Featured slider चालू घडामोडी साहित्य

परखड भाष्यकार : सर व्ही.एस. नायपॉल

Written by shekhar patil

नोबेल पारितोषिक विजेते महान लेखक सर विद्याधर सुरजप्रसाद (व्ही. एस.) नायपॉल यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस. जागतिक साहित्यात आपली छाप सोडणार्‍या भारतीय वंशाच्या निवडक प्रतिभावंतापैकी एक अशा नायपॉल यांचे जीवन व सृजनकार्याचा हा घेतलेला वेध.

विसाव्या शतकाच्या मध्यानंतर जागतिक साहित्यक्षेत्रात एक अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते. जगभर बर्‍याचशा राष्ट्रांनी वसाहतवादाचे जोखड फेकून देत स्वतंत्र श्वास घेतल्यावर तेथील बुध्दीवाद्यांमध्ये ‘स्वत्वा’चा शोध घेण्याची आतुरता वाढली. आपली खरी ओळख कोणती? जेत्यांनी आपल्याला दिलेले तथाकथित संस्कार खरे की यापूर्वीची आपली प्राचीन परंपरा? या प्रश्‍नांनी त्यांच्या मनातील संभ्रम वाढला. जगभरातील स्थलांतरितांच्याही वेदना यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. याचे प्रतिबिंब साहित्यातही उमटले. आपले ‘रुटस्’ शोधणार्‍या या शारदापुत्रांच्या मांदियाळीत नायपॉल यांचे नाव अग्रभागी विराजमान झाले आहे. तथाकथित तिसर्‍या जगातील सांस्कृतिक दुभंगलेपणाला त्यांनी समर्थपणे शब्दांचा साज चढविला. दि. १७ ऑगस्ट १९३२ रोजी कॅरेबियन समूहातील (वेस्ट इंडिज) त्रिनिदाद बेटावर भारतीय मुळाच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. एकोणिसाव्या शतकात त्यांचे पूर्वज भारतातील गोरखपूर जिल्ह्यातून तेथे रोजगाराच्या शोधात आले होते. त्यांचे वडील सुरजप्रसाद हे ‘त्रिनिदाद डेली’ या दैनिकात पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्रिनिदाद हा देश तसा ‘मिनी इंडिया’ म्हणून विख्यात असला तरी तेथील संस्कृती ही तशी मिश्र या प्रकारातीलच होती. मायभूमिपासून शेकडो मैलावर आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची जीवापाड धडपड करणारे आबालवृध्द नायपॉल यांनी बालपणीच पाहिले होते. आपल्या मुलातील लेखकाचे गुण सुरजप्रसाद यांनी फार लवकरच जोखले. विद्याधर यांना फक्त अठराव्या वर्षीच ऑक्सफोर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याने सर्वात जास्त आनंद झाला तो त्यांच्या वडिलांनाच! ऑक्सफोर्ड येथे आपल्या मुलाच्या प्रतिभेला नवीन धुमारे फुटतील अशी त्यांची अशा व्यर्थ नव्हतीच! यानंतर या दोन्ही पिता-पुत्रात सुरु झाला अनोखा पत्रव्यवहार!

जागतिक साहित्यात बर्‍याच लेखकांचा पत्रव्यवहार गाजला असला तरी नायपॉल पिता-पुत्रांनी याला विलक्षण उंची प्रदान केली. लेखक म्हणून आपल्या मुलाची उत्तम जडणघडण व्हावी म्हणून धडपडणारा बाप यातून आपल्याला भेटतो. यावर आधारित ‘अमंग फादर ऍड सन’ हे पुस्तकही प्रचंड गाजले. पिता हा मुलाचा ‘फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड’ असावा हे त्यांच्या पत्रांमधुन बर्‍याचदा अधोरेखित होते. १९५३ साली हृदयाघाताने सुरजप्रसाद यांचा अकाली मृत्यू झाल्याने सर्व नायपॉल परिवार कोलमडला. विद्याधर यांचे अगदी प्राथमिक यशही त्यांनी अनुभवले नाही. दरम्यान, ऑक्सफर्डमध्ये भेटलेल्या पॅट्रशिया हेल या मैत्रीणीशी त्याने संसारही थाटला. अठराव्या वर्षीच पहिली कादंबरी लिहणार्‍या नायपॉल यांना याच्या प्रसिध्दीसाठी मात्र बरीच वाट पहावी लागली. पन्नासच्या दशकाच्या शेवटी त्यांचे साहित्य क्षेत्रात आगमन झाले. आपल्या वडिलांची प्रतिमा त्यांच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. ‘हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’ या अजरामर कादंबरीतून त्यांनी आपल्या वडिलांचीच जीवनकथा जगासमोर मांडली. पेंटर ते पत्रकार अशी धडपड करत आपले घर उभारण्याची आस बाळगणार्‍या मोहन बिस्वास यांची करुण कथा वाचकांना चांगलीच भावली. ‘बीबीसी’चे कर्मचारी व ‘फ्रीलान्स रायटर’ अशी दुहेरी भुमिका बजावणार्‍या विद्याधर यांना १९६१ साली त्रिनिदाद सरकाने खास शिष्यवृत्ती देत आपला देश सखोलपणे न्याहाळण्याची संधी दिली.

एका दशकानंतर आपल्या देशाला पाहतांना त्यांना आत्यंतीक परकेपणाची भावना वाटली. वेस्ट इंडिजमध्ये असतांना भारतीय, इंग्लंडमध्ये असतांना वेस्ट इंडियन आणि बौध्दीक क्षेत्रात कोणताही आधार नसलेला उपरा अशा आपल्या ओळखीने त्यांच्यातील लेखक संभ्रमात पडला. याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले. यानंतर त्यांनी जगप्रवास केला. आपली मायभूमी भारतासह जगाच्या विविध भागांना भेट देऊन त्यावर आधारित पुस्तकांनी जागतिक साहित्यात खळबळ माजवली. साहित्यक्षेत्रात पाश्‍चात्य जग व अमेरिका यांचेच वर्चस्व असतांना त्यांनी पृथ्वीवरील मागास राष्ट्रांचे अत्यंत सडेतोडपणे विश्‍लेषण केले. यातून अगदी त्यांचा मूळ देशही सुटला नाही. ‘ऍन एरिया ऑर्फ डार्कनेस’, ‘वुंडेड सिव्हीलाझेशन’ आणि ‘मिलियन म्युटीनीज नाऊ’ या ग्रंथ-त्रयीने भारतीयत्वाची अक्षरश: चिरफाड केली. भारतात आध्यात्मिकतेला दिलेले अवास्तव स्थान, अंतर्मुख प्रवृत्ती, स्त्रैण विचारधारा हेच या महान संस्कृतीच्या पतनाला कारणीभूत कसे ठरले याची अत्यंत तरल पण परखड मीमांसा त्यांनी केली. प्रखर तर्कशक्ती, अफाट बौध्दिक विलास आणि विलक्षण तटस्थपणा यामुळे भारताचे बाहेरील लेखकाने केलेले सर्वश्रेष्ठ मूल्यमापन म्हणून या तीन ग्रंथांची गणना करण्यात आली. कारकिर्दीच्या प्रारंभी नर्मविनोदाचा शिडकाव असणार्‍या त्यांच्या प्रसन्न शैलीने नंतर गंभीर पण वैचारिक वळण घेतले.

नायपॉल यांनी दक्षिण अमेरिका, आफ्रिका तसेच आशिया खंडातील विविध देशांना भेटी दिल्या. त्यांचे सुक्ष्म अवलोकन करुन पुस्तके लिहिली. मात्र त्यांची मते वारंवार वादाच्या भोवर्‍यात सापडली. इतर विद्वानांनी त्यांच्यावर याच कारणावरुन वारंवार टीकेची झोड उठवली. आफ्रिका खंडाला संस्कृतीच नसल्याचे प्रतिपादन करणार्‍या नायपॉल यांना खुद्द त्रिनिदादमध्येही रोषाला सामारे जावे लागले. ‘वांशिक द्वेष्टा’ हा त्यांच्यावर शिक्का बसला. त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून इस्लामी जगतही सुटले नाही. जगभरातील बहुतांशी इस्लामी देशांमध्ये प्रवास करुन त्यांनी कट्टरता, मूलतत्ववाद, धार्मिक विचारसरणीचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरील प्रभाव अत्यंत जवळून पाहिला. यावर त्यांनी आपल्या ‘अमंग द बिलीव्हर्स’ व ‘बियॉंड बिलीफ’ या पुस्तकांतून कोरडे ओढल्याने खळबळ उडाली. काही समीक्षक तर नायपॉल यांचे लिखाण सलमान रश्दी यांच्यापेक्षाही ज्वालाग्राही असल्याचे मानतात.

या सृजनप्रवासात विविध मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले. १९७१ साली बुकर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे लेखक असा सन्मान मिळवणार्‍या नायपॉल यांना मात्र ‘नोबेल’ तसे उशीराच मिळाले. ७१ पासून दरवर्षी त्यांचे नामांकन या पारितोषिकासाठी केले जात होते. ८० साली तर त्यांचे ‘नोबेल’ निश्‍चित असल्याचा दावा करत ‘न्युज वीक‘ने नायपॉल यांच्या कार्यावर कव्हर स्टोरी देखील केली होती. अखेर तब्बल ३० वर्षानंतर २००१ साली स्वीडीश सकादमीने त्यांच्या कार्याची दखल घेतली. ‘आधुनिक युगातील दबलेल्या संस्कृत्यांचे हुंकार नायपॉल यांच्या साहित्यात प्रतिध्वनीत झाले असून त्यांनी मानवी मूल्यांना नवीन आयाम दिला’, अशा शब्दात त्यांच्या पारितोषिकाच्या घोषणेप्रसंगी स्वीडीश अकादमीने त्यांचा गौरव केला. १९५० पासून नायपॉल ब्रिटनमध्येच वास्तव्यास आहेत. ब्रिटीश जनतेने त्यांना अपार आदर दिला. ‘नाईटहूड’ सह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

१९९५ साली पत्नी पॅट्रिशियाचे निधन झाल्यावर त्यांनी नादिरा खानम अल्वी या पाकिस्तानी मूळाच्या पत्रकार महिलेशी विवाह केला. २००१ साली लेखन संन्यासाचा मानस व्यक्त करणार्‍या नायपॉल यांनी आता भारतावर चौथे पुस्तक लिहिण्याचा संकल्प नुकताच सोडला आहे. नायपॉल यांच्या महत्तेला बरीच कारणे आहेत. त्यांच्या लिखाणाचा विषय ‘बदलते जग’ हा आहे. प्रचंड वेगाने होणारे बदल व विविध भाषा, वंश, संस्कृती यांच्या घुसळणीतून झालेल्या संकराने आधुनिक मानवावर परिणाम केला आहे. वाढत्या स्थलांतराने उपरेपणाची भावनाही वाढीस लागली आहे. याच चक्रव्यूहातील ‘कन्फ्युज्ड वर्ल्ड’ नायपॉल यांनी रंगवले आहे. प्रारंभीच्या काळातील कादंबर्‍यांच्या मर्यादा समजल्यावर त्यांनी नंतर निबंध, प्रवासवर्णने, आत्मचरित्रपर लिखाण आदींना समर्थपणे हाताळले. विशेष बाब म्हणजे त्यांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे व्यक्तीमत्वही स्पष्टवक्तेपणाचे आहे. आपल्या विचारांशी एकनिष्ठतेमुळे ते वारंवार वादातही सापडले. अगदी निर्दयी वाटाव्या इतक्या अलिप्ततेने विचार मांडणारे नायपॉल हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. बाबरी पतनाला त्यांनी जाहीररित्या ‘शौर्याचे प्रतिक’ मानून बर्‍याच जणांचा रोष ओढावून घेतला. गुळमुळीत भूमिका न घेता वेळोवेळी त्यांनी आपली मते विनासंकोच मांडली आहेत. यामुळे त्यांच्यापासून बरेचजण दुरावले. त्यांचा एकेकाळचा शिष्य असणार्‍या पॉल थेरॉक्स या अमेरिकन लेखकाने तर ‘सर विद्याज् शॅडो’ या पुस्तकातून त्यांच्या या विचित्रपणाचाच समाचार घेतला.

इंग्रजीत बर्‍याच भारतीय वंशाच्या लेखकांनी सृजन केले आहे. अगदी रवींद्रनाथ टागोरांपासून आर.के. नारायण,निराद चौधरी ते थेट विक्रम सेठ, अमिताव घोष, झुंपा लाहिरी यांनी इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली असली तरी नायपॉल यांची बात काही औरच! रवींद्रनाथानंतर ‘नोबेल’ मिळवणारे ते एकमेव भारतीय मूळाचे लेखक आहेत. त्यांची भारताशी जुळलेली नाळ अद्यापही कायम आहे. आपल्या पूर्वजांचे अचूक ठिकाण शोधण्यासाठी गोरखपूरनजिकच्या भागाच्या त्यांनी अक्षरश: वार्‍या केलेल्या आहेत. आपला अमृतमहोत्सव हा तसा नजर ‘पार’ लागण्याचा काळ! विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल हे मात्र या मावळतीच्या क्षणांमध्येही माणसांमधील दुभंगलेपण शोधाताहेत. त्यांचा सृजनयज्ञ अविरतपणे सुरुच आहे. आपले भावजीवन समृध्द करणार्‍या या प्रतिभावंताला मानाचा मुजरा!!

About the author

shekhar patil

1 Comment

  • शेखर पाटील यांच्या लेखामुळे नायपाॅल यांचे लेखन वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. धन्यवाद.

Leave a Comment