Featured अनुभव पत्रकारिता

पत्रकारितेतील पहिले पाऊल!

Written by shekhar patil

गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २००२…

दुपारी तीनच्या सुमारास दैनिक देशदुतमधून आलेले पत्र मिळाले. खरं तर या दैनिकात उपसंपादकपदासाठी टाकलेल्या अर्जाला खूप दिवस झाले होते. मात्र या पत्रात दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे नमूद केले होते. आता मुळातच एक दिवस उशीरा हे पत्र मिळाल्याने मी खट्टू झालो. मात्र नंतर देशदूतच्या संपादकांना थेट फोन करून आपल्याला मुलाखतीचे पत्र उशीरा मिळाल्याचे सांगावे असा विचार मनात आला. यानुसार पंधरा मिनिटात दुरध्वनी केला असता इंटरकॉमवरून संपादकांना फोन जोडून देण्यात आला. मी सर्व सांगितल्यानंतर समोरून ‘आपण उद्या सायंकाळी आले तरी चालेल’ असे आश्‍वासक शब्द आल्याने हुरूप आला. सायंकाळी भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पांडे यांची भेट घेतली. पांडेकाकांनी पत्रकारितेत येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. एवढेच नव्हे तर तेव्हाचे माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर हे आपले मित्र असून मुलाखतीस जाण्यापुर्वी त्यांची भेट अवश्य घेण्याचे सुचित केले. माझ्यासमोर मुराळकर यांना दुरध्वनीवरून मी येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

यानंतर मी लागलीच एका फाईलमध्ये आजवर प्रसिध्द झालेल्या लेखांचे कात्रण लावले. आजवर उपसंपादक पदासाठी कधीही मुलाखत दिली नसल्याने यात नेमके काय विचारणार हे स्पष्ट नव्हते. अर्थात ‘काय होईल ते पाहू!’ अशा बेफिकीर वृत्तीने मित्रांना भेटलो. रात्री अंथरूणात पडल्यानंतर झोप न येता विचारचक्र सुरू झाले. आपण पत्रकार बनू हे कधीकाळी मला स्वप्नातही वाटले नव्हते. हो बालपणापासूनच वाचनाची जबरदस्त झिंग असल्याने आपण थोडेफार तरी लिहू शकू हे वाटायचे. मात्र लिखाणच आपला व्यवसाय बनेल…छे विचारही केला नव्हता. कॉलेजात शिकत असतांना मी, पीटर अंकल तसेच अन्य काही मित्रांसह भुसावळात शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळच्या ‘हॉटेल विश्राम’च्या बाहेर रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत चकाट्या पिटत उभे रहायचो. याचवेळी ‘लोकमत’च्या भुसावळ कार्यालयाचे प्रमुख पंढरीनाथ गवळी (ते अंकल यांचे निकटचे मित्र होते.) हे घरी जाण्याआधी आमच्यासोबत पाच-दहा मिनिटे बोलत असत. यातील गप्पांमधूनच कधी तरी पत्रकारितेतील थोडे फार शब्द कानावरून जात असत. १९९९-२०००च्या काळात ‘लोकमत’मधीलच शिरीष सरोदे यांच्याशी परिचय झाला. याच्या पलीकडे या क्षेत्राशी फारसा संबंध नव्हता.

