राजकारण

भाजपची ‘वाट’ आणि ‘चाल’ !

भाजपच्या स्थापनेला आज ३५ वर्षे पुर्ण झालीत. हा पक्ष नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज असल्याचे आजचे चित्र आहे. मात्र ही वाटचाल वाटते तितकी सोपी नाहीच.

स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा कॉंग्रेसेतर राष्ट्रीय पक्ष असणाच्या भाजपच्या स्थापनेला आज ३५ वर्षे पुर्ण झालीत. ‘सांस्कृतिक राष्ट्रावादा’चा नारा बुलंद करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रावर स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न आज साकार झालेले आहे. केंद्रातील भक्कम मोदी सरकारसह आज अनेक राज्यांमध्ये भाजपचीच सरकारे आहेत. मोदी-शहा जोडीने भाजपला ‘पॅन इंडियन’ पक्ष बनविण्यासाठी जोरदार रणनिती आखली आहे. यातून नगण्य अस्तित्व असणार्‍या राज्यांमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. नुकताच भाजपने सदस्य संख्येबाबत जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याचा सन्मान मिळवला आहे. एका अर्थाने जमीनीवर भक्कम पाय रोवून हा पक्ष नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज असल्याचे आजचे चित्र आहे. मात्र ही वाटचाल वाटते तितकी सोपी नक्कीच नाही.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक राजकीय पक्ष उदयास आले अन् विलयास गेले. यातील बहुतांश पक्षांची विचारधारा दीर्घ काळ सत्ता उपभोगणार्‍या कॉंग्रेसच्या विरोधात होती. खरं तर राममनोहर लोहिया यांनी गैर कॉंग्रेसवादाचा हिरीरीने पुरस्कार केला होता. तेच या विचारधारेचे शिल्पकार मानले जात असले तरी तरी हिंदुत्ववादी, समाजवादी, साम्यवादी आदींपासून ते प्रादेशिक पक्षांनी कुठे तरी कॉंग्रेस विरोधाचाच आधार घेतल्याचे उघड आहे. या पार्श्‍वभुमीवर देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय जनसंघ’ स्थापन झाला तरी कॉंग्रेसला समर्थ पर्याय देण्यात हा पक्ष अपयशी ठरला. आणीबाणीनंतरच्या धगधगत्या वातावरणात जनसंघाचा जनता पक्षात विलय झाला. पक्षाचे नेते सत्तेत सहभागी झाले. मात्र नेत्यांच्या अहंकाराने ही मोट फार काळ टिकली नाही. यातच जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी निष्ठेबाबतचे आरोपही याला जबाबदार होते. जनता पार्टीच्या ठिकर्‍या उडल्यानंतर जनसंघाच्या नेत्यांना नव्हे खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्या राजकीय पक्षाची गरज होतीच. यातून सहाव्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला तेव्हा तळागाळापासून पक्षाला नव्याने बांधणी करावी लागणार हे निश्‍चित होते. पक्षाचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा हटेगा कमल खिलेगा’ असा आशावाद प्रकट केला तरी पहिल्या दशकाच्या प्रारंभी भाजपच्या प्रचार, प्रसाराला असणार्‍या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. इंदिराजींच्या हत्येनंतर १९८४च्या लोकसभा निवडणुकीतील सहानुभुतीच्या लाटेत अन्य पक्षांप्रमाणे भाजपचीही वाताहत झाल्यानंतर तर पक्ष नेतृत्वासह कार्यकर्ते सैरभैर झाले. मात्र राजीव गांधी यांनी अतिआत्मविश्‍वासात राम जन्मभुमी आंदोलनास गती दिल्यानंतर भाजपला दिल्लीतील सिंहासनापर्यंत घेऊन जाणारा रस्ता मिळाला.

राज जन्मभुमीच्या प्रक्षोभक कालखंडातच मंडल आयोगाने दुसर्‍या ज्वलंत प्रश्‍नाला जन्म दिला. यातून अनेक अन्य मागासवर्गीय समुहांना राजकीय आत्मभान आले. अयोध्येच्या मुद्यासोबत भाजपच्या नेतृत्वाने अत्यंत कुशलतेने नव्वदच्या दशकात अनेक ओबीसी नेत्यांना लॉंच केले. या दुरदृष्टीचा पक्षाला खुप लाभ झाला. याचाच परिपाक म्हणजे याच समुहातील नरेंद्र मोदी यांच्या हातात आज देशाची धुरा सोपविण्यात आली आहे. मंडल व कमंडलचे राजकारण हे वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरूध्द वाटत असले तरी भारतीय जनता पक्षासाठी मात्र ते लाभदायक ठरले हे मात्र निश्‍चित. यातून पक्षाला केंद्रात सत्ता मिळाली. अटलजींना सहकारी पक्षाच्या कुबड्यांची गरज भासली. मोदींनी तर स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, भाजपचा ताळेबंद हा लोकसभेतील दोन जागांपासून ते २८२ जागांइतकाच मर्यादीत नाही. या कालखंडात भाजपने अनेकदा लवचिक आणि अगदीच स्पष्ट म्हणायचे तर राजकीय लाभासाठी व्यवहारवादी भुमिका घेतली. जनसंघ ते भाजप या वाटचालीचा आढावा घेतला असता आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ हा दिनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्मिक मानववादा’च्या मार्गे कट्टर हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत आज नरेंद्र मोदी यांच्या विकासवादापर्यंत येऊन पोहचल्याचे दिसून येते. आज राम जन्मभुमी, समान नागरी कायदा आदी महत्वाच्या मुद्यांना सोयिस्करपणे गुंडाळून ठेवण्यात आले असले तरी वेळ पडल्यावर ते पुन्हा समोर येऊ शकतात. आता एकाच वेळेला या सर्व विचारांना जपत भाजपचा गाडा हाकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे खासमखास तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावयाचे आहे. मात्र त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानेदेखील आहेत.

भाजप नेत्यांवरील संघाचा असणारा ‘रिमोट कंट्रोल’ हा अनेकदा अधोरेखित होत असतो. यावरून अनेकदा टिका तसेच खिल्लीदेखील उडविण्यात येत असते. याप्रमाणे मोदींपासून भाजपच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांवर संघाचा आजही वचक आहेच. मात्र इतिहासात आज प्रथमच मोदी यांच्या रूपाने एखादे नेतृत्व संघाला डोईजड झाल्याचेही चित्र आहे. मध्यंतरी संघ भाजपमधील काही बोलभांड नेते तथा संघ परिवारातील सदस्यांनी मोदींना अडचणीत आणण्यासाठी जाणीवपुर्वक वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप झाला होता. ‘घरवापसी’सारख्या मोहिमादेखील पंतप्रधानांना अडचणीत आणणार्‍या ठरल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांचे विमान जमीनीवर आणण्यासाठी संघाने ‘आप’ला रसद पुरवल्याची राजकीय वर्तुळात झालेली कुजबुजदेखील या अर्थाने सुचक अशीच आहे. एका अर्थाने भविष्यात संघ नेतृत्व मोदींना आवर घालण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करेल हे निश्‍चित. मात्र हे होत असतांना मोदी-शहा या दुकलीने याच ‘स्टाईल’ने अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अडसर दुर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. एक तर केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आदींना मंत्रीपदापासून वंचित ठेवून त्यांनी अर्धे काम आधीच केले होते. आता मंत्रीमंडळ विस्तारात कलराज मिश्र यांच्यासारख्या ज्येष्ठाला घरी बसविण्याची तयारी सुरू झाली आहे. या बाबींचा विचार करता येत्या काळात मोदींना आवर घालण्याच्या प्रयत्नात संघ; तर अन्य सहकार्‍यांना मुठीत ठेवण्यासाठी मोदींचे प्रयत्न या बाबी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर गंभीर परिणाम होणार आहे. परिणामी पक्षाच्या आगामी वाटचालीत अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणामुळे गतिरोध येऊ शकतो. भाजपमध्ये आजवर कलह नव्हते असे कुणी म्हणणार नाही. याचे अनेक अध्याय पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत आपल्या समोर घडलेत. मात्र अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे दिग्गजही ज्या पध्दतीने शालीनतेने एकमेकांशी वागले त्याचाच कित्ता आत्मविश्‍वासाचे वारे संचारलेले मोदी यांना जमेल का? यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. आज अटल व अडवाणी यांचा भाजप हा मोदी आणि शहा यांच्याकडे हस्तांतरीत झाल्याचे चित्र आहे. मात्र पक्षाचा गाडा हाकतांना आपल्या पुर्वसुरींचे चातुर्य, लवचिकता, औदार्य आणि अर्थातच सर्वसमावेशकता मोदी व शहा यांना दाखवावी लागणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आहे. यानंतरच्या विविध राज्यांमधील निवडणुकांमधून तरी खरोखर कॉंग्रेसचा सफाया झाला. हे करत असतांना देशात आपला पक्ष ‘शत-प्रतिशत’ वाढविण्यासही त्यांनी प्राधान्य दिले आहे. यातून महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या विश्‍वासू मित्रासोबत काडीमोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जम्मू-काश्मिरात पीडीपीसारख्या नवीन पक्षासोबत मैत्री करण्यात आली. भाजपच्या या नितीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे. भाजपच्या आगामी वाटचालीत मित्रपक्ष जोडणे आणि तोडणे याबाबत पक्षाचे नेतृत्व कसा पवित्रा घेते यावरही राजकीय यशापयश ठरणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे नगण्य अस्तित्व आहे. येथे पक्षाला भक्कम करण्यास प्राधान्य देण्याची रणनिती आपल्याला दिसून येत आहे. आगामी काळात आसाम, पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू आदींसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील यशापयश हे महत्वाचे ठरणार आहे. यानंतर उत्तरप्रदेशच्या विधानसभेतही लोकसभेचा चमत्कार घडावा ही अपेक्षा आहेच.

‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवत मोदी सरकार सत्तारूढ झालेय. अल्प काळात त्यांनी काही प्रमाणात तरी दमदार पावले टाकली आहेत. मात्र हे सरकार भांडवलदारांचे असल्याचा आरोप होतोय. धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक न्यायचा प्रश्‍नही आहेच. यातच भुसंपादन विधेयकावरून विरोधकांनी रान उठविले आहे. दिल्लीतील विजयाने केजरीवाल आणि कंपूचा आत्मविश्‍वास दुणावलाय. कॉंग्रेसही मरगळ झटकून भाजपशी दोन हात करण्याच्या पवित्र्यात आहे. विशेष म्हणजे मुलायमसिंग, लालूप्रसाद, नितीश, शरद यादव, देवेगौडा आदी मंडळी जनता परिवाराच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याच्या प्रयत्नांत आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि काही प्रमाणात कर्नाटकात भाजपच्या झंझावाताला एकत्रित जनता परिवाराने काही प्रमाणात तरी थोपवले तरी भाजपच्या आगामी रणनितीला धक्का पोहचू शकतो. आधीच या दोन्ही राज्यांमधील पोट निवडणुका आणि बिहारमधील सत्तांतराच्या नाट्यात जनता परिवाराच्या ऐक्याची ताकद भाजपला दिसली आहे. तर इकडे कॉंग्रेसही नव्या दमाने समोर येऊ शकते. म्हणजे-भ्रष्टाचारविरोधी व स्वच्छ प्रशासनाचा नारा बुलंद करणारे अरविंद केजरीवाल, राहूल वा प्रियंकाच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आणि एकत्रित जनता परिवार यांच्याशी भारतीय जनता पक्षाला आगामी काळात झुंज घ्यावयाची आहे. यातच काही प्रादेशिक सुभेदारांशीही दोन हात करावेच लागणार आहेत. या सर्व अडथळ्यांवर मात केल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचे ‘शत-प्रतिशत’चे स्वप्न खर्‍या अर्थाने पुर्ण होणार आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment