चालू घडामोडी राजकारण

प्रतिकांची पळवा-पळवी

भाजपने उत्तरप्रदेशात राजा महेंद्रप्रताप सिंग यांच्या जयंतीवरून केलेले राजकारण हे समाजात दुहीची बिजे रोवणारे आहे. यातून अन्य विचारधारेची प्रतिके हिसकावण्याची चलाख प्रवृत्तीदेखील ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

सध्या कायम ‘इलेक्शन मोड’मध्ये असणार्‍या भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशात अगदी पक्के सेक्युलर असणारे राजा महेंद्रप्रताप सिंग यांच्या जयंतीवरून केलेले राजकारण हे भारतीय समाजात दुहीची बिजे रोवणारे आहे. यातून अन्य विचारधारेची प्रतिके हिसकावण्याची चलाख प्रवृत्तीदेखील ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतर त्यांनी काही क्षेत्रांमध्ये दमदार पावले टाकली ही बाब कुणी अमान्य करणार नाही. मात्र देशातील जनतेला खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आल्याची अनुभुती अद्याप आलेली नाही. अर्थात भारतीय जनता पक्षाचा देशात विस्तार करण्यासाठी एक जोरदार मोहीम भारतीय जनता पक्षाने आखल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे नेतृत्व अर्थातच सद्यस्थितीतील सर्वाधीक यशस्वी पॉलिटिकल मार्केटिंग गुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत. यासाठी त्यांनी प्रोपगंड्यात माहीर कार्पोरेट मीडियाला तर हाताशी धरलेच पण राजकीय विरोधकांना अक्षरश: हतबल करणार्‍या खेळ्यादेखील रचल्या आहेत. नव्वदच्या दशकातील मंडल आयोगाने इतर मागास समुहांना आत्मभान प्रदान करताच संघ परिवाराने विविध राज्यांमध्ये अनेक ओबीसी चेहरे लॉंच केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर, समान नागरी कायदा, कलम-३७० आदी मुद्दे दिर्घजीवी नसल्याने नवीन मुद्यांचा शोध तर घेण्यात आलाच पण यासोबत नवीन राजकीय नायकांचा शोधही सुरू झाला. यातून दुरगामी रणनिती तयार करण्यात आली. याचे स्पष्ट संकेत एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी मिळाले.

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल हे कॉंग्रेसमधील उजव्या विचारसरणीचे नेते म्हणून ओळखले जात. खरं तर देशाचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासह अनेक कॉंग्रेसी नेत्यांची हिंदुत्ववादाची भुमिका लपून राहिली नव्हती. याचप्रमाणे सरदार पटेल यांनाही ‘हिंदू आयकॉन’ ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. महात्मा गांधीजी यांच्या हत्येनंतर पटेल यांनी संघावर बंदी आणली तरी त्यांनी कधी काळी संघावर स्तुतीसुमने उधळली होती हा धागा पकडत याच बाबीचे उदात्तीकरण करण्यात आले. पाश्‍चात्य संस्कारात रंगलेल्या निधर्मी पंडित नेहरू यांनी महात्मा गांधीजींवर दबाव आणून सरदार पटेल यांना हेतुपुर्वक पंतप्रधानपदापासून रोखले असा प्रचार सुरू झाला. साधारणत: २००५पासून संघाने सरदार पटेल यांना आपलेसे करण्यास प्रारंभ केला. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असणार्‍या नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचे जगातील सर्वात भव्य स्मारक उभारण्यास सुरूवातही केली. त्यांनी प्रति पटेल अशी प्रतिमा तयार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. लोकसभेच्या प्रचारातही पटेल यांच्यावरील अन्यायाचा मुद्दादेखील मोदींनी प्रखरपणे मांडला. युपीए-२ सरकारचा भ्रष्ट कारभार आणि अफलातून प्रचारतंत्रामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपचा आक्रमकपणा अजूनच वाढला.

देशातील सर्वोच्च पद मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मुखातून सरदार पटेल यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव वारंवार निघू लागले. त्यांच्या जयंतीदिनी देशव्यापी स्वच्छता मोहिम सुरू करणार्‍या मोदींनी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघातील व्यासपीठावरू बापूंचे आवर्जून स्मरण केले. तर पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. यानंतर नेहरूंच्या पराष्ट्रनितीवर मोदींच्या सकारात्मक वक्तव्याने कॉंग्रेसी नेते थक्क झाले. एका अर्थाने भाजपने अगदी उघडपणे महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल या कॉंग्रेसच्या पारंपरिक आयकॉन्सला ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता अलीकडच्या काळात भाजपने अन्य विचारधारा असणार्‍या अनेक नायकांना आपलेसे केले आहे. कट्टर डावी विचारसरणी असणारे आणि पक्के निरिश्‍वरवादी शहीद भगतसिंग यांचा भाजपने उपयोग केला. याचप्रमाणे विवेकानंद आणि नेताजी बोस हेदेखील कट्टर उजव्या विचारसरणीचे असल्याचा खुबीने प्रचार केला. मात्र आता सुभाषबाबूंच्या गुढ मृत्युबाबत गुप्त कागदपत्रे उघड करण्यास मोदी सरकारने साफ नकार दिलाय. विशेष म्हणजे आधीचे युपीए सरकार ही कागदपत्रे उघड का करत नाही? यावरून मोदींनी कॉंग्रेसला खूप धारेवर धरले होते ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात आपल्या सहा महिन्यांच्या कालखंडात अनेक मुद्यांवरून यु-टर्न घेणार्‍या मोदी सरकारचा हा पवित्रा स्वाभाविक मानला तरी अलिगडमधील प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असेच आहे.

अलीगडमधील भाजपची खेळी समजून घेण्याआधी आपण या प्रकरणाची थोडी पार्श्‍वभुमी समजून घेऊया. अलीगड मुस्लीम विद्यापीठाची स्थापना सर सैयद अहमद खान यांनी केली आहे. यासाठी त्यांना विविध राजे-महाराजांसह अगदी सर्वसामान्यांनीही मदत केली होती. या विद्यापीठाला तत्कालीन हाथरस संस्थानाचे राजे महेंद्रप्रताप सिंग यांनी तीन एकर जमीन दान केली होती. १८८६ साली जन्मलेले महेंद्रप्रताप हे मार्क्सवादी विचारसरणीचे स्वातंत्र्यसैनिक

राजा महेंद्रप्रताप सिंग

राजा महेंद्रप्रताप सिंग

होते. खुद्द हिंदू असणार्‍या या राजाचे शिक्षण उर्दू माध्यमातून आणि मुस्लीम बहुसंख्य असणार्‍या मोहंमद अँग्लो ओरिएंटल कॉलेजात (हेच कॉलेज १९२० मध्ये अलीगड मुस्लीम विद्यापीठात परिवर्तीत झाले) झाले होते तर त्यांची पत्नी शीख धर्मीय होती. एका अर्थाने पक्के सेक्युलर असणार्‍या महेंद्रप्रताप यांनी पीटर पीर प्रताप असे विचित्र मात्र निधर्मी नावही धारण केले होते. त्यांनी काबुलमध्ये १०१५ साली भारताचे पहिले निर्वासित सरकार स्थापन केले होते. याचे ते प्रमुख होते. तसेच मौलवी बरकतुल्लाह या मुस्लीम व्यक्तीला त्यांनी पंतप्रधान म्हणून तर अबैदुल्ला सिंधी यांना गृहमंत्री म्हणून घोषित केले होते. तब्बल २३ वर्षे जगभर प्रवास करून त्यांनी भारतातील ब्रिटीश सत्ता उलथून टाकण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी हाथरस लोकसभा मतदारसंघातून दोनदा अपक्ष म्हणून विजय मिळवला. १९७९ साली त्यांचे निधन झाले. आता पुन्हा मुद्याकडे वळूया. राजा महेंद्रप्रताप यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठाला तीन एकर जागा दान दिल्याने त्यांची १ डिसेंबर ही जयंती विद्यापीठात साजरी व्हावी असा आग्रह भारतीय जनता पक्षाने धरल्याने ठिणगी पडली.

अलीगड विद्यापीठात सर सैयद अहमद खान यांची जयंती साजरी केली जाते तर महेंद्रप्रताप यांची का नाही? असा खडा सवाल करत भाजपचे स्थानिक खासदार सतीश गौतम यांनी दबावाचे वातावरण निर्माण केले. प्रारंभी विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र यात भाजप आणि विशेषत: संघाचे लोक सहभागी होणार असल्याचे पाहून याला प्रखर विरोध करण्यात आला. यावरून हा कार्यक्रम बारगळला असला तरी अनेक प्रश्‍नांना निर्माण करून गेला आहे. उत्तरप्रदेशात २०१७ साली विधानसभा निवडणूक होत आहे. सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातील ऐंशीपैकी तब्बल ७५ जागा मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्यात हिंदू मतांच्या ध्रुविकरणासाठी हा मुद्दा भाजपने उकरून काढल्याचा आरोप होत आहे. यामुळे आजवर राजा महेंद्रप्रताप यांचे स्मरणही न करणार्‍या भाजपने त्यांना ‘जाट राजा’ म्हणून ममत्व दाखवत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला हो उघड आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या मुजफ्फरपुर हत्याकांडातून झालेल्या ध्रुविकरणाचा भाजपचा खूप लाभ झाला होता. आता याचीच पुढची आवृत्ती महेंद्रप्रताप यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून दिसून आली आहे. मध्यंतरी उत्तरप्रदेशात संघ परिवाराने ‘लव्ह जिहाद’च्या मुद्याला हवा दिली तरी यातून फारसे सिध्द न झाल्याने आता विविध स्थानिक मुद्दे उपस्थित करण्याची रणनिती यातून दिसून आली आहे. राजा महेंद्रप्रताप हे अत्यंत प्रबळ अशा जाट समुदायातील असल्याने भाजपने खुबीने त्यांच्या जयंतीचा मुद्दा काढला. जाट समुदाय सध्या भाजपसोबत असल्याने हा मुद्दा त्यांनी प्रतिष्ठेचा बनविला. मात्र ज्यांच्यावरून हा वाद झाला ते महेंद्रप्रताप सिंग हे कट्टर निधर्मी होते. धक्कादायक बाब म्हणजे १९५७च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मथुरा मतदारसंघातून भाजपची आधीची आवृत्ती असणार्‍या जनसंघाकडून लढणार्‍या अटलबिहारी वाजपेयी यांचा दणदणीत पराभव केला होता. या निवडणुकीत अटलजी तब्बल चौथ्या क्रमांकावर फेकले जाऊन त्यांचे डिपॉजीटही जप्त झाले होते. (या निवडणुकीत अटलजी दोन मतदारसंघातून लढत होते. मथुरा येथून त्यांचा पराभव झाला तरी ते बलरामपुर या दुसर्‍या मतदारसंघातून निवडून लोकसभेत पोहचले होते.) यामुळे भाजपच्या माजी पंतप्रधानांना निवडणुकीत धुळ चारणार्‍या आणि भाजपच्या अगदी विरूध्द विचारधारा असणार्‍या राजा महेंद्रप्रताप यांचा आश्रय या पक्षाला घ्यावा लागतो ही बाब धुर्त राजकारणाची द्योतक असली तरी या पक्षाला शोभणारी मुळीच नाही. अर्थात अलीकडच्या काळात भाजपने अत्यंत चतुराईने विविध राज्यांमध्ये प्रतिके हिसकावण्याची पध्दत रूढ केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देत त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेच्या हक्काच्या दैवताला अलगदपणे स्वीकार केले होते. याप्रमाणे राजकीय स्वार्थासाठी नवनवीन दैवते शोधण्याचा भाजपचा आटापीटा असल्याचे स्पष्ट दिसते. अर्थात या सर्व प्रकारावर आक्षेप घेणारा कॉंग्रेस पक्ष गांधी-नेहरूंच्या पलीकडे पाहण्यास तयार नसल्याने भाजपने या महापुरूषांचा वारसा ‘हायजॅक’ करण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या वर्मी लागला आहे.

महापुरूषांना कुणीही जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे गैर आहे. याचप्रमाणे त्यांचा पॉलिटिकल आयकॉन्स म्हणून वापर करणे ही बाब तर याहूनही गंभीर अशीच आहे. प्रत्येक महापुरूषाचा वारसा हा संपुर्ण देशाच्या उपयोगात पडणार आहे. त्यावर राजकीय पोळी शेकून घेणे गैर असेच आहे. यातच आता भाजपने प्रतिके पळविण्यास प्रारंभ केल्याने कॉंग्रेस आणि अन्य पक्षही जागृत होऊन देशात नवीन राजकीय प्रतिमांचे युध्द रंगण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अर्थात हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. देशाच्या अगदी मुलभुत सुविधांपासून ते आंतराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेबाबत असंख्य समस्या असतांनाही आपले राजकीय पक्ष हे मतपेढीच्या राजकारणासाठी विकासाच्या मुद्यांचा नव्हे तर विविध महापुरूष अथवा त्यांच्याशी संबंधीत मुद्यांचा वापर करतात तेव्हा त्यांच्या क्षुद्र राजकारणाची किव करावीशी वाटते. आज भाजप जे करत आहे ते कॉंग्रेसनेही केले आहे. यामुळे ‘स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस विसर्जीत करावी’ ही आकांक्षा प्रकट करणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हा पक्ष कवटाळून बसला आहे. खुद्द इंदिरा गांधी यांच्या नावातील गांधी हे आडनाव भारतीय मानसिकता आणि त्यातून होणारा राजकीय लाभ लक्षात घेऊन धारण करण्यात आले हा इतिहास आपल्यासमोर आहे. यामुळे भारतीय राजकारणातील प्रतिकांचा खेळ समाप्त होऊन राजकारणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य भारतीय व्यक्ती येईल असे मानणे आज तरी दिवास्वप्न वाटत आहे.

जाता…जाता एक अत्यंत मनोरंजक बाब- महाराष्ट्रात बर्‍याच वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहु-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगत आहेत. भविष्यात भाजप चलाखपणाने या प्रतिकांना हिसकवण्याचा प्रयत्न करणार नाही हे कशावरून?

अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे प्रवेशद्वार.

अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे प्रवेशद्वार.

About the author

shekhar patil

Leave a Comment