चालू घडामोडी राजकारण

पवार जिंकले…पवार हरले !

आज भलेही शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचे गुणगान होत आहे. मात्र राजकीय कारकिर्दीच्या शेवटी त्यांची झालेली अगतिकता कुणापासून लपून राहिलेली नाही.

महाराष्ट्रात राजकीय नैतिकता आणि अनैतिकतेचे सर्व संकेत उद्ध्वस्त होत असतांना या सर्व धटनाक्रमाच्या केंद्रस्थानी पडद्याआड असणार्‍या शरद पवार या व्यक्तीमत्वाचे गुढ अजून वाढले आहे. अर्थात कुणाचा एखादा क्षणिक विजय त्या व्यक्तीच्या ऐतिहासिक मुल्यमापनाला कलाटणी देत असतो. याचप्रमाणे आज भलेही शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचे गुणगान होत आहे. मात्र पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटी त्यांची झालेली अगतिकता कुणापासून लपून राहिलेली नाही.

असं म्हणतात की, महाराष्ट्राचा आत्मा ज्या मोजक्या राजकारण्यांना समजला त्यात शरद पवार यांचे नाव आघाडीवर आहे. विशेषत: शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असणार्‍या त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही नसल्याचे अगदी विरोधकही मान्य करतात. त्यांच्या कार्यक्षमतेबाबतही कुणाला संशय नाही. मात्र आयुष्यात अनेक कोलांटउड्या आणि धक्कातंत्राचा वापर करणार्‍या पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठींबा देण्यासाठी मोजून आपल्या पोतडीतील चिजा काढाव्या लागल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात स्थिर सरकार हवे वगैरे वगैरे हुकमी शब्द वापरण्यात आले आहेत. मात्र स्वत:ला शाहु-फुले-आंबेडकरांचे पाईक म्हणविणार्‍या आणि त्यांच्या कायम नामजप करणार्‍या या मातब्बर नेत्याने यावेळी त्यांचा उल्लेखच टाळला नाही तर आजवरच्या भुमिकेला हरताळ फासत त्यांच्याच भाषेत जातीवादी असणार्‍या संघाच्या कळसुत्री बाहुल्यांना दिलेला राजकीय पाठींबा हा कशाचे द्योतक आहे? पवारांवर अनेक आरोप होतात. अत्यंत बेभरवशाचा, बेरकी, चतुर आणि अर्थातच आतल्या गाठीचा राजकारणी म्हणून त्यांचा लौकीक आहे. ग्रामीण भागात प्रचलित ‘अंगाला वंगण लावलेला पैलवान’ या वाक्याप्रमाणे पवार हेदेखील कधी कुणाच्या हाती लागले नाहीत. मग कधी हे वंगण धर्मनिरपेक्षतेचे, कधी पुरोगामी विचारांचे, कधी शेतकरी हिताचे तर कधी उघड वा छुप्या रितीने मराठा हिताचे वापरण्यात त्यांना संकोच वाटला नाही. एकाच वेळेला धर्म आणि जातीनिरपेक्षतेची भाषा करत महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरंजामी प्रवृत्तींना खतपाणी देण्याचे कामही त्यांनी पध्दतशीरपणे केले. यातूनच अनेक सुभेदार तयार झाले. यातील बर्‍याच राजकीय नववतनदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी साहेबांचे तोंड कधी उघडले नाही. अनेकांचा भ्रष्टाचार डोळ्यात खुपण्या इतपत दिसू लागला तरी ते धृतराष्ट्र बनले. मात्र मतांची वेळ आली तेव्हा जातीचा सुचक वापर करण्यात त्यांना काहीही गैर वाटले नाही. यातून कधी राजू शेट्टींच्या जातीचा उघड उल्लेख करत तर कधी (जातीचा उल्लेख गृहीत धरून !) गडकरी-फडणवीसांच्या हाती सत्ता सोपवणार का? हा जाहीर सवाल विचारण्यात त्यांना काही चुकीचे वाटले नाही. हाफ चड्डीवाल्या संघावर तर तेच नव्हे तर त्यांचे तमाम चेले-चपाटे तुटून पडत असतांना त्यांच्याच सोबतीला जातांना ‘महाराष्ट्राचे स्थैर्य’ हाच एकमेव हेतू असल्याचे ठासून सांगण्यात त्यांना वावगे वाटत नाही. मात्र शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे जास्त ‘स्थैर्य’ देऊ शकतात हा तर्क त्यांनी सोयिस्कर टाळला आणि त्यासाठी प्रयत्नही केले नाहीत.