मात्र बी.एस्सी. झाल्यानंतर एम.आर.ची नोकरी करत असतांना मनात सृजनाचा अंकुर फुटला. याच कालखंडातील काही घटनांनी आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती. २००० साली माझा परममित्र राकेश (कोल्हे) यांचे जळगाव येथील मित्र मुकुंद ठाकूर ‘शिवानी समाचार’ या नावाने साप्ताहिक काढणार असल्याचे समजले. एम.आर. असतांनाच मी आवडीपोटी या साप्ताहिकात लिहण्याचे ठरविले. याच प्रारंभीच्या काळात मुकुंदभाऊंकडेच चंद्रकांत यादव या अवलियाची ओळख झाली. तोपर्यंत यादव हे पत्रकारितील मातब्बर नाव असल्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र या भेटीत यादव यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. पुढे यादव यांना अनेकदा भेटलो तरी पहिली भेट ही अविस्मरणीय होती. अशा प्रकारे जानेवारी २००० पासून ‘शिवानी’त लिखाणाची सुरूवात झाली. अर्थात लिखाणासाठी मोकळीक मिळाल्याने सृजनाचा जणू झराच फुटला. वॉशिंग्टनच्या कुर्‍हाडीप्रमाणे मी जवळपास प्रत्येक विषयावर अक्षरश: झपाटून लिखाण केले. इतिहास, कला, साहित्य, क्रीडा, चालू घडामोडी आणखी काय काय! जो विषय मनात आला त्यावर लिहले. यात काही मालिकाही लिहल्या. त्या काळातील माझ्या राजकीय विश्‍लेषणावर तत्कालीन खासदार वाय.जी. महाजन यांचे स्वीय सचिव उदय भालेराव यांनी मला स्वत: दाद दिली. मी लिहतच होतो. याच काळात लोकमतच्या ‘मैत्र’ पुरवणीतही लिखाण प्रसिध्द झाले. त्या काळात अगदी अधाशासारखे लिखाण केल्याबद्दल आज ओशाळल्यासारखे वाटते. २००१च्या ‘शिवानी समाचार’च्या दिवाळी अंकामध्ये मी ऑल्विन टॉफलर या जगप्रसिध्द विचारवंताच्या ‘फ्युचर शॉक’ या ग्रंथाचे रसग्रहण लिहले. अशाच प्रकारे अनेक ग्रंथांवर लिखाण केले. ‘शिवानी समाचार’ हे साप्ताहिक अत्यंत उत्कृष्ट प्रतीची बहुरंगी छपाईसाठी विख्यात झाले. याचसोबत मलाही थोडेफार नाव मिळाले. हे होत असतांना कुठे तरी आता एखाद्या प्रमुख वर्तमानपत्रात करिअर करावे असे वाटू लागले. यातूनच ‘देशदूत’च्या मुलाखतीस जाण्याची संधी मिळाली होती. नरेंद्र पाटील (हा सध्या पुढारीचा जिल्हा प्रतिनिधी आहे.) या मित्राला सोबत घेऊन गाडीला किक मारली.

शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर यांना भेटलो. पहिल्याच भेटीत ते खूप मित्रत्वाने वागले. पत्रकारितेत आता चांगल्या संधी असल्याचे सांगत त्यांनी उमेद दिली. ‘‘मी स्वत: काही दिवस देशदूतमध्ये काम केले आहे. येथील संपादक सुभाष सोनवणे यांच्याशीही माझा परिचय आहे. तुला मुलाखतीत काही अडचण आल्यास मला अवश्य सांग!’’ या शब्दांनी तर मला चांगलाच धिर आला. यानंतर थोडाफार टाईमपास केल्यानंतर सायंकाळी पावणेचारच्या सुमारास जळगावच्या औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयात आलो. प्रवेशद्वारावर पासेसचे सोपस्कार पार पाडल्यानंतर स्वागतकक्षात गेलो तर हसर्‍या चेहर्‍याचा एक स्मार्ट तरूणही मुलाखतीसाठी बसला होता. त्याचे नाव गिरीश निकम असून तो ‘रानडे’तून पत्रकारितेचे शिक्षण घेऊन पहिल्यांदाच मुलाखतीसाठी आल्याचे कळले. सुरवातीला गिरीशची मुलाखत झाल्यानंतर मला बोलावण्यात आले. संपादक सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी जुजबी प्राथमिक विचारपूस केली. यानंतर मी फाईल त्यांच्या अवलोकनासाठी दिली. यातील दोन पाने उलटल्यानंतर त्यांनी समाधानाने मान डोलवत ती ठेवून दिली. यानंतर अन्य विषयांकडे मोर्चा वळविला. साधारणत: अर्धा तास चर्चा झाल्यानंतर सोनवणे साहेबांनी मला प्रचंड धक्का दिला. ते म्हणाले, ‘मी तुझी निवड करू शकत नाही. तुझ्या लिखाणात चमक आहे. भलेही लेखक बन मात्र पत्रकार बनू नको’’

त्यांच्या या स्पष्ट उदगारांनी मी गारच पडलो. ते पुढे म्हणाले, ‘‘ तुझ्याशी चर्चा करतांना मला तुझ्यातील पोटॅन्शियल जाणवले. मात्र याचा वापर तू उद्योग-व्यापारात केला तर कुठच्या कुठे जाशील. पत्रकारितेत तुला सन्मान मिळेल मात्र या क्षेत्रात पैसे खुप कमी आहे हे विसरू नको.’’ या प्रचंड धक्कयानंतर मी त्यांना अभिवादन करून निरोप घेतला. तोपर्यंत साडेपाच वाजत आले होते. यानंतर मी तातडीने प्रभाकर मुराळकर यांच्या कार्यालयात आलो तर ते निघण्याच्या तयारीत होते. मी त्यांना सर्व घटनाक्रम सांगितले. त्यांनी तातडीने सोनवणे साहेबांना फोन लावला. फोन ठेवताच ते म्हणाले, ‘‘आता तू पुन्हा सुभाष सोनवणे यांच्याकडे जा!’’ पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही पुन्हा देशदूत कार्यालयात आलो. संपादकांनी आत बोलावले. माझ्याकडे पाहून ते हसत म्हणाले की, ‘‘अरे बाबा तुझ्या भल्यासाठी मी तुला पत्रकारितेपासून परावृत्त करत होतो. तुझी इच्छा आहेच तर मग माझी हरकत नाही.’’ त्यांनी तातडीने शेजारच्या कॅबिनमध्ये असणारे कार्मिक व्यवस्थापक समीक भट्टाचार्य यांना बोलावून मला रूजू करून घेण्याचे निर्देश दिले. मला महिना सव्वीसशे रूपये इतके मिळतील असे सांगताच मला याहून मोठा धक्का बसला. हा आकडा माझ्या ‘एमआर’च्या वेतनापेक्षा अनेक पटींनी कमी होता. तरीही मी मनाशी पक्का निर्धार केल्याने देशदूतला रूजू होण्याचे ठरविले. समीक त्यांनी मला आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून सोमवार दिनांक दोन डिसेंबरपासून कामावर येण्याचे सांगितले. यानंतर घरी निघण्याआधी मी सोनवणे साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो असता त्यांनी मला थोडा वेळ बसवून सध्या कोणते लिखाण करतोय? अशी विचारणा केली. यावर मी त्यांना त्या काळात सायबरविश्‍वात विविध सेलिब्रिटींवर नेमकी काय माहिती उपलब्ध आहे? यावर तीन-चार भाग लिहल्याचे सांगितले. सुदैवाने यातील महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरील लेख माझ्याकडे असल्याने मी तो त्यांना दिली. याला पाहून एका क्षणात त्यांनी बेल वाजवून डीटीपी ऑपरेटरला बोलावून तो लेख ऑपरेट करण्यास सांगितले. या लेखाला साजेशा छायाचित्राबद्दल त्यांनी विचारणा केली. यावर मी माझ्याकडे फ्लॉपीमध्ये एक चांगला फोटोग्राफ असल्याचे सांगितले. सोनवणेसरांनी मला उद्या (शनिवारी) दुपारी ते छायाचित्र आणण्याचे सांगितले. यानुसार मी दुसर्‍या दिवशी जाऊन छायाचित्र दिले. यावेळी सोनवणेसरांनी मला हा लेख रविवारच्या ‘शब्दगंध’ पुरवणीत घेत असल्याचे सांगितले. यावेळी मला ते फारसे कळले नाही.

दरम्यान, मी सर्व मित्रांना ‘देशदूत’ला जॉईन करण्याची माहिती दिली. रविवारी सकाळी मी स्टॉलवरून जाऊन देशदूतचा अंक घेतला. घाई गडबडीत शब्दगंध पुरवणी पाहताच मला माझ्या डोळ्यांवर विश्‍वास बसेनासा झाला. पुरवणीची कव्हरस्टोरी म्हणून माझा लेख छापण्यात आला होता. यातच चौकट टाकून ‘सायबरविश्‍वात सेलिब्रिटी’ ही लेखमाला सुरू करण्याचे सुचित करण्यात आले होते. पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण वा अनुभव नसलेल्या एका प्रशिक्षणार्थी उपसंपादकाचा पहिलाच लेख तो नोकरीवर लागण्याच्या एक दिवस आधी त्या वर्तमानपत्राच्या पुरवणीच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा अर्थ फक्त या क्षेत्रातील लोक सांगू शकतील. मी अक्षरश: मोहरलो. आपल्या वेड्यावाकड्या शब्दांमध्ये थोडा फार हा होईना दम असल्याचा विश्‍वास ‘देशदूत’ला रूजू होण्याआधीच आला. ‘शिवानी’तील आपले लिखाण टाकावू नव्हतेच हा विचारही मनात डोकावला. रविवारचा दिवस अक्षरश: हवेत तरंगण्यात गेला. रात्री झोपही लागली नाही.

दोन डिसेंबर २००२…

अखेर स्वप्नवत वाटणारा तो दिवस उजाडला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘नवी आशा नवी दिशा’ हे घोषवाक्य असणार्‍या ‘देशदूत’च्या प्रवेशद्वारातून आत जातांना भावना उचंबळून आल्या. पदवीनंतर सहा वर्षे ‘एमआर’ची नोकरी केल्याने आपण मुळातच पत्रकारितेत उशीरा आलो आहोत. यापुढे या क्षेत्रात काही तरी करावयाचे तर झपाटून काम करावे. आजवरचा वाया गेलेला वेळ भरून काढावा हा संकल्प मनात आला. यातूनच आपण काही तरी करण्यासाठी ‘देशदूत’मध्ये आल्याची जाणीव होताच अंगावर अक्षरश: शहारे आले. थरार…दृढ संकल्प…विलक्षण झपाटलेपण अन् अर्थातच नवतीची हुरहुर अशी भावनांची सरमिसळ घेऊन आत गेलो. थोड्याच वेळात गिरीश निकमही आला. एकाच दिवशी दोघांची पत्रकारिता सुरू झाली. समीक भट्टाचार्य यांनी सांगितलेल्या कागदपत्रांपैकी एक नसल्याने मला तांत्रिकदृष्ट्या दुसर्‍या दिवशी ३ नोव्हेबर रोजी रूजू करण्यात आले. समीक भट्टाचार्य यांनी आमची दोघांची सर्वांशी ओळख करून दिली. आणि आम्ही संपादकीय विभागात जाऊन बसलो. येथे दिवसपाळीला भरत चौधरी, विलास पवार आणि रमेश चौधरी हे सहकारी होते. (काही दिवसांनी नरेंद्र सोनवणे आले.) सर्वांना अभिवादन केल्यानंतर एकमेकांची ओळख झाली. त्यांनी आम्हा दोघांना दिवपाळीच्या प्रादेशिक विभागाच्या कामाबाबत प्राथमिक माहिती दिली. दुपारी दोनच्या सुमारास सोनवणे साहेब आल्यानंतर संपादकीय विभागाची बैठक झाली. यात सरांनी प्रत्येक पेपर चाळून आजच्या हुकलेल्या बातम्यांची यादी तयार करवून घेतली. याचसोबत उद्याच्या अंकासाठी नियोजनही करण्यात आले. थोड्या वेळाने आलेला चहा घेऊन आम्ही सर्वजण डीटीपी विभागात पाने लावण्यासाठी आलो. येथेच मला एक चेहरा ओळखीचा वाटला. काही दिवसांनी त्याच तरूणाने आपली ओळख रामसिंग परदेशी म्हणून करून दिल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो भुसावळला माझ्या कॉलनीच्या बाजूलाच राहत होता. रामसिंगशिवाय दिवसपाळीला तरसोद येथील राजू पाटील व नुकताच डीटीपी ऑपरेटरपदी बढती मिळालेला कैलास परदेशी हे तीन जण होते. दुपारी साडेचारच्या सुमारास सहकार्‍यांनी पानांची बांधणी सुरू केली. साडेसहाला आम्ही सर्वजण बाहेर पडलो. निघतांना क्रीडा प्रतिनिधी राजू खेडकर आला. मी स्वत: राजूच्या नवी पेठेतील वाड्यातील एका खोलीत भाडेकरू असल्याने त्याच्याशी चांगला परिचय होताच. त्याच्याशी थोडा वेळ बोलून मी निघालो. पहिल्याच दिवसाच्या कामात मी एक खुणगाठ मनाशी बांधली की, कितीही बोजा आला तरी दैनंदिन काम हे तसे फारसे वेळखाऊ नव्हे. सकाळी बातम्या संपादित करून डीटीपी ऑपरेटरांना दिल्यानंतर आम्ही वर्तमानपत्रांचे वाचन करत असू. यानंतर दुपारी जेवणानंतर सोनवणे सरांसोबत एक तासाची आढावा बैठक झाल्यानंतर पान लावण्यासाठी एखादा तास असे वेळेचे नियोजन माझ्या लक्षात आले. याचाच अर्थ असा की, दिवसाचे काम तीन तासात केल्यानंतर माझ्याकडे पाच तास उरणार होते. याचा उपयोग वाचन आणि लिखाणासाठी करण्याची खुणगाठ मी मनाशी बांधली.

गिरीश निकम याने पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला असल्याने त्याला या क्षेत्रातील प्राथमिक माहिती तरी होती. मी मात्र पुर्णत: नवखा होतो. यामुळे पहिल्याच दिवशी बातमी तयार करतांना थोडी तारांबळ उडाली. सहकार्‍यांनी मात्र प्रेमाने मला सर्व शिकविले. सुरवातीच्या काळात सोनवणे सरांनी गिरीश आणि मला आपापल्या आवडीच्या विषयांवर लिखाण करण्याचे सुचित केले. मराठीत तंत्रज्ञानाबाबत लिखाण खूप कमी असल्याने मी विज्ञान-तंत्रज्ञानावर लिहावे असा त्यांचा आग्रह होता. इकडे गिरीशला साहित्य आणि रंगभुमीबाबत आवड असल्याने त्याला सांस्कृतीक विषयांवर लिखाण करण्याचे सांगण्यात आले. यानुसार मी झपाट्याने लिखाण सुरू केले. काळ-काम आणि वेग याचे गणित जुळले तरच आपण पत्रकारितेत टिकू हेदेखील प्रारंभीच लक्षात आले. खरं तर खासगी नोकरीमध्ये निष्ठेपेक्षा करियरच्या प्रगतीला महत्व असते. पत्रकारितेतेही अनेक जण तातडीने नोकर्‍या बदलतात. मात्र मी देशदूतमध्ये पाच वर्षे नोकरी करण्याचा संकल्प मनाशी केला. यामागे अनेक कारणे होती. एक तर पाच वर्षाच्या काळात मी आपली थोडीफार तरी ओळख बनवू शकणार होतो. याचसोबत आयुष्यात एका संस्थेत तरी पाच वर्षे टिकावे असा विचार मनाशी होताच. यामुळे काहीही झाले तरी दोन डिसेंबर २००७ रोजी देशदूत सोडायचेच हा निर्धार मनाशी केला. प्रत्यक्षात मात्र देशदूतमध्ये मी साडेसात वर्षे काम केले.

(या साडेसात वर्षात नेमके काय झाले? माझा संकल्प कितपत प्रत्यक्षात सिध्द झाला? या कालखंडात नेमके कोणते कडू-गोड अनुभव आले? या बाबींसाठी वाचा पुढचा भाग…!)

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment