Featured विज्ञान-तंत्रज्ञान

प्रयत्ने वाळू रगडता, वीजही मिळे

प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने वाळूतून अगदी तेलही काढणे शक्य असल्याची म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे. वाळूपासून कुणी तेल काढल्याचे ऐकिवात नाही. मात्र एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने यापासून चक्क वीज निर्मित करून संपूर्ण जगामध्ये धमाल उडवून दिली आहे. गेल्या बुधवारी अमेरिकेतील ‘ब्लुम एनर्जी’ या कंपनीचे संचालक डॉ. के.आर. श्रीधर यांनी एका कार्यक्रमात आपले ‘ब्लुम बॉक्स’ हे उपकरण अधिकृतरित्या बाजारपेठेत उतरवले. गेल्या काही वर्षांपासून डॉ. श्रीधर यांच्या संशोधनाविषयी शास्त्रीय जगतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असली तरी याविषयी अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. 21 फेब्रुवारी रोजी ‘सीबीएस’ या वाहिनीवर त्यांची ‘सिक्स्टी मिनिटस्‌’ या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित करण्यात आल्यावर सर्वसामान्यांना याची माहिती झाली. यानंतर तीन दिवसांनी उद्योग आणि शास्त्रीय तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हे प्रॉडक्ट जगासमोर आल्यानंतर तर सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. विशेषज्ञांच्या मते, या संशोधनाने मानवी प्रगतीला क्रांतीकारी वळण लागणार आहे. एकविसाव्या शतकावर याचीच मुद्रा उमटणार असल्याचे भाकितही करण्यात आले आहे. हे संशोधन नेमके आहे तरी काय? याच्या प्रत्यक्षात उपयोगातून कोणते लाभ होणार? आपल्या जीवनात यामुळे काय फरक पडणार? याचाच घेतलेला हा वेध.
‘ब्लूम बॉक्स’ची माहिती घेण्याआधी या अनुषंगाने झालेल्या संशोधनाची पूर्वपिठीका समजून घेणे गरजेचे आहे. ‘ब्लूम एनर्जी’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के.आर. श्रीधर हे असून त्यांच्याच अभिनव संशोधनातून हे उपकरण तयार करण्यात आले आहे. श्रीधर यांनी चेन्नई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनइरिंगची पदवी संपादन केल्यावर, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले आहे. तेथील अरिझोना विद्यापीठात अध्ययनाचे काम करत असताना त्यांनी ‘नासा’ या संस्थेसाठीदेखील काम केले आहे. काही वर्षांपूर्वी या संस्थेने मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी एक अत्यंत व्यापक मोहिम आखली होती. मंगळावर पाणी आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असला तरी तेथे प्राणवायू नसल्याने मानवाचे वास्तव्य अशक्य आहे. यामुळे श्रीधर याच्यावर सौर उर्जा आणि मंगळावरील पाण्याचा उपयोग करून प्राणवायू आणि हायड्रोजनची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यातील प्राणवायू मानवाच्या श्वसनासाठी तर हायड्रोजन हा वाहनांना इंधन म्हणून वापरता येईल अशी ही योजना होती. श्रीधर यांनी यासाठी एक रिअक्टर तयार केला. याच्या मदतीने त्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. काही कारणांनी ‘नासा’ची ही योजना लांबणीवर पडल्याने ते निराश झाले. एकदा त्यांच्या मनात ‘मंगळासाठी तयार करण्यात आलेली प्रक्रिया उलट केली तर…’ हा विचार आला अन्‌ या संकल्पनेने त्यांना झपाटून टाकले. प्राणवायू आणि हायड्रोजनच्या मदतीने उर्जा तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. यातून 2002 साली त्यांनी ‘ब्लूम एनर्जी’ ही कंपनी सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी तयार केलेली उपकरणे ही काही विख्यात कंपन्या वापरत असल्या तरी याविषयीची माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. आता मात्र या संशोधनाचे सर्व तपशील जगजाहीर करण्यात आले आहेत.
डॉ. श्रीधर यांचा ‘ब्लूम बॉक्स’ ही एक प्रकारची अनोखी बॅटरीच आहे. यात वाळूपासून तयार करण्यात आलेल्या अत्यंत पातळ चकत्यांवर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या शाईचे विशिष्ट आवरण चढवण्यात आले आहे. हेच ऍनोड आणि कॅथोडचे काम करतात. यावर धन आणि ऋण प्रभार जमा होतो. या चकत्यांना धातुच्या पट्यांनी विलग करण्यात आले आहे. या भागावर नैसर्गिक वायू सोडल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन वीज निर्मिती होते. या उपकरणात इंधन म्हणून नैसर्गिक वायू, इथीलिन, मद्यार्क, मिथेन, कचर्‍यातून उत्सर्जित होणारा वायू तसेच गोबर गॅसही चालू शकतो. डॉ. श्रीधर यांनी तयार केलेल्या एका चकतीतून 25 वॅट विजेचे उत्पादन होते. या शेकडो चकत्यांना एकत्र जोडून त्यांनी 100 किलोवॅट उत्पादन करणारा ‘ब्लूम बॉक्स’ तयार केला आहे. याला त्यांनी ‘एनर्जी सर्व्हर’ हे नाव दिले आहे. एखाद्या कार्यालयातील माहितीचा संग्रह ज्याप्रमाणे संगणकीय सर्व्हरवर असतो त्याचप्रमाणे हा उर्जेचा संग्राहक राहणार आहे. या उपकरणाचे अनेक लाभ आहेत. याचा आकार अत्यंत आटोपशीर आहे. 100 केव्ही क्षमतेचे हे उपकरण एखाद्या लहान कारच्या जागेवरही मावू शकते. याच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये सुमारे 800 अंश सेल्सइस इतके तापमान निर्मित होत असले तरी, यात अत्यंत उच्च दर्जाची शीतकरण यंत्रणा बसविण्यात आलेली असल्याने, उष्णतेचा जराही त्रास जाणवत नाही. या उपकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या विजेचा खर्च हा इतर स्त्रोतांच्या मानाने खूप कमी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक उर्जा निर्मितीपेक्षा यात पर्यावरणाची हानी अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे सिध्द झाले आहे. डॉ. श्रीधर यांचे संशोधन अद्भुत आणि युगप्रवर्तक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया जगभर उमटली आहे.
वीज हा आधुनिक युगाचा अविभाज्य घटक असला तरी मानवापुढील ही मोठी समस्यादेखील आहे. पारंपरिक पध्दतीने तयार करण्यात येणार्‍या विजेमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. एवढे करूनही पृथ्वीवर सर्वांनाच वीज मिळत नाही. ‘युनो’च्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे दीड अब्ज अर्थात एक चतुर्थांश नागरिक उर्जेपासून अद्यापही वंचित आहेत. मर्यादित उर्जास्त्रोत, उत्पादनाचा अवाढव्य खर्च यासोबत पर्यावरणाचे नुकसान यामुळे बर्‍याच देशांमध्ये उर्जा संकट अत्यंत तीव्र स्वरूप धारण करू पाहत आहे. आपणही भारनियमनाच्या रूपाने याचे चटके सहन करत आहोत. या सर्व बाबींवर ‘ब्लूम बॉक्स’ हे अत्यंत परिणामकारक ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजेचे दूरवर वहन (ट्रान्समिशन) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. विजेचे उत्पादन आणि प्रत्यक्ष उपयोग यादरम्यान होणारी गळती हा सर्वत्र चिंतेचा विषय आहे. यातच वहन करण्यासाठी अत्यंत महागडी यंत्रणा उभारावी लागते. या पार्श्वभूमिवर, डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाने आमूलाग्र बदल होणे शक्य आहे. विजेची विद्यमान सुविधा ही दूरध्वनीप्रमाणे असली तरी ‘ब्लुम बॉक्स’ मात्र मोबाईलप्रमाणे आहे. मोबाईलमुळे कोट्यवधींच्या हाताशी संपर्काचे हुकमी साधन आले. याचप्रमाणे ‘एनर्जी सर्व्हर’ हा विद्युत निर्मिती आणि वापराचे विकेंद्रीकरण करण्यास समर्थ आहे. उर्जा निर्मिती आणि वितरणाच्या अजस्त्र यंत्रणेऐवजी ठिकठिकाणी अगदी आटोपशीर आकाराचे ‘ब्लुम बॉक्सेस’ बसविण्यात आल्यास, ते अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. 100 किलो वॅट क्षमतेच्या ‘ब्लुम बॉक्स’चे मूल्य आठ लक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे. हा प्राथमिक खर्च थोडासा जास्त असला तरी यातून होणारी वीज निर्मिती ही स्वस्त आहे. डॉ. श्रीधर यांच्या दाव्यानुसार, फक्त तीन वर्षातच या उपकरणाची किंमत वसूल होऊ शकते. सध्या बाजारात अन्य ‘फ्युएल सेल’ही उपलब्ध असले तरी डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाविषयी जगात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर जगभर अत्यंत सखोल संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापरही करण्यात येत आहे. अर्थात या विद्यमान पध्दतींमध्ये मोठ्या प्रमाणात दोष आहेत. सौर आणि पवन उर्जा ही स्वस्त आणि पर्यावरणाला अनुकूल असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. एक तर स्त्रोत (ऊन अथवा वारा) उपलब्ध नसल्यास त्यांच्यापासून उर्जा तयार होत नाही. याशिवाय, असल्या स्वरूपाने तयार झालेल्या उर्जेचा संचयही शक्य नाही. या पार्श्वभूमिवर, ‘ब्लुम बॉक्स’मध्ये अनेक अनोख्या सुविधा आहेत. एक तर हा अगदी आटोपशीर आकाराचा आहे. औद्योगिक वापरासाठी लागणारा ‘एनर्जी सर्व्हर’ हा गॅरेजमध्ये सहजगत्या बसवणे शक्य आहे. याशिवाय, डॉ. श्रीधर हे अवघ्या तीन हजार डॉलर्स मूल्यामध्ये घरगुती वापरासाठी एक किलोवॅट क्षमतेचा बॉक्स तयार करत आहेत. हा तर अगदी हातावर मावणारा असून, तो घराच्या कोणत्याही कोपर्‍यात मावू शकतो. या उपकरणाद्वारे अगदी 24 तास विजेचे उत्पादन शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे यात उर्जेचा संग्रहदेखील शक्य आहे. यामुळे आगामी काळात या बॉक्सला सौर वा पवन उर्जा निमितीचे युनिट जोडल्यास या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून येऊ शकते. बर्‍याचदा एखादे मजेशीर संशोधन जाहीर होत असले तरी कालौघात त्याचा प्रत्यक्ष वापर शक्य होत नाही. मात्र ‘ब्लुम बॉक्स’ याला अपवाद आहे. डॉ. श्रीधर यांनी 2002 साली हे उपकरण विकसित केले होते. मात्र याचा व्यावसायिक स्तरावर उपयोगही सुरू झाल्यानंतरच त्यांनी याविषयी जगाला माहिती दिली. एक प्रकारे ‘आधी केले मग सांगितले’ अशा प्रकाराचा अवलंब केल्याने डॉ. श्रीधर यांच्या उपकरणाच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.


डॉ. श्रीधर

About the author

shekhar patil

Leave a Comment