Featured slider राजकारण

बडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले !

Written by shekhar patil

विश्‍व हिंदू परिषदेचे फायरब्रँड नेते आणि खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचे अघोषीत ब्रँड अँबेसेडर प्रवीण तोगडिया यांना कधी काळी याच संघटनेतून बाहेर जावे लागेल असे कुणी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. खरं तर, गेल्या काही महिन्यांपासून तोगडिया यांनी जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेल्या ड्रामेबाजीमुळे त्यांची ही दुर्गती होणार हे केव्हाच स्पष्ट झाले होते. मात्र यावर शिक्कामोर्तब होत असतांनाची त्यांची झालेली अवस्था ही आपला अवाका लक्षात न घेता उराशी बाळगलेल्या अचाट महत्वाकांक्षेतून ओढवल्याचे अधोरेखीत झाले आहे.

कोणताही राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनांमधील सत्ता संघर्षाची अनेक मासलेवाईक उदाहरणे स्वातंत्र्योत्तर भारताच्या कालखंडात आपल्याला दिसून येतात. थेट नेतृत्वालाच अथवा संघटनेवर पूर्ण पकड असणार्‍यांना आव्हान देणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी तर्‍हेतर्‍हेचे प्रकार यातून समोर आले आहेत. यातील हकालपट्टी अथवा निलंबन हा तसा सरळसोपा उपाय आहे. अडगळीत टाकणे हा दुसरा प्रकार आहे. अडगळीत टाकून त्रास देत स्वत:हून बाहेर पडण्यास भाग पाडणे हा तिसरा ‘पॅटर्न’ होय. तर लोकशाही मार्गाचा दिखावा करत अगदी डिप्लोमॅटीक पध्दतीने धुळीस मिळवण्याचा चौथा प्रकारदेखील क्वचितप्रसंगी वापरण्यात येतो. प्रवीण तोगडिया यांचा ‘गेम’ हा चौथ्या प्रकाराने करण्यात आला. गत दोन दशकांचा विचार केला असता, तोगडियांची तुलना सिताराम केसरी यांच्याशी करता येईल. खरं तर एकीकडे मोठा राजकीय पक्ष तर दुसरीकडे याच प्रकारची मोठी संघटना, एकीकडे गांधी घराण्याचा दृश्य ‘रिमोट कंट्रोल’ तर दुसरीकडे संघ परिवाराची मजबूत पकड अशा बाबी समान दिसून येतात. केसरी यांना गांधी घराण्याच्या मजबुतीचा अंदाज आला नाही. तर तोगडियांना आपली उपयुक्तता कधीच संपल्याचा अगदी सुगावादेखील लागला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदासारखी अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळणार्‍या सिताराम केसरी यांना अतिशय भयंकर अपमान करत आणि विशेष म्हणजे धक्काबुक्की करून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. तर विंहीपमध्ये तोगडिया यांच्यासाठी अतिशय सुनियोजीत पध्दतीने बाहेरचा रस्ता तयार करण्यात आला. अर्थात याची पूर्वपिठीका अलीकडच्या कालखंडातील घटनांमध्ये आपल्याला दिसून येते.

