चालू घडामोडी राजकारण

परराष्ट्रनितीच्या ‘मोदी पॅटर्न’ची पायाभरणी ?

नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या आपल्या कायम तणावग्रस्त संबंध असणार्‍या शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटींनी भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले आहे.

कोणत्याही क्षेत्रात ‘टायमिंग’ हे अत्यंत महत्वाचे असते. याचा विचार करता अलीकडच्या कालखंडात अचूक वेळ साधण्यासाठी ख्यात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या आपल्या कायम तणावग्रस्त संबंध असणार्‍या शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटींनी भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले आहे. यातील अकस्मातपणे पार पाडलेल्या लाहोर भेटीचे कवित्व दीर्घ काळापर्यंत टिकणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे अस्तित्वच एकमेकांच्या शत्रूत्वावर आधारित आहे. गेल्या अर्धशतकात अनेक घडामोडी झाल्या. कम्युनिझमचा पोलादी पडदा विरघळला. सोव्हिएत रशियाचा पाडाव होत दोन्ही जर्मनी एकत्र झाले. मित्र आणि शत्रूराष्ट्रांची नव्याने मांडणी झाली. अर्थात जागतिक सत्ताकारणातील अनेक समीकरणे बदलली तरी भारत आणि पाकमधील कट्टर शत्रूत्व कमी होण्यास तयार नाही. आज एकविसाव्या शतकातही भारतीय उपखंड धुमसतच आहे ही बाब कुणी नाकारू शकत नाही. युनोसारख्या प्रबळ आणि सर्वमान्य संस्थांमुळे आज जगात थेट युध्द करणे फारसे सोपे राहिले नाही. यातच आज सामरिकच नव्हे तर आर्थिक ताकदही तितकीच महत्वाची मानली जाते. या बाबींचा विचार करता भारत आणि पाकिस्तानने निव्वळ रणांगणातील जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन विचार करणे अपेक्षित आहे. मात्र थेट युध्दातील पराजयांमुळे चवताळलेले पाकिस्तानी राज्यकर्ते गेल्या सुमारे अडीच दशकांपासून छद्म युध्दाच्या (प्रॉक्झी वॉर) माध्यमातून भारताला जेरीस आणण्याची एकही संधी सोडतांना दिसले नाहीत. अर्थात दहशतवादाची धग स्वत:ला जाणवायला लागल्यानंतर आता पाक सरकारचे कुठे थोड्या प्रमाणात डोळे उघडल्याचे चित्र आहे. मात्र जागतिक पातळीवर दहशतवादविरूध्द लढाईची गर्जना करून अमेरिकेसारख्या राष्ट्रांकडून रग्गड मदत उपटत असतांनाच गुप्तपणे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे कृत्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच पाकमध्ये सत्ता विभागलेली आहे. तेथे वरकरणी लोकशाही असली तरी लष्कराच्या हातात बर्‍याच अंशी सत्ता एकवटली आहे. तेथील लष्कराने अनेक दहशतवादी संघटनांना पोसल्याने त्या आता मुजोर झाल्या आहेत. यामुळे दुटप्पी भुमिका असणार्‍या पाकसोबत राजनयीक संबंध प्रस्थापित करण्यास भारताचा नेहमीच कस लागत असतो. यात गेल्या अनेक दशकांपासून फारसा बदल झालेला नाही.


या पार्श्‍वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्रनितीला आकार देण्यासाठी पहिल्यांदा भारतीय उपखंडाचीच निवड केली. त्यांनी आपल्या शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह दक्षिण आशियातील राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले. यानंतर त्यांनी स्वत: ‘सार्क’ राष्ट्रांचे दौरे केले. भारतीय उपखंडात भारताची मोठ्या भावाची भुमिका किमान ‘वठविण्यात’ तरी मोदींना या माध्यमातून यश आले. मात्र पाकिस्तानसोबत मोदी सरकारची ठोस मुत्सद्देगिरी अद्याप दिसून आली नव्हती. सीमेवर पाक वारंवार उल्लंघन करतच आहे, दाऊद, हाफीज, लखवीसारख्या भारतद्रोह्यांना त्यांचे पाठबळ मिळतच आहे अन् पाकी सत्ताधारी मात्र सौहार्दाच्या बाता मारत असल्याचे चित्र मोदी सरकारच्या कालखंडात दिसून आले आहे. या पार्श्‍वभुमिवर नरेंद्र मोदी यांचा अत्यंत धक्कादायक असा पाकिस्तान दौरा हा त्यांच्या परराष्ट्रनितीला आकार देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरणार का? या प्रश्‍नाचे उत्तर दोन्ही देशांच्या भविष्याशी थेट निगडीत असणार आहे.

स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रनितीचा विचार करता आपल्याला काही महत्वाचे टप्पे दिसून येतात. स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा कल समाजवादी विचारधारेकडे असला तरी जागतिक पातळीवरील अमेरिका आणि सोव्हिएत संघात विभाजीत झालेल्या राष्ट्रांपेक्षा त्यांना स्वतंत्र अस्तित्व आवश्यक वाटले. यामुळे जागतिक पातळीवर शीत युध्द शिखरावर असतांना नेहरूंनी अलीप्ततावादी चळवळीची पायाभरणी करण्यास प्राधान्य दिले. यात चीनसारख्या शेजार्‍यासोबत पंचशील तत्वानुसार मैत्रीचा सेतू बांधण्याचा प्रयत्न झाला. मात्र चीनने पाठीत खंजिर खुपसून ही निती पार उद्ध्वस्त करून टाकली तर अलीप्ततावादाची मर्यादीत स्वरूपात असणारी ताकद शीतयुध्दाच्या समाप्तीनंतर मोडीत निघाली. इंदिराजींनी थेट समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारून जागतिक पातळीवर सोव्हीयत संघासोबत उघड मैत्री स्वीकारली. खरं तर इंदिराजींनी पाकिस्तानला कधीही भेट दिली नाही. मात्र त्यांनीच पाकच्या विभाजनात महत्वाची भुमिका पार पाडली. इतिहासात आजही इंदिराजींची धुर्तता, समयसुचकता आणि अर्थात धाडसाला तोड नसल्याचे दिसून आले आहे.

नव्वदच्या दशकात भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारल्याने नंतर परराष्ट्रसंबंधांबाबत सामरिकच नव्हे तर आर्थिक बाबीही तितक्याच महत्वाच्या ठरल्या. मात्र या दशकाच्या मध्यावर तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि नंतर लागलीच औटघटकेचे पंतप्रधान झालेले इंद्रकुमार गुजराल यांनी आपल्या शेजार्‍यांसोबत संबंधांसाठी ‘गुजराल डॉक्ट्रीन’ या नावाने ख्यात झालेली पंचसुत्री मांडली. मात्र ही प्रणालीदेखील पुर्णपणे यशस्वी झाली नाही. यामुळे नव्वदच्या दशकाच्या शेवटी अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय उपखंडातील परराष्ट्रसंबंधांना मानवी चेहरा प्रदान करत मोठ्या आशेने आणि अर्थातच स्वप्नाळूपणाने दिल्ली-लाहोर बससेवा आणि समझौता एक्सप्रेसला गती दिली. मात्र याची अल्पावधीतच दुर्गती झाली. यानंतर झालेल्या कारगिल युध्दाच्या जखमा तर दीर्घ काळापर्यंत भरल्या नाहीत. एकविसाव्या शतकात दोन्ही देशांमध्ये वार्तालाप सुरू राहिले तरी त्यात ठोस काहीच घडले नाही.

नेहरूंचे पंचशील, इंदिराजींची धाडसी निती, पुन्हा गुजराल यांची पंचसुत्री, वाजपेयींचा स्वप्नाळू आशावाद आणि संयुक्त पुरोगामी आघाडीची सावध परराष्ट्रनिती या महत्वाच्या टप्प्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परराष्ट्रनितीला ठोस आकार आला नसला तरी याचे बिजारोपण नक्कीच झाले आहे. भारतीय उपखंडात मोठ्या भावाची भुमिका बजावतांना जागतिक पातळीवर महाशक्ती म्हणून दबदबा प्रस्थापित करण्याचा मोदींचा मानस आता स्पष्ट झाला आहे. पाकसोबतची चर्चा लागलीच फलद्रूप होण्याची शक्यता तशी धुसर असतांनाही मोदींनी अत्यंत धाडसीपणे लाहोरला भेट दिल्याचे पडसाद दोन्ही देशांमध्येच नव्हे तर जागतिक पातळीवर उमटणे स्वाभाविक आहे. मोदींनी ट्विट केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एकदम सुनियोजित पध्दतीने दौरा पार पडणे जवळपास अशक्य असतांना असे झाले याचा अर्थही आपण समजून घेणे अपेक्षित आहे. काल लाहोरमधील नाट्याची पटकथा ही आधीच लिहण्यात आल्याचे स्पष्ट आहे. तसे तर अनेक बाबींमध्ये ‘फिक्सींग’ असते. काही ‘रिऍलिटी शोज’मधील कृत्रीमपणा लागलीच उमटून पडतो. तर काहींमध्ये सत्य आणि आभासीपणातील सिमारेषा अत्यंत पुसट असते. मोदींचा कालचा दौरा या दुसर्‍या प्रकारातील मानावा लागणार आहे. भारतीय उपखंडातील ‘अतिथी देवो भव’ची संस्कृती, पारंपरिक पाहुणचार, त्यातील ओलावा, शुभेच्छा/आशीर्वाद, भेट-वस्तू या बाबी बॉलिवुडपट वा दुरचित्रवाणी मालिकांमधूनच नव्हे तर राजनयीक संबंधांमध्ये कशा समर्पकपणे वापरता येतात? हेदेखील यातून स्पष्ट झाले आहे. मुत्सद्देगिरीला आत्मीय संबंधाचा स्पर्श देण्याचा मोदी यांचा हा प्रयत्न दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मैलाचा दगड म्हणून नक्कीच गणला जाऊ शकतो. याला दोन्ही देशांमधील विद्यमान राजकीय स्थितीचा आयाम जोडून पाहता आपल्यासमोर अत्यंत मनोरंजक चित्र उभे राहते.

कालच्या धक्कातंत्राने नरेंद्र मोदींचे भारतातील तर शरीफ यांचे पाकिस्तानमधील राजकीय विरोधकही अक्षरश: स्तिमीत झालेत ही बाब नाकारता येणार नाही. जागतिक पातळीवर मुत्सद्देगिरीत राष्ट्रप्रमुखांच्या वैयक्तीक संबंधांचा महत्वाचा भाग असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी जाणीवपुर्वक वैयक्तीक संबंध जोपासल्याचे आपल्याला दिसून येत आहे. हा खास ‘मोदी पॅटर्न’ आधीच्या सर्व प्रकारांपेक्षा काहीसा भिन्न आहे. याचा विचार करता मोदी आणि शरीफ यांच्यातील वैयक्तीक संबंधांचा दोन्ही देशांना काही ना काही प्रमाणात लाभ होणारच. मोदी सरकारच्या परराष्ट्रनितीची नोंद करतांना लाहोर भेटीला महत्वाचे स्थान राहील यात शंकाच नाही. मात्र नेहरू, गुजराल वा वाजपेयी यांच्याप्रमाणे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी हे स्वत:ची खास परराष्ट्रनिती विकसित करू शकतील का? याचा भारताच्या परराष्ट्रनितीवर दीर्घकालीन परिणाम होईल का? आणि अर्थातच लाहोर भेट हा मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’ ठरणार की ‘इन्स्टंट’ प्रसिध्दीसाठीचा एक सवंग प्रयत्न? यांची उत्तरे आजच आपल्याला मिळू शकणार नाहीत. त्यांच्या आकस्मिक दौर्‍याचे नेमके मुल्यांकन हे येणारा काळच करणार आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment