणि रहेमान यांच्यावर कट्टरपंथी संतापले. मुंबईतल्या रजा अकॅडमीने तर रहेमानच्या विरूध्द फतवा जारी केला. या कालखंडात आपण तणावग्रस्त असल्याचे रहेमानने सांगितले. विशेष बाब म्हणजे आज आमीर खानच्या सोबत उभे राहणार्‍या अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी या फतव्यानंतर रहेमानच्या दिल्ली आणि लखनऊमधील संगीत रजनी अर्थात कन्सर्ट रद्द केल्या होत्या ही बाब लक्षणीय आहे. आता ए. आर. रहेमान यालाही असहिष्णूपणाला सामोरे जावे लागले. मात्र ज्या पध्दतीने आमीरच्या बाजूने बुध्दीवादी व निधर्मी उभे राहिले त्याच पध्दतीने रहेमानची कुणी पाठराखण केली का? नाही म्हणायला काही हिंदुत्ववादी मंडळीने रहेमान याला ‘घरवापसी’चे आवाहन करण्याचा केलेला भंपकपणा वगळता त्याच्या सोबत कुणी ठामपणे उभे राहिले नसल्याचे आपण पाहिले.

कालच्या पोस्टमध्ये मी आमीर खानचे समर्थन केल्याने काहींना राग आला. यातील काही जणांनी मॅसेज करून तो व्यक्तही केला. मात्र आज याच्या दुसर्‍या बाजूवर विचार करण्याची गरज असल्याचे रहेमानच्या वेदनेवरून दिसून आले आहे. प्रत्येक बुध्दीवाद्याला धर्माची चिकित्सा व्हावी असे वाटते. यात काहीही गैर नाही. मात्र फक्त हिंदू धर्माची चिकित्सा करतांना अन्य धर्मातील अनिष्ट चालीरितींवर मौन पाळणे म्हणजे पुरोगामीत्व आहे का? मुर्तीपुजा जर अंधश्रध्दा असेल तर आकाशातल्या बापाची प्रार्थना वा अमूर्त ईश्‍वराची आराधना श्रध्दा कशी? यावर आज गांभिर्याने आणि सर्वांगाने विचार करण्याची गरज आहे. यावर वाद-प्रतिवाद अपेक्षित आहे. प्रत्येक धर्मात अनेक गोलमाल बाबी आणि बुध्दीप्रमाण्यवादाला नाकारणार्‍या परंपरा आहेत. विवेकवाद्यांनी या सर्वांचा निषेध करणे आवश्यक असले तरी तसे होतांना दिसत नाही. यामुळे निव्वळ धर्माच्या आधारावर हिंदू हे देशभक्त तर मुस्लीम देशद्रोही असे प्रमाणपत्र वाटणारी मंडळी जितकी असहिष्णू आहे तितकेच रहेमानसारख्या कलावंताविरूध्द फतवा जारी करणारे नव्हेत काय?

काही दिवसांपुर्वीच चळवळीतल्या मित्रासोबत गप्पा करत असतांना गणेशोत्सवाचा विषय आला. साहजीकच त्याने यावर कडाडून टीका केली. मात्र गणेशाच्या मुर्तीला पुष्पहार घालणे आणि एखाद्या अन्य महापुरूषाच्या पुष्पहार अर्पण करण्यात फरक काय? असा प्रश्‍न मी विचारला तेव्हा तो क्षणभर चमकला. बरोबर आहे ना! फक्त प्रतिके बदलून परिवर्तन होणार नाही. तर यासाठी आपल्याला विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी व्हावे लागणार आहे. यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘टॉलरन्स’ अर्थात सहिष्णूपणाच होय. आज अगदी निसर्गाला देव मानणार्‍या आदिवासींपासून ते विविध धर्म, तेवढेच विविध मते-मतांतरे प्रचलित आहेत. या सर्वांना सामावून घेणारी कोणतीही व्यापक विचारधारा जगात अस्तित्वात येऊ शकत नाही. तर यासाठी आपल्याला प्रत्येकाला लवचिक आणि सहिष्णू बनावे लागणार आहे. अहो निसर्गातही वैविध्य आहे. यामुळे भविष्यात कधी करी हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, बौध्द वा अन्य कोणत्या धर्माचे राज्य येईल हे मानणे म्हणजे दिवास्वप्नात रममाण होण्यासारखे आहे. यापेक्षा आपल्या भोवती अनेक मते मानणारे, विविध श्रध्दा असणारे आणि विविध धर्मांचे पालन करणारे असंख्य लोक असल्याचे एन्जॉय करा. हे वैविध्य आपल्याला मानवतेवरील विश्‍वास दृढ करण्यास भाग पाडेल. कधी काळी चिनी शासक माओ त्से तुंग याने खर्‍या समाजवादी समाजाच्या निर्मितीसाठी ‘ शेकडो फुले उमलू द्या अन् शेकडो विचारधारा जन्मू द्या!’ अशी काव्यात्मक हाक दिली होती. अर्थात खुद्द माओच्या चिनमध्ये साम्यवादी संकुचितपणाने कोट्यवधींच्या जीवनातील रस हिरावून घेतल्याचा रक्तरंजीत इतिहास आपल्यासमोर आहे. मात्र याच्या अगदी विपरीत माओची ही उक्ती भारतात दृश्य स्वरूपात अगदी गुण्यागोविंदाने अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. आज आपण भिन्नधर्मीय, जातीय, पंथीय, भाषिय, प्रादेशिक आणि राजकीय व सामाजिक विचारांना समावून घेतले आहे. अनेक घरांमध्ये तर ही विविधतेतील एकता प्रकर्षाने दिसून येते. याचा विचार करता आमीर खानच्या धर्मावरून त्याला देशद्रोही ठरविणारा जमाव आणि धर्मद्रोहाचा आरोप केल्याचा कांगावा करत रहेमानविरूध्द फतवा बजावणारी मंडळी ही एकाच विखारी मनोवृत्तीचे पालन करणारे आहेत. यातूनच आमीर खानला हिंदुत्ववादी मंडळी टार्गेट करत असतांना गळा काढणारा कंपू रहेमानच्या वेळी कुठे गायब झाला होता? हा प्रश्‍न कुणीही विचारू शकतो. याचे उत्तर दिले तरच भारतात विवेकवादी चळवळीस व्यापक जनाधार मिळू शकेल. अन्यथा फक्त हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींवर बोट ठेवणारे जर अन्य धर्मातील याच प्रकारावर गप्प बसत असतील तर भारतीय समाजातील दुभंगलेपणे अजून रूंदावणार आहे.

rahman

About the author

shekhar patil

Leave a Comment