जानेवारी महिन्याच्या मध्यावर अचानक तोगडिया हे त्यांच्या राहत्या घरून गायब झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच प्रचंड खळबळ उडाली होती. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये राहणार्‍या तोगडिया यांचे अपहरण तर झाले नाही ना? अशी शंका उपस्थित झाली. अनेकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशयदेखील व्यक्त केला. मात्र काही तासानंतर तोगडिया यांचा शोध लागला. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. हे प्रकरण आहे तरी काय? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतांनाच खुद्द प्रवीण तोगडिया हे जगासमोर अवतरले. व्हीलचेअरवर बसून आणि अगदी हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. यात तोगडिया यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. त्यांनी अगदी अश्रूभरल्या डोळ्यांनी गुजरात व राजस्थान सरकारसह केंद्र सरकार आपल्या विरूध्द असल्याचा आरोप केला. अगदी आपल्या एन्काऊंटरची तयारी असल्याचा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला. अर्थात तोगडियांच्या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली. ऐन गुजरात निवडणुकीआधीच तोगडियांच्या या आरोपांनी संघ परिवार आणि अर्थातच सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अस्वस्थतेचे वातावरण पसरले. त्यांनी या पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर शरसंधान केल्यानेही आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. आपण मोदींना भेटण्याची वेळ मागत असलो तरी ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर झालेल्या गुजरातच्या निवडणुकीत तोगडिया यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार केला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राम मंदिराच्या आश्‍वासनाची पूर्तता केली नसल्यापासून ते शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याच्या आरोपांच्या अनेक फैरी त्यांनी झाडल्या. मुळातच या निवडणुकीत भाजपच्या तोंडाला फेस आला होता. विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपला अगदी निसटता विजय मिळाला. यामुळे अर्थातच तोगडिया यांना चेव सुटला. ते नंतरदेखील पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात बोलू लागले. मध्यंतरी त्यांनी आपल्या कारचा अपघात करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. तथापि, आधीच्या ड्रामेबाजीमुळे त्यांच्या या आरोपाकडे प्रसारमाध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही. गेल्या काही दिवसांपासून तर तोगडिया हे कुणाच्या खिजगणतीत नसल्याचे दिसून येत होते. या पार्श्‍वभूमिवर, विश्‍व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडियांचे उमेदवार राघव रेड्डी यांचा पराभव करून विष्णू सदाशीव कोकजे यांनी विजय मिळवल्यामुळे पुन्हा एकदा प्रवीण तोगडिया चर्चेत आले. अर्थात या निवडणुकीचा एकतर्फी निकाल पाहता विश्‍व हिंदू परिषदेत यापुढे तोगडिया यांना फारसे महत्वाचे स्थान नसल्याचे अधोरेखीत झाले. नेमकी हीच बाब लक्षात घेत प्रवीण तोगडिया यांनी लागलीच विश्‍व हिंदू परिषदेला ‘जय श्रीराम’ केला. अर्थात विंहीपनेही लागलीच त्यांच्या जागी आलोक कुमार यांना संघटनेचे कार्यकारी अध्यक्षपद देण्याचे घोषीत करत त्यांना शेवटचा आणि निर्णायक धक्का दिला.

विश्‍व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया या दोन्ही मान्यवरांनी या संघटनेला वलय मिळवून दिले. सिंघल यांनी नव्वदच्या दशकातील धुमसत्या वातावरणात विंहीपची आक्रमक भूमिका जोरकसपणे मांडली. तर याच्या खालोखाल प्रवीण तोगडिया यांनीही आपल्या ज्वालाग्रही वक्तव्यांच्या माध्यमातून संघ आणि पर्यायाने भाजपला अनुकुल अशी परिस्थिती निर्माण करणारी भूमिका घेतली. अत्यंत प्रभावी वक्तृत्व असणार्‍या तोगडिया यांना यामुळे देशातच नव्हे तर विदेशातही मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. विहींपच नव्हे तर संपूर्ण संघ परिवारात तोगडियांचा एक ‘कल्ट’ तयार झाला. विशेष करून अशोक सिंघल यांच्या २०११ साली झालेल्या निधनानंतर विंहीपवरील तोगडियांची पकड अतिशय मजबूत झाली. यानंतर २०१४ साली केंद्रात भाजपने धमाकेदार विजय संपादन केला. तर यानंतर देशभरात या पक्षाचा विजयरथ अविरतपणे सुरू झाला. एकीकडे भारतीय जनता पक्ष यशाच्या पायर्‍या झपाट्याने चढत असतांना दुसरीकडे तोगडिया यांचा आवाज क्षीण होत गेला. युपीएच्या १० वर्षांच्या कालखंडात सरकार हे हिंदूविरोधी असल्याची लोकप्रिय थिअरी मांडणे हे त्यांना सोपे होते. मात्र देशात भाजपला निर्णायक सत्ता असतांना खळबळजनक वक्तव्यांनी जगाचे लक्ष वेधून घेणे हे त्यांच्यासाठी अशक्य झाले. अधून-मधून त्यांनी राम मंदिराचा राग आळवला तरी याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. यातच मोदी व शहा या जोडगोळीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. हे सारे होत असतांना विंहीपवर आपला एकछत्री अंमल असावा असे मनसुबे तोगडियांनी व्यक्त केले. याकडेही संघ परिवाराने गांभिर्याने पाहिले नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात नाटकबाजी तर दुसर्‍या टप्प्यात लोकशाहीवादी निवडणुकीच्या माध्यमातून प्रवीण तोगडिया यांनी पूर्ण जोर लाऊन पाहिला. तथापि, अशा प्रकारच्या आव्हानांवर मात करण्याच्या अनेक चतुर चाली कोळून प्यायलेल्या संघ परिवाराने तोगडियांचा अंमल पूर्णपणे नेस्तनाबूद केला आहे.

विश्‍व हिंदू परिषदेचा त्याग केल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा हिंदू हिताचा राग आळवत भविष्यकालीन वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या तोंडून पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिर, काश्मिरातील कलम-३७०चे निर्मूलन, गौहत्याबंदी आदी संघाचा लोकप्रिय अजेंडा जगासमोर आला आहे. याच्या जोडीला त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या हिताची बाबदेखील बोलून दाखविली आहे. मात्र आधी अत्यंत आत्मविश्‍वासाने बोलणार्‍या प्रवीण तोगडिया यांचे अवसान गळून पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विंहीपने हिंदू हिताचा अजेंडा राबविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असली तरी संघाच्या मजबूत संघटनाशिवाय त्यांना यश मिळणे दुरापास्त होते. याच पध्दतीने आता तोगडियांनी कितीही आगलावे वक्तव्य केले तरी त्यांच्या पाठीशी कोणतेही मजबूत संघटन नसल्यामुळे आता त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जाणार नसल्याची बाब स्पष्ट आहे. येत्या काही दिवसांमध्ये अहमदाबाद येथे त्यांनी बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा फारसा परिणाम होणार नसल्याची बाबदेखील आधीच स्पष्ट झाली आहे. अर्थात वैयक्तीक महत्वाकांक्षेपोटी विंहीपवर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे प्रवीण तोगडिया यांची आकांक्षा धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे. कधीकाळी विंहीप आणि तोगडिया हे समानार्थी शब्द बनले होते. आता याच विंहीपवर टीका करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. अर्थात हाच काळाने प्रवीण तोगडिया यांच्यावर उगवलेला सूड असेल.

प्रवीण तोगडिया यांच्या सद्यस्थितीतल्या दुर्गतीमध्ये अनेक भविष्यकालीन घटनांचे बिजारोपण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. विशेष करून संघ परिवारात व्यक्तीपुजेला असणारा प्रखर विरोधदेखील यातून पुन्हा एकदा दिसून आला आहे. तोगडिया हे विश्‍व हिंदू परिषदेचे जणू काही सर्वेसर्वा असल्याच्या अविर्भावात अनेक वर्षे वावरले. मात्र एका विशिष्ट मर्यादेचे लंघन करण्याचा त्यांचा प्रयत्न संघाने अतिशय अचूकपणे हाणून पाडला आहे. याचप्रमाणे सध्या भारतीय जनता पक्षात एकछत्री अंमल असणार्‍या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला आवर घालण्यासाठी संघाकडे काही ‘स्पेशल प्लॅन’ असेल का? हाच ‘ऑपरेशन प्रवीण तोगडिया’ नंतरचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment