चालू घडामोडी चित्रपट

‘बोल’ आणि अस्वस्थ करणारे प्रश्‍न !

पाकिस्तानसारख्या कट्टरपंथी देशात कथित धार्मिकतेवर कडाडून प्रहार करणारा आणि अनेक मुलभुत समस्यांना हात घालणारा हा सिनेमा आपल्या मनात अनेक प्रश्‍नांचे मोहळ निर्मित करतो.

नव्या पिढीचा प्रतिभावंत पाकिस्तानी निर्माता आणि दिग्दर्शक शोएब मन्सूर यांचा ‘बोल’ चित्रपट रविवारी पुन्हा पाहिला. पाकिस्तानसारख्या कट्टरपंथी देशात कथित धार्मिकतेवर कडाडून प्रहार करणारा आणि अनेक मुलभुत समस्यांना हात घालणारा हा सिनेमा आपल्या मनात अनेक प्रश्‍नांचे मोहळ निर्मित करतो.

Bol

शोएब मन्सूर यांचा याआधीचा ‘खुदा के लिए’ (२००८) हा पहिलाच चित्रपट बराच गाजला होता. पाकिस्तानसारख्या देशात इस्लाम, दहशतवाद आणि कट्टरतेला थेट हात घालणार्‍या या कलाकृतीची वाखाणणी करण्यात आली होती. यानंतर त्याच्याकडून वाढलेल्या अपेक्षा २०११ साली आलेल्या ‘बोल’ने पुर्ण केल्या. हा खरं तर मेलोड्रामाच्या अंगाने जाणारा असला तरी यातील धक्कातंत्र आपल्याला खिळवून ठेवते. आपल्या वडिलांच्या खुनाच्या आरोपावरून फासावर जाणारी जैनब ही तरूणी मृत्युपुर्वी मीडियासमोर आपली कथा सांगण्याची शेवटची इच्छा व्यक्त करते. पाकचे राष्ट्राध्यक्षही ही विचित्र असणारी अट मान्य करतात आणि यातूनच कथानक सुरू होते. या चित्रपटात पाकिस्तानी समाजातील चार वर्गांच्या जीवनाचे समांतर व अत्यंत समर्पक वर्णन करण्यात आले आहे. एक आहे धर्मग्रंथातील नितीनियम आणि भारतीय उपखंडातील सरंजामी आणि पुरूषप्रधान मनोवृत्तीचे समर्पक उदाहरण असणारा हकीम शफुल्लाह. दुसरा त्याचाच शेजारी शिक्षक आणि त्याचे पुरोगामी विचारांचे घराणे. तिसरा लाहोरच्या बदनाम हिरा मंडीतील दलाल सका कंजर आणि त्याचा भोवताल तर चौथा सैफुल्लाहच्या माध्यमातून तृतीयपंथियांच्या व्यथा-वेदना आणि त्यांच्या विश्‍वाची झलकही आपल्याला मिळते.

मुलाच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीला वारंवर गर्भवती करणार्‍या हकीम शफुल्लाहच्या घरी अखेर मुलगा जन्मतो. मात्र तो तृतीयपंथीय असल्याचे लक्षात येताच तो हादरतो. या मुलास तातडीने मारण्याचा तो निर्णय घेतो. मात्र पत्नी आड आल्याने तो हे टाळतो. मात्र आपला हा मुलगा (सैफुल्ला) त्याच्या ह्दयातील काटा बनतो. तो मोठा झाल्यानंतर त्याच्यावर बलात्कार झाल्यामुळे संतापलेल्या शफुल्ला अखेर त्याचा जीव घेतो अन् येथूनच त्याच्यावर संकटांची मालिका सुरू होते. याचा त्याच्या कुटुंबियांनाही फटका बसतो. अर्थात यातच त्याला आपला जीव गमवावा लागतो. ‘बोल’ ही उद्ध्वस्त होत जाणार्‍या एका कुटुंबाच्या कथेइतकीच मर्यादीत नाही तर यातून अनेक घटनांवर भाष्य करण्यात आले आहे. जगातील बहुतांश संस्कृती पितृसत्ताक आहेत. यामुळे लैंगिक पातळीवरून दुजाभावही सर्वत्र आढळतो. तथापि भारतीय उपखंडात टोकाचा लिंगभेद आढळतो. वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहण्यात येते. यातून मुलींना साहजीकच दुय्यम स्थान मिळते. मुलगा होण्याच्या हव्यासापोटी सध्या गर्भलिंगाचे निदान करण्याची सुविधा असली तरी आधीच्या पिढीत याचमुळे बायकांवर अनेक बाळंतपणे लादली जात असत. हकीम शफुल्लाहदेखील याचप्रकारे मुलाच्या हव्यासापोटी पत्नीची प्रकृती आणि मनोदशेची जराही पर्वा न करता आपल्या पुरूषत्वाचा हक्क बजावत राहतो. यातच त्याला काळाची पावलेही ओळखता येत नाहीत. यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असणार्‍या हकीमी व्यवसायात तो रमतो. जमानाच खराब असल्याने अॅलोपॅथी डॉक्टरांची चलती असल्याचा युक्तीवाद तो करतो. यामुळे मर्यादीत नव्हे तर दिवसागणीक कमी होत जाणारे उत्पन्न आणि घरात खाणारी वाढती तोंडे अशा दुष्टचक्रात तो सापडतो. तसा तो पापभिरू असतो. समाजात त्याच्या नैतिकतेला मोठा सन्मान असतो. एक भला माणूस म्हणून त्याची ख्यातीदेखील असते. तसा तो अगदी ह्दयापासून धार्मिकही असतो. मात्र याच धार्मिक आणि सामाजिक नितीनियम पाळणार्‍या माणसाचा कुटुंबातील चेहरा वेगळाच असतो. आपली पत्नी आणि मुलींचा पाणउतारा करण्यापासून ते मारपीट करणे नित्याचेच असते. यातच शफुल्लाहची घटस्फोटीत बंडखोर मुलगी जैनब अनेकदा त्याला वस्तुस्थितीचा आरसा दाखविण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा नेहमीच तिळपापड होतो.

शफुल्लाहच्या कुटुंबाच्याच बाजूला राहत असलेले अख्तर हुसेन या शिक्षकाचे कुटुंब सुसंस्कृत असते. खरं तर त्यांचेही मर्यादीत कुटुंब असले तरी त्यांना फक्त एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने ते आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण तर देतातच पण आयुष्य अगदी मजेतही जगतात. मुले ही ईश्‍वरी देण असल्याची खुळचट समजुत प्रत्येक धर्मात प्रचलित आहे. यामुळे पृथ्वीतलावरील जवळपास प्रत्येक धर्मातील ढुढ्ढाचार्य हे आपापला धर्म वाढविण्यासाठी गर्भपात वा कुटुंब नियोजनाला उघड विरोध करत असतात. नेमक्या याच प्रवृत्तीवर ‘बोल’मध्ये प्रहार करण्यात आले आहे. यातूनच जर आपण मुलांचे योग्य प्रकारे पालनपोषण करू शकत नसेल तर त्यांना व्यर्थ जन्म देण्याचे कारण काय? हा प्रश्‍न प्रखरतेने विचारण्यात आला आहे. यावरूनच एकदा जैनबचे आपल्या वडिलांशी खटका उडतो. वडील तिला आपण ईश्‍वरी आज्ञेनुसार आपला ‘उम्मत’ अर्थात धर्म वाढण्यासाठी मुले जास्त पैदा करण्याचा तर्क देतो तेव्हा ती याची खिल्ली उडवते. यामुळे मृत्यूच्या दारात असणारी जैनब जेव्हा संतापून ‘खिला नही सकते तो पैदा क्यु किया?’ असा प्रश्‍न विचारते तेव्हा तो जगातील तमाम अभावग्रस्त अपत्यांचा प्रातिनिधीक प्रश्‍न बनतो. याचसोबत ‘खून करणे जर पाप असेल तर जन्म देणे का नव्हे? हा तिचा अन्य प्रश्‍नही तितकाच कुणालाही अंतर्मुख करणारा आहे.

‘बोल’मध्ये अगदी थोड्या वेळासाठी लाहोरच्या रंगेल हिरा मंडीचे वर्णन आले आहे. प्रारंभी सका हा दलाल गरीब हकीम शफुल्लाहला आपल्या मुलांना कुराण शिकवण्याची आळवणी करतो तेव्हा तो धुडकावून लावतो. मात्र अडचणीच्या काळात हकीमच हिरामंडीकडे पावले वळवितो. या दोघांचे जग वेगळे आहे. हकीमला मुली होत असल्याने तो घायकुतीस आलेला असतो तर सका हा मुले होत असल्याने दु:खी असतो. हकीमच्या घरात कमावणारा पुरूष एक आणि खाणारे अनेक तर सकाच्या घरी कमावणारी महिला (मीना) एकच आणि खाणारे अनेक असतात. यामुळे पांढरपेशा जगात मुलांचा हव्यास तर बदनाम व्यवसायात मुलींची आकांक्षा आदींचा विरोधाभास आपल्याला ठळकपणे दिसतो. यामुळे नैतिक जगात मुलींना जन्म देऊन स्वत:च्या नजरेत पडलेला हकीम त्याच कारणाने सकाला आपलासा वाटतो. यातूनच तो आपल्या बाईला (ती रखेल, पत्नी की प्रेयसी हा उल्लेख गौण असल्याची त्याची वागणूक असते.) मुलगी व्हावी म्हणून हकीमने तिच्याशी शरीरसंबंध करावे म्हणून गळ घालतो तेव्हा आपल्याला धक्का बसण्यावाचून राहत नाही. एवढेच नव्हे तर हकीम याने याच प्रकारे मुली दिल्यास किंमत वाढविण्याची ऑफरही तो देऊन टाकतो. या सिनेमात ‘मीना’ या तवायफची भुमिका अल्प काळासाठी असली तरी अत्यंत महत्वाची आहे. ही स्त्री अत्यंत संवेदनशील असते. नर्तकीच्या पेशासाठी असणारी लखनवी अदब मोठ्या प्रयत्नांनी आत्मसात केलेली मीना एका क्षणात आपल्या एका ‘ग्राहका’ला पंजाबीतून अक्षरश: शिव्या देत हाकलते. एका क्षणात तिचा मुखवटा आणि चेहरा प्रेक्षकांना दाखविण्यात शोएब मन्सूर यांना यश आले आहे.

या चित्रपटात सैफुल्लाहच्या माध्यमातून तृतीयपंथियांची दुर्दशाही भेदकपणे दर्शविण्यात आली आहे. काही पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये तृतीयपंथिय सन्मानाने जगत असले तरी भारतीय उपखंडात त्यांची दुर्दशा अजून संपलेली नाही. त्यांना हेटाळणीने पाहिले जाते. यामुळे हकीम शफुल्लाह यांच्या घरात ‘ते’ बाळ जन्माला आल्यानंतर दाई एका हिजड्याला ते विकण्याची गळदेखील घालते. मात्र तसे झाले नसले तरी हकीम कधी आपल्या या अपत्याकडे प्रेमाने पहातही नाही. शहराच्या बाहेर असणार्‍या गॅरेजवर तृतीयपंथियांशी शरीरसंबंध करणारे पेंटर्स असतात. त्यांच्या भोवती तृतीयपंथियांचा वावरही असतो. यातूनच सैफुल्लाहवर बलात्कार झाल्यावर त्याला एक हिजडाच घरी सुरक्षित पोहचवतो. तर या अपमानाने संतप्त झालेला हकीम सैफुल्लाहचा बळी घेतो. याबाबत फौजदार हकीमची चौकशी करतांना याबाबत विचारणा करतो तेव्हा तो ‘इज्जत’साठी आपण त्याचा मारल्याचे सांगतो. यावर पटकन तो उदगारतो की, ‘‘इज्जतसाठी तर मुली मारल्या जातात…!’’ यातून मुलींच्या जीवाची तर किंमत समाजाला नाहीच पण तृतीयपंथिय तर याहूनही खालच्या पायरीवर असल्याचा समज दृढ झाल्याचे आपोआप स्पष्ट होते. तृतीयपंथिय असणे हे फार तर एका प्रकारचे अपंगत्व असले तरी ते अजूनही भारतीय उपखंडात स्वीकार्य नाही हेच खरे!

‘बोल’ चित्रपटातील संवाद हे अतिशय मर्मस्पर्शी आहेत. यामुळे जैनब निर्विकारपणे ‘मै कातिल जरूर हू…गुनहगार नही’ असे म्हणते तेव्हा अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. जैनब आपल्या वडिलांशी वादविवाद करतांना अनेक धार्मिक समजुतींना आव्हान देते. अगदी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवाले खुदाची आळवणी करतात तर भारतीय भगवानला संकटात टाकतात असे ती छद्मीपणे म्हणते. तर संपुर्ण पाकिस्तान अल्लाहची आळवणी करूनही गेल्या १६-१७ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचाच संघ विजयी का होतो? असा प्रश्‍न विचारल्यानंतर साहजीकच शफुल्लाह संतापाशिवाय काहीही व्यक्त करू शकत नाही. हिरा मंडीतील दलाल शीका हा शफुल्लाह याला अगदी हसत-हसत ‘‘येथे कुणालाच बापाचे नाव माहित नाही…मलाही नाही…कधी गरजच पडली नाही’’ असे म्हणतो तेव्हा जणू ती संपुर्ण वस्तीच त्याच्या मुखातून बोलते. नर्तकी मीना हीदेखील ‘निकाह तुम्हारी जरूरत है…हमारी नही’ असे सांगते तेव्हा शफुल्लाहचे कथित नैतिक विश्‍व आणि तिच्या जगातील फरकही भेदकपणे दिसून येतो.

‘बोल’ हा चित्रपट मुख्यत: हकीम शफुल्लाह आणि त्याची मुलगी जैनब यांच्याभोवती फिरतो. या दोघांच्या भुमिका अनुक्रमे मंजर सेहबई व हुमैमा मलिक यांनी अत्यंत तन्मयतेने वठविल्या आहेत. अन्य कलावंतांनीही आपापल्या भुमिकांना न्याय दिला आहे. चित्रपटातील गिते सुश्राव्य असली तरी ती चित्रपटाच्या कथेइतकी मनाची पकड घेत नाही हेदेखील तितकेच खरे. अगदी गाणी नसती तर चित्रपट अजून परिणामकारक झाला असता. ‘बोल’मध्ये अनेक अतिरंजीत प्रसंग असले तरी यातील कथानक आणि यातील संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात दिग्दर्शक शोएब मन्सूर हा यशस्वी झालाय. ‘बोल’मध्ये अनेक प्रश्‍न विचारण्यात आले असले तरी हा चित्रपट पाहून आपल्या मनात नवीन प्रश्‍न तयार होतात. एक तर ईशनिंदेचे नियम कडक असणार्‍या पाकिस्तानसारख्या कट्टर देशात इतक्या धाडसी चित्रपटाला परवानगी मिळालीच कशी? हा प्रश्‍न साहजीक मनात येतो. अर्थात याच कट्टर देशातील एक वर्ग आता प्रगतीचा आणि अर्थातच वास्तव विचारांनी पुढे जात असल्याचे यात स्पष्ट दर्शविण्यात आले आहे. यात पाकिस्तानातील शिया-सुन्नी संघर्षाची सुक्ष्म किनारही आपल्याला दिसून येते. तसेच पाकी जनतेवरील भारतीय पॉप कल्चरचे गारूड तर ठसठशीत स्वरूपात समोर येते. धर्म, धर्माचे जीवनातील स्थान, याचा आपापल्या परीने लावण्यात आलेला अर्थ, नैतिकतेचे बेगडी नियम, तृतीयपंथियांची वेदना, मोठ्या कुटुंबातील अडचणी, मुलगी ‘नकोशी’ असल्याची प्रवृत्ती आणि अत्यंत घमेंडी सरंजामी पुरूषी मानसिकता आणि या सर्वांना तोंड देणारी बंडखोर तरूणी याचे भेदक चित्रण पाहण्यासाठी ‘बोल’ अवश्य पहा.

bol1

About the author

shekhar patil

Leave a Comment