चालू घडामोडी पत्रकारिता

पत्रकार दिन आणि कोरडे पाषाण !

आज मराठी पत्रकार दिन! पत्रकार असल्याचा मला ‘गर्व’ नाही…‘माज’ तर मुळीच नाही. मात्र, मी पोटापाण्यासाठी निवडलेला व्यवसाय हा आपल्या समाजातील एक ‘नोबेल प्रोफेशन’ गणला जातो याबाबत अभिमान नक्कीच आहे.

आज मराठी पत्रकार दिन! पत्रकार असल्याचा मला ‘गर्व’ नाही…‘माज’ तर मुळीच नाही. मात्र, मी पोटापाण्यासाठी निवडलेला व्यवसाय हा आपल्या समाजातील एक ‘नोबेल प्रोफेशन’ गणला जातो याबाबत अभिमान नक्कीच आहे. मला पत्रकारितेत बारा वर्षे झालीत. अन्य मान्यवरांना याहून कित्येक पटीने अनुभव आहे. मी एका मोठ्या वर्तमानपत्रात कनिष्ठ पातळीवर साडेसात वर्षे तर गेल्या साडेचार वर्षांपासून ते आजवर एका लहानशा वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहे. या क्षेत्रातील अनेक प्रश्‍नांचा उकल झाल्याचे मला उगीचच वाटते. मात्र काही बाबींचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. आज यापैकी एका बाबीचाच उहापोह.

प्रत्येकाने उदारमतवादी असावे, अगदी प्रतिस्पर्ध्यासोबत निकोप स्पर्धा असावी असे मत वर्तमानपत्रांमधून नेहमी मांडण्यात येत असते. विशेषत: राजकारण्यांना तर आपण हे ज्ञानामृत नेहमी पाजत असतो. प्रत्यक्ष आचरणात मात्र माझे बहुतांश बांधव हे या याच्या अगदी विरूध्द आचरण करत असतात. प्रारंभी ‘देशदूत’ला लागल्यानंतर कोणत्याही बातमीत असणारा अन्य वर्तमानपत्रांचे संपादक, उपसंपादक, त्याचे प्रतिनिधी वा वार्ताहर यांच्या नावापुढील त्यांच्या वर्तमानपत्राचा उल्लेख सरळ गाळण्यात येत असे. सहकार्‍यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘हे असेच असते’ असे सहजगत्या सांगितल्याने मीदेखील हाच कित्ता गिरवला. याबाबत तेव्हाचे संपादक सुभाष सोनवणे साहेब यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी मुंबईच्या पत्रकारितेत आधी वर्तमानपत्रांच्या नावांचा उल्लेख करण्यात येत असे. मात्र अचानक हा प्रकार बंद झाला. यानंतर सरळ संपादकाला ज्येष्ठ पत्रकार तर संपादकीयमधील अन्य सहकार्‍यांसह वार्ताहरांना पत्रकार असा उल्लेख करण्याचा ‘पॅटर्न’ आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अन्य वर्तमानपत्रांमध्येही याच प्रकारे वर्तमानपत्रांच्या नावाचा अनुल्लेख करण्यात येत असल्याचे मी अनुभवले. यश-निवड वा एखादा सामाजिक उपक्रम तर सोडाच अगदी निधन वार्तांमध्येही हाच प्रकार असल्याचे माझ्या लक्षात आले.

सात जुन २०१० रोजी ‘साईमत’ची सुत्रे स्विकारल्यानंतर मी सर्वप्रथम हा ‘ट्रेंड’ तोडण्याचा प्रयत्न केला. संपादक वा डेस्कवरील मंडळीच नव्हे तर अमुक-तमुक वर्तमानपत्राच्या एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावाचा वार्ताहर असो की लहान साप्ताहिकाचा संपादक वा प्रतिनिधी; या सर्वांच्या नावासमोर संबंधीत वर्तमानपत्र वा साप्ताहिकाचे नाव देण्यास मी सुरूवात केली. तेव्हाच्या सर्व सहकार्‍यांना ही बाब खटकली. अगदी ‘‘साहेब, प्रमोदभाऊंचे व तुमचे नाव ते लोक टाकत नाही मग आपण का?’’ अशा स्वरूपाची उलट विचारणाही करण्यात आली. पण मी म्हटले की, ‘‘…हरकत नाही! आपण एकतर्फी प्रेम करू…सुरूवात तर करू!’’ आज साडेचार वर्षानंतर आम्ही असंख्य वेळेस संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, रिपोर्टर्स, छायाचित्रकार, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कॅमेरामन आदींना त्यांची वर्तमानपत्रे वा वाहिन्यांचे नाव आणि त्यांच्या पदासकट प्रसिध्दी दिली. क्वचितप्रसंगी एखाद्या सहकार्‍याकडून चुकीने (कारण प्रत्येक बातमी मी चेक करत नाही) नाव राहून गेल्यास पुढील वेळेस त्याची दुरूस्ती केली. (जळगावातील एका माझ्या माजी सहकार्‍याने याबाबत माझ्याकडे हक्काने तक्रार केली आणि मी नंतर सहकार्‍यांना सुचनाही दिल्यात!) दिव्य मराठीचे तत्कालीन संपादक दीपकजी पटवे यांचे ‘चला राजकारणात‘ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर याबाबत त्यांची भुमिका जाणून घेणारी मुलाखत ‘साईमत’ने पहिल्या पानावर ठळकपणे छापली. या मुलाखतीचा व्हिडीओ ‘जळगाव लाईव्ह’वर टाकला. या सर्व बाबींचा अनुकुल परिणाम दिसून आला. जळगावातील काही वर्तमानपत्रांनी आमच्याप्रमाणे पध्दत सुरू केली. याबाबत बर्‍हाटे साहेबांनी ना मला कधी विचारणा केली ना मी स्पष्टीकरण दिले. मी अन्य वर्तमानपत्रांमधील मित्रांना याबाबत ‘‘तुम्हाला वरूनच असे आदेश आहेत का?’’ अशी विचारणा केली असता नकारार्थी उत्तर आले. ‘‘आम्ही येथे काम करण्यास सुरूवात करतांना असे होते….आम्हीही तसेच सुरू केले’ अशा आशयाची सर्वांनी उत्तरे दिलीत. याचाच मला उमगलेला अर्थ असा की, हे सगळे अंधानुकरण सुरू आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र आंतरजालावरून साभार.)

(प्रतिकात्मक छायाचित्र आंतरजालावरून साभार.)

आज पत्रकार दिनी अनेक विषयांवर चर्चा होत आहे. पत्रकारांवरील हल्ले, या अनुषंगाने कायद्याची मागणी, मालकांनी नियमानुसार वेतन द्यावे यासाठी दबाव गटाची आवश्यकता, श्रमिक पत्रकारांसमोरील अडचणी, सोशल मीडियासह अन्य पर्यायी माध्यमांचे वाढलेले प्रस्थ, तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्या स्वीकारण्यातील अडचणी, वर्तमानपत्रांचे बिघडलेले आर्थिक गणित आदी सर्व बाबी पत्रकारितेत काम करणार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या आहेत. यावर मंथन होणे आवश्यकच आहे. मात्र दुसर्‍या संस्थेत काम करणार्‍या पत्रकाराचे अस्तित्व वर्तमानपत्रेच मान्य करणार की नाहीत? या प्रश्‍नावरही गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. खरं तर एखाद्या पत्रकाराचा दुसर्‍या वर्तमानपत्राने नामोल्लेख टाळल्याने त्याच्यावर फार काही परिणाम होणार नाही. मात्र यातून समाजासमोर काय संदेश जातोय याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांशी काडीचाही संबंध नसणार्‍या माझ्या अनेक मित्रांना पत्रकारितेतील हा क्षुद्रपणा कळला आहे. अनेकदा एखाद्या संपादकाला कार्यक्रमाला बोलावल्याने त्याची चांगली प्रसिध्दी होणार असल्याचे गणित हुशार आयोजक मांडत असतात. मात्र त्या संपादकाचे वर्तमानपत्र सोडून अन्य पेपर एक तर ती बातमीच छापत नाही आणि छापलीच तर त्यावर जोरदार कात्री चालवतात. यामुळे आयोजकही ‘कॅल्युलेशन’ करूनच संपादकांना बोलावतात. बरं वर्तमानपत्रांचे मालक हे एकमेकांचे मित्र असतात. संपादकही असतात. अर्थात शेवटचा घटक असणारे वार्ताहरही एकमेकांचे मित्र असतात. मग कागदावर उमटणारा हा कोतेपणा कशासाठी? मी माझ्यापुरता तरी हा प्रश्‍न सोडवून टाकला आहे. इतर याला काय म्हणतील याबाबत पर्वादेखील करत नाही. मात्र आपण जगाला मनाच्या मोठेपणाचे ज्ञान शिकवतो. मग आचरण याच्या विरूध्द का?

छोटी छोटी बाते कर के बडे कहा बन पाओगे

संकरी गलीयोसे निकलो तो रस्तेपर आओगे॥

अंधानुकरणाच्या अरूंद गल्ल्यांमधून आपण सर्व पत्रकार मित्रांनी बाहेर पडावे अन्यथा ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…आपण स्वत: कोरडे पाषाण’ अशी संभावना झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना पत्रकार हे एका बाबतीत तरी ‘कोरडे पाषाण’ असल्याचा थोडाफार संदेश समाजातील एका वर्गापर्यंत निश्‍चितच पोहचला आहे. असो…परत एकदा सांगतो पत्रकारितेसारख्या व्यवसायात असल्याचा मला अभिमान आहे!!

(अन्य संस्थेतील पत्रकारांचा अनुल्लेख हा मला खटकणारा आहेच. याचसोबत पत्रकार हा स्वत:वरील अन्यायाला वाचा फोडू शकत नसल्याची खंतदेखील आहे. या दुसर्‍या विषयाबाबत पुन्हा कधीतरी!)

About the author

shekhar patil

1 Comment

  • Thanks. Nice एक जबरदस्त विषय समजावलात

Leave a Comment