चालू घडामोडी राजकारण

निव्वळ दबावतंत्र

नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जातीयवादविरोधी जन एकजूट रॅलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य डी.पी. त्रिपाठी यांनी हजेरी लावल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र राजकीय पटलावरील व्यापक घटनांचे अवलोकन केले असता राष्ट्रवादीचे हे दबावतंत्र असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय कृषी मंत्री ना. शरदराव पवार यांची पंतप्रधानपदाची आकांक्षा कुणापासून लपून राहिलेली नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्यासाठी त्यांनी आजवर केलेले निकराचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती ढासळली असल्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुर्ण ताकदीने उतरण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास आपणास पंतप्रधानपद मिळू शकेल असा होरा शरद पवार यांनी मांडल्याचे दिसून येत आहे. ही बाब अशक्य कोटीतली असली तरी राष्ट्रवादीने महाराष्ट्रात किमान १५ ते १८ जागा जिंकल्यास चमत्कार घडण्याची त्यांना अपेक्षा आहे. मात्र यामध्ये असणार्‍या अनंत अडचणींची त्यांना चांगलीच जाणीव आहे.

सध्या देशभरात विद्यमान केंद्र सरकारविरूध्द संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारविरूध्दही नाराजीचा सुर आहे. यातच बहुतांश निवडणुकपुर्व चाचण्यांमध्ये केंद्रासह महाराष्ट्रात सत्ताधार्‍यांना अर्थात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याचे संकेत मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या चार जागा मिळणार असल्याचे सर्व्हेक्षणातून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या शरद पवार यांनी आर.आर. पाटील, छगन भुजबळ आदी मातब्बर मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे ठरविले आहे. यासाठी काही जणांनी खळखळ केली तरी साहेबांच्या आदेशामुळे त्यांना निवडणूक लढावीच लागणार असल्याची चिन्हे आहेत. हे सारे होत असतांना कॉंग्रेसशी लोकसभेच्या जागा वाटपाबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी २६-२२ या सुत्रानुसार गत लोकसभा निवडणूक लढविली होती. यात काही मतदारसंघांची अदलाबदली करून हे सुत्र कायम रहावे यावर राष्ट्रवादी ठाम आहे. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी राज्यात कॉंग्रेसची ताकद वाढल्याचा युक्तीवाद करत राष्ट्रवादीला २२ पेक्षा कमी जागा द्यावात अशी भुमिका घेतली आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये यावरून एकमेकांना इशारे देण्याचा खेळही रंगला आहे. यातच काही दिवसांपुर्वी शरद पवार यांनी आपण राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नसल्याचे सांगून बॉंब टाकला. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच नवी दिल्लीत तिसर्‍या आघाडीच्या गठनासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत शरद पवार यांनी आपले विश्‍वासू सहकारी डी.पी. त्रिपाठी यांना पाठवून आणखी एक चाल खेळली आहे.

काही निवडणूक सर्व्हेक्षणांमध्ये केंद्रातील सत्तेच्या चाव्या कॉंग्रेस आणि भाजपा वगळता अन्य पक्षांच्या हाती असतील असे दिसून आले आहे. यामुळे कॉंग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून देशात तिसर्‍या आघाडीचा पर्याय उभा करण्याचे प्रयत्न नितीशकुमार, मुलायमसिंग यांच्यासह डाव्यांनी चालविले आहेत. यात शरद पवार प्रत्यक्ष सहभागी झाले नसले तरी त्रिपाठी यांना पाठवून त्यांनी कॉंग्रेसला योग्य तो इशारा दिला आहे. याचसोबत त्यांनी तिसर्‍या आघाडीत जाण्याचे पर्यायही खुले ठेवले आहेत. राष्ट्रीय राजकारणात शरदरावांचे अनेक मित्र आहेत. यामुळे तिसर्‍या आघाडीच्या हाती सत्तेची सुत्रे आल्यास ते सहजगत्या यात वाटेकरी होऊ शकतात. अर्थात कॉंग्रेसप्रणित युपीए पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतरही ते याच आघाडीत राहून सत्तेचा वाटा मिळवू शकतात. यामुळे एकाच वेळी दोन्ही पर्याय खुले ठेवण्याचा मुरब्बीपणा त्यांनी दाखविला आहे. अर्थात ते आपले पत्ते निवडणुकीच्या नंतरच खोलतील यात शंकाच नाही. सध्या तरी त्यांनी तिसर्‍या आघाडीत संभाव्य प्रवेशाची भिती दाखवून कॉंग्रेसला अस्वस्थ केले आहे. यामुळे साहजिकच कॉंग्रेस पक्ष जागा वाटपात नरमाईची भुमिका घेणार हे अपेक्षितच आहे. आगामी लोकसभा निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढविल्यास दोन्ही पक्षांना जबर फटका बसणार हे शरद पवार जाणून आहेत. याचमुळे तिसर्‍या आघाडीत प्रवेशाची आवई उठवून शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

About the author

shekhar patil

Leave a Comment