अनुभव पत्रकारिता

ना बाराचा फेरा…ना फुकाचा तोरा !

पत्रकारितेतील आठवणींच्या पहिल्या तीन भागांमध्ये ‘देशदुत’मधील स्मृती जागविल्या होत्या. आजच्या भागात ‘साईमत’विषयी!

आज पत्रकारितेत ‘पडून’ नव्हे तर ‘उभे राहून’ १२ वर्षे झालीत. अगदी आतून वाटतेय…अजूनही ठिणगी विझलेली नाही. अजुनही प्रस्थापित झालेलो नाही. भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे लेखकाचा लेखकराव होतो याचप्रमाणे पत्रकाराचा पत्रकार साहेब फटकन होतो. आईशपथ सांगतोय आयुष्यात कधी ‘पत्रकार साहेब’ होण्याची आकांक्षा बाळगली नाही. अजूनही पार ज्युनिअर्सच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या व्यथावेदना सोडविण्याचा प्रयत्न करतो. पार एकाद्या गावातील वार्ताहरालाही मोठ्या संपादकाइतका सन्मान देतो. याचसोबत वरिष्ठ पत्रकारांचे आदराने व लक्षपुर्वक ऐकतो. त्यांच्या चांगल्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. गणित लक्षात घेऊन नव्हे तर ह्दयातून आलेली हाक ऐकतो. असो. सगळेच सांगायचे तर तुम्ही बोर होऊन जाल. (आत्मकथेसाठी काही तर बाकी हवे ना!)

या बारा वर्षांनी मला खूप काही दिले. प्रत्येक क्षण आसुसल्यागत जगण्याचा संकल्प, सृजनाने धुंद होण्याची धडपड, बर्‍यावाईट अनुभवातून आलेला थोडाफार स्थितप्रज्ञपणा आणि नेमके कोणते स्टेशन गाठावयाचे आहे याची थोडीफार कल्पना आली आहे. आयुष्यातील सर्व अनुभवांपेक्षा ही बारा वर्षे खूप वेगळी आहेत. एक तर बी.एस्सी. होतांनाच मनाशी संकल्प होता की, ‘बेटा भीक मागावी लागली तरी चालेल पण जे शिकले त्यावर आधारित नोकरी कधीच करायची नाही.’ आज आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन आरशात पहातांना मी स्वत:च्या डोळ्यात डोळे टाकून आत्मसन्मानाने पाहू शकतो. चलं यार आपला संकल्प आजवर तरी पुर्ण झालाय. पुढे काय होणार ते माहित नाही. मात्र या क्षणापर्यंत आपण स्वाभीमानही जपला आणि संकल्पही.

गेल्या वर्षाच्या याच दिवसापासून ( २ डिसेंबर २०१३) मी माझ्या पत्रकारितेतील आठवणी आपल्यासमोर सादर केल्या होत्या. यातील तीन भाग वाचून मला मला इतक्या प्रतिक्रिया मिळाल्या की त्यावर एक लेख होऊ शकतो. पत्रकारितेतील आठवणींच्या पहिल्या तीन भागांमध्ये ‘देशदुत’मधील स्मृती जागविल्या होत्या. आजच्या भागात ‘साईमत’विषयी! खरं सांगतो…देशदुतमधील माझी कारकीर्द ही एखाद्या अभिजात कसोटी क्रिकेट सामन्याप्रमाणे रंगली. मस्तपैकी तबियतने खेळायचे. जोरदार डिफेन्स आणि तेवढीच तुटून पडण्याची आक्रमकता. कधी कंटाळवाणे टुकुटुकु तर कधी आडव्या-तिडव्या फटक्यांचे उसने अवसान! मजेत चालू होते सारे…मात्र एका ठिकाणी राहिल्यास साचलेपणाचा धोका होताच…यातच मनाचा संकल्प देशदुतमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षे थांबण्याचा होता; त्यालाही तब्बल अडीच वर्षे वर लोटली. यामुळे अखेर ‘साईमत’च्या संसारात दाखल झालो. मी मागेच सांगितले आहे की ‘देशदुत’मध्ये असतांनाच ‘साईमत’च्या निर्मितीत माझा पहिल्या दिवसापासून वाटा होता. यामुळे येथे आल्यावर मला स्वत:च्या घरात आल्यासारखे वाटले.

{ वाचा आठवणींच्या मालिकेतील आधीचे तीन भाग

* पत्रकारितेतील पहिले पाऊल

* देशदूतचे दे धमाल दिवस

* सृजनशील साडेसाती }

मी माझ्या आठवणींमध्ये नमुदही केलेय की, ‘शेखर पाटील देशदुत सोडून साईमतमध्ये गेला’ ही बर्‍याच जणांना चक्कर आणणारी बातमी वाटली होती. (काहींना अजूनही वाटते!) मात्र ‘साईमत’मध्ये जातांना मी माझ्या शैलीत फरक केला. एक तर कसोटी ही नावलौकीक प्रदान करणारी असली तरी जमाना ‘टी-२०’चा आहे. यामुळे देशदुतमधील माझ्यातील कसोटी खेळाडू हा साईमतमध्ये उत्साहाने फसफसणार्‍या एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे ‘टी-२०’साठी सज्ज झाला. यामागे अनेक कारणे होती. एक तर देशदुत आणि साईमतची जातकुळी पुर्णपणे वेगळी आहे. एक प्रस्थापित ब्रँड असून दुसर्‍याला त्या वेळेपर्यंत ओळख मिळालेली नव्हती. यामुळे धोके पत्करून काही जोरदार टोले मारणे भाग होते. यावेळी आपण आजवर अभिजात पध्दतीने खेळत होतो हे पुर्णपणे विसरणे भाग होते. याचा सर्वात मोठा परिणाम माझ्या दृष्टीकोनावर झाला. आजवर एखादी बातमी वा प्रसंगावरून आपण कोणत्या आशयाचा लेख करू याच्या चिंतेत असणारा मी आता यावर आपण बातमीच्या स्वरूपात काय आक्रमक भाष्य करू शकतो याबाबत विचार करू लागला. यातून माझ्या विचारांचा पुर्णपणे फोकस हा स्थानिक पातळीवर आला.

देशदुतमध्ये असतांना मी इतके विविधांगी लिखाण केले की आता हसू येते. च्यामारी एकही विषय सोडला नाही. ‘साईमत’मध्ये मात्र हे लिखाण टाळले. कारण आम्ही जगाला फार काही विचारप्रवर्तक वा क्रांतीकारक वगैरे असले काही देत नाही. ताजे वृत्त आणि नाविन्यपुर्ण विश्‍लेषणावरच ‘साईमत’चा भर राहिला असून तो वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळे येथे आपली विद्वत्ता पाजळण्यापेक्षा ‘टी-२०’चा थरार अनुभवणे हेच उत्तम. आणि याचा मी पुरेपुर आनंदही लुटतोय. विशेष म्हणजे ‘साईमत’ला बळ प्रदान करण्याचे काम माझे तर चेहरा बर्‍हाटे साहेबांचा असे आम्ही ठरवून घेतले. यामुळे एखाद्या संपादकाला आपल्या वर्तमानपत्राच्या ब्रँडिंगसाठी कायकाय करावे लागते ती सर्व जबाबदारी बर्‍हाटे साहेबांनी सांभाळली आहे. म्हणजे समाजातील लब्धप्रतिष्ठितांसोबत उठबस करण्यापासून ते विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून जाणे तसेच उपस्थिती लावण्याचे काम साहेबांकडे आहे. मी मात्र पुर्णपणे अंकावर लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामी येथे बर्‍यापैकी निवांतपणा मिळाला. याचा मी माझ्या आवडी जोपासण्यासाठी पुरेपुर उपयोग करून घेतला. याचे जगाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दृश्य स्वरूप दिसले. खरं तर महाविद्यालयीन जीवनापासूनच मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रचंड रस होता. यात हॅम रेडिओसह काय-काय उद्योग केले हेदेखील स्वतंत्रपणे लिहणारच आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू’ आणि ‘सायन्स रिपोर्टर’ या मासिकांचे बरेचसे अंक माझ्याकडे होते. अर्थात देशदुतमध्ये दाखल होण्याआधी इंटरनेटचे वेड लागले होतेच. यातून तंत्रज्ञानाची दिशा इलेक्ट्रॉनिक्सकडून माहिती तंत्रज्ञानाकडे वळली.

‘साईमत’मध्ये दाखल झालो तोपर्यंत यात बर्‍यापैकी ‘तयार’ झालो होतो. एव्हाना माझा प्रस्तुत ब्लॉगही अस्तित्वात आला होता. यानंतर तंत्रज्ञानात काही तरी करावे म्हणून ‘जळगाव लाईव्ह’ची संकल्पना सुचली. आज पहिल्यांदा सांगतो की, अनेकदा मी गुगलमध्ये उगाचच शेखर पाटील नाव टाईप करून सर्च करत असे. आणि आपल्या नावाशी संबंधीत वेबवर अगदी काहीही नाही यामुळे खट्टू होत असे. यातूनच ‘शेखर पाटील डॉटकॉम’ मेहनतीने तयार केले. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे इंटरनेटवर काहीही अस्तित्व नसल्याचे पाहून फक्त जिल्ह्यातील हॅपनिंग्जला प्राधान्य असणारे ‘जळगाव लाईव्ह’ १४ डिसेंबर २०१० रोजी अस्तित्वात आले. हे पोर्टल सुरू केल्यानंतर पहिले काही महिने मी यावर स्वत:ची कोणतीही ओळख ठेवली नाही. यथावकाश लोकांना कळाल्यानंतर काही मित्रांनी याचे जोरदार ‘लॉंचिंग’ करण्याचा सल्ला दिला. मात्र मी हे मनावर घेतले नाही. यातच १९ जानेवारी २०१२ रोजी मला अचानक राज्य मराठी विकास संस्थेकडून पहिल्यांदा फोन आणि नंतर ई-मेल आला. यात ‘जळगाव लाईव्ह’ला तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट मराठी संकेतस्थळ हा पुरस्कार मिळाला असून राजभाषा दिवसाला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पारितोषिक मिळणार असल्याचे कळले तेव्हा पत्रकारितेतील पहिला सार्थकतेचा क्षण आल्याचे वाटले.

झाले…२७ फेब्रुवारी २०१२ रोजी दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात पारितोषिक घेतांना मन उचंबळून आले. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात ‘जळगाव लाईव्ह’चा संदर्भ घेत ‘‘जिल्हा पातळीवरील इतके चांगले काम होत असेल तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचे भवितव्य निश्‍चितच उज्ज्वल आहे’’ असे म्हटले तेव्हा अंगावर उगीच मुठभर मांस चढल्यासारखे झाले. हे पारितोषिक मिळाल्यानंतर १९ मे २०१२ रोजी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जळगाव लाईव्ह’ अधिकृतरित्या लॉंच केले. याप्रसंगी माझे गुरूवर्य सुभाष सोनवणे साहेब यांनी आवर्जून उपस्थिती लावली. आज ‘जळगाव लाईव्ह’ अस्तित्वात येऊन जवळपास चार वर्षे होत असतांना जवळपास एक ब्रँड बनला असल्याने समाधान वाटते. प्रारंभीची दीड-दोन वर्षे मी दैनंदिन काम सांभाळून मीच पोर्टलवर बातम्या अपडेट करत असते. यथावकाश मिलींद कोल्हे, तुषार भांबरे आणि जितेंद्र कोतवाल या सहकार्‍यांनी (स्वत:हून इच्छा दाखवत) हे काम समजून घेतले. आज कार्यालयीन वेळेत मिलींद कोल्हे आणि जितेंद्र कोतवाल तर सायंकाळी तुषार हे काम सांभाळत असल्याने मी बर्‍यापैकी निर्धास्त झालो. अर्थात हा वेळ सत्कारणी लागावा म्हणून काय करावे हा प्रश्‍न मन पोखरू लागला. यातून व्यावसायिक पातळीवर काम करण्याआधी एखादा मोठा प्रोजेक्ट करावा हा विचार मनात होताच. याची संधीदेखील लवकरच मिळाली.

जळगाव जिल्ह्यातील सर्व बातम्या एकाच ठिकाणी देणारा प्लॅटफॉर्म ‘जळगाव लाईव्ह’च्या रूपाने अस्तित्वात आणल्यानंतर याचप्रमाणे अन्य क्षेत्रांकडे माझी नजर गेली. यात मराठीत तंत्रज्ञानविषयी माहितीचा एकही स्त्रोत नसल्याचे लक्षात आले होते. याशिवाय महाराष्ट्र चालविण्याचे निर्णय होत असलेल्या मंत्रालयाविषयीदेखील एकाच ठिकाणी बातम्या एकाच ठिकाणी देणारे व्यासपीठही नसल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने ‘टेकवार्ता’ आणि ‘मंत्रालय लाईव्ह’ हे पोर्टल्स अस्तित्वात आले. यांना व्यापक पातळीवर पोहचवण्यासाठी माझे उद्योजक मित्र तथा जनशक्ती समुहाचे प्रमुख कुंदन ढाके यांची सोबत घेतली. आज या दोन्ही वेबसाईटला मराठी जनांची पसंती मिळाली आहे. यातील ‘मंत्रालय लाईव्ह’ला तर लॉंच झाले नसतांनाही दहा हजारावर फेसबुक लाईक्स मिळाले आहेत. प्रशासन आणि जनतेतील हा मराठीत असणारा एकमेव दुवा भन्नाट हिट होण्याचे संकेत मिळाले आहेच. पाहूया पुढे काय होते ते!

आज माझ्या पोर्टफोलियोमध्ये पन्नासच्या वर वेबसाईट आहेत. त्यापैकी ‘जळगाव लाईव्ह’, ‘टेकवार्ता’, ‘मिशन एमपीएससी’, ‘ग्रेट मराठी’, ‘मंत्रालय लाईव्ह’ आदींवर मुख्यत: भर देण्याचे सुरू आहे. येत्या काही दिवसांत एखाद-दुसरे मोठे व्यावसायिक काम मिळण्याची शक्यता आहे. त्यावर बोलणी सुरू आहे. याशिवाय एक देश पातळीवरील हिंदीतील प्रकल्पही हाती घेतला आहे. आज ‘साईमत’च्या माध्यमातून प्रिंट तर या सर्व वेबसाईटच्या माध्यमातून सायबर मीडियात काम सुरू आहे. यातच गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल मीडियाचे सुक्ष्म अध्ययन सुरू आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असून यातील किमान साठ टक्के इंटरनेटयुक्त स्मार्टफोन्स आहेत. जगातील प्रत्येक कंपनीची ‘मोबाईल फर्स्ट’ ही पॉलिसी असतांना आपले याकडे दुर्लक्ष होता कामा नये यासाठी मी सजग आहे. यातून येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासमोर काही तरी नवे सादर करण्याचा माझा मानस आहे. हा सगळा आटापीटा सुरू असतांना नियमितपणे ध्यान, उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन, अभिजात चित्रपटांचा आस्वाद घेणे, कुटुंबासह मित्रमंडळींना वेळ देणे हे कसे जमेल? याचे नियोजनही सुरू आहे. असो…आठवणी बर्‍याच लांबल्या.

‘देशदुत’ने माझा पाया पक्का केला तर ‘साईमत’मध्ये बांधणीचे काम सुरू आहे. कळस वगैरे अद्याप दुर असला तरी जीवनाचा प्रत्येक क्षण सार्थकी लागल्याचा आनंद आहेच. अर्थात मजा येईल तोपर्यंतच पत्रकारितेत रहायचे ठरविले आहे. रोजीरोटीचा ‘जुगाड’ तर कुठुनही लागू शकतो. पत्रकारितेतील बारा वर्षे हा फार मोठा कालखंड नाही. मात्र या एका तपात मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक तर काही पत्रकार आपल्या क्षेत्राला खूप शिव्या देतात. यात आपण उगीच आल्याचा उद्वेग ते व्यक्त करतात. अथवा त्यांच्या डोक्यात प्रचंड हवा शिरलेली असते. ही दोन्ही टोके मला अगदीच अमान्य आहेत. पत्रकारितेतील ही बारा वर्षे मी वायादेखील घालवलेली नाही आणि मी फार काही मोठा बनलेला नाही. अगदी आपल्या गावंढळ भाषेत बोलायचे तर हा काळ ‘ना तर बाराचा फेरा…ना फुकटाचा तोरा’ या प्रकारातील आहे. मी सामान्य आहे…सामान्यपणेच जगणार आणि या जगातून सामान्यपणेच विदा होणार. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एका कवितेत ईश्‍वराला आळवणी करतांना म्हटले आहे की,

मेरे प्रभु,

मुझे इतनी उंचाई कभी मत देना,

गैरो को गले ना लगा सकू,

इतनी रूखाई कभी मत देना॥

मला हे मान्य नाही. कोणतेही पद मोठे नसते तर माणूस सर्वश्रेष्ठ असतो. यामुळे मी तर प्रार्थना करणार की,

मेरे प्रभु,

मुझे शिखर दे अथवा पाताल भेज

तेरा ये बंदा जैसा है वैसा ही रहेगा॥

माझ्या आकांक्षेबद्दल आपल्याला काय वाटते ?

saimat

About the author

shekhar patil

3 Comments

Leave a Comment