चालू घडामोडी राजकारण

पुन्हा सोनिया भरोसे

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आल्याने या चर्चेला पुर्णविराम मिळाला असला तरी यातून कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता धुसरच वाटत आहे.

गत लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाची प्रचंड वाताहत झाल्यानंतर पक्षात खांदेपालट होणार असल्याची अधून-मधून चर्चा होत होती. यातच पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आल्याने या चर्चेला पुर्णविराम मिळाला असला तरी यातून कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता धुसरच वाटत आहे.

सोनिया गांधी यांनी राजकारणात पाऊल टाकतांनाची स्थिती कॉंग्रेससाठी निराशाजनक होती. खरं तर राष्ट्रीय राजकारणातही तो कालखंड विचित्र स्थितीचा होता. यापुढे दिल्लीत आघाड्यांची सरकारे येणार असल्याचे संकेत तर यातून मिळतच होते. पण भाजपसारख्या पक्षाची ताकदही मोठ्या प्रमाणात वाढली होती. इकडे कॉंग्रेसलाही अंतर्गत कलहाने ग्रासले होते. पी.व्ही. नरसिंहा राव यांनी चतुराईने अल्प मतातील सरकार पाच वर्षे चालवले खरे. मात्र गांधी घराण्याच्या पलीकडेही कुणी देशातील सर्वोच्च स्थान भुषवू शकते हा संदेश गेल्यामुळे अनेक नेत्यांच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या होत्या. यात तत्कालीन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनी पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याचे दिशेने पाऊले टाकण्याचा प्रयत्न सुरू करतांनाच सोनिया गांधी यांनी राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. खरं तर राजीवजींच्या क्रूर हत्येनंतर सोनियांना कॉंग्रेसींनी अनेकदा गळ घातली तरी त्यांनी याला निग्रहपुर्वक नकार दिला होता. यामुळे कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्य बनत लागलीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हाती आली. यावेळी सीताराम केसरी यांची काय गत झाली ते अवघ्या देशाने पाहिले. अर्थात सोनियांच्या आगमनामुळे आपला पंतप्रधानपदाचा दावा हिरावला जाणार हे पाहून शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने आपली स्वतंत्र चुल मांडली. त्यांनी सोनियांच्या विदेशीपक्षाचा मुद्दा उठविला. नेमक्या याच मुद्यावरून भाजपनेही त्यांच्यावर खालच्या पातळीवर जात चिखलपेक केली. मात्र भारतीय राजकारणातील खाचखळगे शिकून घेत त्यांनी पुन्हा कॉंग्रेसला ‘सोनियाचे दिन’ आणले. यातच त्यांनी आश्‍चर्यकारकरित्या पंतप्रधानपदाचा नकार देत त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थशास्त्राच्या प्रकांड पंडिताकडे देशाची धुरा सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘युपीए’ने दोनदा सत्ता उपभोगली. मात्र भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेले युपीए-२ सरकार मोदींच्या झंझावातासमोर उद्ध्वस्त झाले तेव्हापासून कॉंग्रेसचे दिवस फिरले असून हा पक्ष अक्षरश: सैरभैर झाला आहे.

खरं तर २०१४ची लोकसभा निवडणूक ही राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात यावी अशी काही नेत्यांची मागणी होती. मात्र देशातील तत्कालीन युपीए सरकारविरूध्द असणार्‍या लाटेचे पुर्वानुमान लावत राहूल यांच्याकडे धुरा सोपविणे धोक्याचे होते. यातून त्यांच्यावर अपयशाचा शिक्का बसण्याची भिती होती. यामुळे अध्यक्षपद सोनियांनी आपल्याकडेच ठेवले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर तर बर्‍याच कॉंग्रेसी कार्यकर्त्यांनी प्रियंका यांनाही राजकारणात सक्रीय करण्याची मागणी केली होती. मात्र राहूल अथवा प्रियंका यांच्याकडे धुरा सोपविण्यासाठी अनुकुल स्थिती सध्या नसल्याने सोनियांनी हा धोका पत्करला नसल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. आता मोदी सरकारच्या सव्वा वर्षाच्या कालखंडानंतर मोदी सरकारच्या वाढत्या अलोकप्रियतेमुळे कॉंग्रेस पक्षाला घडी बसविण्याची उत्तम संधी असतांना राहूल यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविणे हे उचित ठरले असते. मात्र अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची झालेली फेरनिवड ही तशी आश्‍चर्यकारक अशीच आहे.

सध्या कॉंग्रेसची देशभरातील स्थिती फारशी चांगली नाही. पक्षाचे लोकसभेत अवघे ४४ इतके नीचांकी बल आहे. गेल्या वर्षभरात कॉंग्रेसने महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मिर आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला आहे. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असतांना या पक्षाला दुय्यम भुमिका घ्यावी लागत आहे. लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या पक्षांना प्रत्येकी १०० जागा मिळाल्या असतांना कॉंग्रेसला अवघ्या ४० जागांवर समाधान मानावे लागत आहे. परिणामी एके काळी बिहारात सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेससाठी ही मोठी नाचक्की आहे. मात्र मोदींच्या झंझावाताला अटकाव घालण्याच्या नावाखाली कॉंग्रेसला ही दुय्यम भुमिका घ्यावी लागली आहे. आपल्या पक्षाची ताकद, त्याचे संघटन मोठ्या प्रमाणात क्षीण होत असतानाही तिला संजीवनी देण्याचा कसलाही कार्यक्रम पक्षाला राबवता आलेला नाही. नाही म्हणायला भुमि अधिग्रहण विधेयक आणि भाजपच्या मंत्र्यांवरील गैरव्यवहाराचा आरोप असणार्‍या मंत्र्यांविरूध्द रान उठवितांना त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी यावेळी सर्व विरोधकांची एकत्र मोट त्यांना आवळता आली नाही. अगदी युपीएतील सर्व घटक पक्षांमध्येही विश्‍वास निर्माण करण्यातही त्यांना यश आले नाही. यामुळे एकीकडे गलीतगात्र झालेल्या कॉंग्रेसींमध्ये चैतन्याचे वारे फुंकतांना संसदेत आणि संसदेबाहेर मोदी सरकारला कोंडीत पकडणे आणि आपल्या जुन्या सहकारी पक्षांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याची कठीण कामगिरी त्यांच्याकडे आहे. बिहारच्या पाठोपाठ पश्‍चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांमधील कॉंग्रेसची स्थिती फारशी समाधानकारक नाही. यामुळे बिहारप्रमाणे तेथेदेखील अन्य राजकीय पक्षांसोबत दुय्यम भुमिका घ्यावी लागणार का? हा प्रश्‍न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. अर्थात केंद्रीयच नव्हे तर अनेक राज्यांच्या राजकारणातील कॉंग्रेसचे स्थान डळमळीत होत असल्याचा संदेशही यातून जाण्याचा धोका आहे.

राहूल गांधी सध्या कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. गेल्या एक दशकापेक्षा ते कॉंग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी आहेत. युपीए सरकारच्या कालखंडात ते अनेकदा लुडबुड करतांना आढळून आले होते. यातच अनेकदा त्यांनी एक तर वाद ओढावून घेतले आहेत नाही तर हास्यास्पद विधाने केली आहेत. त्यांच्यातील नेतृत्वगुणही दिसले नाहीत. एका अर्थाने राहूल हे कॉंग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी अद्याप परिपक्व नसल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. याचमुळे सोनियांनी अद्याप त्यांच्याकडे सुत्रे देण्याचे टाळले असावे असे मानले जात आहे. मध्यंतरी राहूल यांनी कॉंग्रेसमधील ‘यंग ब्रिगेड’चे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तरी यात फारसे यश लाभले नाही. मुळातच राहूल यांच्या सहकार्‍यांची कामगिरीदेखील फारशी सरस झालेली नाही. इकडे कॉंग्रेसचा प्रमुख विरोधक असणार्‍या भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राण फुंकले आहेत. त्यांनी ज्येष्ठांना जाणीवपुर्वक घरी बसवत नवीन चेहरे समोर आणले आहेत. यातील सर्वच कार्यक्षम नसले तरी यातून पक्षात जबाबदार नेत्यांची एक नवीन पिढी तयार होत असल्याचे अवघा देश पाहत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाचा वेध घेत आधुनिक युगाची भाषा बोलत आहेत. इकडे मात्र कॉंग्रेसची मदार ही पुर्णपणे सोनिया गांधी आणि त्यांच्या ज्येष्ठ सहकार्‍यांवर असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. अर्थात मोदी हे देशाची धुरा हाताळण्यासोबतच आपल्या पक्षालाही प्रचंड मजबूत करत आहेत. इकडे कॉंग्रेसकडे मात्र दुय्यम भुमिका येऊ लागली आहे. हे चित्र बदलण्यासाठी सोनियांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सोनियांचा राजकारणात प्रवेश होत असतांना अर्थात १९९७-९८ या कालखंडापेक्षाही कॉंग्रेसची गलितगात्र अवस्था असल्याने त्यांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. यात राहूल गांधीच काय कॉंग्रेसच्या कथित ‘यंग ब्रिगेड’ला जराही स्थान नाही हे त्या पक्षाचे दुर्दैव नव्हे तर काय?

Sonia Gandhi

About the author

shekhar patil

Leave a Comment