चालू घडामोडी चित्रपट पत्रकारिता

फुटलेल्या कॅमेर्‍यांची कथा अन् व्यथा!

Written by shekhar patil

आपल्या मुलाच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण टिपण्यासाठी व्हिडीओ कॅमेरा विकत घेणार्‍या इमाद बुरनात या पॅलेस्टीन तरूणाचा कॅमेरा घराबाहेर आपल्या गावात आणि परिसरात घडणार्‍या घटनांकडे जेव्हा कॅमेरा वळतो तेव्हा काय होते?

आपल्या मुलाच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण टिपण्यासाठी व्हिडीओ कॅमेरा विकत घेणार्‍या इमाद बुरनात या पॅलेस्टीन तरूणाचा कॅमेरा घराबाहेर आपल्या गावात आणि परिसरात घडणार्‍या घटनांकडे जेव्हा कॅमेरा वळतो तेव्हा काय होते? हे ‘फाईव्ह ब्रोकन कॅमेराज’ या विश्‍वविख्यात डॉक्युमेंटरीमध्ये अगदी भेदकपणे दाखविण्यात आले आहे.

इमाद बुरनात…पस्तीशीत असणारा आणि पॅलेस्टाईनच्या बिलीन या लहानशा गावात राहणारा कुटुंबवत्सल तरूण. पत्नी सुरय्या, मुले मोहंमद, यासीन आणि ताकी आदीन तसेच आपल्या वडिलांसह राहणार्‍या इमादच्या घरात २००५च्या फेब्रुवारी महिन्यात जिब्राईल या चौथ्या मुलाचा जन्म होतो. आपल्या या चिमुरड्याच्या डोळ्यातून जग पाहण्यासाठी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा व्हिडीओ कॅमेर्‍याच्या सहाय्याने कैद करण्याची कल्पना त्याच्या मनात येते. यातून तो लागलीच स्वस्त व्हिडीओ कॅमेरा विकत घेतो. जिब्राईलच्या बाललिलांचे चित्रीकरण करतांना त्याला खूप आनंद वाटतो. दरम्यान, त्या खेड्यात इमाद हा कॅमेरामन म्हणून प्रसिध्द होतो. त्याला अनेक कार्यक्रमांचे शुटींग करण्यासाठी बोलावण्यात येते. इकडे इमादच्या घराबाहेर बरेच काही घडत असते. तो इस्त्राएल आणि पॅलेस्टाईनच्या दरम्यान असणार्‍या वादग्रस्त प्रदेशातील बिलीन या जेमतेम दोन हजार लोकवस्ती असणार्‍या गावातील रहिवासी असतो. जिब्राईलचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी महाकाय बुलडोझर्सच्या आवाजांनी बिलीनवासी धास्तावतात. खर तर या खेड्यातील बहुतांश लोक हे डोंगराळ भागात असणार्‍या जमीनीवर अवलंबून असतात. या डोंगराळ भागातील जमीन फारशी सुपीक नसतेच. मात्र ऑलिव्हचे झाड हा त्यांच्यासाठी जणू कल्पवृक्षच असतो. परंतु इस्त्राएली बुलडोझर्स या ग्रामस्थांच्या शेतातील ऑलिव्हची झाडे उखडून फेकण्यास प्रारंभ करतात. येथूनच एक हौशी कॅमेरामन गांभिर्याने आपल्या भोवतीच्या घटनांकडे वळतो.

इस्त्राएली सरकार पश्‍चिम किनारपट्टीच्या भागातील पॅलेस्टीनी खेडेगावातील शेतकर्‍यांची जमीन हडपून त्यावर ज्यू लोकवस्ती वसविण्याचा विचार करत असल्याचे बिलीनवासियांच्या लक्षात येते. येथून त्यांचा संघर्ष सुरू होतो. प्रत्येक शुक्रवारच्या नमाजनंतर शांततामय मार्गाने इस्त्राएली सरकारच्या दंडुकेशाहीचा विरोध करण्याचा निर्णय त्या गावातील तरूण घेतात. दरम्यानच्या काळात अत्यंत साहसी, शरीराने धिप्पाड मात्र निरागस मुलासारखा स्वभाव असणार्‍या फिल आणि अदिब या तरूणांकडे या आंदोलनाचे नेतृत्व येते. त्यांच्या आंदोलनाचे चित्रीकरण करत असतांना इमादचा त्यांच्यासोबत

ऑस्कर सोहळ्यात पत्नी आणि मुलासह.

ऑस्कर सोहळ्यात पत्नी आणि मुलासह.

अतुट मैत्रीचा बंध निर्मित होतो. आंदोलन सुरू असतांनाच आता इस्त्राएली सरकार बिलीनवासियांच्या हिसकावलेल्या जमीनीवर भिंत बांधण्यास सुरूवात करतात. यामुळे साहजीकच भिंतीपलीकडच्या त्या जमीनीवर इस्त्राएलींचा ताबा होणार असल्याने ग्रामस्थ आपले आंदोलन अजून तीव्र करतात. या गदारोळात अश्रूधुरांचे नळकांडे थेट इमादच्या कॅमेर्‍यावरच धडकते. यातून पहिला कॅमेरा तुटतो. खरं तर इमादची नियमित कमाई नसल्याने तो नवीन कॅमेरा घेऊ शकत नाही. यामुळे त्याला इसरेल हा आंदोलक नवीन कॅमेरा घेऊन देतो. जिबरेल वाढत असतांना बिलीनकरांचा संघर्षही तीव्र होतो. त्यांना प्रतिकार करणारे इस्त्राएली सैनिक आता अश्रूधुरासह रबराच्या गोळ्या वापरू लागतात. यातून अनेक जण जखमी होतात. हे होत असतांना जिबरेल दुडूदुडू चालू लागतो. मात्र आता इमादचा कॅमेरा हा आपल्या मुलापेक्षा बाहेरच्या जगाचा जास्त वेध घेतो. जेव्हा जिबरेल पहिला शब्द ‘जिदार’ अर्थात भिंत म्हणून उच्चारतो तेव्हा मात्र इमाद हादरतो. आपल्या भोवतीच्या घटनांमधून आपल्या मुलाचे भावविश्‍व उद्ध्वस्त होत असल्याचे त्याच्या लक्षात येते. मात्र याला कोणताही पर्याय नसल्याची जाणीवही त्याला होते. आतापर्यंत इमादची शुटींगची आवड त्याच्या मोहंमद या मोठ्या मुलासही आकर्षित करते. यामुळे तोदेखील आपल्या वडिलांचे अनेकदा चित्रीकरण करतो.

बिलीनमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. यातच इस्त्राएल सरकारच्या सर्व प्रयत्नांना गावकरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध दर्शवतच असतात. यात ते अगदी चक्क स्वत: इस्त्राएलींच्या भिंतीपलीकडे आपला ट्रेलर ठेवणे, आऊटपोस्ट बांधणे यांचा अवलंब करतात. सैनिक ऑलिव्हच्या शेकडो वृक्षांना आग लावतात तेव्हा ते ‘गांधिगिरी’ करत ऑलिव्हचे रोपटे लावतात. २००७च्या वतंत ऋतुमध्ये इमादचा दुसरा कॅमेरा एक सैनिक फोडतो. नंतर इमादच्या तीन भावांना अटक होते. आता सैनिक रात्री-अपरात्रीही येतात. आधी तरूण व प्रौढांना निशाणा बनविणारे इस्त्राएली बालकांनाही पकडतात. इमादच्या हातातील कॅमेरा सैनिकांना नेहमी खटकतो. यातून त्याला अटकही होते. नंतर त्याला नजरकैदेत ठेवले जाते. त्याच्या व्हिडीओ शुटींगच्या ‘वेडा’ला बरे करण्यासाठी इस्त्राएली शासन मनोचिकित्सकाला पाठविते तेव्हा हा पठ्ठ्या म्हणतो की, ‘मला जगात करण्यासाठी काहीही नसल्याने मी चित्रीकरण करतो’ अखेर त्याची तुरूंगातून मुक्तता होते. या कालखंडापर्यंत बिलीनकरांचा संघर्ष संपुर्ण गाझा पट्टीसह जगभरात पोहचलेला असतो. शेजारच्या निलीन गावात तर दोन बालकांचे यात बळी जातात. विविध देशांमधील मानवाधिकार कार्यकर्ते, राजकीय नेते या गावात येऊन निदर्शनांमध्ये भाग घेतात. यात २००८च्या प्रारंभी इमादच्या तिसर्‍या कॅमेर्‍याच्या लेन्समध्येच गोळी शिरते. यात सुदैवाने त्याला काही इजा होत नाही मात्र कॅमेरा निकामी होतो. यामुळे नाऊमेद न होता तो पुन्हा नवा कॅमेरा हातात घेतो. इतक्यात इस्त्राएली सुप्रीम कोर्ट बिलीनजवळची भिंत आणि नव्याने उभारण्यात येणारी वस्ती अवैध असल्याचा ऐतिहासिक निकाल दिल्याने बिलीनमध्ये जंगी उत्सव साजरा होतो. मात्र सरकार न्यायालयाचा आदेश झुगारून लावते. यानंतर सैनिकांनी उभारलेल्या कुंपणातून ट्रकमध्ये जात असतांना झालेल्या अपघातात त्याचा चौथा कॅमेरा तर फुटतोच पण तो स्वत: गंभीर जखमी होतो. तेल अविवमधील हॉस्पिटलच्या अत्याधुनिक उपचारांनी तो वाचतो मात्र यासाठी एक वर्ष तर लागतेच पण यासाठी लागलेल्या अवाढव्य रकमेने त्याच्या आयुष्याचे आर्थिक गणित बिघडते. यातच निदर्शनांमध्ये झालेल्या फिलचा मृत्यूने त्याला धक्का बसतो. इकडे अदीबही एक वर्षासाठी कारागृहात जातो. एव्हाना बिलीनमधील वातावरण प्रचंड प्रक्षोभक बनलेले असते. जिबरेल पाच वर्षांचा होतो. मात्र भोवतालच्या परिस्थितीने तो अंतर्मुख बनतो. त्याच्यातील निरागसता लयास जात असल्याचे पाहून इमाद अस्वस्थ होतो. २०१०च्या वसंत ऋतुमध्ये एक सैनिक संतापून इमादचा पाचवा कॅमेरा फोडतो. मात्र भोवताली अनेक सकारात्मक बदल होत असतात. एक तर बिलीनमधील आंदोलनाचे पडसाद पाहून इस्त्राएली सरकार अवैध पध्दतीने उभारलेले कुंपण तोडून टाकते. हा गेल्या पाच वर्षात शांततेने सुरू असणार्‍या आंदोलनाचा मोठा विजय असतो.

अलीकडच्या काळात ‘सिटीझन जर्नालिझम’ ही संज्ञा उदयास आली आहे. यात सोशल मीडियाच्या प्रसारामुळे याला प्रचंड गती आली आहे. यातून मध्यपुर्वेतील अनेक देशांमध्ये क्रांत्या झाल्या आहेत. मात्र सोशल मीडियाचा खर्‍या अर्थाने उदय होण्याआधी इमाद बुरनात या तरूणाने पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण नसतांना आणि मनात तसा कोणताही हेतू नसतांना ज्या निष्ठेने आपल्या भोवतालचे चित्रण केले ते पाहून आपण चकीत होतो. तो रूढ अर्थाने पत्रकार नसतो. मात्र नंतरच्या काळात स्थानिक चॅनल्ससह आंतराष्ट्रीय पातळीवरील वाहिन्यांमध्ये त्याच्या चित्रफिती वापरल्या जातात. २००५ ते १० या पाच वर्षाच्या कालखंडात वैयक्तीक चित्रीकरण वगळता त्याच्याकडे तब्बल सातशे तासांचे फुटेज असते. हा खरं म्हणजे आधुनिक युगातील एका यशस्वी अहिंसक चळवळीचा दस्तऐवजच मानावा लागणार आहे. या फुटेजमधून माहितीपट तयार करण्याचा विचार इमादच्या मनात येतो. यावेळी

इस्त्राएली सैनिकांना ‘एमी ऍवार्ड’ दाखवितांना.

इस्त्राएली सैनिकांना ‘एमी ऍवार्ड’ दाखवितांना.

त्याच्या मदतीला गाय दाविदी हा ज्यू तरूण धावून येतो. गाय हा इमादच्या सहकार्‍यांसोबत आंदोलनात सहभागी झालेला असल्याने त्यांच्यात मैत्री होतीच. यामुळे या दोघांनी अत्यंत मेहनतीने या फुटेजमधून महत्वाचे क्षण वेगळे करून डॉक्युमेंटरी निर्मित केली. यात त्यांनी सलग घटना घेतांना मुख्य सुत्रधार म्हणून खुद्द इमाद बुरनात हा कथानक सांगतो असे स्वरूप ठेवले. आंदोलनाच्या या संघर्षपर्वात इमादच्या फुटलेल्या पाच कॅमेर्‍यांचे रूपक घेऊन याची पटकथा विणण्यात आली आहे. यात स्वत: इमाद हाच अरबी भाषेत घडलेल्या घटनांवर भाष्य करत असल्याचे आपल्याला दिसून येते. माहितीपटाच्या प्रारंभी कोरडा वाटणारा इमादचा स्वर थोड्या वेळातच भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार होतो. आंदोलनाचे चित्रीकरण करतांना येणार्‍या अडचणी, कुटुंबाच्या व विशेषत: मुलांच्या भवितव्याबद्दल वाटणारी काळजी, पत्नीने दिलेला सबुरीचा सल्ला, अटकेची टांगती तलवार, भीषण अपघात आदींमुळे जेरीस आल्यावरही तो आत्यंतिक निष्ठेने आपला भोवताल कॅमेर्‍यात टिपत राहतो. एका अर्थाने तो एकाच वेळी आंदोलक, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ता व अर्थातच कुटुंबप्रमुख म्हणून भुमिका बजावतो.

आपल्या भोवतील उद्रेक कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करत असतांना इमान बुरनात फक्त काही दृश्यांमध्येच आपल्याला दिसतो. मात्र निवेदनातून तोदेखील बर्‍याच प्रमाणात आपल्याला कळत जातो. फिल आणि अदिबसारखे धाडस आपल्यात नाही, आपण प्रत्यक्षात आंदोलनात भाग घेऊ शकत नसल्याबद्दल अनेकदा त्याला न्यूनगंड वाटतो. तो स्वत:वर चिडतो. मात्र आपल्या हातातील कॅमेरा त्यांची संघर्ष जगापर्यंत पोहचवेल याची आशा त्याला असते. यातून तो अक्षरश: झपाटल्यागत व्हिडीओ चित्रीकरण करत सुटतो.

पॅलेस्टीनी व इस्त्राएली संघर्षाला अनेक आयाम आहेत. दोन्ही बाजूंमध्ये आजवर रक्तरंजीत संघर्ष झालेला असून त्याला अद्यापही विराम मिळालेला नाही. मात्र बिलीनच्या संघर्षाचे वैशिष्ट म्हणजे या गावच्या रहिवाशांनी २००५पासून आजवर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. यामुळेच या आंदोलनाला जगभरात व्यापक पाठींबा मिळाला. यातच ‘फाईव्ह ब्रोकन कॅमेराज’च्या रूपाने ही संघर्षगाथा अगदी बारीक-सारीक संदर्भांसह जगापर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम इमाद बुरनात याने केले आहे. २०१२च्या सुरवातील ‘फाईव्ह ब्रोकन कॅमेराज’ ही डॉक्युमेंटरी रिलीज झाल्यानंतर सर्वत्र तिचे जोरात स्वागत करण्यात आले. या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्तम माहितीपटाच्या विभागात तिला नामांकन मिळाले. दुर्दैवाने ऑस्कर हुकले तरी इमाद बुरनात याच्या प्रतिभेला सर्वत्र सन्मान मिळाला. या डॉक्युमेंटरीला ‘एमी ऍवॉर्ड’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जाणार्‍या अरब (इमाद) आणि ज्यू (गाय दाविदी) यांच्या या माहितीपटाकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहण्यात आले. आजही बिलीनवासी आपली जमीन परत मिळावी म्हणून शांततामय मार्गाने निदर्शने करत आहेत. मात्र आज त्यांच्या वेदनेला वैश्‍विक आवाज मिळालाय याचे सर्व श्रेय इमादच्या प्रयत्नांना आहे हे कुणी नाकारू शकणार नाही.

(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

पहा या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर:…

About the author

shekhar patil

Leave a Comment