आज विख्यात पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांची जयंती. लिखाणातून मांडलेला बंडखोरपणा प्रत्यक्ष आयुष्यात उतारण्याचे धाडस फार थोडे करू शकतात. यात महिलांवरील बंधने आणि एकूणच पितृसत्ताक समाजातील भेदाचे वातावरण पाहता भारतीय लेखिकांसाठी तर ही बाब जवळपास अशक्यप्राय या कोटीतली होय. मात्र अमृताजींनी जे लिहले तेच त्या जगल्या. लिखाणातला विद्रोह त्यांच्या जीवनात झिरपला. अमृताजींचे जीवन हे अनेकांना त्यांच्या लिखाणापेक्षा जास्त रोमांचकारी वाटते. आपल्या सामाजिक संकेतांना झुगारून लावत मनस्वीपणे जीवन जगणार्या अमृताजी आणि त्यांचे खासगी आयुष्य हे नक्कीच काव्यमय आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा त्रिकोण (अमृता-साहीर-इमरोज), याची जाहीरपणे दिलेली कबुली आणि विशेषत: इमरोज यांच्यासोबतचे त्यांचे सहजीवन हे त्यांच्याच एखाद्या कथा-कादंबरीपेक्षा जास्त रसरशीत वाटणे तसे स्वाभाविकदेखील आहे. मला तर अमृता आणि इमरोज हे ‘सोल मेट’ वाटतात. जगातील बहुतांश प्रेमकथा शारिरीक पातळीच्या पलीकडे जात नाहीत. काही जोडपी मानसिक पातळीवर एकमेकांच्या प्रगाढ प्रेमात असतात. मात्र याच्याही पलीकडचे प्रेम हे आत्मीक पातळीवरचे असते. खलील जिब्रान यांच्या मते खरे प्रेमी हे एखाद्या छताला आधार देणार्या कमानींसारखे असतात. ते कायम सोबत असले तरी नेहमीच अंतर राखून असतात. अर्थात आपल्या साथीदाराच्या स्वातंत्र्याचा आदर करत त्याच्यावर निस्सीम प्रेम करणे हेच खरे प्रेम होय ! याचा विचार करता आपापल्या सृजनातील स्वातंत्र्यच नव्हे तर वैयक्तीक आवडी-निवडी राखत एकमेकांच्या अलौकीक प्रेमात असणारे अमृता आणि इमरोज हे भविष्यात नक्कीच दंतकथा म्हणून ओळखले जाणार आहेत.
अमृताजींनी आपल्या सृजनातून अनेक विषयांना स्पर्श केला आहे. फाळणीच्या वेदना, विशेषत: यात लक्षावधी हिंदू, मुस्लीम, शीख स्त्रीयांची झालेली होरपळ त्यांच्या लिखाणातून विलक्षण परिणामकारकरित्या जगासमोर आली आहे. त्यांच्या वेदनांना अमृताजींनी शब्द दिले. मात्र त्या निव्वळ नारीवादी नव्हेत तर त्यांचे संपूर्ण मानवतेवर प्रेम आहे. मानवी जीवनातील विलक्षण गुंतागुंत त्यांच्या विविध कृतींमधून जगासमोर आली आहे. कथा, कादंबरी, कविता, लेख आदी विविध माध्यमांचा अतिशय समर्पक उपयोग त्यांनी केला. आणि हो यात त्यांच्या ‘रसीदी टिकट’ आणि ‘कागज ते कॅनव्हास’ या आत्मचरित्रपर पुस्तकांना विसरून कसे चालेल? शालेय वयातच ‘रसीदी टिकट’ हातात पडले तेव्हा मी गडबडून गेलो होतो. मला ते समजले नाही. मात्र काही वर्षांनी पुन्हा वाचल्यानंतर याची महत्ता लक्षात आली. अनेक पुस्तकांमधील निवडक प्रकरणे आपण विसरू शकत नाहीत. आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा झालो?’ या पुस्तकातील शेवटचे ‘मी कोण आहे?’ हे विलक्षण हळूवारपणे व्यक्त केलेले स्वगत मला खूप भावते. मी याची अनेक पारायणे केली आहेत. याचप्रमाणे ‘रसीदी टिकट’मधील ‘सोलहवा साल’ या प्रकरणाची अमीट छाप माझ्यावर आहे. सोळावे वर्ष हे अनेक अर्थांनी लक्षणीय मानले जाते. अमृताजींच्या जीवनात या वर्षात नेमके काय झाले हे त्यांनी अत्यंत विलक्षण पध्दतीने रेखाटले आहे. त्यांची आई अकराव्या वर्षीच वारली. तर धार्मीक प्रवृत्तीचे असणारे साहित्यिक वडील हे त्यांच्याच धुंदीत असत. यात सोळावे वर्ष किती हळूवारपणे त्यांच्या आयुष्यात आले हे यात नमूद करण्यात आले आहे. त्या म्हणतात:-
