साहित्य

पाऊस बहिणाबाईंच्या सृजनातला !

Written by shekhar patil

निसर्गाला डोळसपणे अनुभवत बहिणाबाईंनी जीवनातील विविध अंगांवर केलेले भाष्य अजरामर झाले आहे. निसर्ग आणि जिवनानुभुती यांची तात्विक पातळीवरील सांगड त्यांच्या सृजनात आहे.

पावसाळा आल्यानंतर कवितांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल सोशल मीडियात मिश्कील प्रतिक्रिया उमटतात. वर्षा ऋतुत ‘उदंड जाहल्या कविता’ अशी म्हणण्याची वेळ येणार असल्याकडे याचा रोख असतो. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी पावसाळा आणि काव्य सृजनाचे अगदी जवळचे नाते आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. आणि पावसाळा आल्यानंतर बहिणाबाई चौधरी यांचे काव्य हटकून आठवणारच. आपला भोवताल व विशेषत: निसर्गाला डोळसपणे अनुभवत बहिणाबाईंनी मानवी जीवनातील विविध अंगांवर केलेले भाष्य मराठीत अजरामर झाले आहे. निसर्ग आणि जिवनानुभुती यांची तात्विक पातळीवरील सांगड त्यांच्या सृजनात आहे. साहजीकच त्यांच्या काव्यात पावसाचेही अनेक उल्लेख आहेत.

बहिणबाईंचे आयुष्य बहुतांश त्यांचे माहेर असणारे आसोदा आणि सासर जळगाव यांच्यात व्यतीत झाले. अर्थात त्यांनी निसर्गाची विविध रूपेही याच भागात अनुभवली. म्हणजे याच परिसरातील पावसाळाही त्यांनी अनुभवला आणि शब्दांमधून व्यक्तही केला. पहिला पाऊस हा बेभान करणारा असतो. उष्णतेने कासाविस झालेल्या चराचराला प्रफुल्लीत करणारा असतो.

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आता सरीवर सरी
शेत शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस
आता धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस
आला ललकरी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत

आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस

येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

पहिल्या पावसाने, धरतीच्या परिमयाने (मृदगंध) जीव भरून गेल्याचे बहिणाबाई म्हणतात. मात्र मनाला धुंद करणे इतकेच पावसाचे काम नाही. सरींवर सरी येत नदी-नाले वाहून निघतात. घरांच्या धाब्यांवरील खारी माती वाहून गेल्याने ती गळायला लागतात. सुरवातील मजा म्हणून भिजणारी बालके नंतर पावसाच्या रौद्र रूपाला घाबरतातही. इकडे पावसाची हौस काही दिवसांतच फिटते अन् शेतकरी असणार्‍या बहिणाबाई पावसाने थोडी उसंत घेत शेत फुलण्याची वाट पाहतात. यासाठी आळवणीही करतात. पुढे तर झडीही लागते. अन् लहान-थोरांना वडे-भजे खात घरांमध्ये दडी मारावी लागते. पावसाचे निर्व्याज, अवखळ, रौद्र, कंटाळवाणे आणि अर्थात नवसंजीवनी देणारे रूप बहिणाबाई एकाच कवितेत उभे करतात. याचमुळे पाऊस हा जणू काही देवाच्या डोळ्यातले आसू असल्याची जाणीव होते. किती ही विलक्षण प्रतिभा!

पावसाळा हा पांढरपेशांसाठी आनंदाचे प्रतिक असला तरी शेतकर्‍याचे मात्र अवघे जीवनमान यावर अवलंबून आहे. बहिणाबाईंनी याचेच अत्यंत विलोभनीय चित्रण ‘पेरनी’ या कवितेत केले आहे.

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे

पेरनी पेरनी
आले आभायात ढग
ढगात वाजंदी
ईज करी झगमग

पेरनी पेरनी
आभायात गडगड
बरस बरस
माझ्या उरी धडधड

पेरनी पेरनी
काढा पांभरी मोघडा
झडीन तो झडो
कव्हा बर्साती चौघडा

पेरनी पेरनी
आला धरतीचा वास
वाढे पेरनीची
शेतकर्‍या, तुझी आस

पेरनी पेरनी
आता मिरूगबी सरे
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे

पेरनी पेरनी
भीज भीज धर्ती माते
बीज बियान्याचे
भरून ठेवले पोते

पेरनी पेरनी
अवघ्या जगाची कारनी
ढोराची चारनी
कोटी पोटाची भरनी

पेरनी पेरनी
देवा तुझी रे करनी
दैवाची हेरनी
माझ्या जीवाची झुरनी

मृगाची चाहूल लागताच पोपया (पावशा पक्षी) ‘पेर्ते व्हा रे…पेर्ते व्हा रे’ असे गाऊ लागतो. आभाळात ढग जमा होतात. वीज झगमग करू लागते अन् बहिणाबाईंच्या हृदयाची धडधड वाढते. पांभरी,मोघड्यासह सर्व अवजारे काढून सज्ज ठेवण्याची लगबग सुरू होते. ‘बर्साती चौघडा’ अर्थात पाऊस केव्हा कोसळेल याचा नेम नसल्याने सर्वांनी तयार रहावे असे त्या सुचवतात. पाऊस पडल्यानंतर धरतीच्या सुगंधाने शेतकर्‍याच्या आशा पल्लवित होतात. एव्हाना मृग सरला असल्याने पोपयाचे गानही हरवते. कवयित्री धरती मातेने चिंब भिजावे अशी आसा बाळगते. पेरनी ही फक्ती पीक घेण्याइतकी मर्यादीत नाही तर अवघ्या जगासाठी ती महत्वाची आहे. ढोरांच्या चार्‍यापासून ते लोकांच्या पोटापर्यंत तिची आवश्यकता आहे. म्हणूनच ही पेरनी देवाची जणू करणी असल्याचे बहिणाबाई म्हणतात. काही ओळींमध्ये पेरणी आणि तिची महत्ता आपल्यासमोर यातून उभी राहते. खरं तर बहिणाबाईंनी पेरणीचे खुप कौतुक. काळ्या मातीतून तरारणारे कोंब हे नव्या जीवनाचे प्रतिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘देव अजब गारोडी’ या त्यांच्या कवितेत थेट पावसाचा उल्लेख नसला तरी वर्षा ऋतुशीच संबंधीत पेरणीवर त्यांनी तात्विक भाष्य केले आहे.

धरत्रीच्या कुशीमंधी
बीयबियानं निजली
वर्‍हे पसरली माटी
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वर्‍हे
गह्यरलं शेत जसं
आंगावरती शहारे

ऊन वार्‍याशी खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वार्‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !

या कवितेतील प्रतिमासृष्टी कुणालाही थक्क करणारी आहे. विलक्षण प्रवाहीपणे पेरणी आणि शेतीच्या माध्यमातून आबादानी करणारा परमेश्‍वर हा ‘अजब गारोडी’ असल्याचे त्या म्हणतात. (खरं तर हे सारं काही शब्दांतून साकारणार्‍या बहिणाबाईदेखील ‘अजब गारोडी’च नव्हेत काय?) मातीची शाल पांघरणारे बियाणे, अंगावर शहारे आल्यागत फुटणारे कोंब, यात कोंबातून जणू हात जोडून तरारलेली पाने, टाळ्या वाजवत परमेश्‍वराला आबादानी होण्यासाठी आर्जवे करणारी हीच पाने, डोलणारे शिवार आणि यातून शेतकर्‍यांच्या कष्टाला आलेले फळ हे अवघ्या काही शब्दांमध्ये उभे करण्याचे सामर्थ्य बहिणाबाईंनाच शक्य आहे. त्यांनी कापणी, मळणी, उपननी आदींनाही आपल्या काव्यात गुंफले आहे. मात्र ही पावसाळ्यानंतरची कामे असल्याने त्याचा इथे उल्लेख अप्रस्तुत आहे. तसेच शेतीची साधने ही पेरणीपुर्व कामे असल्याने याबाबतच्या कवितेचाही उल्लेख मी टाळला आहे.

बहिणाबाईंची ‘माझी माय सरसोती’ ही कविता म्हणजे मराठीतले अक्षरलेणं! यातील

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं धरतीत उगवतं
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझं येनजानं वारा सांगे कानामंधी

या चार ओळींमधून बहिणबाईंनी आपल्या जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. कर्मकांड, पोथ्या-ग्रंथ वगैरे काहीही नाही तर पावसात समावणारं अन् धरतीत उगवणारं हेच आपल्यासाठी भगवत्ता असल्याचे त्या सांगतात. त्यांना परमेश्‍वराची पानापानांमधून चाहूल लागते तर वारा हळूच कानामंधी देवाचे येनंजान सांगतो. किती साधं-सोपं तत्वज्ञान! शब्दबंबाळ वा उपमांनी अलंकृत न करतांनाही ही अशिक्षित महिला अवघ्या शेतकरीवर्गाच्या आयुष्याचे सार सांगितले आहे. याशिवाय त्यांच्या काही स्फुट ओव्यांमधून पावसाचे उल्लेख आहेत. यात

डोये लागले आभायी
मेघा नको रे बरसू
केली नजर खालती
माझे शिंपडले आसू

असा करूण उल्लेख आहे.

घाम गायता शेतात
शेतकरी तरसला
तव्हा कुठे आभायात
मेघुराया बरसला

अशा शब्दांमध्ये त्यांनी शेतकर्‍याची हतबलता प्रदर्शीत केली आहे. महत्वाची बाब म्हणजे जळगावच्या मेहरूण तलावातून उगम पावणार्‍या व शहरातून वाहत जाणार्‍या नदीला ‘लेंडी नाला’ म्हणणे बहिणाबाईंना मुळीच पसंत नाही.

अरे वाहत वाहत
आली नदी ‘मेहरूनी’
तिले म्हनू नका लेंडी
भागवते धोन पानी

अशा शब्दांत त्यांनी ‘मेहरूनी’चा गौरव केला आहे. बहिणाबाईच्या कालखंडात यातील पाण्याने धुणी-भांडी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थात आजची स्थिती पाहता याला ‘लेंडी नाला’ म्हणणेच योग्य आहे. असो. बहिणाबाईंच्या काव्यातील वर्षा ऋतुचा हा प्रवास आपल्याला आवडेल अशी अपेक्षा.

About the author

shekhar patil

4 Comments

 • शेखर सर,
  बहिणाबाईंच्या रचनांबाबत काय बोलावे? मात्र आपण पावसाळयाच्या निमित्तांने मांडलेला तो सारा प्रपंच खरोखरीच पावसाची, बळीराजाच्या जीवनाची आणि निसर्गरुपी परमेश्वराची अनुभूती देऊन गेला..
  अफलातून..!
  खूप भावले ।

 • भारी विष्लेषण केलय सर तुम्ही…ग्रेट आहात तुम्ही

 • शेखरजी, स न।
  आपले टिपण वाचले।खूप नेमकेपणाने लिहिलेय।खरे तर बहिणाबाई ह्या आधुनिक मराठी कृषी जाणिवेची भूमी आहेत।चक्रधर,ज्ञानोबा,नामा, तुका,जना,जोतीराव या साऱ्यांना पचवून या माऊलीनं आपली कविता गाईली।सोपानराव यांनी हे धन आपल्याला दिलं।आजही आपली ती शिदोरी आहे।खूप बोलता येईल।
  तुम्ही उत्तमच लिहिले त्यासाठी अभिनंदन।शक्य झाल्यास फोन करा।बोलुत।आपला।श्रीकांत देशमुख।

Leave a Comment