चालू घडामोडी राजकारण

फलकबाजांना दणका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना वाढदिवसाच्या दिवशी फलकबाजी करणार्‍यांना दुसर्‍याच दिवशी पक्षातून बाहेर काढण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असाच आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना कानपिचक्या देत चमकोगिरी करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गर्जना केली आहे. यात प्रामुख्याने वाढदिवसाच्या दिवशी फलकबाजी करणार्‍यांना दुसर्‍याच दिवशी पक्षातून बाहेर काढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असाच आहे.

अलीकडच्या काळात आलेले होर्डींग्जचे खुळ आता बहुतांश शहरेच नव्हे तर ग्रामीण भागातही चांगलेच फोफावले आहे. यात वाढदिवसांच्या फलकांनी तर कहर केला आहे. फ्लेक्स प्रिंटींगचे अल्प दर आणि मिळेल ती जागा आपल्याच बापाची समजण्याच्या प्रवृत्तीमुळे आज ही समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. आपला भोवताला विद्रुप करण्यात या फलकांचा सर्वात मोठा वाटा आहे. या विद्रुपीकरणाबाबत आजवर अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली. अगदी न्यायालयानेही याची दखल घेत बेकायदा फलक काढण्याचे आदेश दिले तरी यावर फारशी अंमलबजावणी होत नसल्याचे आजचे चित्र आहे. यामुळे आता राज ठाकरे यांनी या प्रकारावर कडक भुमिका घेतली हे चांगले झाले. खरं तर त्यांनी आधीच फलकबाजी करणार्‍यांना सुचना दिल्या होत्या. जनतेची कामे करण्याचे सोडून फक्त बाजार मांडण्याच्या प्रवृत्तीला चाप घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला होता. त्यांच्या या सुचनेचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. त्यांच्या सुचनेनंतरही गावोगावी मनसैनिकांनी केलेली फलकबाजी प्रसारमाध्यमांमधूनही गाजली होती. आता मात्र थेट राज यांनी असे करणार्‍यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची घोषणा केली आहे.

औद्योगीकरण आणि शहरीकरणाचे अनेक ‘साईड इफेक्ट’ आहेत. यात विविध प्रकारचे प्रदुषण, वाहतूक समस्या आदींसोबत फलकबाजीदेखील कारणीभूत आहे. आजच्या बाजारपेठ केंद्रीत युगात मोक्याच्या इमारतींवरील जागा फलकांनी व्यापल्या आहेत. हा धोका राजकीय क्षेत्रात सर्वप्रथम राज ठाकरे यांच्या लक्षात आला याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांच्या या घोषणेनंतरही काही प्रश्‍न उरतातच.

एक तर राज यांनी आपल्या वाढदिवसाच्या फलकबाजीपासून दुर राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र वर्षभरात वेळोवेळी येणारे सण/उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, विविध सामाजिक वा राजकीय उपक्रम कुणाची नियुक्ती वा यश मिळाल्याबद्दल एवढंच काय आदरांजलीपरही शेकडो बेकायदेशीर फलक झळकत असतात. खुद्द मनसेसकट सर्व राजकीय पक्ष हे विविध निवडणुकांच्या प्रचारासह सभा, मेळावा, आपल्या नेत्यांनी केेलेली कामे, उदघाटने आदींसाठीही बेकायदेशीर फलकांचा मुक्त वापर करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अवाढव्य कार्पोरेट कंपन्यांसह गल्लीबोळातील व्यावसायिकही फलकबाजीतून शहरी विद्रुपीकरणाला प्रामुख्याने कारणीभुत आहेत. त्यांच्यावरही राज यांनी अशीच ठाम भुमिका घ्यावी ही अपेक्षा.

(प्रतिकात्मक छायाचित्र आंतरजालावरून साभार)

(प्रतिकात्मक छायाचित्र आंतरजालावरून साभार)

About the author

shekhar patil

Leave a Comment