“घर में पिताजी के सिवाय कोई नहीं था- वे भी लेखक जो सारी रात जागते थे, लिखते थे और सारे दिन सोते थे। माँ जीवित होतीं तो शायद सोलहवाँ साल और तरह से आता- परिचितों की तरह, सहेलियों की तरह। पर माँ की गैर हाजिरी के कारण जिंदगी में से बहुत कुछ गैर हाजिरी हो गया था। आसपास के अच्छे-बुरे प्रभावों से बचाने के लिए पिता को इसमें ही सुरक्षा समझ में आई थी कि मेरा कोई परिचित न हो, न स्कूल की कोई लड़की, न पड़ोस का कोई लड़का।
सोलहवाँ बरस भी इसी गिनती में शामिल था और मेरा ख्याल है, इसीलिए वह सीधी तरह का घर का दरवाजा खटखटाकर नहीं आया था, चोरों की तरह आया था। कहते हैं ऋषियों की समाधि भंग करने के लिए जो अप्सराएँ आती थीं, उनमें राजा इंद्र की साजिश होती थी। मेरा सोलहवाँ साल भी अवश्य ही ईश्वर की साजिश रहा होगा, क्योंकि इसने मेरे बचपन की समाधि तोड़ दी थी। मैं कविताएँ लिखने लगी थी और हर कविता मुझे वर्जित इच्छा की तरह लगती थी। किसी ऋषि की समाधि टूट जाए तो भटकने का शाप उसके पीछे पड़ जाता है- ‘सोचों का शाप’ मेरे पीछे पड़ गया ।
त्या पुढे म्हणतात:- “इसिलिये सोलहवे वर्ष से मेरा परिचय उस असफल प्रेम के समान था जिसकी कसक सदा के लिये कही पडी रह जाती है ! और इसिलिये वह सोलहवा साल अब भी मेरी जिंदगी के हर वर्ष मे कही न कही शामील है…..खुदा की जिस साजीश ने यह सोलहवा साल किसी अप्सरा की तरह भेजकर मेरे बचपन की समाधी भंग की थी, उस साजीश की मै ऋणी हू। क्योकी उस साजीश का संबंध केवल एक वर्ष से नही था, मेरी सारी उम्र से है ।”
अमृताजींच्या लिखाणातील मुख्य धागा प्रेम आहे. ते लौकीक आणि पारलौकीक दोन्ही प्रकारचे ! त्यांच्या लिखाणात अनेकदा गूढ प्रतिमा, स्वप्ने यांचा वारंवार उल्लेख येतो. प्रेममार्गातून आपल्या आयुष्याचे सार शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमिवर त्यांनी वारीस शाह या विख्यात सूफी संताला उद्देशून लिहलेली कविता अजरामर झालेली आहे. यात ते वारीस शाह यांना कबरमधून बाहेर येत पुन्हा एकदा प्रितीचे तराणे गाण्याचे आवाहन करतात. तेव्हा फाळणीमुळे पंजाब रक्तबंबाळ झाला होता, देश दुभंगला होता. आताही फारशी स्थिती वेगळी नाही. फरक फक्त आता भौगोलिक नव्हे तर मानसिक दुभंगलेपणा आहे. यामुळे पुन्हा एका अमृता प्रीतमची आवश्यकता आहे. किंबहुना त्यांना आवाहनदेखील करू शकतो. अगदी त्यांचेच शब्द बदलून सांगावयाचे झाले तर….
आज आखॉ अमृता प्रीतम नूँ कित्थो कबरां विच्चो बोल
ते अज्ज किताब-ए-इश्क दा कोई अगला वरका फोल ।
(आज मै अमृता प्रीतम से कहती हू, अपनी कब्र से बोल
और इश्क की, किताब का कोई नया पन्ना खोल ।)
अर्थात अमृता काही आता परत येणार नसली तरी तिच्या कविता आणि शब्दांमधून जगासमोर आलेले भावविश्व जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी नक्कीच सक्षम आहे. म्हणूनच आज की शाम….अमृता प्रीतम के नाम !