चालू घडामोडी पत्रकारिता साहित्य

फेसबुक आणि नात्यांचे भावबंध

फेसबुकसारख्या साईट टाईमपाससाठी बदनाम झाल्या आहेत. मात्र वरिष्ठ पत्रकार संजय सिन्हा यांनी याचाच उपयोग करत आपल्या सृजनाला नवी उंची प्रदान तर केलीच पण नात्यांचा नव्याने धांडोळाही घेतला.

फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटकडे कुणी फारसे गांभिर्याने पाहत नाही. त्या टाईमपाससाठी बदनाम झाल्या आहेत. मात्र वरिष्ठ पत्रकार संजय सिन्हा यांनी याचाच उपयोग करत आपल्या सृजनाला नवी उंची प्रदान तर केलीच पण नात्यांचा नव्याने धांडोळाही घेतला.

sanjay_sinha1

‘इंडिया टुडे’ समुहाच्या ‘आज तक’ वाहिनीत उच्च पदावर काम करणारे संजय सिन्हा यांच्या कामगिरीची माहिती देण्याआधी त्यांच्याबाबत थोडेसे! बिहारमधील एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घराण्यात जन्मलेल्या संजयजींचे शिक्षण विदेशात झाले. उच्च करियर सोडून ते पत्रकारितेकडे आकर्षित झाले. जनसत्तासारख्या अनेक दैनिकांमधून त्यांनी सुमारे दहा वर्षे काम केले. यानंतर नव्यानेच उदयास आलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी त्यांना भुरळ घातली. विविध वाहिन्यांमधून त्यांनी काम केले. यात भारताच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचे वार्तांकन केल्याच्या अनुभवातून ते समृध्द झाले. यात गुजरातमधील भुकंपाच्या प्रसंगाने ते अंतर्मुख झाले तर कारगिलच्या युध्दभुमीवर जीव धोक्यात टाकून सीमेवर वावरले. अनेक विदेशी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्येही त्यांनी विपुल लिखाण केले आहे. आयुष्यात त्यांना सर्व काही मिळाले. करियर, पद, पैसा, प्रसिध्दी वगैरे वगैरे. मात्र अंतर्यामीच्या रितेपणाने त्यांच्या सृजनाला नवीन दिशा दिली. खरं तर संजयजी फेसबुकादी सोशल नेटवर्कींग माध्यमाकडे ते फारसे गांभिर्याने पाहत नव्हते. मात्र याच माध्यमाने त्यांना अभिव्यक्तीसाठी एक अत्यंत सशक्त माध्यम दिले.

पैसा आणि प्रसिध्दीच्या शिखरावर असणार्‍या संजय सिन्हा यांच्या वैयक्तीक आयुष्यातील काही दुर्दैवी घटनांनी त्यांच्या काळजावर न मिटणार्‍या जखमा झाल्या आहेत. एक तर किशोरवयीन वयातच त्यांनी आईला गमावले, एक बहिण तर बालपणीच वारली होती आणि गेल्या वर्षीच त्यांचा मोठा भाऊदेखील परलोकी गेला. या विलक्षण रितेपणाला शब्द देण्यासाठी त्यांनी फेसबुकचे माध्यम निवडले आणि १२ नोव्हेंबर २०१३ पासून दररोज किमान एक दीर्घ पोस्ट लिहण्याचा संकल्प केला. वर्षभरात अगदी देश-विदेशात असतांनाही त्यांनी हा संकल्प पाळला. आणि यातूनच जगासमोर त्यांच्या ३६५ वैविध्याने नटलेल्या पोस्ट आल्या. संजयजींनी आपल्या लिखाणात अगदी कोणताही विषय वर्ज्य मानला नाही. अगदी तत्वचिंतनपर विचारांपासून ते हलक्या-फुलक्या विषयांनाही त्यांनी स्पर्श केला. त्यांचे वाचन, अवलोकन, चिंतन आणि मनन किती उच्च दर्जाचे आहे याची खात्री त्यांचे विचार वाचून पटते. त्यांच्या पोस्टला अमाप लोकप्रियता लाभली. प्रत्येक पोस्टवर अक्षरश: शेकडोंनी ‘लाईक्स’ आणि ‘कॉमेंट्स’ येऊ लागल्या. एका वर्षात त्यांनी इतक्या विषयांना स्पर्श केला की कुणीही अक्षरश: थक्क झाल्याशिवाय राहत नाही.

उदाहरण पहा…त्यांच्या एका पोस्टमधील ही वाक्ये… जी त्यांच्या पुस्तकावर ब्लर्ब म्हणून अंकित करण्यात आलेली आहेत.

‘‘मुझे इसमें कोई संदेह नहीं कि मेरी मॉं ने ही फेसबुक की कल्पना पहली बार की थी। मार्क जुकरबर्ग तो बहुत बाद में आए फेसबुक के इस संसार को लेकर्। मेरी मॉं उनसे बहुत पहले से अपने लिए फेसबुक का संसार रच चुकी थी। वो इस दुनिया में बहुत कम समय तक रह पाई, लेकिन जितने भी दिन रही, रिश्ते जोड़ती रही। मैंने उसे कभी किसी से रिश्ते तोड़ते नहीं देखा। कहती थी कि रिश्ते बनाने में चाहे सौ बार सोच लो, लेकिन तोड़ने में तो हजार बार सोचना। मॉं कहती थी कि एक दिन वो नहीं रहेगी लेकिन ‘रिश्ते’ रहेंगे। सब एक-दूसरे से जुदा होते चले जाएँगे, लेकिन रिश्तों का कारवॉं सबको एक-दूसरे से जोड़े रहेगा। आदमी आता है चले जाने के लिए, लेकिन रिश्ते जिंदा रहते हैं यादों में, व्यवहार में, मस्तिष्क में ।’’

एखाद्या पोस्टमधून संजयजी वाचनाबाबत सांगतात तर दुसर्‍यातून सिनेमाविषयी. ‘करवा चौथ’च्या दिवशी आपल्या विवाहाची सुरस कथा ते सांगतात तर शाहरूखसारख्या कॉलेजमधील मित्रातला माणूस आपल्यासमोर उभा करतात. आज आयुष्यात अगदी शिखरावर असणारा शाहरूख भर दिवसा आपल्या आईच्या मजारवर जाऊ शकत नसल्याचे त्याचे दु:ख आपल्याला कळते. अनेकदा ‘आज तक’मध्ये येणारे चित्रपट कलावंत, क्रिकेटपटू, राजकारणी यांच्याविषयीदेखील संजयजींनी अगदी समरसून लिहिले आहे. यात ‘हॅपनींग’सोबत संबंधीत व्यक्तीविशेष अचूक शब्दांमध्ये सादर करण्यात त्यांचा हात कुणी पकडू शकणार नाही.

दरम्यान, भल्या पहाटे उठून विविधांगी विषयांवर लिखाण करणार्‍या संजय सिन्हा यांचे फेसबुकसारख्या आभासी माध्यमातून अनेकांशी भावबंध जुळले. कुणी त्यांना मित्र मानले, कुणी भाऊ, कुणी काका तर कुणी मामा! त्यांची आई कधीच परलोकी गेली असली तरी फेसबुकवर त्यांना आईदेखील मिळाली आणि मेहुणीदेखील! या सर्व नात्यांची त्यांच्या वॉलवर चर्चा होऊ लागली. यातून या सर्व आभासी आप्तांनी दिल्लीत एकत्र येण्याचे ठरले. यासाठी १५ नोव्हेंबर २०१४ हा दिवस ठरविण्यात आला. दिल्लीतील एका फेसबुक मित्राने या कार्यक्रमाचा पुर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. या अनोख्या मेळाव्याला हजर राहण्याची अनेकांनी उत्स्फुर्तपणे तयारी दर्शविली. संजय सिन्हा यांना ‘आपला’ मानणार्‍या देश-विदेशातील तब्बल हजार स्त्री-पुरूषांनी या अफलातून स्नेहमिलनाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात संजयजी सिन्हा यांच्या ३६५ फेसबुक पोस्टमधून निवडलेल्या लिखाणातून आकारास आलेल्या ‘रिश्ते’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. महत्वाची बाब म्हणजे पुढील वर्षी सिन्हा यांच्या विवाहाला २५ वर्षे होत आहेत. या पार्श्‍वभुमीवर एक वर्षाआधीच त्यांच्या विवाहाचा रौप्यमहोत्सव म्हणून या उभयतांचा पुन्हा विवाह लावण्यात आला. भरभरून व्यक्त झालेली मनोगते, हास्य-विनोद, गाणी आणि सहभोजन आदींनी हा एक दिवसीय स्नेहमेळावा अविस्मरणीय झाला. सुमारे सात-आठ महिन्यांपासून मी नियमितपणे त्यांच्या पोस्ट वाचत आहे. अनेकांवर कॉमेंटही केल्या. दिल्ली येथील स्नेहमेळाव्याला प्रयत्न करूनही जमले नाही. मात्र संजय सिन्हा यांच्यापासून लिखाणाची प्रेरणा निश्‍चित घेण्याचा संकल्प केला आहे.

विविध सेलिब्रीटीज सोशल मीडियावर असल्या तरी बहुतांश ट्विटरसारख्या संक्षिप्त संदेशावरच अनेक जण विसंबून राहतात. मात्र ब्लॉगसारख्या लांबलचक पोस्ट लिहण्याच्या फंदात कुणी पडत नाही. या पार्श्‍वभुमीवर वृत्तवाहिनीतील अत्यंत व्यस्त वेळापत्रकाच्या नोकरीत आणि जबाबदार पदावर असूनही संजयजी सिन्हा यांनी ज्या पध्दतीने विविध विषयांना स्पर्श केला ते पाहता त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अर्थात फक्त संवेदनशील लिखाण करूनच ते थांबले नाहीत तर त्यावर व्यक्त होणार्‍या प्रतिक्रिया आणि अर्थात त्यांच्यामागील माणसांनाही त्यांनी अनुभवले. यातून आभासी जगतातील हा काफिला प्रत्यक्षात एकमेकांना कडकडून भेटला. उथळपणा आणि अर्धवट ज्ञानाच्या प्रदर्शनाने सोशल मीडिया बदनाम झाला आहे. या पार्श्‍वभुमीवर संजय सिन्हा यांच्यासारखे संकल्पवान लेखक, त्यावर साधक-बाधक चर्चा करणारे त्यांचे सुजाण मित्र आणि अर्थातच यातून त्यांच्याच जुळलेला भावबंध या सार्‍या बाबी चकीत करणार्‍याच आहेत. फेसबुकवरील मित्रांची प्रत्यक्षात भेट आणि स्नेहमेळावे अनेक ठिकाणी भरतात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या सृजनाला सलाम करण्यासह त्याच्यातील संवेदनशील व्यक्तीला भेटण्यासाठी हजारावर लोक एखाद्या ठिकाणी जमतात ही अशक्यप्राय बाब या स्नेहमेळाव्यातून शक्य झाली आहे. अर्थात याचे नायक आहेत ते खुद्द संजयजी सिन्हा हेच!! आता मला उत्सुकता लागलीय ती त्यांचे ‘रिश्ते’ या पुस्तकाची! ‘अमेझॉन’वर ऑर्डर दिलीय…वाट पहातोय!

जाता…जाता; अत्यंत व्यस्त दिनचर्येत अनेक प्रतिभावंत मनाजोगे लिखाण करू शकत नाही. सर्वसाधारणपणे ‘वेळ मिळत नाही’ या कारणावरून अनेक जण आपल्या प्रतिभेला पुर्णपणे न्याय देऊ शकत नाही. संजय सिन्हा यांनी वेळेचा बहाणा करणार्‍यांसमोर एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. अर्थात यातून मराठीतला एखादा वरिष्ठ पत्रकार, साहित्यिक, कलावंत वा अन्य वलयांकीत व्यक्ती कधी असे करणार का? हा प्रश्‍न उगाच माझ्या मनाला स्पर्शुन गेला.

About the author

shekhar patil

5 Comments

  • संजय जी आपको आपके मिशन पर चलते वक्त अनेक गतीरोधको का सामना करना पड़ा होंगा में चाहता हूँ की आप उन्हें भी शेयर करे…ताकी हम जैसे कइयो के कान के पर्दे खुल जाएं….

  • Great Salute Sanjay Sinha sir! This article give me info about creativity…please keep it up…regards

Leave a Comment