खरं तर शरद पवार यांची संपुर्ण राजकीय कारर्कीद अनेक विरोधाभासी निर्णयांनी गच्च भरली आहे. यात पुलोद सरकारच्या निर्मितीत गाजलेल्या ‘पाठीत खंजीर खुपसण्या’पासून ते थेट काल भारतीय जनता पक्षाला पाठींबा देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. मात्र पवारांच्या बहुतांश राजकीय खेळ्या त्यांना तारणार्‍याच ठरल्या. यात वयाच्या चाळीशीत समाजवादी कॉंग्रेसच्या रूपाने स्वत:चा सवतासुभा उभारणे असो, राजीवजींच्या आवाहनावरून कॉंग्रेसमध्ये परतणे असो की सोनियांच्या विदेशीपणाला विरोध करत राष्ट्रवादीची निर्मिती असो…प्रत्येक निर्णयातून ‘पवार संपले’ ही हाकाटी उठली तरी ते सर्वांना पुरून उरले. शरद पवारांचे अनेक निर्णय चुकले, बर्‍याच वेळा त्यांना माघार घ्यावी लागली. यात राजीवजींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील अपयश आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिताराम केसरींकडून झालेला पराभव यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय राजकारणात उदयास आलेल्या अस्थैर्याच्या पार्श्‍वभुमीवर अनेकदा पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होण्याशिवाय काहीही झाले नाही. कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तीन-चार वर्षांपुर्वी स्थापना केली असता तरी गुजराल वा देवैगौडा यांच्याऐवजी पवार यांचा क्रमांक लागला असता. मात्र टायमिंग चुकल्याची त्यांना जबर किंमत मोजावी लागली. यातूनच २०१४च्या लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी रिंगणातून माघार घेत शस्त्र म्यान केले.

शरद पवार यांच्या निर्णयांचे फटके त्यांच्या निकटवर्तीयांनाही बसले. यामुळे २००४ साली कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही त्यांनी चतुराईने मुख्यमंत्रीपद नाकारत राज्यात नवीन नेतृत्व उभे केले नाही. छगन भुजबळ यांच्यासह अन्य मराठेतर जाती समुहातील नेतृत्वाला पुरेपुर बहरण्याची संधी देत योग्य वेळ आल्यानंतर त्यांचे पंख कापण्याचे कसबही त्यांनी दाखविले. एवढेच नव्हे तर आपल्या पुतण्याला अनेकदा धक्का देण्याची उघड वा छुपे निर्णय त्यांनी घेतले. रिपब्लिकनच्या नेत्यांचा वापर करण्यातही त्यांचा कुणी हात धरू शकला नाही. असं म्हणतात की मांजर कितीही उंचीवरून पडले तरी ते चार पायांवरच उभे राहते. याचप्रमाणे कितीही संकटे आली तरी पवार हे सुरक्षित राहिले. यात त्यांच्या कारकीर्दीत काही वर्षांच्या विरामानंतर कॉंग्रेस, समाजवादी कॉंग्रेस, पुन्हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असे टप्पे आले. यामुळे आता त्यांनी आयुष्यात प्रथमच संघ विचाराच्या पक्षाला पाठींबा दिला यात राजकीय निरिक्षकांपासून ते सर्वसामान्यांना नवल वाटले नाही. मात्र राजकीय करियरच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांचा हा जुगार अगतिकतेतून आलेला असला तरी तो चातुर्यात परिवर्तीत करण्याचे कसब ते आणि त्यांच्या चाहत्यांना दाखवावे लागत आहे.

केंद्रात अनेक वर्षांनी स्पष्ट बहुमत असणारे भाजपचे सरकार आरूढ झालेले आहे. सीबीआय, केद्रीय सतर्कता आयोग, एनफोर्समेंेट डिपार्टमेंट (ईडी), आयकर खाते, राज्यातील गृह खाते, लाचलुचपत प्रतिबंधक खाते (अँटी करप्शन ब्युरो), राज्यपाल व नुकतेच पदारूढ झालेले विधानसभाध्यक्ष हे सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरितीने भाजपच्या हातात आहेत. अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही सुभेदारांच्या चौकशीला परवानगी देण्याचे राज्यपालांचे पत्र त्यांना धडकी भरवू शकते. यातून अप्रत्यक्षरितीने पवार यांच्यावरही शिंतोळे उडू शकतात. यामुळे आपल्या शिलेदारांना वाचवण्यासाठी भाजपची सोबत ही आवश्यक होती. खरं तर मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांनी युपीएच्या राज्यपालांची हकालपट्टीचे सत्र सुरू करतांना मुळचे राष्ट्रवादीचे व सध्या सिक्कीमचे राज्यपाल असणारे श्रीनिवास पाटील यांना अभय मिळाले होते तेव्हाच या मैत्रीची चाहूल लागली होती. यानंतर युती तुटल्याची घोषणा भाजपने केली अन् आघाडीची राष्ट्रवादीने तेव्हाच जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. याचाच अर्थ भाजप आणि राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची पटकथा कधीपासूनच लिहण्यात आली होती. काल ती पडद्यावर आली इतकच! या घटनाक्रमांमध्ये शरद पवार यांच्यातील धुर्त राजकारणी पुन्हा एकदा जगासमोर आला हा त्यांचा विजय असल्याचे तत्कालीन चित्र उभे करण्यात आले आहे. मात्र राजकारणाच्या उत्तरार्धातील ही चुक त्यांच्या ऐतिहासिक मुल्यमापनावर कायमचे प्रश्‍नचिन्ह उभे करणारी आहे.

शरद पवार यांनी अनेक राजकीय भुमिका बदलतांना कधीही जातीवाद्यांशी हातमिळवणी केली नव्हती. अगदी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैयक्तीक मैत्री जोपासतांनाही त्यांनी आपला पुरोगामी विचार सोडला नाही. ते आयुष्यभर कृतीनेही पुरोगामी राहिले मग आताच प्रतिगाम्यांची संगत कशी? हा प्रश्‍न आता कायम उपस्थित होणार आहे. अगदी ‘पाठीत खंजीर’प्रमाणे हा प्रश्‍नही त्यांची पाठ सोडणार नाही. प्रेम, युध्द आणि राजकारणात सारे काही क्षम्य असते असे मानले तरी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा नेता असली ‘कॉंप्रमाईज’ करतो ही बाब त्यांच्या लौकिकाला शोभणारी नाहीच. भलेही २०१९ची निवडणूक जवळ आल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप सरकार जातीवादी असल्याचा आरोप करत शरद पवार हे त्यांचा पाठींबा काढून पुन्हा पुरागामीपणाचा नारा बुलंद करतील. ते ब्राह्मण-बहुजन वादही कौशल्याने उकरून काढतील. सुचकरित्या पेशवाईवरही घणाघात करतील. कदाचित चांगल्या जागा मिळवून कोणत्याही पक्षासोबत पुन्हा सत्तारूढ होतील. मात्र २०१४ साली या महान नेत्याने आपल्या मुळ पुरोगामी विचारांना राजकीय स्वार्थासाठी तिलांजली दिली ही बाब इतिहासात कोरली गेली आहे. राजकीय तडजोडीचा हा कलंक त्यांना पुसणे खूप अवघड आहे. एका अर्थाने भाजप सरकारची सोबत करून शरद पवार जिंकल्याचे चित्र असले तरी यातूनच या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा नैतिक आणि वैचारिक पराभव झाला हे विसरता कामा नये.

sharad-pawar

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment