चित्रपट

निस्सिम प्रेमानुभुती

Written by shekhar patil

काळ बदलतो…वेळही बदलते. बदलत नाही ते प्रेम फक्त उत्कट प्रेम ! नेमके हेच ‘द रोड होम’मध्ये अगदी मनमोहक आणि भावसमृध्द स्वरूपात दर्शविले आहे.

अनेक महिन्यांपासून काही रसिक मित्रांसोबत ‘मुव्ही क्लब’ सुरू करण्याचा मानस आज अचानक पुर्णत्वास आला. ‘साईमत’च्या सभागृहात ‘द रोड होम’ या अत्यंत भावस्पर्शी चिनी चित्रपटाने आमची ही आनंदयात्रा सुरू झाली आहे. यामुळे साहजीकच आज याच चित्रपटाविषयी.

खरं तर आपण बरेच चिनी चित्रपट पाहतो. यापैकी बहुतांश हे हॉंगकॉंगमध्ये तयार झालेले असतात. यातूनच ब्रुस ली, जॅकी चान, जेट ली आदी ग्लोबल आयकॉन्स बनले आहेत. मात्र यापैकी बरेचसे चित्रपट हे ‘मार्शल आर्टस’शी संबंधीत असतात. यात चॅकी चान स्टाईल नर्मविनोदी मसाला आणि अचाट स्टंट्सचा बोलबाला असतो. मात्र चिनमध्ये अभिजात चित्रपटांची मोठी परंपरा आहे. यात अलीकडच्या काळातील सर्वात प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून गणल्या जाणार्‍या झांग इमाऊ याने अनेक लक्षणीय चित्रपटांची निर्मिती केली आहे. यातच १९९९ साली आलेल्या ‘द रोड होम’चा समावेश आहे. इमाऊ याने एका साध्या कथानकाला आपल्या परिसस्पर्शाने अक्षरश: पडद्यावर दृश्य कवितेसमान साकारले आहे.

( पहा ‘द रोड होम’ची एक झलक!)

या चित्रपटाची कथा एका चिनी खेड्यात घडते. यातील वर्तमान हा विसाव्या शतकाचा शेवटचा आहे. (नायकाच्या घरातील ‘टायटॅनिक’च्या पोस्टरमधून ही बाब स्पष्टपणे दर्शविण्यात आली आहे.) आपले वडील वारल्याची वार्ता माहिती पडल्यानंतर शहरात व्यावसायिक म्हणून यशस्वी असणारा लुओ युशेंग हा तरूण बर्फाळ रस्त्यातून एका कारमधून आपल्या घरी चालला असतो. रस्त्याने त्याला आपल्या आईची काळजी वाटते. घरी गेल्यानंतर त्याला समजते की हिमवादळातही त्याची आई आपल्या पतीच्या शाळेजवळ बसून आहे. आपल्या मुलास पाहून ती शोकमग्न होते. लुओचे वडील हे आपल्या गावातील शाळेसाठी निधी जमा करण्यासाठी बाहेरगावी गेले असतांना हिमवादळात सापडून मृत्युमुखी पडलेले असतात. त्यांचे पार्थिव हे शहरातील हॉस्पिटलमध्ये ठेवलेले असते. गावचा सरपंच आणि लुओ हे त्याच्या वडिलांचे पार्थिव ट्रॅक्टरसारख्या वाहनावर आणून गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा प्रकट करतात. मात्र त्याच्या आईच्या मनात वेगळेच असते. सुमारे चाळीस वर्षे आपल्या पतीसोबत घालवलेल्या क्षणांच्या साक्षीदार असणार्‍या सर्व खुणांमधून आपल्या पतीची अंत्ययात्रा जावी असा तिचा हेका असतो. खरं तर ही प्राचीन चिनी परंपरा असली तरी अलीकडेच्या काळात मात्र ती लयास गेलेली असते. विशेषत: चिनमधील सांस्कृतीक क्रांतीच्या वरवंट्यानंतर तर अंधविश्‍वास म्हणून ही प्रथा जवळपास नष्ट झालेली असते. यातच त्या लहानशा गावात दुसर्‍या शहरातून पार्थिव खांद्यावर आणण्यासाठी तरूण मुलेही नसतात. शेवटी आईच्या इच्छेला मान देत लुओ आपल्या गावच्या सरपंचाला या कामासाठी खूप पैसे खर्च करून भाड्याने माणसे आणण्याचे सांगतो. दरम्यान लुओची आई ही त्याला आपल्या घरातील हातमाग दुरूस्त करण्याचे सांगते. यानुसार तो गावातून दुरूस्त करून आणतो तर ती आपल्या पतीसाठी कफन विणायला बसते. थकलेल्या लुओ आपल्या पित्याच्या खोलीत येऊन बसतो आणि कथानकाचा दुसरा टप्पा सुरू होतो.

अनेक चित्रपटांची कथा ही फ्लॅशबॅकच्या स्वरूपात सादर करण्यात येते. यात बहुतांश वेळा भुतकाळ हा कृष्णधवल चित्रीकरणाचे दर्शविलेला असतो. मात्र झांग इमाऊ याने वर्तमानकाळ हा कृष्णधवल दाखवला असून लुओ आपल्या मातापित्याच्या लोकविलक्षण सहजीवनाची कथा सांगण्यास सुरूवात करताच चित्रपट रंगीत होतो. यानंतर कथानक चाळीस वर्ष आधी सरकते. उत्तर चिनमधील एका सुदुर असणार्‍या खेड्यात झाओ दी ही अठरा वर्षाची तरूणी आपल्या अंध आईसोबत राहत असते. अत्यंत संथ आणि कंटाळवाणा आयुष्यक्रम असणार्‍या या युवतीच्या जीवनात एका दिवशी गोड अध्याय सुरू होतो. शहरातून लुओ चांगहू नावाचा एक युवक शिक्षक म्हणून येतो अन् त्याला पाहताच ती स्वत:ला हरवून बसते. त्या क्षणापासून ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडते. काही दिवसातच त्या गावात शाळेचे बांधकाम सुरू होते. तेथे त्या शिक्षकासह अन्य गावकरी काम करत असतात. या सर्वांना गावातल्या प्रत्येक घरातून एक जेवणाचा डबा जात असतो. त्या शिक्षकासाठी ती अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ तयार करते. अर्थात त्याला ते मिळते की नाही हे तिला कळतही नाही. दरम्यान नजरानजरीच्या खेळात लुओ चांगहुलाही तिचे प्रेम कळते. दरम्यान, तो प्रत्येक सांजेला गावातील एका घरी भोजन करत असतो. झाओच्या घरी तो येतो तेव्हा ती अगदी समरसुन तयारी करते. लुओ चांगहुदेखील भरपेट भोजन करतो. या दरम्यान, अंध असूनही झुओच्या आईला तिचे गुपीत कळते. अर्थात खेडवळ, निरक्षर आणि गरीब मुलीने त्याच्यासारख्या शिक्षकाचे स्वप्नही पाहू नये अशा शब्दांत ती तिला समजावण्याचा प्रयत्नही करते. मात्र ती ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते.

दरम्यान, राजकीय लफड्यात अडकुन (त्या काळात चिनमध्ये ही बाब नित्यनेमाने होत होती) झांगहू याला शहरात जावे लागते. अमुक-तमुक दिवशी आपण परत येणार असे आश्‍वासन देऊन तो शहरात जातो. अर्थात तो वेळेवर न आल्याने झुओ अक्षरश: कासाविस होते. एकदा तर भयंकर दिमवादळात ती त्याला शोधण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी निघते. मात्र कोसळून पडलेल्या झुओला गावकरी उचलून आणतात. पन्नासच्या दशकात चिनी समाजात वडिलधार्‍यांनी ठरवून दिलेले विवाह प्रचलित असतांना लहानशा खेड्यातील झुओचे अगदी ह्दयापासून असलेल्या प्रेमाची गावकर्‍यांना खात्री पटते. अखेर शहरात असणार्‍या झांगहू याला कसातरी याबाबत निरोप मिळतो अन् तो सरकारी निर्बंध झुगारून तिला भेटण्यासाठी येतो. अर्थात त्यांची भेट होते तरी सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याला पुन्हा दोन वर्षे दुर जावे लागते. यानंतर मात्र लुआन झांगहू आणि झाओ दी यांचा विवाह होते. यानंतर चाळीस वर्षे तो शिक्षक म्हणून त्याच गावात काम करतो.
यानंतर चित्रपट पुन्हा वर्तमानात अर्थात कृष्णधवल स्वरूपात सुरू होतो. लुओ युशेंग हा आपल्या आईला घेऊन शेजारच्या शहरातील हॉस्पिटलमध्ये असणार्‍या वडिलांच्या पार्थिवाला घेण्यासाठी जातो. यानंतर ते गावकरी आणि भाड्याने सांगितलेल्या लोकांच्या मदतीने झांगहूचे पार्थिव घेऊन येतात. दरम्यान, झांगहू यांचे अनेक विद्यार्थीदेखील या अनोख्या अंत्ययात्रेत सहभागी होतात. अखेर हा काफिला झांगहू आणि झाओ यांच्या प्रेमकथेचे साक्षीदार असणार्‍या रस्त्यावरून येतो. यानंतर त्यांच्या प्रेमातील एका खट्याळ घटनेच्या साक्षीदार असणार्‍या विहीरीजवळ झांगहूला दफन करण्यात येते. इकडे लुओ युशेंग हा आपल्या आईच्या इच्छेनुसार जुनी शाळा पाडण्यापुर्वी त्यात एक दिवस स्वत: शिकवतो आणि हा चित्रपट संपतो.

‘द रोड होम’ हा चित्रपट अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर प्रेमाला मध्यवर्ती ठेवून अनेक अजरामर चित्रपट काढण्यात आले आहेत. किंबहुना बहुतांश चित्रपटात एक तरी प्रेमकथा असतेच. मात्र ‘द रोड होम’ची कथा विलक्षण संवेदनशील अशीच आहे. यात दोन प्रमुख पुरूष पात्रे असूनही चित्रपट नायिकाप्रधान आहे. प्रेमात पडणे (फॉलिंग इन लव्ह) आणि प्रेमात असणे (बीईंग इन लव्ह) याच्यातील स्पष्ट फरक आपल्याला यातून दिसतो. खरं तर यात नायक आणि नायिका कधी प्रेमाची अभिव्यक्ती करतच नाही. त्यांना तशी गरजही वाटत नाही. मात्र झाओच्या प्रत्येक हालचालीतून प्रेमाची अनुभुती येते. मगं झांगहूला गुपचुप अनिमिषपणे न्याहाळणे असो, त्याची वाट पाहणे असो की, त्याची फक्त एक झलक पाहण्याची तळमळ असो! तिची प्रत्येक हालचाल ही अपार्थिव प्रेमाची द्योतक आहे. झांगहू शहरात निघून गेल्यानंतरचा तिचा कासाविसपणा मन सुन्न करतो. याचमुळे आधुनिकतेचा वारादेखील न लागलेल्या गावात त्यांच्या प्रेमकथेला जणू दंतकथेचे स्वरूप प्राप्त होते. अबोध, अव्यक्त आणि जीवनातील खाचखळग्यांच्या जाणीवेचा स्पर्श नसलेले प्रेम हे चाळीस वर्षानंतर लोणच्याप्रमाणे मुरून अगदी लज्जतदार तर होतेच पण त्यांच्या अनुभुतीतील ताजेपण अबाधित राहते हे विशेष.

हे सर्व दर्शवितांना दिग्दर्शक झांग इमाऊ यांनी निसर्ग आणि संगीताची केलेली पाखरण या कथानकाला सुंदर स्वप्नात परिवर्तीत करण्यात समर्थ आहे. खरं तर झाओच्या मनोदशेनुसार यात निसर्ग दाखविण्यात आला आहे. मग विरहातील आणि झुहांगच्या मृत्युनंतरचा हिमवर्षाव असो की त्यांच्या प्रेमकथेतील वसंत! ‘द रोड होम’मध्ये कथानक आणि निसर्गाचा ताळमेळ कसा असावा हे अगदी समर्पकरित्या दर्शविण्यात आले आहे. लहानशा खेड्यातील निसर्गाच्या विविध छटा पात्रांच्या मनोदशेला भाव प्रदान करतात. विशेषत: गव्हाच्या ओंब्यांची सळसळ आणि झाओच्या मनातली उलथापालथ काय सुंदर दर्शविण्यात आलीय! उर्वरित कसर संगीत भरून काढते. खरं तर या चित्रपटात फार थोडे संवाद असून संगीताचाही अतिरिक्त वापर टाळण्यात आला आहे. मात्र थीम म्युझिकसह पार्श्‍वसंगीत हे अत्यंत अप्रतीम या प्रकारातील आहे. याचमुळे एका साध्या, सरळ मेलोड्राम्याला उंची प्राप्त झाली आहे. चित्रपटातील पात्रांचा अभिनयदेखील सरस आहे. सर्वात कौतुक वाटते ते झाओ दी या नायिकेची मध्यवर्ती भुमिका साकारणार्‍या झांग झियी या अभिनेत्रीचे! आपल्या या पहिल्याच चित्रपटातल्या भुमिकेत तिने प्राण ओतले आहे. विलक्षण बोलका चेहरा असणार्‍या या अभिनेत्रीने अपार्थिव प्रेमातील हालचाली आणि घालमेल विलक्षण तन्मयतेने व्यक्त केली आहे. विशेषत: धांदलमध्ये तिची पळण्याची स्टाईल तर लाजवाबच! इतर कलावंतांनीही आपापली भुमिका उत्तमरित्या वठविली आहे.

‘द रोड होम’मध्ये अनेक रंग असले तरी यातील प्रेमाचा भाव हा सर्वाधीक गडद आहे. बरं हे प्रेम फक्त झाओ दी हिचेच नव्हे तर तिचा पतीही तिच्यावर तितकेच प्रेम करतो आणि मुलगाही आपल्या आईच्या प्रत्येक इच्छेचे पालन करतो. खरं तर तो अनेक वर्षांपासून गावाला आलेला नसतो. मात्र पित्याच्या मृत्युतुन त्याला आपल्या आई-वडिलांच्या प्रगाढ संबंधाची पुन्हा एकदा उजळणी होते. यात तोदेखील आकंठ बुडून जातो. या चित्रपटातून आपल्याला चीनच्या ग्रामजीवनाची थोडीफार झलक मिळते. यातील अंत्यसंस्कारासह अनेक प्रथा या आपल्यासारख्याच असल्याचे पाहून गंमतही वाटते. याचप्रमाणे लाल रंगाचे शुभ कापडही यात येते. या चित्रपटात कोणतेही राजकीय भाष्य करण्यात आले नाही. मात्र चित्रपटातील नायक हा सांस्कृतीक क्रांतीतल्या दडपशाहीला बळी पडलेला असतो हे स्पष्ट होते. तसेच पस्तिशी पार केलेला आपला मुलगा अजून लग्न का करत नाही? या प्रश्‍नाने चिंताग्रस्त होणारी मातादेखील आपल्याला मिळते. अर्थात चाळीस वर्षांपुर्वीच्या निर्बंधापेक्षा काळ खुपच बदललेला असतो. यामुळे पुढच्या भेटीत आपल्या मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटीस आणावे ही इच्छादेखील त्याची वृध्द माता व्यक्त करते. काळ बदलतो…वेळही बदलते. बदलत नाही ते प्रेम फक्त उत्कट प्रेम! नेमके हेच ‘द रोड होम’मध्ये अगदी मनमोहक आणि भावसमृध्द स्वरूपात दर्शविले आहे.

हा चित्रपट चिनी भाषेतील (इंग्रजी सबटायटल्ससह) आहे. मात्र समजून घेतांना काहीही अडचण येत नाही. अगदी एक दुजे के लिये या चित्रपटातल्या गाण्यातील ….कितनी जुबाने बोले लोग हमजोली….दुनिया मे प्यार की एक है बोली!! या वाक्याप्रमाणे जगात प्रेमाची एकच भाषा असते. हीच या चित्रपटाची भाषा आहे. गंमत म्हणजे या चित्रपटात नायक हा नायिकेला प्रपोज करत नाही. तिच्या मागे गाणी म्हणत फिरत नाही. नायिकाही विरहात गळा काढून करूण गाणी म्हणत नाही. कसलाही मेलोड्रामा नाही. मात्र कलाकृती एकदम चोवीस कॅरेट!!

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment