Featured चालू घडामोडी

पितृसत्ताक विकृतीचा कळस

Written by shekhar patil

“कोणत्याही देशाचे ‘राष्ट्रीय चारित्र्य’ हे तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहांमधून समजत असते!” असे कधीतरी वाचलेले आठवतेय. याचा विचार करता आपली सार्वजनिक स्वच्छतागृहे किती घाणेरडी आणि त्यातही याच्या भिंती किती विकृत पध्दतीने रंगवलेल्या असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. शाळा/कॉलेजमधील टॉलेटस्, बसच्या सीटस्, ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीही याच प्रकारच्या कलाकुसरीने ‘विशोभित’ असतात. याला आता आयाम जुळलाय तो सोशल मीडियाचा !

‘त्रिया चरित्रमं पुरुष भाग्यम देवो न जानती मनुष्य कुत:’ असे आपले पूर्वजही सांगून गेलेत. म्हणजे पुरूषाचे भाग्य आणि स्त्रियांचे चरित्र म्हणे अगदी देवादिकांनाही कळत नाही तर मानवाची काय बिशाद! आपलेच काय सर्वच धर्म पुरूषधार्जिणे आहेत म्हणा. अगदी शेक्सपियरसारखा प्रतिभावंतही याचीच री ओढतांना दिसतो. बहुतांश धर्मग्रंथ, प्राचीन हस्तलिखीतांपासून ते अलीकडच्या ‘व्हायरल’ संस्कृतीत हीच वृत्ती आढळून येते. याचा विकृत आयाम ‘सोनम गुप्ता’ या प्रकरणातून दिसून आला. या वर्षाच्या सुरवातीला काही नोटांवर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे आढळून आले होते. केंद्र सरकारने आकस्मिकपणे पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकाराला पुन्हा उधाण आले. सोशल मीडियातून हा विषय सध्या प्रचंड प्रमाणात चघळण्यात येत आहे. आता बिचार्‍या कुणा सोनम गुप्तावरील रागापोटी एखाद्या माथेफिरूने टाकलेला या प्रकारचा संदेश मोठ्या आवडीने चर्चीला जात आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला सरसकट गुन्हेगार ठरवून टाकण्याचे ‘मीडिया ट्रायल’चे प्रकार सर्वज्ञात आहेत. मात्र सोशल मीडिया तरी सुजाण आहे का? नक्कीच नाही. व्हायरल होणारे बहुतांश कंटेंट हे अस्सल भारतीय मानसिकतेला अनुसरूनच असते. आपल्या ‘पॉप कल्चर’मध्ये असेही बदनाम ही मुन्नीच असते; मादक तारूण्य फक्त शीलाकडेच असते; नखरेल फक्त शांताबाईच असते…सविता भाभीबद्दल तर विचारूच नका! उदाहरणे अनेक आहेत. व्यभिचारी, थिल्लर, बाजारबसवी ही शेलकी विशेषणे फक्त महिलांच्या वाटेला असतात. ‘बेवफा’ फक्त ‘ती’च असते. ‘खानदान की इज्जत’ सांभाळण्याची जबाबदारीही त्यांचीच. सोशल मीडियातील बहुतांश ‘फॉरवर्डेड’ संदेशांचा सार हा महिला या मूढ, प्रसंगावधान तसेच भोवतालची शून्य माहिती असणार्‍या, भांडकुदळ, चुगलखोर, कंजूष, पुरूषांना सतावणार्‍या असतात. आता हे सर्व मानवी गुण पुरूषांना नसतात का हो ? आणि हो त्यांच्या चारित्र्याकडे तर अगदी भिंग लाऊन पाहिले जाते. यामुळे कुणा खर्‍या-खोट्या सोनम गुप्ताच्या कथित ‘बेवफाई’चे किस्से मारे रंगवून ‘व्हायरल’ होत आहेत. यातून सोनम गुप्ता नाव असणार्‍या तरूणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास होत असेल हो? अर्थात याचा विचार करायला वेळ आहे तरी कुणाकडे?

रूपेरी पडद्यावर जवळपास नग्नावस्थेत असणार्‍या अभिनेत्यांच्या खर्‍या/खोट्या ‘सिक्स पॅक्स’चे जाम कौतुक करणारा आपला समाज अभिनेत्रींच्या शरीरसौष्ठवाला अश्‍लीलतेशी जोडण्यास नेहमी सज्ज असतो. यामुळे आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये जास्त रस घेणार्‍यांना एखादी दीपिका पडुकोन ‘शेम ऑन यू’ म्हणते तेव्हा मला तिचे खूप कौतुक करावेसे वाटते. (या अभिनेत्रीचा मी एकही चित्रपट पाहिलेला नसल्याने मुद्दाम तरफदारी नव्हे हे येथे आवर्जून नमुद करतोय!) आपल्या मासिक ऋतुचक्राबद्दल, मातृत्वाबद्दल, शरीराबद्दल, वर्णाबद्दल, भेद व अत्याचाराबाबत आणि खरं तर एकंदरीतच स्त्रीत्वाबाबत आता हळूहळू का होईना महिला आवाज उठवत आहेत. सोनम गुप्ताला ‘व्हायरल’ करणार्‍या विकृत गोंगाटासमोर हा आवाज थोडा कमकुवत असला तरी मात्र या वेदना आता अभिव्यक्त होताहेत हे महत्वाचे. ‘टिव्ही टुडे’ समूहातील पत्रकार ऋचा साकल्ले यांनी ‘मै हू सोनम गुप्ता’ या नावाने एक खुले पत्र लिहून समाजाला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. यात ऋचाजी म्हणतात-

“क्या अब भी आप सबको जानना है सोनम गुप्ता कौन है…तो सुनिए मेरे मित्रों, मेरे देशवासियों, आपके बगल में रहने वाली हर एक लड़की, आपकी बहन, आपकी दोस्त,आपकी पत्नी और आपकी मां…आपके देश की हर बच्ची-बच्ची है सोनम गुप्ता…आज मैं हूं कल आपकी बेटी है सोनम गुप्ता…मैं हूं सोनम गुप्ता…जो हर दिन जन्म लेती हूं. हर दिन बनता है हमारे देश मे मेरा किस्सा.”

शक्य झाल्यास आपण हे पत्र आणि यात त्यांच्या आवाजात असणारा व्हिडीओदेखील अवश्य पहा.

About the author

shekhar patil

Leave a Comment