इन्फोसीसचे सहसंस्थापक तथा भारतीय आयटी आयकॉन एन. आर. नारायण मुर्ती यांनी भारतातातील अभ्यासक्रमांमध्ये संशोधन आणि कल्पकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. विशेषत: आयआयटी आणि आयआयएस आदींसारख्या जगविख्यात संस्थांनी भारताला अभिमान वाटावे असे काहीही दिले नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. यातून मुर्ती यांनी एका महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधनासाठी भारतीय विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात याबाबत विख्यात शास्त्रज्ञ यशपाल यांनी काही वर्षांपुर्वी खंत प्रकट केली होती. याआधी आणि नंतरही याबाबत अनेकदा चर्चा झडली आहे. यात नारायणमुर्ती यांनी भर टाकली आहे. त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इस्ट्यिट्युट ऑफ सायन्स’मध्ये आयोजित कार्यक्रमात आपले परखड मत मांडले. विश्वविख्यात मॅसेच्युसेटस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात ‘एमआयटी’ या संस्थेने गत ५० वर्षात जीपीएस, मायक्रोचीप आदींसारखे महत्वाचे शोध लावल्याचे त्यांनी सांगितले. ‘फ्रॉम आयडियाज टू इन्व्हेन्शन: १०१ गिफ्ट फ्रॉम एमआयटी टू वर्ल्ड’ या पुस्तकात उर्वरीत संशोधनाबद्दल माहिती असल्याचा संदर्भही त्यांनी दिला. यामुळे गेल्या साठ वर्षात भारतीयांनी इलेक्ट्रीक बल्ब, रेडिओ, दुरचित्रवाणी, इंटरनेट, वाय-फाय, एमआयआय, अल्ट्रासाऊंड आदींप्रमाणे मानवी जीवनावर व्यापक परिणाम करणारा एखादा तरी शोध लावला का? असा खडा सवाल मुर्ती यांनी केला. पाश्चात्य विद्यापीठांमधील संशोधनामुळे मानवी जीवन सुखी झाले असतांना भारतीय विद्यापीठांनी मात्र यात काहीही भर घातली नाही. अगदी आयआयटी व आयआयएस आदींसारख्या विख्यात संस्थांनीही यासाठी कोणतेही कार्य केले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नारायण मुर्ती यांच्या या चिंतनात तथ्य आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. भारतात मुलभुत संशोधनाकडे कुणी वळत नाही हे सत्य आहे. याला मुळातच शासकीय आणि खासगी पातळीवर असणारी अनास्था कारणीभुत आहे. करियर हा शिक्षणाचा मुळ हेतू असतो. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये शासकीयच नव्हे तर खासगी पातळीवरही संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे तेथे मोठ्या प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. भारतात मात्र प्रचंड अनास्थेमुळे ही बाब शक्य नाही. केंद्र व राज्य सरकारे यावर कमी खर्च करतात. खासगी पातळीवरही यात कुणी फारशी गुंतवणूक केलेली नाही. यामुळे किमान आयआयटी आणि आयआयएस यांच्यासारख्या संस्थांनी तरी संशोधनात हातभार लावण्याची अपेक्षा गैर नाही. आयआयटी हा तर जगभरात एक ‘ब्रँड’ बनलेला आहे. येथून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. आजही या संस्थेचा लौकीक कायम असतांना नारायण मुर्ती यांनी मात्र संशोधनाच्या मुद्यावरून या संस्थेच्या विश्वासार्हतेवरच नेमके बोट ठेवले आहे. अर्थात याची भारताला किंमतही चुकवावी लागली आहे. खुद्द मुर्ती यांनीच यावर विवेचन केले आहे.
भारतात सर्वात खराब सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे. आपल्या नद्या जगातील सर्वात प्रदुषीत आहेत. शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, दरडोई उत्पन्न, कुपोषण, निरक्षरता आदी निकषांवरही आपण खूप मागे आहोत. यामुळे आपण आधीच जगाच्या मागे आहोत. यातच गेल्या सहा दशकांमध्ये भारतीयांनी जगाला दीपवून टाकणारी एखादी संकल्पना, विचार, संशोधन आदी केले नसल्याबद्दल नारायण मुर्ती यांनी खंत व्यक्त केली. यावर मात करण्यासाठीही त्यांनी या भाषणात सखोल विवेचन केले. यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. १९६०च्या दशकात तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या अमेरिका दौर्यात तेथील भारतीय संशोधकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले होते. यातून अनेक शास्त्रज्ञ भारतात परतल्याने हरीतक्रांती, धवलक्रांती आदींसोबत भारताचा अवकाश/आण्विक कार्यक्रमही पुढे सरकल्याचे त्यांनी सांगितले. साठच्या दशकातील हे भारलेले वातावरण परत आणण्याचे आवाहनही नारायण मुर्ती यांनी केले.
नारायण मुर्ती यांनी आपल्या भाषणातून नेमक्या वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. त्यांनी तर विज्ञान-तंत्रज्ञानावरच चिंतन केलेय. मात्र वाणिज्य, वित्त, साहित्य, कला, चित्रपट, मानसशास्त्र, संगीत आदी विविध क्षेत्रांमध्ये तरी भारतीयांनी कोणताही युग प्रवर्तक विचार मांडलेला नाही ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. अलीकडच्या काळात प्राचीन भारतीय विद्यांचे उदात्तीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. वरिष्ठ केंद्रीय मंत्रीदेखील प्राचीन भारतातील कथित विमानविद्या, क्षेपणास्त्र प्रणाली, शल्यचिकित्सा आदींची वाखाणणी करण्यात मग्न आहेत. भुतकाळाचे उदात्तीकरण हे कितीही मनभावन असले तरी याची वस्तुस्थितीवर आधारित चिकित्सा होणे आवश्यक आहे. तसे मात्र होतांना दिसून येत नाही. याच्या अगदी विरूध्द गतकाळात न रमता भविष्याचा वेध घेणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जग बदलून टाकणारे शोध लावताहेत. यात अमेरिका व पाश्चात्य राष्ट्रांसोबत चीन, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आदी राष्ट्रेदेखील आघाडीवर आहेत.
प्राचीन भारतात आयुर्वेद, योगविद्या, ज्योतिष, गणित आदी क्षेत्रांमध्ये भारतीय आघाडीवर होते. विशेषत: गणितात भारताने शुन्याच्या रूपाने मौलिक भर घातली आहे. तर फटाके, क्षेपणास्त्र, कागद निर्मिती आदींमध्ये चीन आघाडीवर होता. आपण भुतकाळातच रंगून जात असतांना चीन आपल्या कित्येक पटीने पुढे निघून घेला आहे. नव्वदच्या दशकात जगभरात झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा भारतातही परिणाम झाला. मुळातच भारतीय शिक्षण पध्दती ही ब्रिटीशांच्या प्रणालीवर आधारित आहे. आपल्याकडे इंग्रजी सुलभ पध्दतीने समजणारा मोठा वर्ग आहे. यामुळे नव्वदच्या दशकात भारतीय तरूण मोठ्या संख्येने सिलीकॉन व्हॅलीत गेले. अनेक जण मोठ्या पदांवर विराजमान झाले. आजही मायक्रोसॉप्टसह अनेक आयटी कंपन्यांची धुरा मूळ भारतीय असणार्या तंत्रज्ञांच्याच हातात आहे. इकडे भारतातही या लाटेने नवीन संधी निर्मित केल्या. खुद्द नारायण मुर्ती यांच्या ‘इन्फोसीस’सह, विप्रो, पटणी, टिसीएस आदी कंपन्या यामुळे भरभराटीस आल्यात. यातून लक्षावधी तरूणांना रोजगार मिळाला. अर्थात यातही कल्पकता, नाविन्य, संशोधनवृत्ती आदींचा अभाव होता. कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्यात पारंगत झाले म्हणजे फार काही मिळवले असे नाही. तर सॉफ्टवेअरचे प्रोग्रॅमिंग व हार्डवेअरलाही तेवढेच महत्व आहे. मात्र भारतीयांनी फक्त विविध प्रकारच्या सॉप्टवेअर्समध्ये पारंगत होण्यास प्रारंभ केला. याचा विचार करता नव्वदच्या दशकात पाश्चात्यांपेक्षा स्वस्त दरात काम करणारे ‘सायबर कुली’ तयार झाल्याचा अनेकदा आरोप करण्यात येतो यात तथ्य नक्कीच आहे. यामुळे सिलीकॉन व्हॅलीत भारतीयांना साहजीकच प्राधान्य मिळाले. भारतीय आयटी कंपन्यांनीही याचाच लाभ घेतला. यातील बहुतांश कंपन्या आऊटसोर्सींगच्या कामांवर नावलौकीकास आल्या. आऊटसोर्सींगमुळे पाश्चात्य राष्ट्रांना अतिरिक्त महागड्या मनुष्यबळाऐवजी भारतीय कंपन्यांकडून काम करणे सोयिस्कर झाले. तंत्रज्ञान जसे विकसित झाले त्यानुसार हा प्रकार वाढत गेला. परिणामी स्वस्त दरात काम करणार्या भारतीय अभियंत्यांना अमेरिकेसह अन्य आधुनिक राष्ट्रे तसेच भारतीय कंपन्यांनी हातोहात उचलले. यात नारायण मुर्ती यांना अभिप्रेत असणार्या मुलभुत संशोधनाचा साहजीकच बोजवारा उडाला. म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेने अनेकांना रोजगार दिला असला तरी भारतातील बुध्दीमान तरूण संशोधनाच्या वाटेला गेले नाहीत. यामुळे नारायण मुर्ती यांनी आयआयटी व आयआयएस या संस्थांवर टीका करतांना आपण स्वत: मुलभुत संशोधनात काय भर टाकली? हे सांगणे महत्वाचे आहे. त्यांनी आपल्या भाषणात इन्फोसीसने ‘ग्लोबल डिलीव्हरी सिस्टिम’ आणि ‘२४ अवर्स वर्क डे’ ही प्रणाली जगाला दिल्याचे अभिमानाने सांगितले. मात्र याचा इन्फोसीसला लाभ होण्यापलीकडे काय झाले? याचा उहापोहदेखील त्यांनी करणे अभिप्रेत आहे. खरं तर या प्रणाली आधीपासूनच अस्तित्वात होत्या. यातच ‘इन्फोसीस’ची ओळख ही ग्राहककेंद्रीत कंपनी म्हणून जागतिक पातळीवर बनली आहे. या कंपनीच्या ‘आर अँड डी’च्या तरतुदीत अलीकडच्या वर्षात सातत्याने घट होत आहे. म्हणजे खुद्द मुर्ती यांची कंपनीच नाविन्य आणि कल्पकतेला प्राधान्य देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारतीयांना विज्ञानात महत्वाचे टप्पे गाठले. यात पोखरणच्या दोन्ही अणुचाचण्या, ‘इस्त्रो’च्या माध्यमातून केलेली देदीप्यमान वाटचाल-विशेषत: मंगलयानाची यशस्वी स्वारी, विविध क्षेपणास्त्रांना विकसित करणे, स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान आदींचा आपण अभिमानाने उल्लेख करू शकतो. मात्र नारायण मुर्ती म्हणतात त्यानुसार यात जगाला दीपवणारे फार थोडे आहे. बरं मुलभुत संशोधानाप्रमाणेच तंत्रज्ञानातही हीच बोंब आहे.
वर नमुद केल्याप्रमाणे नव्वदच्या दशकापासून भारतीयांनी सॉफ्टवेअर व फार तर प्रोग्रॅमिंगमध्ये लक्ष दिले. याचा फायदा निश्चित प्रमाणात झाला. मात्र हार्डवेअरकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडले. एकविसाव्या शतकाचा उदय होत असतांना यात अमेरिकन कंपन्या आघाडीवर होत्या. मात्र चिनी कंपन्यांनी यात जोरदार मुसंडी मारली. आज दहा-पंधरा वर्षात यात चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. लेनोव्हो, एसर आदी ग्लोबल ब्रँड बनले आहेत. याचप्रमाणे दक्षिण कोरियासारख्या लहानशा राष्ट्रांमधून सॅमसंग, एलजीसारख्या कंपन्यांचा उदय झाला. आज हार्डवेअरमध्ये आपली अत्यंत दयनीय अवस्था आहे. स्मार्टफोनच्या प्रचारामुळे आता संगणकच कालबाह्य ठरण्याचा धोका आहे. याच्या निर्मितीतही ऍपल, सॅमसंग आदींसारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. जगातील पहिल्या दहा स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये शेवटच्या क्रमांकावर एकमेव मायक्रोमॅक्स ही भारतीय कंपनी आहे. अगदी दोन-तीन वर्षात उदयास आलेल्या शिओमीसारख्या कंपन्या जागतिक पातळीवर प्रस्थापित होत असतांना भारतीय कंपन्या दुय्यम पातळीपर्यंतच पोहचू शकल्या आहेत.
आज विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये अत्यंत सखोल मुलभुत संशोधन होत आहे. याचसोबत तंत्रज्ञानही प्रचंड गतीने बदलत आहे. आगामी काळात स्मार्टफोनच्या लाटेवर स्वार होत अनेक वैविध्यपुर्ण तंत्रज्ञान मानवी जीवनाला आमूलाग्र बदलून टाकण्याच्या तयारीत आहे. यातच वेअरेबल्स, व्हर्च्यअल रिऍलिटी आदी तंत्रज्ञान उंबरठ्यावर उभे आहे. प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होण्याच्या मार्गावर आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्कींग साईटने जग कनेक्ट झाले आहे. व्हाटसऍपसारख्या मॅसेंजरने कोट्यवधींना वेड लावले आहे. यातही भारतीय कंपन्या आहेत कोठे? रिटेलींगमध्ये क्रांती करणारे ई-कॉमर्स भारतात रूजले आहे. यातून फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या कंपन्यांनी बाळसे धरले आहे. मात्र आता अमेझॉन आणि अलिबाबासारख्या विदेशी कंपन्यांनी भारताकडे लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारने आगामी काळात या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढविल्यास भारतीय कंपन्या गोत्यात येणार हे नक्की. कारण विदेशी कंपन्यांचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात नाही. म्हणजे मुलभुत संशोधनाप्रमाणेच तंत्रज्ञानातही भारताची स्थिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम मोठ्या उत्साहाने सुरू केली आहे. मात्र आज जगातील तमाम कंपन्या भारतात उत्पादनासाठी उत्सुक असतांना भारतीय कंपन्या जागतिक पातळीवर कमी पडत असल्याचे चित्र आहे. खरं तर पंतप्रधानांनी कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीलाही प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. मात्र यात निव्वळ सुलभ रोजगार निर्मिती हा उद्देश ठेवल्यास आपल्याकडे फार तर कुशल कामगार व तंत्रज्ञ निर्माण होतील, संशोधक नव्हेत! हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे मुलभुत संशोधनासाठी व्यापक प्रयत्न होतील तेव्हाच आजचे निराशाजनक चित्र बदलेल. अन्यथा काल यशपाल यांनी खंत व्यक्त केली, आता नारायण मुर्ती यांनी खडे बोल सुनावले तर भविष्यातही कुणी तरी मान्यवर यावर विचार व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. अर्थात पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच…