चालू घडामोडी राजकारण

भाजपचा ‘माइंड गेम’

प्रतिस्पर्ध्याला पुर्ण नामोहरम करण्यासाठी त्याचे मानसिक खच्चीकरण आवश्यक असते हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील नियम राजकारणालाही लागू होतो. या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने शिवसेना या आपल्या निवडणुकीआधीच्या मित्रपक्षाला जेरीस आणतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही सुरक्षित अंतरावर ठेवत राजकीय चातुर्य दाखविले आहे.

प्रतिस्पर्ध्याला पुर्ण नामोहरम करण्यासाठी त्याचे मानसिक खच्चीकरण आवश्यक असते हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील नियम राजकारणालाही लागू होतो. या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने शिवसेना या आपल्या निवडणुकीआधीच्या मित्रपक्षाला जेरीस आणतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही सुरक्षित अंतरावर ठेवत राजकीय चातुर्य दाखविले आहे.

मुळातच महाराष्ट्रात सत्ताधार्‍यांच्या विरोधी वातावरण असल्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला दणदणीत यश मिळेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नव्हती. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालातून याचे संकेतही मिळाले होते. यातच या दोन्ही पक्षांच्या जोडीला रिपाइंचा आठवले गट, स्वाभीमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी समाज पक्ष आणि शिवसंग्राम आल्याने महायुतीची ताकद अजूनच वाढली होती. मात्र जागा वाटपावरून गत २५ वर्षांपासून अबाधित असणारी युती तुटली. सर्व घटकपक्ष भाजपसोबत गेले. अर्थात युतीपाठोपाठ आघाडीही तुटली. आता युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी तुटल्याचे जाहीर करण्यासाठी पडद्याआड नेमके काय झाले असावे याचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलीच मिळाले. निकालातून भारतीय जनता पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्याचे जाहीर होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसने न मागता त्यांना बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली. यातून एका क्षणात शिवसेनेचे उपद्रवमुल्य समाप्त तर झालेच पण राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्मित करण्यात शरद पवार यशस्वी झाले. खरं तर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतांना भाजपने शिवसेनेला सोबत घ्यावे ही संघाची इच्छा आहे. एक तर दोघांची विचारधारा समान असून त्यांनी एकमेकांशी वैमनस्य पत्करल्यास राजकारणातील हिंदू शक्तीचे विभाजन होऊन याचा सरळ लाभ विरोधकांना होण्याची शक्यता असल्याचा धोका संघाने ओळखून शिवसेनेसोबत बोलणीचे निर्देश दिले. यानुसार भाजपची शिवसेनेसोबत बोलणी सुरू झाली तरी यावर कोणताही निर्णय न होताच भाजपने आपल्या मंत्र्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू करून शिवसेनेवर दबाव आणला आहे.

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात तब्बल १५ वर्षांनंतर सत्तेत सहभागी होत असल्याने त्यांच्या मातब्बर नेत्यांनी महत्वाती खाती मिळावी म्हणून लॉबिंग करण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राप्रमाणेच राज्यातही आटोपशीर मंत्रीमंडळाची सुचना देऊन त्यांना दणका दिला. यामुळे ४२ मंत्र्यांपैकी निम्मे वा त्याहून कमी मंत्रीपदे पदरात पाडून घेण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांना सुरंग लागला. यानंतर २८ जणांच्या मंत्रीमंडळात भाजपला १८ तर शिवसेनेला ९ असा नवीन फॉर्म्युला समोर आला. यातही महत्वाची खाती भाजप ठेवणार असल्याची अट टाकण्यात आली. जागा वाटपाचा तिढा कायम असतांनाच आता शिवसेनेने भाजप नेत्यांची जाहीर माफी मागण्याची अट टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे करतांना भाजपने नवीन पवित्रा घेतला आहे. युती तुटल्याची बातमी दिल्लीतून राजीवप्रताप रूडी यांनी पत्रकारांना सुचकपणे दिली होती. यावर सायंकाळी शिक्कामोर्तब झाले होते. याचप्रमाणे शिवसेनेच्या माफीची मागणी केंद्रातील भाजपच्या एका मंत्र्याकडून करण्यात आल्याची बातमी पेरण्यात आल्याने शिवसेना नेतृत्व हैराण झाले आहे.

युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर अत्यंत जळजळीत भाषेत टीका केली होती. यातच पक्षाचे मुखपत्र असणार्‍या ‘सामना’तूनही त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती. विधानसभा निकालानंतर भाजप सुतासारखा सरळ येत सहकार्याची याचना करेल असा शिवसेनेचा होरा होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने विनाशर्त पाठींबा आणि विश्‍वासदर्शक ठरावाप्रसंगी अनुपस्थित राहण्याची घोषणा करून शिवसेनेच्या शिडातील हवाच काढून टाकली आहे. याचमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतातील सरकार स्थापन होण्यास फारसा अडथळा उरलेला नाही. सद्यस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस बाहेरून पाठींबा देत असल्याने त्यांचे सरकार सुरक्षित आहे. अर्थात भविष्यात ते एक तर सत्तेत वाटा मागू शकतात वा पडद्याआड काही तडजोड करू शकतात हा धोका लक्षात घेता शिवसेनेशी बोलणी करण्याचे नाटकही भाजपने पध्दतशीरपणे वठविले आहे. परिणामी एका वेळी दोन पर्याय राखून ठेवण्याची किमयादेखील त्यांनी साध्य केली आहे. अंतर्गत गोटातील हालचालींचा विचार करता संघाच्या दबावामुळे भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेची सोबत घेऊ शकतो. मात्र यासाठी तह करतांना आजवर झालेल्या अपमानाचे उट्टे काढत भविष्यातही या पक्षाचे नेते डोईजड होऊ नये तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावालाही झुगारून लावण्याची तजवीज करण्यात आली आहे. यातच घटकपक्षही आता याचकाच्या भुमिकेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी महाराष्ट्र विधानसभेत स्पष्ट बहुमत नसूनही सर्वच पातळ्यांवर भाजप निश्‍चिंत असल्याचे आजचे चित्र आहे. अर्थात सरकार सत्तारूढ होण्याआधी दाखविलेले हे चातुर्य सरकार चालवतांना दाखविण्यात देवेंद्र फडणवीस यांचा खरा कस लागणार आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment