Uncategorized चालू घडामोडी

पीके, पैसा, पाकिस्तान आणि प्रपोगंडा

पीके चित्रपटावरून उडालेली धुमश्‍चक्री, त्याच्या कमाईचे आकडे, यातील पाकिस्तानी बाजारपेठेला लक्षात घेऊन दाखविलेली व्यावसायिक चलाखी, बॉलिवुडचा पंजाबी ते मुस्लीम हा चेहर्‍यातील बदल आणि फायनान्सर्सचा अजेंडा याबाबत माझे हे विवेचन.

पीके चित्रपटावरून उडालेली धुमश्‍चक्री, त्याच्या कमाईचे आकडे, यातील पाकिस्तानी बाजारपेठेला लक्षात घेऊन दाखविलेली व्यावसायिक चलाखी, बॉलिवुडचा पंजाबी ते मुस्लीम हा चेहर्‍यातील बदल आणि फायनान्सर्सचा अजेंडा याबाबत माझे हे विवेचन.

पीके आणि त्यावरील वादाबाबत माझी भुमिका स्पष्ट करण्याआधी सांगतो की ही चित्रपटाची समीक्षा नाही.प्रथम पीकेबाबत मला आवडलेल्या तीन निवडक समीक्षा आपल्याला सादर करतो. खालील तिन्ही लेखांमधून पीके, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या चित्रपटाचे कलात्मक मुल्य याबाबत आपल्याला बर्‍यापैकी आकलन होते. आपण खालील लिंक्सवर क्लिक करून ते वाचू शकतात.

* गणेश मतकरी: पीके- सफाईदार म्हणायचा इतकच !

* डॉ. आनंद नाडकर्णी: माणसातील देवत्वाचा शोध

* संजय भास्कर जोशी: पीकेचे तात्पर्य

सप्टेंबर २०१२मध्ये तेव्हाचे पाकिस्तानी पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांनी तेथील सुप्रीम कोर्टात एका प्रकरणात ‘मुझपर विश्‍वास करो’ असे म्हटल्यावर प्रचंड हलकल्लोळ उडाला होता. आता आपल्याला यात काही विशेष वाटणार नाही. न्यायालयात कुणीही आपला प्रतिवाद करतांना हे वाक्य म्हणू शकतो. मात्र पाकिस्तानात यावरून गहजब उडण्याचे कारण म्हणजे अशरफ यांनी चक्क ‘विश्‍वास’ हा हिंदी शब्द वापरल्याने तेथील कट्टरपंथियच नव्हे तर अगदी बुध्दवादी मंडळीचेही पित्त खवळले. काय तर म्हणे ‘विश्‍वास’ या शब्दाच्या माध्यमातून हिंदी शब्द पाकिस्तानात घुसखोरी करत आहेत. याला सर्वस्वी बॉलिवुडचे चित्रपट, दुरचित्रवाणी मालिका आणि विशेषत: बालकांचे हिंदीत डब झालेले कार्टुन्स कारणीभुत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत गरमागरम चर्चा झडल्या. आणि झाडून सार्‍यांनी (यात प्रसारमाध्यमांमधील बुध्दीवादी मंडळीही आलीच!) भारताच्या या सांस्कृतीक आक्रमणाला पायबंद घालण्याची मागणी केली. आता ‘विश्‍वास’सारखा क्षुद्र शब्द ज्या समाजाला प्रक्षुब्ध करतो त्याच समाजातील तरूणावर भारतीय व विशेषत: हिंदू मुलगी ‘मरते’ हा एक भन्नाट, भारतीय उपखंडातील पुरूषी अहंकाराला फुलवणारा आणि अर्थातच रग्गड पैसा कमावून देणारा घटक ठरू शकतो हे हेरण्याइतकी व्यावसायिक बुध्दी आपल्या खान, हिराणी आणि चोप्रा या मंडळीची निश्‍चितच आहे. येथेच पीकेचा पहिला व्यावसायिक विजय झाला. परिणामी पीके भारतीय मुस्लीमांमध्ये लोकप्रिय तर झालाच पण तो पाकिस्तानातही धुमाकुळ घालतोय. यात खुबीने मुस्लीम धर्मावर नर्मविनोदी टीका करण्यात आली असली तरी खरे प्रहार हिंदू धर्मावर करण्यात आलेत. याचा दुहेरी परिणाम होऊन गल्ला अजूनच वाढला.

