चित्रपट

प्यार तेरी पहली नजर को सलाम…

Written by shekhar patil

या चित्रपटातील सर्वच गाणी सरस आहेत. मात्र माझ्या मते तरी ‘मुकुटमणी’ शोभणारे हेच. पहिले प्रेम, पहिली नजर आदींचे स्मरण होताच हे गाणे अवचितपणे आठवते.

आज पुन्हा एकदा ‘फुलो के रंग से दिल की कलम से’ लिहायचे म्हटल्यानंतर ओठांवर अगदी सहजगत्या रेंगाळणारे आणि हृदयाच्या तारा झंकृत करणार्‍या एक दुजे के लिए या अजरामर चित्रपटातील ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम…प्यार तेरी पहली नजर को सलाम…’ हे गाणे आपसूकच आठवले. साहजीकच आज त्यावरच…

खर्‍या अर्थाने जीवनात पहिले प्रेम येण्याआधीच मी डायरीत नोंद केलेल्या वि.स. खांडेकर यांच्या ‘पहिले प्रेम’ या पुस्तकातील पुढील वेच्याचे कितीदा वाचन केले हे कळलेही नाही…(काळाच्या ओघात खांडेकरांच्या साहित्याचे वाचन केव्हाच मागे पडले तरी ही नोंद कायम स्मरणात आहे.)

‘‘पहिलं प्रेम स्वप्नाळू असते, पण खोटे नसते, स्त्री पुरुषांच्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा जो मोठा भाग असतो, तो मान्य करायला तरुण मनाची बहुदा तयारी नसते. काव्यातल्या कल्पनांनी भारून गेलेल्या तरुण दृष्टीला पहिले प्रेम हे दिव्य, स्वर्गीय, अतुल आणि अनुपम वाटावे, यात अस्वाभाविक असे काहीच नाही. काव्य आणि काळा चष्मा यांचे साम्य कुणालाही आवडले नाही तरी व्यवहारात ते पदोपदी अनुभवाला येते. डोळ्यांवर काळा चष्मा घालून उन्हाकडे पाहणाराला त्याची तीव्रता जशी जाणवत नाही, त्या प्रमाणे काव्य दृष्टीने जगाकडे पाहणारालाही खाचखळग्यांची जाणीव होत नाही. पहिल्या प्रेमातल्या निराशेने मनुष्य उदास होईल ,त्याच्या डोळ्यांवरची काव्याची झापड थोडीफार कमी होईल पण एवढ्या मुळे त्याला पुन्हा प्रेम करावेसे वाटणार नाही आणि केले तरी त्याला पहिल्या प्रेमाची सर येणार नाही या गोष्टी फक्त काव्यात शोभून दिसतात. तरी जीवनात त्यांना अवास्तव महत्व देण्यात अर्थ नाही.’’

प्रत्येक क्षणाला जगात कुठेतरी पहिले प्रेम होतच असते. याची अभिव्यक्तीदेखील असंख्य प्रकारांनी झाली आहे. प्राचीन साहित्य, लोकगितांपासून ते कथा,कविता कादंबर्‍या, नाटक, चित्रपट आदींमध्ये याची अनेक विलोभनीय रूपे आपण पाहिलीत. अजूनही अनुभवत आहोत. गाण्यांचा विचार केला तर चिक्कार हिंदी/मराठी गाणी पहिल्या प्रेमावर आधारित आहेत. पण एक नाजूक गुंतागुंत राहिलीच. पहिल्या प्रेमाची जाणीव ही कधी पहिल्याच नजरेत होते म्हणजेच- ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट!’; तर कधी काही काळानंतर याची जाणीव होते. यातील पहिल्या सुचकच नव्हे तर थेट प्रेमात पडल्याची जाणीव करून देणार्‍या नेत्रसंकेताबाबत तर क्या कहने…! नेमक्या याच नजरेचा गौरव करत ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांनी प्रेमरसाने ओतप्रोत गाणे लिहले. त्या काळात ऐन भरात असणार्‍या लक्ष्मी-प्यारे या जोडीने त्याला साज दिला. पडद्यावर रती अग्निहोत्री अन् कमाल हसन यांनी ते साकारले अन् लतादिदींच्या आर्त स्वराने यावर कळस चढविला.

बहुतांश हिंदी चित्रपटांच्या गाभ्यात कुठे तरी प्रेमकथा असतेच. अनेक सिनेमे तर प्रेमकथांनीच गाजलेत. मात्र सत्तरच्या दशकात बहुतांश बॉलिवुडपटातील प्रेम हे तोंडी लावण्यापुरते उरले. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्या अस्वस्थ कालखंडातील तरूणाईचा आवाज बनलेला आणि अवघा रूपेरी पडदा व्यापून टाकणारा अमिताभ बच्चन नावाचा महानायक! त्याच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेत व्यवस्थेवर सूड उगवण्यास प्रथम प्राधान्य असे. अर्थात यानंतर प्रेम, रूदन, हास्य आदी रसांचा क्रम लागत असे. या कालखंडात मोजक्या प्रेमकथा आल्या. खुद्द अमिताभच्या कभी-कभी वा सिलसिलातील भुमिका या प्रेमविराच्या होत्या. मात्र या कालखंडातील अगदी खर्‍या अर्थाने गाजलेली प्रेमकथा म्हणून ‘एक दुजे के लिए’ची इतिहासात नोंद झाली आहे. हा खर तर १९७८ साली के. बालचंदर यांच्या मुळ तेलगू भाषेतल्या ‘मारो चरित्रा’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक. मुळ चित्रपटात तामिळ मुलगा आणि तेलगू मुलगी यांच्या आंतर भाषिक व सांस्कृतीक प्रेमातील शोकात्म नाट्य रंगविण्यात आले होते. या चित्रपटाला रसिकांनी डोक्यावर उचलून धरल्याने तो तामिळ, कन्नड आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषांमध्ये ‘डब’ करण्यात आला. यानंतर के. बालचंदर यांनी त्याला (१९८१ साली) हिंदीत नव्याने बनविण्याचा निर्णय घेतला. यात मुळ नायिका सरिता हिच्या जागी रती अग्निहोत्री असा बदल करण्यात आला. नायक कमल हासन आणि गायक एस.पी. बालासुब्रमण्यम आदींना कायम ठेवण्यात आले. या चित्रपटातील सर्वच गाणी सरस आहेत. मात्र माझ्या मते तरी ‘मुकुटमणी’ शोभणारे ‘प्यार तेरी पहली नजर को सलाम’ हेच आहे.

आता या गाण्यापर्यंत चित्रपटात बर्‍याच घडामोडी झालेल्या असतात. दाक्षिणात्य वासू आणि उत्तर भारतीय सपना यांच्यातील प्रेमाने दोन्ही कुटुंबांमध्ये वादंग उठलेले असते. यातून या दोघांनी एकमेकांपासून एक वर्ष दुर रहावे आणि या कालखंडात वासूने हिंदी भाषा शिकावी अशी अट टाकण्यात आलेली असते. आता दोन्ही बाजूंनी विरह, यातून होणारी जीवघेणी तगमग, गैर समजुतीचे वादंग, कट-कारस्थाने आदी बाबी सुरूच असतात. अशातच पहार्‍यात असणारी सपना ही वासूसोबतच्या भेटीगाठींचा साक्षी असणारा सागर, समुद्र किनारा, मंदिर, पुरातन हवेली, डोंगर-दर्‍या आदींच्या सानिध्यात आपल्या प्रेमाचे स्मरण करते अन् पडद्यावर जादू पसरते…अनुप जलोटा यांच्या उच्च स्वरातून मानवी जीवनातील अटळ सत्य बाहेर पडते…

कोशीश कर के देख ले, दरिया सारे, नदीया सारी
दिल की लगी नही बुझती, बुझती है सब चिंगारी

यानंतर लतादिदींच्या अमृतस्वरात सुरू होते पहिल्या प्रेमावरील अमरगान!

सोला बरस की बाली उमर को सलाम
ऐ प्यार तेरी, पहली नजर को सलाम

दुनिया में सब से पहले, जिस ने ये दिल दिया
दुनिया के सब से पहले, दिलबर को सलाम
दिलसे निकलने वाले, रस्ते का शुक्रिया
दिल तक पहुचनी वाली डगर को सलाम

जिस में जवान होकर, बदनाम हम हुए
उस शहर, उस गली, उस घर को सलाम
जिसने हमे मिलाया, जिसने जुदा किया
उस वक्त, उस घड़ी, उस गजर को सलाम

मिलते रहे यहॉं हम, ये है यहॉं लिखा
इस लिखावट की जेरो ज़बर को सलाम
साहिल की रेत पर यूँ लहरा उठा ये दिल
सागर में उठने वाली हर लहर को सलाम
इन मस्त गहरी गहरी, आँखों की झील में
जिसने हमे डूबोया, उस भँवर को सलाम
घूंघट को तोड़ कर जो सर से सरक गयी
ऐसी निगोड़ी धानी चुनर को सलाम
उल्फत के दुश्मनों ने कोशिश हजार की
फिर भी नहीं झुकी जो, उस नजर को सलाम

या नायिका आपल्या प्रेमाचे स्मरण करतांना याच्या वैश्‍विक भावनेशी नातेदेखील सांगत आहे. खरं तर ती ओथंबलेल्या हृदयाने कृतज्ञता प्रकट करतेय. जगात सर्वप्रथम प्रेमिकाला ती सलाम करते. हृदयातून निघणारा रस्ता आणि शेवटी हृदयापर्यंतच पोहचणार्‍या वाटेचेही स्मरण तिला आहे. प्रेमी अनेकदा अकारण बदनाम होत असतात. मात्र यासाठी कारणीभुत ठरणारे शहर, गल्ली आणि घर अगदी एवढेच नव्हे तर तो क्षणही तिच्या अगदी स्मरणात आहे. अर्थात कितीही बोभाटा झाली तरी आपण भेटतच राहू असा आशावाद तिला आहे. या अत्यानंदातच ती सागरातील लाटा, ‘त्या’च्या नेत्रातला महासागर एवढेच नव्हे तर त्याला पाहून खाली सरकलेल्या ओढणीचेही स्मरण करते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रेमाचा दुश्मन असणार्‍या जगाने प्रयत्नांची शिकस्त करूनही न झुकणार्‍या प्रेमाच्या नजरेलाही तिला सलाम आहेच.

‘एक दुजे के लिए’ ही शोकात्म प्रेमकथा होती. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर देशभरात अनेक वासू-सपनांनी मृत्यूला कवटाळले होते. मात्र या गाण्यात तरी प्रेमाच्या अमरत्वाला मांडण्यात आले आहे. या चित्रपटानंतर ‘कयामत से कयामत तक’, ‘मैने प्यार किया’, ‘आशिकी’, ‘डीडीएलजे’ आदींसह रूपेरी पडद्यावरील अन्य प्रेमकथांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाण्यांची मालिका सुरू झाली. आजही अनेक गाण्यांमधून प्रेम हे नवनवीन शब्द, संगीत आणि चालींमधून आपल्या हृदयाला स्पर्श करतच असते. मात्र प्रेम व त्यातही पहिल्या प्रेमातली ती पहिली नजर आणि अर्थातच याच्या अमरत्वाला या गाण्याच्या माध्यमातून मिळालेली अभिव्यक्ती ही रसिक मनाला धुंद करणारी आहे. अनेकदा ऐकून वा पाहूनच नव्हे तर अनुभवूनही यातील माधुर्य, गेयता व गोडवा कमी होत नाही. अर्थातच हे गाणे अतिशय सारगर्भ आहेच. महत्वाची बाब म्हणजे ते आपल्या आयुष्यातील एखाद्या तरी नाजूक घटनेशी संबंधीत आहेच. पहिले प्रेम, पहिली नजर आदींचे स्मरण होताच हे गाणे (किमान मला तरी!) अवचितपणे आठवते. चला आपणही आताच याचा आनंद लुटा…

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment