क्रीडा

फुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा !

Written by shekhar patil

‘कोपा अमेरिका’ आणि ‘युरो’ या स्पर्धांचा ‘इफेक्ट’ आपल्या भोवतीदेखील जाणवत आहे. आज सकाळीच चिरंजीवांनी ‘‘पप्पा आपण फुटबॉल खेळूया!’’ हा हुकुम सोडल्यावर ही बाब प्रकर्षाने जाणवली. झाले…सर्व तयारी करून आम्ही मैदानावर पोहचलो तर मुलाची मित्रमंडळीदेखील जमली होती. आता बच्चे कंपनीच्या खेळात माझी भुमिका ही अर्थातच अंपायरची म्हणजे भांडणे सोडविण्यापासून ते एखाद्या निर्णयापर्यंत मर्यादीत नसते. तर क्रिकेट खेळतांना हक्काचा बॉलर वा फिल्डर म्हणूनदेखील ते माझा दम काढतात. आज मला अंपायरसोबत गोलकिपरची भुमिका पार पाडावी लागली. दहा-बारा वर्षे वयोगटातील माझ्या मुलाची ‘कंपनी’ अगदी सज्ज तयारी करून आली होती. पालकांनी अत्यंत कौतुकाने फुटबॉल खेळायला जाणार्‍या आपल्या मुलांना पिण्याच्या पाण्यापासून ते शूज, स्पोर्टस वेअर आदींची व्यवस्था करून दिली होती. मी मैदानावर असल्याने इतर पालक तसे निर्धास्त होते. काही वेळानंतर पाणी पिण्याच्या निमित्ताने मी बाजूला उभा राहिलो अन् हरवून गेलो.

भुसावळातील विद्यानगर मित्र मंडळाची आमची टिम क्रिकेट व (मुख्यत्वे पावसाळ्यात) फुटबॉल खेळायची तेव्हा कधीही आमचे कुणी पालक त्यांच्या मुलांना खेळतांना पाहण्यासाठी आले नव्हते. हो…अनेकदा ते आम्हाला जास्त खेळण्यावरून रागवत असत. त्यांना आमच्या खेळण्यासाठी देणे-घेणे नव्हते. आता पहा परिस्थिती किती बदललीय! आमच्या पिढीत साधनांची कमतरता अन् वडिलधार्‍यांची अनास्था होती. आता पालकांचा कौतुकाने ओसंडून वाहणारा उत्साह अन् अन् याचमुळे पाल्यांना हवी ती साधने उपलब्ध आहेत मात्र एक धागा समान आहे तो म्हणजे अर्थातच खेळाची धुंदी! साधने असोत वा नसोत…फुटबॉल अन् त्याची लोकप्रियता कायम राहणार! यावरून आठविले…काही वर्षांपुर्वी फुटबॉल वेडाशी संबंधीत एक सुंदर शॉर्ट फिल्म पाहण्यात आली होती. यावर लिहण्याचा प्रयत्न करूनही राहून गेले होते. आज मुलाच्या फुटबॉल प्रेमामुळे याला नव्याने चालना मिळाली.

थायलंड मर्कंटाईल बँकेने (टिएमबी) २०११ साली आपल्या ग्राहकांसाठी एक प्रेरणादायी शॉर्ट फिल्म तयार केली. ‘मेक द डिफरन्स’ या कॅचलाईनवर आधारित ही डॉक्युमेंटरी प्रचंड गाजली. यातून फुटबॉल प्रेमाची एक अभुतपुर्व गाथादेखील समोर आली. अवघ्या सव्वापाच मिनिटांच्या या फिल्मची पार्श्‍वभुमि समजून घेणे आवश्यक आहे. कोह पानयी हे दक्षिण थायलंडमधील एक छोटेसे मात्र जगावेगळे खेडे आहे. याची खासियत म्हणजे हे तरंगते गाव आहे. एका भक्कम खडकाच्या आधारे अठराव्या शतकाच्या शेवटी दोन मुस्लीम कुटुंबांनी येथे तरंगते गाव उभारले. याचा मुळ उद्देश अर्थातच खोल समुद्रात विपुल प्रमाणात असणार्‍या माशांची शिकार करणे हा होता. परिणामी येथील सर्व जणांचा प्रमुख व्यवसाय हा साहजीकच मासेमारी हा बनला. येथे एक इंचही जमीन नाहीय. भोवती अथांग महासागर. अर्थात या जवळपास दीड हजार लोकसंख्येच्या या गावातील प्रत्येक जण पट्टीचा पोहणारा असेल हे सांगणे नकोच. जागाच नसल्यामुळे मुलांच्या खेळण्यासही मर्यादा आल्याच. नौकांची स्पर्धा सोडली तर या गावात कोणताही खेळ अस्तित्वातच नव्हता.

या शॉर्ट फिल्मची सुरवात होते ती १९८६ साली. या वर्षीच्या वर्ल्डकपचा थरार आपल्या टेलिव्हिजनवर पाहिल्यामुळे तेथील मुलांना हा खेळ खूपच भावला. आपणही फुटबॉल खेळावा अशी इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली. त्यांनी हा विचार आपल्या पालकांना सांगितला तेव्हा सर्व हसले. आता जमीनच नसणार्‍या गावात फुटबॉल तरी खेळणार कसा हो? वडिलधार्‍यांचे हसणे हे वास्तवाला धरून होते. मात्र फुटबॉलची झिंग डोक्यात शिरलेल्या या मुलांनी एक अफलातून शक्कल लढविली. त्यांनी आपले गाव जसे सागरावर तरंगतेच अगदी त्याचप्रमाणे फुटबॉलचे तरंगते मैदान तयार करण्याचा संकल्प हाती घेतला. अगदी अशक्य कोटीतले हे काम पुर्ण करत ही मुले फुटबॉल खेळतच नाहीत तर एक क्लबही बनवितात. आज ‘पानयी फुटबॉल क्लब’ हा थायलंडमधील विख्यात संघ म्हणून गणला जातोय. ही सर्व वाटचाल पाहण्यासाठी आपण ती फिल्म अवश्य पहावी.

ब्युटिफुल गेम म्हणून ख्यात असणारा फुटबॉल आपल्या धुसमुसळेपणाने अनेकदा बदनामही झाला आहे. सध्या सुरू असणार्‍या ‘युरो’तील चाहत्यांच्या धुमाकुळाने याला गालबोट लागले आहे. अर्थात हुल्लडबाजी करणारे प्रेक्षक चुकले म्हणून जगाच्या कान्याकोपर्‍यात कोट्यवधी आबालवृध्दांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेल्या फुटबॉलला दोष कशासाठी ? हा खेळ फक्त भांडणेच लावत नाही तर जोडण्याचे कामही करतो. याच फुटबॉल वेडाची ही गाथा आपल्याला अवश्य आवडेल.

काही छायाचित्रे !

तेव्हाची बालके आता मोठी झालीत ! यांनीच मोठ्या जिद्दीने फुटबॉल वेड जपले.

तेव्हाची बालके आता मोठी झालीत ! यांनीच मोठ्या जिद्दीने फुटबॉल वेड जपले.

panyee_fc

panyee_fc1

पानयी फुटबॉल क्लबने आजही आपले पहिले तरंगते मैदान मोठ्या अभिमानाने जपले आहे. मात्र याचसोबत आताच्या पिढीसाठी नवीन आधुनिक मैदानही तयार केले आहे.

About the author

shekhar patil

1 Comment

  • MANVI JIVNAT KHEALA KHUP MAHTWA AAHE. KHELA MULE MANVI SHARIR NIROGI RAHATE.. YA SHORT FILM CYA MADYAMATUN EVDE SHIKAYLA MILALE KI DURDMYA ITCHA SHAKTI ASLYA VAR MANUS KAHIHI KARU SHAKTO, KITIHI KATHIN KAMAT TO ASHASWI HOU SHAKTO….

Leave a Comment