स्वातंत्र्योत्तर कालखंडापासूनच पाकिस्तानातील मनोरंजन उद्योग हा बहुतांश बॉलिवुडच्या प्रभावातून बाहेर येऊ शकला नाही. यामुळे संतापून झिया उल-हक यांनी ऐंशीच्या दशकात भारतीय चित्रपटांवर बंदी घातली तरी चोरट्या मार्गाने ते पाहिलेच जात होते. मग व्हिडीओ कॅसेटस्ची जागा व्हिसीडी आणि डिव्हीडीने घेतली. इकडे उपग्रह वाहिन्यांनी तर सरकारी निर्बंध कधीच उलथून टाकले होते. यामुळे २००८मध्ये तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविली. यानंतर पाकमध्ये शाहरूख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला सर्वप्रथम परवानगी मिळाली. यातही मुस्लीम युवक आणि हिंदू तरूणीचे हुकमी कॉंबिनेशन असल्याने या चित्रपटाने पाकमधील तेव्हापर्यंतचे उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडीत काढले. (पुढे शोएब मन्सुरच्या ‘बोल’ने हा रेकॉर्ड तोडला) खरं तर शाहरूखचा हा चित्रपट सुमार होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातच एक वर्ष आधी आलेला ‘खुदा के लिये’ हा सिनेमा याहून कित्येक पटीने सरस होता. मात्र असे असुनही ‘माय नेम’ला मिळालेल्या यशातून बॉलिवुडला व्यावसायिक यशाचा नवीन मार्ग सापडला. पीकेने हा हिट फॉर्म्युला पुन्हा वापरला. याची फळे अर्थातच मिळणारच होती.

बॉलिवुडपट सध्या देशात ११ सर्कीटस्च्या माध्यमातून वितरीत केली जातात. ओव्हरसीज व्यवसाय, सॅटेलाईट हक्क आदींच्या माध्यमातूनही व्यवसाय होतो. भारतीय उपखंडात नेपाळ, भुतान, श्रीलंका आदी देशांमध्ये हिंदी चित्रपट लोकप्रिय असले तरी आता पाकिस्तानच्या रूपाने मोठी बाजारपेठ बॉलिवुडला खुली झाली आहे. यातच दोन्ही देशातील सांस्कृतीक साम्य पाहता ही बॉलिवुडच्या धंदेवाईकांना नामी संधी चालून आली आहे. यातून आता बजरंगी भाईजानच नव्हे तर शिव सुलेमानसारखे चित्रपटही झळकतील हे निश्‍चित. बजरंगी… ईदच्या मुहुर्तावर झळकणार असून यातील मुस्लीम-हिंदू प्रेम प्रकरण गल्लाभरू ठरणार यात शंकाच नाही. एक प्रकारे पाकिस्तानातील इस्लामी मनोभुमिका असणार्‍या बाजारपेठेला (भविष्यात यात बांगलादेशाचा समावेश झाल्यास एकत्रित ३५ कोटी तर भारतातील लोकसंख्या पकडून तब्बल ५२ कोटी !) डोळ्यासमोर ठेवून बॉलिवुडपट निर्माण होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

प्रसारमाध्यमे आणि चित्रपटजगत ही ‘ओपिनियम मेकींग’साठी अत्यंत परिणामकारक माध्यमे आहेत. यातून अगदी हळूहळू का होईना पण एक विशिष्ट विचार सहजपणे खुबीने मांडता येतो. साहजीकच ही माध्यमे जाणते-अजाणतेपणाने आपला ‘अजेंडा’ लादत असतात. नव्वदच्या दशकात हॉलिवुडचा विख्यात नायक मार्लन ब्रँडो याने हॉलिवुड ही ज्युईश लॉबी चालवत असून ते चित्रपटांमधून आपल्याला अनुकुल विचार पेरत असल्याचा आरोप केला होता. यामुळे साहजीकच प्रचंड खळबळ उडाली होती. ब्रांडोच्या म्हणण्यात निश्‍चितच तथ्य आहे. अमेरिकन मीडिया आणि चित्रपटसृष्टीवरील ज्युंचे साम्राज्य ही उघड बाब आहे. मात्र ब्रांडो यांच्या आरोपाने ज्यु लॉबी खवळली. यातून या अभिनेत्याला इतक्या अडचणी आल्या की अखेर अमेरिकेतील ज्युंचा सर्वोच्च राबी (धर्मगुरू) यांच्या समोर गुडघ्यांवर टेकून त्याला साश्रू नयनांनी माफी मागावी लागली होती. याचप्रमाणे मेल गिब्सन यानेही या प्रकरणी आवाज उठविल्यानंतर त्याला खूप अडचणी आल्या. या पार्श्‍वभुमीवर बॉलिवुडमधील अंतर्गत प्रवाह समजून घेण्याची आवश्यकता आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या सुरवातीपासूनच पंजाबी मंडळीने हिंदी चित्रपटसृष्टीवर पकड बनविली आहे. म्हणजे अगदी नट,नट्या, व दिग्दर्शकच नव्हे तर निर्माते आणि फायनान्सरही पंजाबीच असल्याने याचे स्पष्ट प्रतिबिंब चित्रपटांमधून दिसून आले. म्हणजे चित्रपटातील पात्रांची नावे (खन्ना, अरोरा आदी), मक्के दी रोटी, सरसों-दा साग पासून ते ‘गाजर का हलुआ’, मुंडा-कुडी, विवाहपध्दती, भांगडा, गाण्यांमधील पंजाबी ठेका आणि शब्द या बाबी सर्रास वापरण्यात आल्या. म्हणजे कुणी हिंदी चित्रपटांचे अध्ययन करून त्यावरून भारताविषयी मत तयार करावयाचे झाल्यास सव्वा अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या या देशाची पंजाबी संस्कृती असेल असा कुणीही समज करून घेईल. बॉलिवुडने भारतात रूजविलेल्या ‘पॉप कल्चर’मध्ये पंजाबीचे वर्चस्व ही हिंदी चित्रपटांचीच कमाल असल्याचे कुणी अमान्य करणार नाही. नव्वदच्या दशकानंतर अर्थात आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाल्यानंतर अनिवासी भारतीयांची मोठी बाजारपेठ हिंदी सिनेमाला उपलब्ध झाली. या प्रेक्षकांनाही सुखासीन पंजाबी कल्चर भावणारेच होते. यातच वर नमुद केल्याप्रमाणे पाकिस्तानसारख्या मनोरंजनाच्या बाबतीत काहीसा मागासलेपण असणार्‍या देशाची कवाडे खुली झाल्यानंतर बॉलिवुडला इस्लामी संस्कृतीला टाळून चालणार नव्हते. यातच नव्वदच्या दशकाच्या सुरवातील उदयास आलेल्या दाऊद, शकीलसारख्या गँगस्टर्सचे ‘बॉलिवुड कनेक्शन’ अनेकदा उघड झाले आहे. अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचा उदय झाल्यानंतर त्याने बॉलिवुडमध्येही साहजीकच हस्तक्षेप सुरू केला. अनेक नट-नट्यांनी दाऊदभाईच्या दरबारात लावलेल्या हजेरीची छायाचित्रे आणि व्हिडीओजदेखील जगासमोर आले आहेत. मग ज्यू लॉबीसमोर झुकणारा मार्लन ब्रांडो आणि भाईंना टरकणार्‍या हिंदी तारेमंडळीत फारसा फरक उरत नाही. फक्त एका ठिकाणी हे उघड होते ते दुसर्‍या ठिकाणी पडद्याआड! एका अर्थाने पडद्याआडचे डॉन, पडद्यावरील नायक आणि अर्थातच विस्तारलेली इस्लामी धर्मियांची बाजारपेठ पाहता हिंदी चित्रपटसृष्टीत याच अनुषंगाने अजेंडा राबविण्यास कधीपासूनच सुरूवात झाल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येते.

एके काळी दिलीपकुमार, मधुबाला, मीनाकुमारी यांच्यासह अनेक कलावंतांना आपला धर्म लपवण्यासाठी टोपणनावांचा वापर करावा लागत होता. यानंतर चित्रपट तारे स्वधर्माच्या नावाने पडद्यावर वावरू लागले. आताच्या उदारमतवादी वातावरणात चित्रपटातील पात्रेदेखील त्याच नावाने आलीत. एका अर्थाने पाकिस्तानसारखी मनोरंजनाची मोठी बाजारपेठ आणि फायनान्सर्सच्या माध्यमातून अंडरवर्ल्डचा पैसा बॉलिवुडमध्ये आल्याने हिंदू (खरं तर पंजाबी) चेहरामोहरा असणारे हिंदी चित्रपट लवकरच इस्लामी चेहरा धारण करू शकतात. याला कुणी थांबवू शकत नाही. मात्र यात हिंदू धर्माचा उपमर्द करणे, ‘लव्ह जिहाद’सारख्या कथित विखारी संकल्पना आदींचा कोणताही भाग नसल्याचे माझे तरी स्पष्ट मत आहे. आज पीके रूपेरी पडद्यावरून समाजाचे प्रबोधन (हे म्हणणेही धाडसच आहे. खरं तर मनोरंजनातून प्रबोधन) करण्याचे काम करत असेल तर आपण त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र या माध्यमातून आमीरखान, राजकुमार हिराणी तसेच विधू विनोद चोप्रा आदी मंडळीला समाजसुधारणा करायची असल्याचा कुणाचा दावा असेल तर ते निव्वळ थोतांड आहे. ते समाजाला सुधारायला निघालेत, हिंदू धर्मावर टिका करताहेत वा कथित ‘लव्ह जिहाद’चा विचार समाजात पेरताहेत हे सर्व मुद्देदेखील तकलादू आहेत. म्हणजे ‘पीके’मुळे हिंदू धर्म सुधरणार वा बुडणार या दोन्ही विचारांचे समर्थक व्यर्थ मुद्यांवर वेळ वाया घालवत आहेत. हा सर्व बाजारपेठ आणि अर्थातच पैशांचा मामला आहे. या तिघांनी समाजाची अचुक (हिंदुंना बोचणारी तर मुस्लीमांना सुखावणारी) नस पकडली इतकेच. या पलीकडे ‘पीके’वर विचार करणेही फारसे योग्य नाही.

शेवटी- फक्त विचार करा…पीके जर वर्षापुर्वी प्रदर्शीत झाला असता तर भाजप, शिवसेना या पक्षांनी किती अकांड-तांडव केले असते! पार सोनिया गांधी यांच्या वरदहस्ताने भारतात राबविण्यात येत असलेल्या कथित हिंदुविरोधी अजेंड्यासोबत सेन्सार बोर्डच्या अध्यक्ष लिला सॅमसन यांच्या धर्मापासून ते त्यांच्या अँटी हिंदू भुमिकेचाही समाचार घेण्यात आला असता. आज मात्र त्यांना मुग गिळून बसावे लागत आहे. भाजपचे नेते व अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या चित्रपटाची उघड पाठराखण केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तर ‘पीके’ हा खुपच मनोरंजक आणि धाडसी असल्याचे प्रशस्तीपत्रही देऊन टाकले. उत्तरप्रदेशातील निवडणुकीत ‘लव्ह जिहाद’वर गदारोळ करणारे योगी आदित्यनाथ आणि अन्य मंडळीनेदेखील यावर मौन धारण केलेले आहे. नेमकी हीच बाब भाजपला हिंदुत्ववादी पक्ष समजणार्‍यांना धक्कादायक ठरली आहे.

शाहरूख खानने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावरून वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने रूद्ररूप धारण करत त्याच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला प्रखर विरोध केला होता. मात्र हिंदू देवतांची खिल्ली उडवतांनाच एक हिंदू तरूणी पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडत असल्याचे कथानक शिवसेना खपवून घेतो याचे अनेक अर्थ आहेत. मुंबईतील बॉंबस्फोट प्रकरणी संजय दत्तला पहिल्यांदा अटक झाल्यानंतर शिवसेनेने प्रारंभी आक्रमकच भुुमिका घेतली होती. मात्र सुनील दत्त आपल्या पुत्राला मातोश्रीवर घेऊन गेल्यानंतर शिवसेनाप्रमुखांना अचानक संजूबाबा ‘उगवता तारा’ वाटू लागला होता. यामागची राजकीय सौदेबाजी सुनील दत्त यांनी एक टर्म निवडणूक लढवून न केल्यानंतर सहज उघडकीस आली होती. आता पीके सुरळीत चालण्यासाठी पडद्याआड काय झाले असेल याचा अंदाज आपण लावू शकता काय? याचा अर्थ एकच-पीके आणि त्याबाबतचे वाद हे सर्व एका मोठ्या अर्थकारणाशी निगडीत आहेत.

pk

About the author

shekhar patil

3 Comments

  • Dear Shekharbhau,

    Your all articles are good. also this article is having different angle. Thanks

  • खूप छान लेख आहे अगदी अचूक विश्लेषण केल आहे.
    हॉलीवूडच ज्यू कनेक्शन पण छान अधोरेखित केल आहे.

Leave a Comment