Featured slider चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

पकडला गेला तो चोर !

Written by shekhar patil

सध्या सर्वत्र फेसबुकवरील गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत जगभरात चिंताग्रस्तपणे चर्चा सुरू आहेत. केंब्रीज अ‍ॅनालिटीका या संस्थेने सुमारे पाच कोटी युजर्सची गोपनीय माहिती जमा करून याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत वापर केल्याच्या आरोपावरून हे सारे सुरू झाले आहे. यात आता भारतातील राजकीय पक्षांचा आयामदेखील जुडला आहे. काँग्रेस व भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सर्व घडामोडींचा विचार करता फेसबुक आणि अर्थातच या कंपनीच्या मालकीच्या व्हाटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक मॅसेंजर आदींवरील अब्जावधी युजर्सची वैयक्तीक माहिती ही गोपनीय नसून कुणीही याला कोणत्याही पध्दतीने वापरू शकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे खोटे नाही. अगदी १०० टक्के खरे आहे. मात्र यात दोष फक्त फेसबुक, व्हाटसअ‍ॅप आदींचाच आहे का? याला थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा धुर्तपणा तसेच युजर्सचा निष्काळजीपणा जबाबदार नाही का? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. अर्थात समोरच्याकडे आपण एक बोट दाखविल्यास चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरता कामा नये. सध्या सुरू असलेल्या हलकल्लोळातून नेमके हेच सुरू आहे.

जो कुणीही इंटरनेटचा वापर करतो त्याची (कितीही प्रयत्न केले तरी!) कोणतीही बाब गोपनीय वा खासगी राहत नाही, ही अगदी सूर्यप्रकाशाइतकी सत्य बाब आहे. आपली सर्व डिजीटल कुंडली अनेक टेक कंपन्या, विविध अ‍ॅप्सच्या निर्मात्यांकडे जमा होत असते. ही सर्व माहिती जाहिरातदारांना विकली जाते. अर्थात हा झाला या माहितीचा नैतिक (इथिकल) उपयोग. आणि या उपयोगाला जगमान्यतादेखील आहे. यामुळे यात वावगे मानले जात नाही. मात्र या माहितीचा गैरकृत्यासाठी वापर होत असल्यास तो गुन्हा आहे. केंब्रीज अ‍ॅनालिटीकाचे उदाहरण हे दुसर्‍या प्रकारातील आहे. केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक अलेक्झांडर कोगन यांनी धिस इज युवर डिजीटल लाईफ हे फेसबुक अ‍ॅप तयार केले होते. यात युजरचे व्यक्तीमत्व हे अमुक-तमुकसोबत जुळत असल्याचे भाकीत करण्यात येत होते. यासाठी लॉगीन करतांना युजरकडून घेण्यात आलेल्या परमीशनमध्ये त्या युजर तसेच त्याच्या मित्रांच्या यादीतील सर्व युजर्सचे लोकेशन, प्रोफाईलमधील सर्व माहिती, त्याच्या पोस्ट तसेच त्याने लाईक केलेल्या पोस्ट आदी माहितींचा समावेश होता. अर्थात कोट्यवधी लोकांनी या माहितीतल्या संवेदनशीलतकडे लक्ष न देता या अ‍ॅपला आपल्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेच दिला आणि इथेच घात झाला. प्रा. कोगन यांनी ही माहिती केंब्रिज अ‍ॅनालिटीका या संस्थेला विकली. आणि या संस्थेने डोनाल्ड ट्रंप यांच्या पॉलिटीकल कँपेनिंगमध्ये याचा खुबीने वापर केला. आता हीच माहिती फुटल्यानंतर जगभरात फेसबुक डिलीट करण्याची बोंब मारली जात आहे. मुळातच प्रत्येक युजरने राजीखुशीने आपली सर्व माहिती कोगन यांच्या अ‍ॅपला दिली होती. यामुळे त्यांना कुणीही न्यायालयात खेचू शकत नाही. तर केंब्रिज अ‍ॅनलिटीकाही यातून फार मोठे नुकसान होण्याची शक्यता धुसर आहे.

मुळातच कोणतीही सोशल साईट अथवा अ‍ॅप हे युजर्सची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. फेसबुकनेही आपल्या भोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारले आहे. मात्र अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप हे युजरला आमीष दाखवून त्याच्याकडून त्याच्या फेसबुक अकाऊंटमधील सर्व माहितीचा अ‍ॅक्सेस मागून घेत असतात. यातून काय होऊ शकते हे केंब्रींज अ‍ॅनालिटीका प्रकरणातून समोर आले आहेच. आता पाश्‍चात्य राष्ट्रांमधल्या प्रसारमाध्यमांमध्ये तंत्रज्ञानाची समज असल्यामुळे हे प्रकार समोर येतात. केंब्रींज अ‍ॅनालिटीकाचा झोल हा न्यूयॉर्क टाईम्स आणि द गार्डीयन या वृत्तपत्रांनी समोर आणला आहे. तर चॅनल ४ या वाहिनीने स्टींग ऑपरेशनमधून यावर शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे भारतीय मीडियातील अल्प अपवाद वगळता तंत्रसाक्षरता किती भयंकर आहे याची चुणूक मनीष भंगाळे प्रकरणात दिसून आली आहेच. भारतात फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप, जस्ट डायल आदींसारख्या अ‍ॅपमधून डाटा मायनिंग अथवा एक्सट्रॅक्ट करून तो सीडीच्या स्वरूपात विकणार्‍या शेकडो कंपन्या राजरोसपणे कार्यरत आहेत. यात तर अगदी शहरानुसार स्मार्टफोन युजर्सच्या इत्यंभूत माहितीचा समावेश असतो. याच्यापेक्षाही संवेदनशील असणारा आधारचा डाटादेखील याच प्रकारे विकला जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या तरी याबाबत बेफिकीरी आहे. ही बेपर्वाई फक्त शासकीयच नव्हे तर वैयक्तीक पातळीवरही आहे. याचेच ताजे उदाहरण अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेल्या मल्लूअ‍ॅपमधून समोर आले आहे.

मल्लूअ‍ॅप हे फनअ‍ॅप सध्या करोडो भारतीय युजर्सच्या गळ्यातील ताईत बनले आहे. यात कोणत्याही युजरच्या फेसबुकवरील वर्तनाशी सुसंगत विविध मजेशीर बाबींना अधोरेखीत करण्यात येते. यामध्ये अगदी त्या युजरच्या सर्वोत्तम मित्रांपासून ते तो विविध निवडणुकीत कोणते पद मिळवेल आदींची माहिती यात देण्यात येत असते. हे सर्व विनोदी प्रेडिक्शन्स फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. यात अलीकडे स्थानिक ठिकाणांशी संबंधीत बाबींचा समावेश करण्यात आल्यामुळे याची लोकप्रियता अजून वाढली आहे. मात्र हे अ‍ॅप वापरणे किती धोकेदायक आहे? याची माहिती कुणालाही नाही. कोट्यवधी युजर्स अगदी राजीखुशीने मल्लूअ‍ॅपला आपल्या फेसबुक अकाऊंटचा अ‍ॅक्सेस देऊन आपल्या मित्रांवर वट मारत आहेत. मात्र हे अ‍ॅप आपल्या युजर्सकून नेमकी कोणती माहिती मागतेय याबाबत आपण https://malluapps.net/privacy/en या लिंकवर जाऊन खातरजमा करू शकतात. यातील मल्लूअ‍ॅपच्या अटी/शर्ती आणि युजरकडून मागितलेला अ‍ॅक्सेस पाहता आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे आपण मल्लूअ‍ॅप वापरत नसले तरी आपल्या मित्रांच्या यादीतील कुणी याला वापरत असल्यास आपल्या प्रोफाईलवरील सर्व माहिती लीक होण्याचा धोकादेखील आहेत. अर्थात दोष मल्लूअ‍ॅप तयार करणार्‍यांचा जितका आहे तितकाच त्या अ‍ॅपला माहिती देणार्‍या युजर्सचाही आहेच. आणि फेसबुकवर मल्लूअ‍ॅपसारखे हजारो थर्ड पार्टी अ‍ॅप्स आधीच वापरात आहेत. यापुढे केंब्रिज अ‍ॅनालिटीक म्हणजे किस झाड की पत्ती ? मात्र पकडला गेला तो चोर हा न्याय या प्रकरणाला लावण्यात आला आहे. मल्लूअ‍ॅपसह अन्य फेसबुक अ‍ॅप वापरतांना युजर अगदी सहजपणे आपल्यासह आपल्या मित्रांच्या यादीतील सर्व जणांच्या फेसबुक प्रोफाईलचा अ‍ॅक्सेस संबंधीतांना सोपवत असतो. याशिवाय, फेसबुकच्या मदतीने लॉगीनची सक्ती असणार्‍या विविध साईट तसेच अ‍ॅप्सकडेही आपली सर्व माहिती अगदी उघडपणे जमा होत असते. याच प्रकारे विविध मार्गांनी जमा करण्यात आलेला डाटा हा फक्त नैतिक कामांसाठीच वापरला गेला असेल याची गॅरंटी कुणीही देऊ शकणार नाही. हाच या प्रकरणातील भयंकर आयाम आहे. याहूनही धक्कादायक बाबी खालीलप्रमाणे असून यामुळे संशयकल्लोळ कमी होण्याऐवजी वाढला आहे.

१) फेसबुकला आधीपासूनच केंब्रिज अ‍ॅनालिटीकाकडे आपल्या युजर्सचा डाटाबेस असल्याची माहिती होती. आता हे स्कूप उघडकीस आल्यानंतर आपण या संस्थेला त्यांच्याकडील डाटा डीलीट करण्याचे सांगितले होते असा मनभावीपणा फेसबुक प्रशासनाने दाखविला आहे. अर्था केंब्रिज अ‍ॅनालिटीकाने हा डाटा डिलीट केला नसल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. म्हणजे चोरी झाल्याचे कबूल करायचे पड चोरीचा ऐवज दुसरीकडे असल्याचा कांगावा करत हात वर करायचे हा दुटप्पीपणा यातून केला जात आहे.

२) केंब्रिज अ‍ॅनालिटीकाची सहयोगी संस्था असणार्‍या ओव्हलेनो या भारतातील पीआर एजन्सीने आधीच भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांना सेवा देत असल्याचे जाहीर केले होते. आता हा घोळ उघडकीस आल्यानंतर या संस्थेने आपले वेबसाईटदेखील बंद करून टाकली आहे. अर्थात या कंपनीची सेवा घेणार्‍या राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. मात्र असे न होता आता विविध पक्ष एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. यामुळे भारतात तरी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा राजकीय विषयाच्या पलीकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

३) केंब्रिज अ‍ॅनालिटीकाचा संस्थापक तथा सीईओ अलेक्झांडर निक्स याचे चॅनल ४ या वाहिनीने केलेले स्टींग ऑपरेशन हे अनेक प्रश्‍नांना जन्म देणारे आहे. यात त्याने बिनदिक्कतपणे ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारातील आपल्या संस्थेचा सिंहाचा वाटा असल्याची बढाई मारतांनाच त्याने जगभरातील विविध निवडणुकींच्या प्रचारात त्यांच्या संस्थेने आजमावलेल्या अनेक गैरकृत्यांची कबुलीदेखील दिली. यात हनीट्रॅपसह लाच, खोटे आरोप, सोशल मीडियातून पध्दतशीरपणे केलेली बदनामी आदींचा समावेश आहे. म्हणजे एकीकडे आपली संस्था ही फक्त तंत्रज्ञानविषयक बाबींवर लक्ष केंद्रीत करणारी असल्याचे सांगणारा निक्स निवडणुकीत हुकमी यश मिळवून जबाबदारीही घेतो याला काय म्हणणार ? विशेष म्हणजे त्याच्या संस्थेने अमेरिकेसह नायजेरिया चेक गणराज्य, केनिया आणि अर्जेंटीनासह भारतातही विविध निवडणुकांमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतल्याची माहिती या स्टींग ऑपरेशनच्या कार्यक्रमात देण्यात आली आहे. यामुळे भारतीय निवडणुकांमध्येही केंब्रिज अ‍ॅनालिटीकाने पडद्यामागे साम-दाम-दंड-भेदयुक्त भूमिका निभावली नसणार हे कशावरून ?

खाली पहा- चॅनल ४ या वाहिनीने स्टींग ऑपरेशनमधून केलेला गौप्यस्फोट.

४) या प्रकरणी अनेक दिवसांपासून चुप्पी साधून असणारा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने अखेर एका पोस्टच्या माध्यमातून युजर्सचा डाटा सुरक्षित ठेवण्यात झालेली चूक मान्य करत माफी मागितली आहे. यात त्याने केंब्रिज अ‍ॅनालिटीकाच्या कृत्याशी संबंधीत घटनाक्रम देत भविष्यात याला टाळण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. विशेष करून थर्ड पार्टी अ‍ॅप्सबाबत सुरक्षा पाळण्यावर त्याचा भर असणार असे या पोस्टमधून अधोरेखीत झाले आहे. तथापि, हा सर्व साप निघून गेल्यावर भुई थोपटण्याचा प्रकार आहे. पृथ्वीवरील दोन अब्जांपेक्षा जास्त लोकांची गोपनीय माहिती आधीच अनेक कंपन्यांकडे जमा झालेली आहे. यामुळे भविष्यात कितीही काळजी घेतली तरी आजवर लीक झालेल्या माहितीचे काय? याचे उत्तर झुकरबर्गने दिलेले नाही. हे उत्तर तो देऊही शकणार नाही.

अधिक माहितीसाठी

* सीएनएन या वाहिनीसोबत बोलतांना मार्क झुकरबर्गने दिलेली सफाई.

* न्यूयॉर्क टाईम्सला मार्कने दिलेली मुलाखत

https://www.nytimes.com/2018/03/21/technology/mark-zuckerberg-q-and-a.html

* द वायर्डला मार्कने दिलेली मुलाखत

https://www.wired.com/story/mark-zuckerberg-talks-to-wired-about-facebooks-privacy-problem

About the author

shekhar patil

Leave a Comment