विज्ञान-तंत्रज्ञान

नवमाध्यमांची क्रांती!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘जंतर मंतर’ वरील आंदोलनाचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पार पडला. यानिमित्ताने देशभरात उसळलेली लाट ही अत्यंत आश्‍चर्यकारक अशीच आहे. या आंदोलनातील तरूणाईचा सक्रीय सहभाग आणि यासाठी त्यांनी वापरलेली अत्याधुनिक संपर्कसाधने ही येणार्‍या युगाची नांदी ठरणार आहे.
२१ सप्टेंबर १९९५ रोजी सकाळी नवी दिल्ली येथील एका गणेश मूर्तीने दुध पिल्याची घटना अवघ्या काही तासात जगभर पोहचली होती ही बाब आपणास आठवत असेल. आजच्या तुलनेत अगदीच प्राथमिक स्वरूपाची संपर्क यंत्रणा असूनही गणपतीचे कथित दुध प्राशन प्रचंड गतीने पसरले होते. आज तर अगदी क्षणाक्षणाची खबर देणार्‍या वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स आणि सोशल नेटवर्कींग साईटस् आदींची रेलचेल आहे. या माध्यमांची ताकद वेळोवेळी सिध्दही झाली आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलनात या माध्यमांनी बजावलेली भूमिका ही अत्यंत विस्मयजनक अशीच म्हणावी लागेल.
क्रिकेटच्या विश्‍वचषकात अवघा देश रंगलेला असतांना अण्णा हजारे यांनी आपले नियोजित उपोषण पुढे ढकलल्याची बातमी वर्तमानपत्रांच्या अगदी कोपर्‍यात छापून आली होती. दोन एप्रिलला आपल्या संघाने विश्‍वचषक पटकावल्यावर तर येत्या काही महिन्यांपर्यंत या खेळाडुंचे कोडकौतुक सुरू राहिल असे वाटले होते. मात्र आता हा विश्‍वचषक काही महिन्यांपूर्वी झाला की काय? ही शंका वाटू लागली आहे. ही किमया घडलीय अत्याधुनिक प्रसारमाध्यमे त्यातही न्यू मीडियामुळे! देशात आजवर अनेक आंदोलने झाले. यापैकी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने अत्यंत व्यापक स्वरूप धारण केले होते. विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केल्यावरही देश ढवळून निघाला होता. या दोन्ही कालखंडापेक्षा अण्णा हजारे यांना अत्यंत व्यापक पाठिंबा मिळाला.
जयप्रकाश नारायण अथवा व्ही.पी. सिंग यांच्या कालखंडात प्रसारमाध्यमे हे मुख्यत: छापील स्वरूपातील होती. यात हस्तक्षेप करण्याचा अथवा आपले मत प्रदर्शीत करण्याचा वाचकांना अधिकार नव्हता. असल्यास त्यावर मर्यादा होती. आजही छापील प्रसारमाध्यमांचे स्थान अबाधित असले तरी जनतेच्या मदतीला कुणाचेही निर्बंध नसणारा न्यू मीडिया आला आहे. फेसबुक, ट्विटर यांच्या सारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्, ब्लॉग्ज, कम्युनिटी पोर्टल्स आदींवर सरकारी अथवा खासगी बंधने नाहीत. यामुळे लक्षावधी नागरिकांनी या माध्यमाचा यथेच्छ वापर करत या आंदोलनात आपापल्या परीने हातभार लावला. यापूर्वी कोणत्याही आंदोलनास समर्थन द्यावयाचे झाल्यास यात सक्रीय सहभागी व्हावे लागत असे. आज मात्र कोट्यवधी नागरिकांनी आपल्या घरी अथवा कार्यालयात बसूनही अण्णांच्या आंदोलनाचा वन्ही चेतविला. सायबरविश्‍वात अण्णांच्या आंदोलनास प्रचंड पाठिंबा मिळण्यासाठी अर्थातच तरूणाईच्या मनातील आक्रोश कारणीभूत ठरला. आपल्या देशात तरूणाईचा टक्का जगात सर्वाधिक आहे. त्यांना मार्ग दाखविणारे अण्णा हजारेंसारखे समाजसेवक आणि याच्या जोडीला न्यू मीडिया असल्यास देशात क्रांती घडविणे अगदीच अशक्य नाही हेदेखील या आंदोलनाने दाखवून दिले आहे.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनास कितपत यश आले अथवा याचा शेवट काय होणार याविषयी मतभिन्नता असू शकते. मात्र या आंदोलनाने देशाच्या इतिहासात एक विभाजन रेषा तयार झाली हे मात्र निश्‍चित. येणार्‍या काळात क्रांतीचा बिगुल या नवमाध्यमांच्या मदतीनेच फुंकला जाणार आहे. या क्रांतीलढ्यासाठी कोणत्याही शस्त्रास्त्रांची आवश्यकता नाही. सत्ताधार्‍यांची गुर्मी उतरवण्यासाठी अण्णा हजारे सारखे निस्वार्थी नेतृत्व असले की बस्स! कोणते वर्तमानपत्र अथवा चॅनलने प्रसिध्दी दिली नाही तरी एखाद्या वणव्याप्रमाणे क्रांतीचा संदेश पसरवणे शक्य आहे. एका अर्थाने आता प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. याला ‘मॅनेज’ करणे शक्य नसल्यामुळेच सत्ताधार्‍यांना धडकी भरली आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment