Featured आध्यात्म

परंपरेला विज्ञानाची जोड देणारा रहस्यदर्शी

विख्यात रहस्यदर्शी आणि तत्वचिंतक ओशो रजनीश यांची आज जयंती. एके काळी आपल्या प्रखर क्रांतीकारक विचारांनी संपूर्ण जगातील तमाम ढुढ्ढाचार्यांना हादरवणार्‍या ओशोंना आता जगभर मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहे. त्यांचे विचार, ध्यान प्रणाली आणि तत्वज्ञानाला आत्मसात करण्यासाठी सर्वत्र उत्सुकता दिसून येत आहे. त्यांनी मानवतेला इतक्या विविधांगी रूपाने समृध्द केले आहे की आपली मती अक्षरश: गुंग होते. जीवनाच्या प्रत्येक आयामाला परिसस्पर्श करणार्‍या त्यांच्या रसाळ प्रवचनांची कोट्यवधींना भुरळ पडली आहे. मात्र त्यांची महत्ता केवळ इतकीच नाही. आपल्या तेजस्वी विचारांना त्यांनी आधुनिक ध्यान प्रणालींची जोड दिलेली आहे. याचा उपयोग करून असंख्य स्त्री-पुरूषांनी आपल्या जीवनात समग्र रूपांतरण अनुभवले आहे. त्यांची विचाराधारा आणि चिंतनाची चिकित्सा करावयाची ठरवल्यास हजारो पानेही अपुरी पडतील. अर्थात ते या लेखाचे प्रयोजनही नव्हे. आजच्या युगातील मानवाची जटिल मनोदशा लक्षात घेत, ओशोंनी पारंपरिक ध्यानविधींना अत्याधुनिक मनोचिकित्सेची जोड दिलेली आहे. याचाच संक्षिप्त वेध घेण्याचा हा प्रयत्न.

ओशोंनी सर्वात जास्त भर ध्यानावर दिलेला आहे. एक प्रकारे ध्यान हे त्यांच्या शिकवणीचे सार मानता येईल. अर्थात, त्यांच्या ध्यानपध्दती या परंपरागत विधींपेक्षा खूप वेगळ्या आहेत. जगातील बरेच धर्म, पंथ अथवा उपपंथांमध्ये ध्यानाला महत्व दिलेले आहे. जगातील विविध भागांमध्ये आजवर ध्यानाचे शेकडो प्रकार विकसित करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकार फारसे परिणामकारक नसल्याचा साधकांचा अनुभव आहे. एक तर बर्‍याच गुरूंनी ध्यान हे चुकीच्या पध्दतीने जगासमोर आणले. याखेरीज, काही उपयुक्त विधींमध्ये कालानुरूप बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे बर्‍याच ध्यानविधींमुळे आत्मिक शांततेऐवजी मनोविकार बळावल्याचा अनुभव येतो. जीवनभर चुकीची साधना करणार्‍यांना अंतर्यात्रेत गती मिळण्याऐवजी विक्षिप्तता अथवा वेडेपणा जडल्याच्याही अनेक घटना घडतात. भरीत भर म्हणजे सर्वत्र आजही ध्यानाविषयी अनेक चुकीच्या समजुती प्रचलित आहेत. ‘एकांतात पद्मासनात डोळे मिटून मन एकाग्र करणे म्हणजे ध्यान’, असे तर अगदी तमाम तथाकथित आध्यात्मवाद्यांनाही वाटते. यात कुणाचा दोषही नाही. परंपरेनेच आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. एकांत आणि एकाग्रता यांच्या माजलेल्या स्तोमामुळे बरेच जण इच्छुक असूनही ध्यानापासून दूरच राहतात. ओशोंनी या सर्व बाबींना जाणून घेत ध्यानाच्या नवीन पध्दती विकसित केल्या.

विपस्सना आणि अन्य काही विधी या अंतर्यात्रेसाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी आत्यंतिक तणावाने ग्रासलेल्या आजच्या मानवासाठी थेट या प्रक्रियेत उतरणे धोकेदायकही ठरू शकते. प्राचीन आणि आजच्या युगातील माणसांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आजच्या अत्यंत गतीमान जीवनचक्रातील मानव हा अनेक मनोविकारांनी ग्रस्त आहे. परिणामी, कुणी ध्यानाद्वारे शांतता मिळवण्याचा प्रयत्न करताच परिणाम उलटाच होतो. यामुळे ओशोंनी कॅथार्सिस अर्थात रेचनावर भर दिला. नवीन साधकांनी ध्यानाच्या गहन धारेत प्रवेश करण्याआधी मन आणि शरीराची शुध्दी करण्याचे त्यांनी सुचविले. एव्हढेच नव्हे तर त्यांनी यासाठी ‘सक्रीय ध्यान’ (डायनॅमिक मेडिटेशन) ही क्रांतीकारक पध्दती विकसित केली. यातील प्रथम तीन चरणांमध्ये शारीरिक आणि मनोवेगांचा निचरा झाल्यावर कुणीही साधक ध्यानाच्या खर्‍या (चौथ्या) भागात अगदी सहजगत्या प्रवेश करतो. ध्यान आणि सक्रियता या बाबींचा पारंपरिक दृष्टीकोनातून विचार केला असता त्या एकमेकींशी विसंगत भासतात. ओशोंच्या मते मात्र त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. त्यांनी या संदर्भात सविस्तर विवेचनही केले आहे. ध्यान ही अक्रियता असली तरी आजच्या मानवाला याची पूर्वतयारी आत्यंतिक गतीमानतेपासून करावी लागेल असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. ‘सक्रिय’चा प्रयोग करणार्‍या कुणालाही याची लागलीच प्रचिती येते. त्यांनी खूप ध्यानपध्दती विकसित केल्या असल्या तरी ‘डायनॅमिक’ची बात काही औरच! एक प्रकारे साधकांसाठी ही रामबाण पध्दतीच होय. याखेरीज, त्यांच्या कुंडलिनी, नटराज, नो-डायमेन्शन, मंडला आदी विधींसह काही ‘थेरपी ग्रुप्स’मध्येही मोठ्या प्रमाणात सक्रियता असून यामागे वैज्ञानिक सिध्दांत आहेत.

विसाव्या शतकात मानवी मनावर अत्यंत सखोल संशोधन झाले. चेतन आणि अचेतन मनातील कोलाहल शमविल्याशिवाय कुणाचेही व्यक्तिमत्व खंडितच असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी सिध्द केले. समग्र व्यक्तिमत्व अर्थात एकसंघ मनोदशेसाठी मानसिक चिकित्सा तसेच विश्लेषणाच्या विविध पध्दतीही विकसित करण्यात आल्या. मनोचिकित्सेला मानवी चेतनेच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे स्थान असले तरी याच्या मर्यादाही खूप आहेत. यामुळे ओशोंनी मनोचिकित्सेतील काही घटकांचा पारंपरिक विधींसोबत अफलातून संगम करत नवीन ध्यान प्रकार विकसित केले. खरं तर, मनोचिकित्सा जिथे संपते तेथून ओशोंच्या विधींद्वारे अंतर्यात्रा सुरू होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांनी पौर्वात्य विधींना पाश्चात्य मनोचिकित्सेचा साज चढविला. ध्यान ही अत्यंत वैज्ञानिक प्रक्रिया असल्याने त्यांनी वारंवार प्रतिपादन केले आहे. याचा वर्ण, भाषा, जाती, धर्म अथवा वंशाशी काहीही संबंध नसल्याचेही विचार त्यांनी मांडले. ध्यानावर सर्व मानवजातीचा अधिकार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ओशोंना विश्वव्यापी मान्यता मिळण्यामागे ही बाबही कारणीभूत आहे. कोणत्याही स्वरूपाचे कर्मकांड, पुजा-अर्चा अथवा तंत्र, मंत्रादी अवडंबर न माजवता ध्यानाद्वारे कुणीही अंतर्यात्रेत गतीमान होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. यासाठी रूढी-परंपरांना उद्ध्वस्त करत त्यांनी आधुनिकतेचीच कास धरली.

पूर्वी ध्यान म्हणजे काही तरी रूक्ष प्रक्रिया असल्याचा समज होता. ओशोंनी ध्यानाला उत्सवाचा आयाम दिला. त्यांच्या जवळपास प्रत्येक ध्यानविधीच्या शेवटी अस्तित्वाला धन्यवाद देत उत्सव साजरा करण्यात येतो. ‘हंसीबा खेलिबा धरिबा ध्यानम’ हा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या बहुतांशी ध्यानविधी आपण अगदी सहजगत्या करू शकतो हे विशेष. सच्च्या साधकात ‘बुध्दाचे मौन अन्‌ मिरेचे नर्तन’ यांचा मिलाफ असावा ही शिकवण त्यांनी दिली. ‘अहर्निश जागरूकता म्हणजेच ध्यान’ हे सांगत त्यांनी यासाठी कुणाला संसाराचा त्याग करण्याचीही आवश्यकता dear_oshoनसल्याचे सांगितले. वास्तविक पाहता कोलाहलयुक्त जगामध्ये राहूनच ध्यान साधणे खूप कठीण आहे. यासाठी त्यांनी ‘मेडिटेशन इन मार्केट प्लेस’ या संकल्पनेवर आधारित ध्यानांवरच भर दिला. त्यांनी सर्व स्तरांतील लोकांसाठी पध्दती विकसित केल्या. मानसिक ताणावरील उपायांपासून ते सत्याचा शोध घेण्यासाठी आसुसलेल्या साधकांना उपकारक पध्दती त्यांनी शोधल्या. एक प्रकारे मानवी चेतनेच्या विविध पातळ्यांवर त्यांनी कार्य केले.

ओशोंना अंतर्गत आणि बाह्यरित्या अत्यंत समृध्द जीवन जगणारा मानव अभिप्रेत होता. त्यांच्या मते भौतिक सुबत्ता आणि आध्यात्मिकता यांच्या संगमातूनच नवमानवाची निर्मिती होणार आहे. आपली विशाल प्रवचनसंपदा आणि विविध ध्यानविधींद्वारे त्यांनी जीवनभर हाच प्रयत्न केला. आज ओशोंच्या तत्वचिंतनासोबत त्यांच्या ध्यानसंपदेविषयीदेखील जगभर जिज्ञासा दिसून येत आहे. यावर ठिकठिकाणी व्यापक व सखोल संशोधनही होत आहे. पूर्व आणि पश्चिम, परंपरा आणि आधुनिकता तसेच आध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांच्या विरूध्द नसून यांच्या संगमातूनच पृथ्वीवर समग्र व्यक्तीमत्वाचा नवमानव अवतरणार असल्याचे ओशोंनी फक्त सांगितलेच नाही तर यासाठी लागणार्‍या विधीदेखील दिल्या, ही त्यांची महत्ता होय. त्यांना आपल्या जीवनकाळात अनेक वादळांना तोंड द्यावे लागले होते. खरं तर काळाच्या पुढचे क्रांतीकारक विचार मांडल्याचाही तो परिणाम असावा. आता एकविसाव्या शतकातील मानवापाशी सर्व प्रकारची भौतिक सुखे असतांनाही अंतरीचे रितेपण आणि मनोतणावाच्या वेदना त्याला छळत आहे. यावर मात करून चैतन्यमय जीवन जगण्यासाठी ओशोंचे विचार आणि ध्यानविधी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही आता जगाच्या लक्षात आलेय. ओशोंची शिकवण आणि ध्यानपध्दतीला जगभरात मिळणारा प्रतिसाद हेच दर्शवतोय.

About the author

shekhar patil

Leave a Comment